मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|बृहत्संहिता|
अध्याय ३२

बृहत्संहिता - अध्याय ३२

शके ८८८ फाल्गुन कृष्ण द्वितीया गुरुवारी उत्पलनामकाने ही टीका केली.


जलामध्ये रहाणारे जे मोठे प्राणी त्यांनी केलेला भूकंप असे कोणी ऋषि म्हणतात. भूमीच्या भाराने दु:ख पावलेले जे दिग्गज त्यांच्या विश्रांतीपासून भूमिकंप होतो असे अन्य गर्गादि ऋषि म्हणतात ॥१॥

नभस्थित वायूने ताडित जो वायु तो भूमीवर पदत असता शब्दासहित भूमिकंप करतो असे वसिष्ठादिक म्हणतात. हा भूकंप  धर्माधर्माने प्रजांस शुभाशुभसूचक होतो असे कोणी आचार्य म्हणतात ॥२॥

पृथ्वीवर पडणारे व पृथ्वीपासून आकाशात उडणारे जे पक्षयुक्त पर्वत त्यांनी कंपित झालेली जी पृथ्वी ती, देवसभेमध्ये जाऊन ब्रम्हादेवाप्रत लज्जायुक्त भाषण करिती झाली ॥३॥

हे भगवान, तुम्ही जे मला अचला असे नाम दिले ते चलन पावणारे जे अचल (पर्वत) त्यांनी नाहीसे केले. तेणेकरून झालेल्या दु:खाते सहन करणास मी समर्थ नाही ॥४॥

नंतर गद्नद (अस्पष्ट) भाषणाने यक्त, थोडेसे कंपित आहेत ओष्ठ जिचेठाई असे, नेत्रोदकाने युक्त, असे तिचे मुख पाहून ब्रम्हादेव इंद्रास म्हणतात ॥५॥

हे इंद्रा पर्वतपक्षांच्या नाशार्थ वज्र टाक आणि पृथ्वीचा शोक दूर कर. अशी ब्रम्हादेवाची आज्ञा होताच तसे केले असे इंद्र ब्रम्हादेवाप्रत बोलून हे भूमी तू पर्वतांपासून भिऊ नकोस असे भाषण करिता झाला ॥६॥

परंतु वायु, अग्नि, इंद्र, वरूण हे लोकांस होणार्‍या शुभाशुभ फलांचे ज्ञान पूर्वी व्हावे म्हणून दिवसरात्र यांचे चार भाग करून ते चवघॆ चार भागांमध्ये तुला कांपवितील, (दिवसाच्या पूर्वार्धी वायु कापवील, दि. उत्तरार्धी अग्नि, रात्रीच्या पूर्वार्धी इंद्र, रा उत्तरार्धीं वरूण कापवील) ॥७॥

वायु, अग्नि, इंद्र म्ह. आकाश, वरुण म्ह. उदक ही चार तत्त्वे पृथ्वीतत्त्वाशी मिळतात तेव्हां भूंकप होतो.

उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, पुनर्वसु, मृगशीर्ष, अश्विनी या सात नक्षत्रांचे वायुमंडल होय. या नक्षत्री दिवसाच्या पूर्वार्धी भूमिकंप झाला तर सात दिवसात ही वक्ष्यमाण चिन्हे होतात ॥८॥

धूमाने व्याप्त दिशा आहेत ज्यामध्ये अशा आकाशात वायु, भूमिसंबंधी धूळ उडवितहोत्साता व वृक्ष मोडितहोत्साता फिरेल. सूर्य शीतकिरण भासेल ॥९॥

वायूने भूकंप झाला असता धान्ये, उदक, वनौषधी यांचा क्षय होतो. सूज, श्वास, उन्माद. ज्वर, कास, यांपासून वैश्यांस पीडा होते ॥१०॥

सूरूप, शस्त्रे धारण करणोर, वैद्य, स्त्रिया, कवि, गायक, व्यापारी, शिल्पी या लोकांस पीडा होते व सौराष्ट्र, कुरु, मगध, दशार्ण, मत्स्य या देशांसही पीडा होते ॥११॥

पुष्य, कृत्तिका, विशाखा, भरणी, मघा, पूर्वाभाद्रपदा, पूर्वा ही नक्षत्रे अग्निमंडल होत. या मंडली दिवसाच्या उत्तरार्धी भूकंप झाला तर त्याची चिन्हे पुढे सांगतो ॥१२॥

तारा व उल्का यांच्या पतनाने व्याप्त, दिग्दाहाने प्रदीप्त असे आकाश असता वायुयुक्त अग्नि, सात दिवसात फिरेल ॥१३॥

अग्निभूकंप झाला असता मेघनाश, उदकसंचयाचा नाश, राजांचे वैर, दद्रू (गजकर्ण इ.,) विचर्चिका (खरूज,) ज्वर, विसर्पिका (त्वग्रोगवि.,) पांडुरोग, हे होतात ॥१४॥

तेजस्वी, क्रोधी यांस पीडा होते. अश्मक, अंग, बाल्हीक, तंगण, कलिंग, वंग, द्रविड, शबर हे लोक बहुप्रकारच्या पीडा पावतात ॥१५॥

अभिजित, श्रवण, धनिष्ठा, रोहिणी, ज्येष्ठा, उत्तराषाढा, अनुराधा या सात नक्षत्रांचे इंद्रमंडल. यावर भूकंपाची चिन्हे होतात ती सांगतो ॥१६॥

चंचल पर्वतांसारखे, गंभीर (मधुर) शब्द करणारे, विद्युल्लतेनेयुक्त, महिषशृंग, भ्रमरपंक्ति, सर्प य़ांसारखे काळे, असे मेघ उदकवृष्टि करतील ॥१७॥

हया ऐंद्रमंडलावर भूकंप झाला तर कुलजातीने प्रसिद्ध, कीर्तियुक्त राजे, समुद्रायात मुख्य, यांचा नाश होतो. अतिसार,  गळा धरणे, मुखरोग, छर्दि (ओकारी) हे रोग होतात ॥१८॥

काशि, युगंधर, पौरव, किरात, कीर, अभिसार, हल, मद्र, अर्बुद, सुवास्तु, मालव, या देशांतील लोकांस पीडा होते व चांगली वृष्टि होते ॥१९॥

रेवती, पूर्वाषाढा, आर्द्रा, आश्लेषा, मूल, उत्तराभाद्र्पदा, शततारका, हे वारुणमंडल होय. याचीही सात दिवसांपूर्वी चिन्हे होतात ॥२०॥

या नक्षत्रांवर भूकंप झाला तर नीलकमल, भ्रमर, फारकाळे काजळ यांसारखे, मधुरशब्द करणारे, वीजांनी दिसणारे, असे बहुत मेघ मोठया धारांनी वृष्टि करतात ॥२१॥

हे वारुणमंड्ल समुद्र व नद्या यांच्या आश्रयाने रहाणारांचा नाश करणारे, अतिवृष्टि करणारे, द्वेषरहित करणारे असे होय. गोर्नद, चेदि, कुकुर, किरात, वैदेह या देशांतील लोकांचा नाश करिते ॥२२॥

भूमिकंपाचे फल सहा महिन्यांनी व निर्घात (तुफानवारा किंवा मेघगर्जना) याचे फल दोन महिन्यांनी होते. अन्यही उल्कादि उत्पातांचे फल या वाय्वादि मंडलांसारखेच जाणावे असे अन्यगर्गादि मुनि म्हणतात ॥२३॥

उल्का, गंधर्वनगर, रज, निर्घात, भूकंप, दिग्दाह, प्रचंडवायु, सूर्यचंद्रास ग्रहण, नक्षत्रतारागण यांस विकार ॥२४॥

अभ्र नसून वृष्टि, मोठया वार्‍याने युक्त वृष्टि, अग्नि नसून धूम, ज्वालाचे विस्फुलिंग, अरण्यांतील प्राण्यांचा गांवांत प्रवेश, रात्री इंद्रधनुष्य दिसेल ॥२५॥

संध्यासमयाचे विकार, तुटलेली खळी, नद्यांचे प्रतिकूल प्रवाह, स्वर्गामध्ये वाद्यध्वनि, झे उत्पात व अन्ही जे प्रकृति (स्वाभाविक असणे) यात बदल होणे, हेही उत्पातरूपच होय. या सर्व उत्पातांचे फल या पूर्वोक्त वाय्वादि मंडलांच्या फलांसारखेच सांगावे ॥२६॥

वायव्यमंडलावर झालेल्या भूकंपाचा, ऐंद्रमंडलावरील भूकंप नाश करितो. तसाच ऐंद्रमं. भूकंपाचा वायु. भूकंप नाश करितो. असे वारुण व अग्नि हेही परस्परांचा नाश करितात. वेलाभूकंप (श्लोक ७) नक्षत्र भूकंप (श्लो. ८) हे परस्परांचा नाश करितात. (दिवसाच्या पूर्वार्धी झालेला भूकंप वायव्य व त्याचवेळी श्रवणनक्षत्र असले तर तो ऐंद्रभूकंप, असे झाले तर कोणाचेही फल होत नाही ॥२७॥

आग्नेयमंडली वायुवेळेवर भूकंप होईल तर प्रख्यात राजास मरण व दु:ख प्राप्त होईल व दुर्भिक्ष, महामारी, अवर्षण यांहीकरून सर्व लोकही संतप्त होतील ॥२८॥

वारुणमंडली ऐंद्रवेळेवर भूकंप होईल तर सुभिक्ष, कल्याण, वृष्टि, संतोष ही लोकांमध्ये होतील व गाई बहुत दूध देतील. राजे द्वेष सोडतील ॥२९॥

ज्या अद्भुताविषयी फळाचा काळ सांगितला नाही त्या देहस्पंदनादि अद्भुताविषयी हा वक्ष्यमाण फलकालनियम घ्यावा. वायुमंडली अद्भुत झाले तर त्याचे शुभाशुभफल दोन महिन्यांनी होते. अग्निमंडली दीड महिन्याने, ऐंद्रमंडली सात दिवसांनी, वरुणमंडली तत्काल, अशी शुभाशुभफले होतात ॥३०॥

वायुमंडलामध्ये भूकंप झाला तर भूमी दोनशे योजनें चलन पावते. अग्निमंडलामध्ये झाला तर एकशे दहा योजने, वरुणमंडलामध्ये झाला तर एकशे ऐंशी योजने, ऐंद्रमंडलामध्ये भूकंप झाला तर एकशे साठ योजने असे भूमिचलन होते ॥३१॥

भूमिकंप झाल्यापासून दुसरा भूमिकंप, ३।४।७ इतक्या दिवशी, एक महिन्याने, पंधरा दिवशी, दीड महिन्याने जर होईल तर प्रतिष्ठित राजांचा नाश होईल ॥३२॥


॥ इतिबृहत्संहितायांभूमिकंपलक्षणंनामद्वात्रिंशोध्याय: ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP