ब्रम्हादेवाप्रत देव भाषण करतात. हे भगवान, आम्ही दैत्यांबरोबर युद्ध करण्याविषयी समर्थ नाही. यास्तव हे शरण्य, तुजप्रत शरण आलो ॥१॥
क्षीरसमुद्रामध्ये विष्णु आहे तो तुम्हांस जो केतु देईल त्याला पाहून युद्धामध्ये तुमचे समोर दैत्य उभे रहाणार नाहीत असे ब्रम्हयाने देवांस सांगितले ॥२॥
असा पूर्वोक्त ब्रम्हादेवाचा वर प्राप्त झाला असता, ते इंद्रादि देव, क्षीरसमुद्राप्रत जाऊन श्रीवत्सचिन्हित, कौस्तुभमण्याच्या किरणांनी प्रकाशित आहे उरस्थल ज्याचे अशा नारायणाची स्तुति करिते झाले ॥३॥
लक्ष्मीचापति, अचिंत्य, अतुल्य, सर्वांच्याठाई सम, सर्व प्राण्यांस दुर्विज्ञेय, परमात्मा, अनादि, व्यापक, ज्याचा अंतही समजत नाही (अनंत) असा तू आहेस (अशी भगवंताची स्तुति देवांनी केली) ॥४॥
त्या इंद्रादि देवांनी स्तुति केली असता, तो नारायणदेव संतुष्ट होऊन, देवाकारणे दैत्यस्त्रियांच्या मुखकमलसमूहास, चंद्रासारखा आकुंचित करणारा व देवस्त्रियांच्या मुखकमलसमूहास, सूर्यासारखा प्रफुल्लित करणारा ध्वज देता झाला ॥५॥
विष्णुते जापासून उत्पन्न झालेला, लखलखीत, रत्नांनी चित्रविचित्र आठ चाकांच्या रथावर उभारलेला, शरद्दतूतील सूर्यासारखा चकचकीत अशा ध्वजाते प्राप्त होऊन, इंद्र आनंद पावता झाला ॥६॥
तो इंद्र, बारीक घंटांनी सुशोभित व माला, छत्र, घंटा, पिटक (भूषण) यांनी युक्त अशा उभारलेल्या ध्वजाने युद्धामध्ये शत्रुसैन्याचा नाश करिता झाला ॥७॥
इंद्र, चेदिदेशाचा राजा, उपरिचर (स्वर्गावर फिरणारा) जो वसुनामक राजा त्यास ध्वज देता झाला. तो राजा ध्वजाच्या वेणुमय (बांबूच्या) त्या काठीते यशाशास्त्र पूजिता झाला ॥८॥
पूजेने संतुष्ट झालेला इंद्र भाषण करिता झाला. असे पूजन जे राजे करितील ते वसुराजासारखे द्रव्यवान होतील व त्यांची आज्ञा भूमीवर सर्व पालन करतील ॥९॥
त्यांच्या प्रजा आनंदित, भय व रोग यांनी रहित, बहुत अन्नाने युक्त अशा होतील व तो ध्वजच भूमीवर निमित्तांनी शुभाशुभफल सांगेल ॥१०॥
पराक्रम, कुलाची व धनाची वृद्धि, शत्रुपराजय यांते इच्छिणार्या राजांनी इंद्राज्ञेने पूर्वीप्रमाणे प्रयुक्त अशी त्या ध्वजाची पूजा करावी. ती पूजा मी ऋषींनी सांगितलेल्या शास्त्रावरून सांगतो ॥११॥
तो ध्वज करण्याचा प्रकार सांगतो. शुभकरण, वार, नक्षत्र, मंगलशकुन व प्रयाणोक्त मुहूर्त पाहून, जोशी व सुतार यांनी अरण्यात जावे ॥१२॥
बाग, देवालय, श्मशान, वारूळ, मार्ग, यज्ञभूमि, यांच्याठाई झालेले; कुब्ज (लहान,) वर सुकलेले, काटयांचे, वेलीनी युक्त, वंदाक (बांचे) याने युक्त ॥१३॥
बहुत पक्ष्यांचे घरटे व ढीली यानी युक्त, मोडलेले व जळके व स्त्रीलिंगी नावाचे असे वृक्ष इंद्रध्वजार्थ शुभ नाहीत ॥१४॥
अर्जुन (साद्डा यासच ताम्हान म्ह०,) साग, कळंब, धव (धावडा,) उंबर हे पाच वृक्ष शुभ होत. यातून एकादा वृक्ष अथवा अन्य प्रशस्त वृक्ष इंद्रध्वजास शुभ होय ॥१५॥
गौरवर्ण किंवा काळी नव्हे अशा भूमीवर झालेल्या वृक्षाप्रत ब्राम्हाणे प्रथम मनुष्यरहितवेळी रात्री जाऊन, यथाशास्त्र पूजा करून स्पर्श करावा आणि हा वक्ष्यमाण मंत्र म्हणावा ॥१६॥
जी या वृक्षावर भूते असतील त्यांचे कल्याण असो. तुम्हांस नमस्कार असो. हा मी दिलेला बलि याते ग्रहण करून अन्यत्र राहण्यास जावे ॥१७॥
हे उत्तमवृक्षा, तुझे कल्याण असो. राजा, इंद्रध्वजाकारणे तुझी प्रार्थना करितो. ही पूजा ग्रहण करावी ॥१८॥
नंतर प्रात:काळी उदङमुख किंवा प्राङमुख होऊन, तो वृक्ष तोडावा. तोडतेवेळी कुर्हाडीचा शब्द व्हावा तसा न होता निराळाच शब्द होईल तर अशुभ होय. स्निग्ध (मधुर,) घन (जोराचा) शब्द होईल तर शुभ होय ॥१९॥
मोडल्यावाचून व मुरगळ्यावाचून, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे, दुसर्या वृक्षावर न लागता, असा पडलेला वृक्ष राजांस जय देतो. याहून विपरीत पडलेला वृक्ष टाकावा ॥२०॥
नंतर त्या वृक्षाचे चार अंगुले अग्र तोडावे व आठ अंगुले मूळ तोडावे आणि ती काठी पाण्यामध्ये टाकावी. नंतर पाण्यातून काढून गाडयावर घालून न्यावी अथवा मनुष्यांनी न्यावी ॥२१॥
गाडयाचे चाकांतील मध्यकाष्ठ मोडेल तर सैन्याचा भेद होतो. चाकाचा बाहेरचा भाग मोडेल तर सैन्याचा नाश होईल. आस मोडेल तर द्रव्यनाश होतो. आसाची खील मोडली तर सुताराचा नाश होतो ॥२२॥
भाद्रपद शुक्लाष्टमीस उत्तमवेष (पोशाख) धारण करणारे नागरिक लोक, दैवज्ञ, प्रधान, अंत:पुराचा पाहरेकरी, ब्राम्हाणप्रमुख यांनी युक्त राजाने ॥२३॥
अहतवस्त्राने वेष्टित व माला, गंध, धूप, यांनी युक्त अशी इंद्रध्वजसंबंधी काठी नागरिक लोकांकरवी शंख व वाद्ये यांच्या शब्दांसहित नगरामध्ये आणावी ॥२४॥
सुंदर पताका, तोरण व नवमाला (पत्रपुष्पमाला) यांनी सुशोभित, आनंदित जनांनी युक्त, भिजवलेले व सुशोभित असे आहेत मार्ग ज्यामध्ये असे, सुंदर वेश्यासमूहाने व्याप्त, ॥२५॥
पूजित आहेत बाजारातील गृहे (दुकाने) ज्यांच्याठाई असे, बहुत मंगलशब्द व वेदघोष हे आहेत ज्यात असे, नट, नर्तक, गायक यानी व्याप्त आहेत चतुष्पथ (चवाठे) ज्यात अशा नगराप्रत राजाने ती यष्टि आणावी ॥२६॥
त्या नगरामध्ये उभारलेल्या पताका, श्वेतवर्ण विजय देणार्या, पीतवर्ण रोग देणार्या, चित्रवर्ण जय देणार्या, रक्तवर्ण युद्ध देणार्या अशा होतात ॥२७॥
नगरामध्ये जाणार्या यष्ठीते गजादिक पशु पाडतील तर भय होते. मुलांनी त्यावेळी हस्तांनी टाळ्या वाजविल्या तर युद्ध होते. बैल इत्यादि प्राण्यांचे युद्ध झाले तर राजांचे युद्ध होते ॥२८॥
सुताराने ती यष्टि पुन: तासून यथायोग्य यंत्रामध्ये बसवावी (आसनावर काही आधार लावून तिर्कस ठेवावी.) हया यष्टीपुढे राजाने एकादशीस जागरण करावे ॥२९॥
श्वेतवस्त्र व श्वेत उष्णीष (पागोटे) ही धारण करणार्या पुरोहिताने इंद्रदैवत्य व विषुदैवत्य मंत्रांनी अग्नीमध्ये हवन करावे आणि दैवज्ञाने शुभाशुभ चिन्हे पाहावी ॥३०॥
इष्टद्रव्याच्या आकाराचा, सुंदर, स्निग्ध, निबिडज्वालायुक्त असा अग्नि कल्याणकारक होय. याहून अन्यप्रकारचा अग्नि अशुभ होय. याचा विस्तार यात्राप्रकरणी सांगितला आहे ॥३१॥
पूर्णाहुति देतेवेळी प्रयत्न केल्यावाचून स्वत: प्रज्वलित (तेजस्वी) ज्यालायुक्त, निर्मल, प्रदक्षिणज्वालायुक्त, असा अग्नि असेल तर गंगा व यमुना यांचे जल हाच सुंदर हार जिला अशी व समुद्रच आहे कमरपट्टा जिला अशी पृथ्वी राजाच्या स्वाधीन होते ॥३२॥
सुवर्ण, अशोकपुष्प, कुरंटपुष्प, कमल, वैडूर्यमणि, नीलकमल, यासारखा पूर्णाहुतिसमयी अग्नि असेल तर रत्नांच्या किरणांनी नाशित आहे अंधकार ज्याचा असा राजगृहाच्या मधला अवकाश होईल (रत्नांनी पूर्ण राजगृह होईल) ॥३३॥
ज्या राजांच्या अग्नीचा शब्द, रथसमूह, समुद्र, मेघ, गज, यांच्या शब्दांसारखा होईल, त्या राजांच्या गमनकाली मदांध गजसमूहाने चलित अशा दिशा अंधकारासारख्या होतात (त्या राजांच्या पिलखान्यात बहुत गज होतात) ॥३४॥
तो अग्नि, ध्वज, कुंभ, अश्व, गज, पर्वत यांसारखा असेल तर, उदयपर्वत व अस्तपर्वत हे आहेत ओष्ठ जिला अशी व हिमालय व विंध्य हे आहेत स्तन जिला अशी पृथ्वी राजाच्या स्वाधीन होते. ॥३५॥
हत्तीचे मदोदक, भूमी, कमल, लाहया, घृत, मध, यांसारखा गंध अग्नीस येईल तर प्रणतराजांच्या मुकुटमण्यांच्या कांतीनी प्रकाशित अशी भूमी राजाच्या स्वाधीन होते (सकल राजे शरण येतात) ॥३६॥
इंद्रध्वज उचलला असता जे, शुभाशुभफल अग्निस्वरूपांनी सांगितले ते जन्मसमय, यज्ञ, ग्रहशांति, यात्रा, विवाह, इत्यादिकालीही पाहावे (कुल, शील, वृत्त, वित्त यांचा विचार करून जे यथायोग्य असेल ते सांगावे) ॥३७॥
गुळ, अनरसे, खीर इत्यादि पक्वान्ने व दक्षिणा यांनीकरून ब्राम्हाणांची पूजा करून श्रवणयुक्त द्वादशीस अथवा अन्यत्र श्रवणावर तो इंद्रध्वज उभारावा (समोर उभा करावा) श्रवण नसले तरी द्वादशीसच उभारावा ॥३८॥
शक्रध्वजाच्या शोभार्थ कुमारिका सात किंवा पाच शक्रध्वजविधिज्ञांनी कराव्या असे मनुराजा सांगता झाला. त्या कुमारिका, इंद्रध्वजाच्या उंचीच्या चतुर्थांशप्रमाण नंदा व अर्धांशप्रमाण उपनंदा, षोडशभागप्रमाण जय, विजय व दोन वसुंधरानामक कराव्या आणि सातवी अष्टांशप्रमाण इंद्रमातानामक कुमारिका करावी. ती या सहांच्या मध्ये ठेवावी ॥३९॥४०॥
संतुष्ट झालेल्या देवांनी इंद्रध्वजास पूर्वी जी भूषणे केली ती विचित्रस्वरूप भूषणे अनुक्रमाने राजाने द्यावी ॥४१॥
तांबडया अशोकपुष्पासारखा चतुष्कोण अलंकार प्रथम विश्वकर्म्याने इंद्रध्वजास दिला. ब्रम्हादेवाने व शंकराने अनेकवर्णांची रशना (कंबरपट्टा) दुसरी दिली ॥४२॥
अष्टकोण नीलरक्तवर्णाचे तिसरे भूषण इंद्राने दिले. काळे मसूरकनामक चवथे तेजस्वी भूषण यमाने दिले ॥४३॥
लोहितवर्ण षटकोण उदकातील भोवर्यासारखे पाचवे भूषण वरुण देता झाला. मोराच्या पिसांनी केलेले मेघासारखे नीलवर्ण सहावे बाहुभूषण वायु देता झाला ॥४४॥
बहुत चित्रवर्ण, आपले बाहुभूषण ध्वजाकारणे सातवे भूषण कार्तिकस्वामी देता झाला. अग्निज्वालेसारखे आठवे भूषण अग्नि देता झाला ॥४५॥
वैडूर्यमण्यासारखे दुसरे नववे कंठभूषण चंद्र देता झाला. रथचक्रासारखे तेजस्वी दहावे भूषण त्वष्टानामक सूर्य देता झाला ॥४६॥
कमलासारखे उद्वंशनामक अकरावे भूषण विश्वेदेव देते झाले. नीलकमलासारखे निवंशनामक बारावे भूषण मुनि देते झाले ॥४७॥
थोडेसे खालीवर नमलेले वर मोठे लाखेच्या रसासारखे आरक्त असे तेरावे छत्राकार भूषण इंद्रध्वजाच्या मस्तकी बृहस्पति बृहस्पति व शुक्र हे देते झाले ॥४८॥
जे जे भूषण ज्या ज्या देवाने इंद्रध्वजासाठी निर्माण केले त्या भूषणाची देवता निर्माणकर्ता देव होय असे विद्वानांनी जाणावे ॥४९॥
ध्वजप्रमाणाचा तिसरा हिस्सा पहिल्या भूषणाचा घेर होतो. पुढील भूषणाचे घेर मागच्या भूषणापेक्षा अष्टमांश कमी असावे ॥५०॥
अष्टमीपासून चवथ्यादिवशी (एकादशीस) पूर्वोक्तालंकारांनी इंद्रध्वजाचे पूरण शास्त्रज्ञाने करावे (अलंकार घालावे.) प्रथम, राजाने ओणवे राहून, मनूने सांगितलेले आगमोक्त मंत्र नियमाने म्हणावे ॥५१॥
शिव, सूर्य, यम, इंद्र, चंद्र, कुबेर, अग्नि, वरुण, महर्षिसमुदाय, दिशा, अप्सरा, शुक्र, बृहस्पति, स्कंद, वायु, या सर्वांनी ॥५२॥
जसे तुझे अनेकप्रकारच्या महान अलंकारांनीकरून पूजन केले, तसे येथे हे शुभ अलंकार, संतुष्ट होऊन ग्रहण कर ॥५३॥
अज, नाशरहित, शाश्वत, एकरूप, विष्णु, वराह, पुराणपुरुष, अंतक, सर्वहरणकर्ता, अग्नि, सहस्रवदन, शवक्रतु, स्तुत्य ॥५४॥
आद्यविद्वान, सप्तजिव्हा, पालनकर्ता, परमेश्वर, रक्षिता, देवाधिप, वृत्रहंता, शोभनसेनायुक्त, अशा इंद्राते आमंत्रण करतो. आमचे वीर जयवंत होऊन (हा मंत्रांचा अर्थ आहे. हे मंत्र कोणत्यावेळी राजाने म्हणावे तो प्रकार पुढील श्लोकांत सांगतो) ॥५५॥
इंद्रध्वजास अलंकार घालतेवेळेस, उभारतेवेळेस, प्रवेशकाली, स्नानकाली, पुष्णमालासमर्पणी, विसर्जनसमयी उपवासयुक्त होऊन राजाने हे शुभमंत्र पठन करावे ॥५६॥
छत्र, ध्वज, आरसा, फले, अर्धचंद्र, चित्रवर्णमाला, केळी, ऊस, सर्प व सिंह व गवाक्षे यांनीयुक्त अशी भूषणे, अष्टदिशांकडे दिकपालांनी अलंकृत (ही सर्व काष्ठाची करावी) अशा ॥५७॥
ध्वजास अष्टदिशांकडे रज्जु बांधावे. ते तुटके नसावे, बळकट काष्ठाच्या दोन मातृका ध्वजाच्या दोन बाजूंस कराव्या. चांगली आहेत अर्गल व पादतोरण ज्याची असा, वृक्षाच्या साढाच्या फुटलेल्या नाहीत अशा कुमारिकांनी युक्त, तो इंद्रध्वज उभारावा ॥५८॥
मंगलशब्द, आशीर्वाद, नमस्कार यानी संहित निरंतर जनशब्द युक्त, सुंदरपटह (रणवाद्य,) मृदंग, शंख, दुंदुभि त्या इत्यादि वाद्यशब्दयुक्त; वेदविहित वाक्यांते पढणार्या ब्राम्हाणांच्या शब्दांनी युक्त व शुभशब्दयुक्त ध्वज उभारावा ॥५९॥
फले, दधि, घृत, लाहया, मध, पुष्पे, ही आहेत ह्स्ताग्री ज्यांच्या असे, नम्र आहेत मस्तेक ज्यांची असे व स्तुति करणार्या नागरिक लोकांनी वेष्टित असा इंद्रध्वज, राजाने शत्रुवधार्थ शत्रुनगराकडे नम्र आहे अग्र ज्याचे असा करावा ॥६०॥
फार जलद नाही, फार विलंबितही नाही असे, कंपित नाही असे, माळा व भूषणे पडली नाही असे ध्वजाचे उत्थापन राजस शुभ व याहून अन्यथा अशुभ होय. त्या अशुभाची शांति करून उपाध्याने शमन करावे ॥६१॥
गृध्र, घुबड, कपोत, काक, कंक (ज्याच्या पिसांचा बाणास पिसारा करितात,) हे पक्षी जर ध्वजावर बसतील तर राजास महद्भय होते. चाषपक्षी बसेल तर युवराजास भय होते. श्येन (ससाणा) बसेल तर नेत्रपीडा होते ॥६२॥
ध्वजाच्या छत्राचा भंग किंवा पतन होईल तर, राजास मृत्यु. ध्वजास, मधाचे पोळे धरेल तर चोरभय होते. उल्का (अ. ३३ श्लो० ८) पात होईल तर पुरोहितवध होतो. अशनि (अ० ३३ श्लो० ४) पात होईल तर राजाच्या मुख्य स्त्रीचा नाश होतो ॥६३॥
ध्वजाची पताका पडेल तर राजस्त्रियेचा नाश होतो. पूर्वोक्त भूषणे पडली तर अवृष्टि होते. मध्य, अग्र, मूल यांच्याठाई केतुभंग झाला तर अनुक्रमाने प्रधान, राजा, नागरिकलोक यांचा नाश होतो ॥६४॥
तो ध्वज धूमावृत (त्यावेळी आकाशात धूम होईल तर) असता अग्निभय होते. अंधकाराने व्याप्त अ० चित्तास मोह होतो. व्याल (प्राणि विशेष) हे भग्न होऊन पडले तर प्रधाननाश होतो. उत्तरादि दिशांकडे उत्पात झाले तरा अनुक्रमाने ब्राम्हाणादिवर्णांचा नाश होतो. पूर्वोक्त इंद्रकुमारिकांचा भंग झाला तर वेश्यांचा नाश होतो ॥६५॥
दोर्या तुटल्या तर बालांस पीडा. तोरणाचे बाजूचे काष्ठ फुटले तर राजमातेस पीडा. लहान मुले किंवा चारण (भाट) जे जे करतील ते सर्व शुभ किंवा अशुभ तसेच होणार असे समजावे ॥६६॥
चार दिवस पूजित नंतर पाचवे दिवशी उत्थापित असे इंद्राचे चिन्ह (ध्वज) त्याची राजाने पूजा करून प्रधानासहवर्तमान आपल्या बलाची वृद्धि व्हावी एतदर्थ पाचव्यादिवशी त्याचे उत्थापन करावे ॥६७॥
उपरिचरवसूने प्रवृत्त केले व राजांनीही निरंतर केले असे, हे इंद्रध्वजपूजन जो राजा करील तो शत्रुकृत भयाते प्राप्त होणारा नाही ॥६८॥
॥ इतिबृहत्संहितायांइंद्रध्वजसंपन्नामत्रिचत्वारिंशोध्याय: ॥४॥