गर्भाधानकाली रक्त (शोणित) अधिक झाले तर स्त्रीजन्म होतो. रेताधिक्य झाले तर पुरुषजन्म होतो. शोणित व रेत यांचे साम्य झाले तर नपुंसकजन्म होतो. यास्तव शुक्र (धातु) वृद्धि करणारी रसायने सेवन करावी ॥१॥
गृहपृष्ठ (गच्ची,) चंद्रकिरण, नीलकमलसहित मद्य शूद्रास (ब्राम्हाणादिकांस इच्छितपान,) मद्यपानाने अलसस्त्री, मधुर शब्द करणारी वीणा, मदनाच्या गोष्टी, एकांतस्थळ, सुगंधपुष्पमाला, हा समुदाय कामाचा बंधनरज्जु होय (हे सर्व पदार्थ कामोद्दीपक होत) ॥२॥
माक्षीकधातु (माक्षिकभस्म,) मध, पारा, लोहचूर्ण (मंडूर,) हरडा, शिलाजित, वावडिंग, घृत ही सर्व घृत, माक्षिकांवाचून, समभाग व घृत, माक्षिक समभाग यांची गुटिका करून जो २१ दिवस भक्षण करील तो ८० वर्षांचा म्हातारा असेल तथापि तरुणासारखा स्त्रीप्रत रमवील ॥३॥
कुइलीच्या पाळांचा दुधांत काढा करून तो, जो कामी पुरुष प्राशन करील, तो स्त्रियांच्याठाई रतिसमयी अशक्ततेते प्राप्त होणार नाही. दुधाचे मंथन करून काढिलेल्या लोण्याचे तुपात उडीत पक्व करून ते सहा ग्रास भक्षण करून पश्चात दुग्धपान केले असता स्त्रीच्या रतीमध्ये अशक्त होत नाही ॥४॥
भुयकोहळीच्या कांद्याचे चूर्ण करून त्याचेच रसाची त्या चूर्णास ७ पुटे पुन:पुन: शुष्ककरून द्यावी ते चूर्ण, ज्यास स्त्रिया बहुत असतील त्याने शर्करायुक्त तापलेल्या दुधासहवर्तमान प्राशन करावे ॥५॥
आंवळकाठीचे चूर्णास आंवळ्यांच्या रसाची उत्तम पुटे देऊन ते चूर्ण, मध, साखर, आज्य समभाग घेऊन ते मिश्रण चाटून नंतर जठराग्नीचे शक्तीप्रमाणे दुग्धपान करणारा पुरुष यथेच्छ मैथुन करितो ॥६॥
बोकडाच्या आंडाने युक्त असे दुग्ध तापवून त्याने तिळ सातवेळ भिजवून शुष्क करून भक्षण करावे नंतर दुग्धपान करणार्या पुरुषापुढे चिमणापक्षी बहुत स्त्रीगमन काय करतो. (बहुत स्त्रियांप्रत बहुतवेळ शीघ्र गमन करतो) ॥७॥
जे पुरुष उडदांच्या वरणासहवर्तमान घृताने युक्त साठक्या (अवचित्या) तांदुळाच्या भाताते भक्षण करितात. नंतर दुग्धपानही करितात. ते त्या रात्रीच्याठाई मदनासहवर्तमान निद्रा करितात. (वारंवार स्त्रीगमनच करतात निद्रा येत नाही) ॥८॥
तिळ, अश्वगंधा (वनस्पतिविशेष, आसंध,) कुइलीची पळे, भुयकोहळी, साठके तांदुळांचे पीठ (सर्व औषधे अर्धी व तांदुळाचे पीठ अर्धे) असा योग करून बकरीच्या दुधात भिजवून त्याच्या करंज्या करून तुपात तळल्य असता, त्या शुक्रवृद्धि करणार्या होतात ॥९॥
दुधाबरोबर सराट्यांचा उपयोग अथवा भुयकोहळीच्या कंदाचे भक्षण केले असता; स्त्रियांच्याठाई रेतस्खलन होत नाही. ते जर पुरुषास जिरेल तर अग्निमांद्य होईल. त्यास हे पुढील चूर्ण द्यावे ॥१०॥
ओवा, लवण (सैंधव,) हरडेदळ, सुंठ, पिंपळी ही समभाग चूर्ण करून मद्य, पेज, उष्णोदक यांतील एकाद्या बरोबर त्या चूर्णाचे पान करावे म्ह० जठराग्नि प्रदीप्त होतो ॥११॥
फार आंबट, फार कडु, फार खारट, फार तिखट, क्षारयुक्त शाकाबहुत ज्यामध्ये अशी भोजने जो पुरुष भक्षण करतो तो द्दष्टि, रेत, बल यांनी रहितहोत्साता स्त्रीते प्राप्त होऊन, तरुण असताही, वृद्धासारखा बहुत निमिते, कपटे करतो. (त्याकडून स्त्रींचे रतीमध्ये समाधान होत नाही) ॥१२॥
॥ इतिबृहत्संहितायामंत:पुरचिंतायांकांदर्पिकंनामषटसप्ततितमोध्याय: ॥७६॥