प्रतिमा कर्त्यास अनुकूल दिवशी, दैवज्ञाने विशोधित शुभनिमित्ती, प्रयाणसंबंधी शुभशकुनांनी वनात (बहुत वृक्षदेशी) प्रवेश करावा ॥१॥
श्मशान, मार्ग, देवालय, वारूळ, बाग, तपस्व्याचा आश्रम, यातील वृक्ष; चैत्य गांवांतील मोठा वृक्ष, नद्यांच्या संगमी झालेले वृक्ष व घागरीच्या उदकाने शिंपलेले वृक्ष, ॥२॥
कुब्ज (लहान,) अनुजात (मागून झालेले,) वेली यांनी पीडित (युक्त,) बीज व वायु यांनी पीडित, आपोआप पडलेले, हत्तीने पीडित, नीरस, अग्नीने जळलेले,मधमोहे धरण्याचे ॥३॥
असे वृक्ष वर्ज्य करावे. व पाने, पुष्पे व फळे बळि व पुष्पे यांनी पूजा करावी ॥४॥
देवदारू, चंदन, शमी, मोहा, हे वृक्ष ब्राम्हाणांस शुभ; कडुनिंब, अश्वत्थ, खदिर, बिल्व, हे क्षत्रियांस वृद्धिदायक; ॥५॥
असण्याचे झाड, खदिर,निगूड, टेंभुरणी, हे वैश्यांस शुभ फल देणारे; टेंभुरणी, बकूळ, सालवृक्ष, अर्जुन, आम्र, साग, हे शूद्रांस शुभ होत ॥६॥
लिंग अथवा प्रतिमा वृक्षाची जशी दिशा तशी स्थापन करावी म्ह० वृक्षाची जी पूर्व तीप्रतिमेची पूर्व दिशा, वृ० अधोभाग, वृ० ॠर्ध्वभाग तो प्र० ऊर्ध्वभाग, याप्रमाणे करावयाचे यास्तव वृक्षाच्या दिशा व ऊर्ध्वाधोभागांस चिन्हे करावी ॥७॥
क्षीर, मोदक, भात, दही, तिळकूट, उल्लोपिका (पक्वान्नवि०,) इत्यादि भक्ष्य पदार्थ; मद्य, पुष्पे,धूप, गंध, यांनीकरून वृक्षाची पूजा करून ॥८॥
देव, पितर, पिशाच, राक्षस, नाग, दैत्य, प्रमथादिगण, विनायक (विघ्न हर्ता,) भूत, प्रेत, सिद्ध, गंधर्व इत्यादिकांची रात्री पूजा करून वृक्षास स्पर्श करून बोलावे ॥९॥
अमुक देवाची प्रतिमा करण्याकरिता तुला कल्पिला आहे. हे वृक्षा तुला नमस्कार असो. ही यशाशास्त्र केलेली पूजा ग्रहण करावीस ॥१०॥
जी या वृक्षी भूते रहातात ती यथाशास्त्र दिलेला हा बलि ग्रहण करून दुसर्या जागी रहाण्याची जागा कल्पोत आणि मजवर क्षमा करोत. आज त्याकारणे नमस्कार असो ॥११॥
प्रात:काली वृक्षाचे उदकाने सिंचन करून ईशानी दिशेस मध व आज्य यांनी लिप्त अशा कुर्हाडीने तोडण्यास प्रारंभ करून त्यापासून प्रदक्षिण, शेष राहिलेला वृक्ष तोडावा ॥१२॥
पूर्व, ईशानी, उत्तर या दिशांकडे तो वृक्ष पडेल तर वृद्धिकर होतो. आग्नेयीस अग्निदाह, दक्षिणेस रोग, निऋतीस रोग, पश्चिमेस रोग, वायव्येस अश्वक्षय ही फले होतात ॥१३॥
जे वृक्षनिपात, छेदन, वृक्षगर्भ या वनसंप्रवेशात सांगितले नाहीत, ते इंद्रध्वज (अ० ४३ श्लो० १९।२०) यात व वास्तुप्रकरणात पूर्वी मी सांगितले आहेत ते येथे तसेच योजावे ॥१४॥
॥ इतिबृहत्संहितायांवनसंप्रवेशोनामैकोनषष्टितमोध्याय: ॥५९॥