वृश्चिक व वृषभ या राशीस सूर्याच्या प्रवेशावरून म्ह. या संक्रांति होतात त्या वेळेवरून अनुक्रमाने ग्रीष्म (उन्हाळी) धान्ये व शरत (पावसाची) धान्ये यांचे शुभाशुभयोग बादरायणाचार्याने जे सांगितले ते हे (वक्ष्यमाण) मी केले आहेत ॥१॥
सूर्याच्या वृश्चिक प्रवेशकाली वृश्चिक लग्नापासून केंद्रस्थानी १।४।७।१० शुभग्रह असतील अथवा बलिष्ठ शुभग्रहांनी सूर्य द्दष्ट असेल तर ग्रीष्मसंबंधी धान्यांची वृद्धि होते (अक्षीणचंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभग्रह होत. स्वगृही, स्वोच्ची, स्वमित्रगृही जो ग्रह असेल तो बलिष्ठ) ॥२॥
वृश्चिकराशीस सूर्य, गुरु कुंभी, चंद्र सिंही, अथवा गुरु सिंही, चंद्र कुंभी असे असतील तर ग्रीष्मधान्ये उत्पन्न होतील ॥३॥
वृश्चिकस्थसूर्यापासून दुसरा शुक्र किंवा बुध असेल अथवा दोघेही एककालीच दुसरे असतील अथवा वृश्चिकस्थसूर्यापासून शुक्र बारावा किंवा बुध बारावा अथवा दोघेही बारावे असतील तर ग्रीष्मधान्यांची निष्पत्ति होईल. सूर्यावर गुरूची द्दष्टि असेल तर, फारच चांगली ग्रीष्मधान्यनिष्पत्ति होईल ॥४॥
शुभमध्यगत वृश्चिकस्थ सूर्यापासून सप्तमस्थानी गुरु व चंद्र हे असतील तर, धान्य संपत्ति उत्तम होईल. (वृश्चिकस्थ सूर्य व त्यापासून दुसरा, बुधशुक्रांतून एक व दुसरा बारावा असे असतील तर, तो सूर्य शुभमध्यगत होतो.) वृश्चिकाच्या आरंभी सूर्य व त्यापासून दुसरा गुरु असेल तर धान्यनिष्पत्ति अर्धी होते ॥५॥
वृश्चिकस्थसूर्यापासून अकरावा शुक्र, चवथा चंद्र, दुसरा बुध, असे असतील तर धान्याची उत्तमसंपत्ति होते. पूर्वोक्तयोग असून, त्यात दहावा गुरु असेल तर गाईंचीही उत्तम संपत्ति होते म्ह. धान्य होऊन दुधही बहुत होते॥६॥
कुंभराशीस गुरु, वृषभास चंद्र, वृश्चिकाच्या प्रथमांशी सूर्य, भौम व शनि हे मकरराशीस, असे असतील तर धान्याची उत्पत्ति चांगली होईल; परंतु पुढे शत्रुचक्र व रोग यांचे भय होते ॥७॥
वृश्चिकस्थसूर्य, भौम व शनि या पापग्रहांच्या मध्ये असेल तर धान्याचा नाश होतो. वृश्चिकापासून भौम व शनि यातून एक सप्तम असेल तर धान्य उत्पन्न झाले तरी त्याचा नाशा होईल ॥८॥
वृश्चिकापासून द्वितीयस्थानी पापग्रह असेल आणि त्यावर शुभग्रहांची द्दष्टि नसेल तर प्रथम उगवलेले धान्य नाश पावते. नंतर पेरलेले धान्य चांगले उत्पन्न होते ॥९॥
वृश्चिकस्थ सूर्यापासून भौम, शनि या पापग्रहांतून एक सप्तमस्थानी व दुसरा १।४।१० या स्थानी असे असतील तर धान्यनाश होतो; परंतु त्या प्रापग्रहांवर शुभग्रहांची द्दष्टि असेल तर सर्व देशांमध्ये धान्यनाश होणार नाही (क्वचिद्देशी होईल) ॥१०॥
वृश्चिकस्थ सूर्यापासून भौम, शनि या पापग्रहांतून एक सातवा व एक सहावा असे असतील तर, धान्यनिष्पत्ति चांगली होईल; परंतु मूल्याची हानि होईल म्ह. महागाई होईल ॥११॥
या पूर्वोक्त प्रकारानेच सूर्य वृषभराशीस जाईल त्या वेळेवरून शरद्दतूत उत्पन्न होणार्या धान्यांचा नाश किंवा वृद्धि ही सस्यजातक समजणार्या पंडितानी जाणावी ॥१२॥
सूर्य, मेषादि तीन राशींच्याठाई, बुध, गुरु, शुक्र यांनी युक्त किंवा द्दष्ट असेल तर, ग्रीष्मऋतूंतील धान्ये समर्घ (स्वस्त) व इहलोकी बंधुवर्गास आणि परलोकी धर्मार्थ योग्य अशी होतील ॥१३॥
धनु, मकर, कुंभ या राशीच सूर्य सौम्यग्रहयुक्त किंवा द्दष्ट असता, शरद्दतूतील धान्यांचे फल, ग्रीष्मऋतूंतील धान्यांचे फल पूर्वी सांगितले, त्यासारखेच पहावे. हे फल धान्यसंग्रहकाली पहावे; परंतु पापग्रहांच्या द्दष्टियोगाने विपर्यय होतो. म्ह. महागाई होते. धान्यविक्रयकाली विपर्ययच शुभ होय ॥१४॥
॥ इतिबृहत्संहितायांसस्यजातकंनामचत्वारिंशोध्याय: ॥४०॥