मी प्रथम दिव्य (ग्रहनक्षत्राश्रय) व अंतरिक्ष (उल्कानिर्घाताद्याश्रय) असे शुभाशुभफल बहुतकरून सूर्यादि गृहचार, चंद्रग्रहयोग, ग्रहयुद्ध, ग्रहमार्ग इत्यादिकांमध्ये विस्ताराने सांगितले ॥१॥
हे पूर्वोक्त सर्व पुन: सांगणे वराह मिहिराचार्यास योग्य नव्हे; कारण हा आचार्य संक्षेप करणारा आहे. यास्तव हा त्यास दोष आहे असे पंडितांनी बोलू नये. हे जे श्रेष्ठ मयूरचित्रक ते उक्तफलांचेच कथन असे प्रसिद्ध आहे ॥२॥
त्या मयूरचित्रकाचे स्वरूप, पूर्वोक्ताचेच कथन करणे हेच आहे. यास्तव मी हे मयूरचित्र न सांगितले तथापी माझी याविषयी वाच्यता (अपकीर्ती) होईल ॥३॥
नागा, गजा, ऐरावता (अ. ९ श्लोक १) या उत्तरमार्गात रहाणारे व तेजस्वी असे सर्व ग्रह असतील तर कल्याण, सुभिक्ष, सुख ही होतात. मृगा, अजा, दहना, या दक्षिणामार्गात रहाणारे व तेजरहित सर्व ग्रह असतील तर ते दुर्भिक्ष, चोर, मृत्यु यांते करतात. वृषभा, गो, जरद्नवा या मध्यमार्गात सर्व ग्रह असतील तर मध्यम फल होते ॥४॥
कोष्ठागार (मघा) नक्षत्री शुक्र व पुष्यनक्षत्री गुरू असे असतील तर राजे गतवैर व सुखी होतील. लोक आनंदित व रोगरहित होतील ॥५॥
सूर्यावाचून सर्व ग्रह जर कृत्तिका, मद्या, रोहिणी, श्रवण, ज्येष्ठा या नक्षत्राते दक्षिणमार्गगमनाने, योगतारेच्या आच्छादनाने किंवा भेदनाने पीडा करतील तर पश्चिमदिशा अनीतीने पीडित होते म्ह. पश्चिमदिशेकडे अन्याय होतात ॥६॥
सायंकाली पूर्वेकडे सर्व ग्रह ध्वजासारखे असतील तर पूर्वदिशेकडील राजांचे युद्ध होईल. आकाशमध्यभागी असतील तर मध्यदेशास पीडा होईल; परंतु ते ग्रह रूक्ष (रखरखीत) असतील तर व निर्मळ किरणयुक्त असतील तर पूर्वोक्त युद्ध व पीडा होणार नाही ॥७॥
ते सर्व ग्रह दक्षिणदिशेकडे असतील तर दक्षिणदिशेकडील मेघांचा नाश होतो. ते ग्रह अल्प व कलुषबिंब असतील तर युद्धे होतील व स्थूलबिंब तेजस्वी असतील तर कल्याण होईल ॥८॥
ते ग्रह उत्तरमार्गी तेजस्वी असतील तर राजांस सुखकारक होतात व अल्पबिंब, भस्मासारखे असतील तर देश व राजे यांस अशुभकारक होतात ॥९॥
नक्षत्रांच्या योगतारा व ग्रहांच्या तारा धूम, ज्वाला, अग्निकण यांनी युक्त असतील अथवा अभ्रादि निमित्तावाचून द्दष्टिगोचर होणार नाहीत तर राजासहवर्तमान सर्व लोकांचा नाश होतो ॥१०॥
ज्याकाळी स्वर्गामध्ये दोन चंद्र भासतील त्याकाळी ब्राम्हाणांची अत्यंत वृद्धि शीघ्र होते. सूर्य भासतील तर क्षत्रियांचे युद्ध होते. तीन चार इत्यादि सूर्य भासतील तर जगताचा प्रलय होतो ॥११॥
सप्तऋषि, अभिजिन्नक्षत्रतारा, ज्येष्ठनक्षत्रतारा याते धूमकेतु (शेंडयेनक्षत्र) स्पर्श करील तर अवर्षण, शुभकर्मनाश, शोक ही होतील. धूमकेतु आश्लेषानक्षत्रास स्पर्श करील तर निश्वयाने अवर्षण होईल व बालांसह पळून जाऊन लोक नाश पावतील ॥१२॥
पूर्वेकडील कृत्तीकादि सात नक्षत्री शनि असून, वक्रगति होईल तर दुर्भिक्ष, मोठे भय, मित्रांचा परस्पर विरोध, अवर्षण ही करितो ॥१३॥
रोहिणी शकटाते, शनि किंवा भौम अथवा केतु, हे ग्रह भेदन करतील तर दु:खसागरामध्ये सर्व जगत नाश पावेल. यात काय आश्चर्य ॥१४॥
धूमकेतु निरंतर उदय पावेल व सर्व नक्षत्रचक्रामध्ये फिरेल. तर, सर्व जगत पूर्व्जन्मार्जित पापाचे फळ अनुभविते ॥१५॥
धनुष्यासारखा, रूक्ष (अनिर्मल,) रक्तवर्ण असा चंद्र दुर्भिक्ष, सैन्याचा यद्योग (युद्ध) कारक होय. धनुष्याकृति चंद्राची दोरी जिकडे असेल तिकडील राजांचा जय होतो. चंद्राची खाली शृंगे असतील तर गाईंचा नाश व धान्यनाश होतो. ज्वाला व धूम यांनी चंद्र युक्त असेल तर राजास मृत्यु होतो ॥१६॥
निर्मल, स्थूल, समशृंग, विस्तीर्ण, उच्च, उत्तरेकडे नागवीथीत (अ९ श्लोक १) गमन करणारा, शुभग्रहांनी द्दष्ट, पापग्रहरहित असा चंद्र लोकांस अत्यंत आनंद करतो ॥१७॥
मघा, अनुराधा, ज्येष्ठा, विशाखा, चित्रा, या नक्षत्री चंद्र येऊन दक्षिणदिशेकडून त्या नक्षत्राशी योग करील तर शुभ नव्हे. उत्तरेकडून किंवा मधून योग करील तर शुभ होय ॥१८॥
सूर्याच्या उदयी किंवा अस्ती जी अभ्रांची तिर्कस रेषा ती परिघ होय. एक सूर्य असून दुसरा सूर्य दिसतो तो परिधि होय. तो परिधि स्पष्ट व इंद्रधनुष्याचे रंगासारखा असेल तर दंडसंज्ञक होय ॥१९॥
सूर्योदयी किंवा अस्ती जे लांब किरण ते अमोघसंज्ञक होत. तुटलेले व स्पष्ट जे इंद्रधनु ते रोहितसं० होय व लांब इंद्रधनुष्य ते ऐरावतसंज्ञक होय ॥२०॥
सूर्याच्या अर्धास्तापासून नक्षत्रे स्पष्ट दिसेतोपर्य़ंत सायंसंध्या व नक्षत्रे तेजहीन झाल्यापासून सूर्याचा अर्धोदय होईपर्यंत प्रात:संध्या होय ॥२१॥
या संध्यासमयी या वक्ष्यमाणचिन्हांनी शुभाशुभ बोलावे. हे पूर्वोक्त परिघादि सर्व स्निग्ध असतील तर तत्काल वृष्टि होते व रूक्ष असतील तर भय होते ॥२२॥
अखंड परिघ, आकाश निर्मल, सूर्याचे किरण श्यामवर्ण, अमोघसंज्ञक किरण स्निग्ध, श्वेत इंद्रधनुष्य, पूर्वोत्तरदिशांकडे
वीज, मेघ, वृक्ष स्निग्ध व सूर्यकिरणांनी आलिंगित असे हे असतील तर वृष्टि होते अथवा मोठा मेघ, अस्तमानकाली सूर्याचे आच्छादन करील तर वृष्टि होते ॥२३॥
ज्या देशी खंडित, वाकडा कृष्णवर्ण, अल्पबिंब, काकादि चिन्हांनी विद्ध रूक्ष असा सूर्य दिसेल त्या देशी बहुतकरून राजाचा नाश होतो ॥२४॥
मांसभक्षक पक्षिसमुदाय ज्या युद्धेच्छु राजाच्या सेनेच्या पाठीमागून जाईल त्या राजाचे सैन्य पळेल (पराजय होईल.) तेच पक्षीद सेनेच्या पुढे असतील तर राजाचा जय होईल ॥२५॥
सूर्याच्या उदयी किंवा अस्ती गंधर्वनगरासारखी सेना सूर्यबिंब रोधील (आच्छादील) तर राजास युद्ध व भय प्राप्त झाले असे सांगावे ॥२६॥
शांत असे पक्षी व अरण्यपशु यांचे शब्द, स्निग्ध (निर्मल,) अल्पवायु अशी संध्या (दयास्तसंध्यासमय) असेल तर शुभ होय़. धुरळ्याने युक्त, रूक्ष (मलिन,) रक्तवर्ण अशी संध्या लोकांचा नाश करते ॥२७॥
गर्गादि ऋषींनी जे मयूरचित्रक विस्ताराने सांगितले तेच तेथे मी पुनरुक्ति वर्ज्य सर्व सांगितले. कोकिळेचा शब्द श्रवण करून कावळाही शब्द करतो. ते त्याचे करणे स्वाभाविकच आहे. कोकिळेला जिंकण्याकरिता नव्हे. तद्वत हे माझे बोलणे आहे ॥२८॥
॥ इतिवृ०मयूरचित्रकंनामसप्तचत्वारिंशोध्याय: ॥४७॥