बृहत्संहिता - अध्याय १०

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


अथशनैश्चरचार:
॥ अथशनैश्चरचार: ॥

श्रवण, स्वाती, हस्त, आर्द्रा, भरणी, पूर्वाफल्गुनी या नक्षत्री शनैश्चर असेल आणि तो स्निग्ध (विपुलमूर्ति) असेल त्र बहुत उदकाने व्याप्त अशी भूमि करील ॥१॥

आश्लेषा, शततारका, ज्येष्ठा, या नक्षत्री शनैश्चर असेल तर उत्तम कल्याण करील व बहुत वृष्टि करणार नाही (अल्पवृष्टि करील) मूलनक्षत्री शनि असेल तर दुर्भिक्ष, युद्धे व अवर्षण ही करील. प्रत्येक (सर्व) नक्षत्रांचीही फले पुढे सांगतो ॥२॥

शनि, अश्विनी नक्षत्री असेल तर अश्व, अश्वरक्षक, कवि, वैद्य, प्रधान यांचा नाश होतो. शनि, भरणीस असता नर्तक, वादक (वाद्ये वाजविणारे,) गाणारे, अन्यायाने वागणारे, दुष्ट आचरण करणारे यांचा नाश होतो ॥३॥

शनि, कृत्तिका नक्षत्री अ० सुवर्णकरादि अग्न्युपजीवी व सेनापति यांस पीडा होते. शनि, रोहिणीस अ० कोशल. मद्र, काशि, पांचाल या देशी राहणारे लोक व गाडयांवर जीविका करणारे यांचा नाश होतो ॥४॥

शनि, मृगशीर्षन० अ० वत्सदेशी राहणारे लोक, यजन करणारे (ऋत्विज,) यजमान, श्रेष्ठ लोक, मध्यदेश यास पीडा होते. शनि, आर्द्रानक्षत्री अ० पारा काढणारे, हिंग करणारे, तेली, रजक, चोर या सर्वांस पीडा होते ॥५॥

शनि, पुनर्वसुन० अ० पंचनद, प्रत्यंत, सुराष्ट्र, सिंधु, सौवीर या देशांतील लोकांस पीडा होते. पुष्यनक्षत्री अ० घंटावादक (श्रावक,) घोषिक (गव्हरवासी,) यवन, व्यापारी, कपटी व पुष्पे यांस पीडा होते ॥६॥

शनि, आश्लेषांस अ० जलोद्भव प्राणी व सर्प यांस पीडा. मघानक्षत्री अ० वाल्हीक, चीन, गांधार, या देशांतील लोक; शूलिक (त्रिशूल धारण करणारे,) पारा काढणारे, वैश्य, धान्यांची कोठारे व व्यापारी यांस पीडा होते ॥७॥

शनि, पूर्वाफ० अ० रसविक्रय करणारे, वेश्या, कन्या, महाराष्ट्रदेशातील लोक, या सर्वांस पीडा होते. उत्तराफ० अ० राजे, गुड, लवण, संन्यासी, उदके, तक्षशिलानगरी या सर्वांस पीडा होते ॥८॥

शनि, हस्तन० अ० नापित, चाक्रिक (कुंभकार तेली इत्यादिक,) चोर वैद्य, शिंपी, हस्तिग्राह (महात,) वेश्या, कसबीलोक, माळी, हया सर्वांस पीडा होते ॥९॥

शनि, चित्रान० अ० स्त्रीजन, लेखक, चित्रकार व अनेक तर्‍हेची भांडी यांस पीडा होते. स्वातीस अ० दक्षिणवर्‍हाडप्रांतस्थ लोक, गुप्तबातमीदार, जासूद, सूत  (सारथि अथवा पौराणिक,) नौकेतून गमन करणारे, नृत्य जाणणारे यांस पीडा होते ॥१०॥

शनि, विशाखानक्षत्री अ० त्रैगर्त, चीन, कौलूत, या देशांतील लोक; कुंकुम, लाख, धान्ये, मांजिष्ठ व कौस्तुभ (कुसुंबारंग) या सर्वांचा नाश होतो ॥११॥

शनि, अनुराधांस अ. कुलूत, तंगण, खस (नेपाळादि डोंगराळ प्रदेश,) काश्मीर या देशांतील लोक; प्रधान, कुंभार, घंटा वाजविनारे (श्रावक) यांस पीडा होते व मित्रांचा परस्पर भेद होतो ॥१२॥

शनि, ज्येष्ठान० अ० राजे, राजोपाध्याय, राजपूजित, योद्धे, समुदाय, श्रेष्ठ कुले, बहुत सजातीयांचा समुदाय, हे सर्व संतापाते पावतील मूल न० अ० काशि, कोशल, पांचाल या देशांतील लोक; आम्रादि फले, औषधी, योद्धे यांस ताप होतो ॥१३॥

शनि, पूर्वाषाढान० अ० अंग, वंग, कोशल, गिरिव्रज (मगध देशाची राजधानी), मगध, पुंड्र, मिथिल या देशांतील लोक व अलिप्तीनगरीत जे लोक रहातात ते, हे सर्व दु:खाते प्राप्त होतील ॥१४॥

शनि, उत्तराषाढान० अ० दशार्णदेशस्थ लोक, यवन, उज्जयनीदेशस्थ लोक, शभर (भिल्ल,) पारियात्रपर्वतावरील लोक, कुंतिभोज (बागलपूर) या देशातील लोक या सर्वांचा नाश होतो ॥१५॥

शनि, श्रवण न० अ० राजाने अधिकार दिलेले, ब्राम्हाणश्रेष्ठ, वैद्य, आचार्य व कलिंगदेशस्थ लोक, यांचा नाश होतो. धनिष्ठ न० अ० मगधदेशच्या राजाचा जय होतो व द्रव्यरक्षणी नियुक्त अशा लोकांची वृद्धी होते ॥१६॥

शनि, शततारका व पूर्वाभाद्रपदा या २ नक्षत्री अ० वैद्य, कवि, मद्यविकणारे, व्यापारी, नीतिशास्त्र जाणणारे यांस पीडा होते. उत्तराभा० नक्षत्री अ० नदीतीरी राहणारे, पालख्या करणारे सुतार, स्त्रिया, सुवर्ण यांस पीडा होते ॥१७॥

शनि, रेवती न० अ० राजाने पोषित लोक (राजाश्रित,) क्रौंचद्वीपी रहाणारे लोक, शरद्दतूतील धान्य, शबर (भिल्ल,)
यवन या सर्वांस पीडा होते ॥१८॥

जेव्हा विशाखानक्षत्री बृहस्पति आणि कृत्तिकानक्षत्री शनैश्चर असे असतील, तेव्हा लोकांत फार भयंकर अनीति होईल. व जर ते दोघेही एकनक्षत्री असतील तर नगराचा भेद होईल ॥१९॥

शनि, जर अनेक रंगांचा दिसेल तर पक्ष्यांचा नाश होतो. जर पीतकिरण दिसेल तर दुर्भिक्ष करील. रक्तवर्ण दिसेल तर संग्रामभय होते. भस्मासारखा दिसेल तर लोकांमध्ये बहुत वैरे होतील ॥२०॥

शनि, वैडूर्यमण्यासारखा असून स्वच्छ असेल तर प्रजांचे कल्याण होईल व बाण (काळा कोराटा,) अतसी (जवसाचे झाड) यांच्या पुष्पांचा वर्णासारखा शनीचा वर्ण असेल तर प्रशस्त होय. श्वेत, रक्त, पीत,कृष्ण या चार वर्णांतून जो वर्ण शनि घेईल त्या ब्राम्हाणादि चार वर्णांचा नाश होईल असे गर्गादि ऋषि म्हणतात. (श्वेतवर्ण शनि ब्राम्हाणांचा, रक्त. क्षत्रियांचा, पीत० वैश्यांचा व कृष्ण० शूद्रांचा नाश करितो) ॥२१॥


॥ इतिबृहत्संहितायांशनैश्चरचारोदशमोध्याय: ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-02-18T03:56:51.9570000