ज्या द्रव्यांचे स्वामी जे मेषादिराशि, कश्यपादि ऋषींनी द्रव्यांच्या शुभाशुभार्थ (सवंग, महाग यांच्या ज्ञानार्थ) सांगितले; ते शास्त्रावरून सांगतो ॥१॥
वस्त्र, आधिक (कंबल इ०,) कुतप (रानमेंढयाच्या लोकरीचे वस्त्र शाल इ०,) मसूर, गोधूम, देवदाराचा चीक (राळ,) यव, जलरहितभूमीवर झालेल्या औषधी, सुवर्ण यांचा स्वामी मेषराशि होय ॥२॥
व्रस्त्र, पुष्प, गोधूम, शालि (भात,) यव, महिष, बैल, यांचा स्वामी वृषभराशि होय. धान्य, शरद्दतूमध्ये झालेले पदार्थ, वेली, कमलकंद, कापूस यांचा स्वामी मिथूनराशि होय ॥३॥
हरीक, केळी, दूर्वा, जायफळादि सर्व फले, कंद, तमालपत्र, दालचिनी, वृक्षांच्यासाली, नारळ यांचा स्वामी कर्कराशि होय. तुषधान्ये (शाली,) मधुर, आंबट, खारट, कडु, तिखट, तुरट हे षड्विध रस; सिंह, व्याघ्र, मार्जार इत्यादिकांची कातडी; गूळ यांचा स्वामी सिंहराशि होय ॥४॥
जवस, वाटाणे, कुळीथ, गहू, मूग, पावटे यांचा स्वामी कन्याराशि होय. उडीद, गहू, मोहरी, सातु यांचा स्वामी तूलराशि होय ॥५॥
ऊस, सैक्य (सिंचनाने झालेले वल्लीफलादि,) लोह, बकरा, मेंढा, यांचा स्वामी वृश्चिकराशि होय. अश्व, मीठ, वस्त्र, आयुधे (धनुष्यबाण इ०,) तीळ धान्य म्ह० कोथिंबीर मूळे, यांचा स्वामी धनराशि होय ॥६॥
वृक्ष, गुल्म (कांडेनाही मुळाहून फुटणारा वृक्ष म्ह. झुडपे,) वल्ली, सिंचनाने होणारे, ऊस, सुवर्ण, काळे लोखंड, यांचा स्वामी मकरराशि होय. उदकाने झालेले, फल, पुष्प, रत्न, नानाप्रकारची रत्ने, यांचा स्वामी कुंभराशि होय ॥७॥
गजकपालोत्पन्न मोती व शुक्तिसंभवमोती, हिरे, नानाप्रकारची तेले, मत्स्यांपासून झालेली मौक्तिकादिके, यांचा स्वामी मीनराशि होय ॥८॥
कोणत्याही राशीपासून ४।१०।२।११।७।९।५ या स्थानी बृहस्पति असेल तर त्या राशीच्या द्रव्यांची वृद्धि होते. २।११।१०।५।८ यास्थानी बुध असेल तर वृद्धि होते ॥९॥
६।७ या स्थानी शुक्र अ० हानि होते. याहून अन्यस्थाती अ० वृद्धि होते. ३।६।१०।११ या स्थानी सूर्य, भौम, शनि हे अ० वृद्धि व अन्यस्थानी अस० हानि होत्ये ॥१०॥
ज्या राशीच्या पीडास्थानी (१।२।४।५।७।८।९।१२ या स्थानी) बलिष्ठ (स्वगृही, स्वोच्ची, मित्रगृही, स्वनवांशी राहिलेले) पापग्रह असतील तर त्या राशीची पूर्वोक्त द्रव्ये महाग व दुर्मिळ होतील ॥११॥
ज्या राशींच्या पूर्वोक्त शुभस्थानी (श्लोक ९ व १०) बलिष्ठ शुक्र, गुरु, बुध हे असतील त्या राशीच्या द्रव्यांची वृद्धि होऊन ती स्वस्त व सुलभ होतात ॥१२॥
राशीपासून गोचरी अशुभस्थानी ग्रह असेल आणि त्यावर बलिष्ठ शुभग्रहांची द्दष्टि असेल तर तो ग्रह तशी पीडा करणार नाही. पापग्रहांची द्दष्टि असेल तर शुभाचे अशुभफल होते ॥१३॥
॥ इतिबृहत्संहितायांद्रव्यनिश्चयोनामैकचत्वारिंशोध्याय: ॥४१॥