ज्येष्ठशुद्ध पौर्णिमा अतिक्रांत झाल्यावर, पूर्वाषाढादि सर्वनक्षत्री जी वृष्टि होईल तिचे उदक मोजून शुभ किंवा अशुभ सांगावे ॥१॥
एक हात व्यासाचे तोंडाचे वर्तुल पात्र करून ते पावसात ठेवावे व त्यात जे पाणी जमेल त्यावरून उदकप्रमाण सांगावे. पन्नास पलें म्हणजे एक आढक (चार तोळ्यांचे १ पल) ४ आढकांचा एक द्रोण होतो ॥२॥
धुरळामात्र मरेल किंवा गवतावर बिंदु दिसतील अशी वृष्टि पूर्वाषाढादि ज्या नक्षत्री प्रथम होईल त्या नक्षत्राने उदकाचे प्रमाण लोकांमध्ये सांगावे. गर्भधारण झाले पुढे वायुधारणही होऊन, या वर्षणकाली वृष्टि झाली नाही तर पुढे प्रसवकालीही वृष्टि होत नाही ॥३॥
प्रवर्षणकाली कोणत्याही प्रदेशी वृष्टि झाली तर वर्षाकाली पूर्वाषाढादि नक्षत्री चांगली वृष्टि होते असे कश्यपादिऋषि म्हणतात. दहा योजने मंडलावर प्रवर्षणकाली वृष्टि झाली तर वर्षाकाली शुभवृष्टि होते असे देवलादिऋषि म्हणतात. बारा योजने मंडलाहून अधिक वृष्टि प्रवर्षणकाली झाली म्हणजे वर्षाकाली शुभवृष्टि होईल असे गर्ग, वसिष्ठ, पराशर म्हणतात; परंतु याहून कमी नसावी असेही म्हणतात ॥४॥
ज्या पूर्वाषाढादि नक्षत्री वर्षणकाली वृष्टि होते त्याच नक्षत्री वर्षाकाली पुन: बहुतकरून वृष्टि होते. जर पूर्वाषाढादि नक्षत्री वर्षणकाली वृष्टि झाली नाही तर वर्षाकाली अनावृष्टि होते. (पर्जन्य पडत नाही) ॥५॥
हस्त, पूर्वाषाढा, मृगशीर्ष, चित्रा, रेवती, धनिष्ठा या नक्षत्री १६ द्रोण; शततारका, ज्येष्ठा, स्वाती या नक्षत्री ४ द्रोण; कृत्तिकानक्षत्री १० द्रोण; ॥६॥
श्रवण, मघा, अनुराधा, भरणी, मूल या नक्षत्री १४ द्रोण; पूर्वानक्षत्री २५ द्रोण; पुनर्वसुनक्षत्री २० द्रोण ॥७॥
विशाखा, उत्तराषाढा या नक्षत्री २० द्रोण; आश्लेषानक्षत्री १३ द्रोण; उत्तराभाद्रपदा, उत्तरा, रोहिणी या नक्षत्री २५ द्रोण ॥८॥
पूर्वाभाद्रपदा, पुष्य या नक्षत्री १५ द्रोण; अश्विनीनक्षत्री १२ द्रोण; आर्द्रानक्षत्री १८ द्रोण; याप्रमाणे प्रवर्णणकाली ती ती नक्षत्रे उपद्रवरहित असली म्हणजे वृष्टि होते ॥९॥
सूर्य, शनि राहु, केतु यांनी नक्षत्र पीडित असता, म्हणजे हे त्या नक्षत्रास असता; तसेच भौम व त्रिविध उत्पात यांनी नक्षत्र ताडित असता कल्याण होत नाही व वृष्टिही होत नाही. बुध, गुरु, शुक्र या शुभग्रहांनी युक्त व उत्पातरहित नक्षत्र अ. कल्याण व वृष्टि ही होतात ॥१०॥
॥ इतिबृहत्संहितायांप्रवर्षणंनामत्रयोविंशोध्याय: ॥२३॥