पुढे सांगितलेला नियम सामान्य होय. घोडयाच्या खोगिराच्या मागच्या जागी म्ह० शेपटीकडे व डाव्या आंगी अग्नि दिसेल तर शुभ नव्हे. पुढे व उजव्या आंगी शुभ होय (उत्पातवशाने अश्वांचे अंगावर ज्वालारूप अग्नि दिसतो.) घोडयांचे सर्वांगज्वलन वृद्धिकारक नव्हे व सतत दोन वर्षे अग्निकण व धूम घोडयांचे आंगातून निघतील तर नाश होतो ॥१॥
अश्वाचे लिंग प्रदीप्त म्ह० तप्त असल्यास राजाच्या अंत:पुरांचा (स्त्रियांच) नाश होतो. उदर प्रदीप्त अ० कोश (तिजोरी) क्षय होतो. गुद, पुच्छ ही प्रदीप्त अ० पराजय होतो. मुख व मस्तक ही प्रदीप्त असता जय होतो ॥२॥
घोडयाचे मानेचे होहोंकडील भाग (स्कंध) व त्याचे खालचे भाग (अंस) आणि खोगीर ठेवण्याची जागा यांच्याठाई ज्वलन अ० जय होतो. पादांच्याठाई ज्वलन अ० स्वामीस बंध होतो. ललाट, उर, नेत्र, भुज यांच्याठाई धूम द्दष्टिगोचर होईल तर पराजय होतो व ज्वलन (अग्नि) दिसेल तर जय होतो ॥३॥
घोडयाचे नाकाची भोके, नाक, मस्तक, नेत्रोदक पडण्याचे स्थान, नेत्र, यांच्याठाई रात्रीस दिसेल तर जय होईल, पळसाच्या फुलाचा, तांबडा, काळा, कसरा, पोपटी, पांढरा, या रंगांच्या घोडयांस सर्वकाळ ज्वलन शुभ होय ॥४॥
वैरण व पाणी न घेणे, पडणे, घर्म येणे, निमित्तावाचून कंप, मुखातूना रक्तस्राव किंवा धूर येणे, रात्रीस निद्रा न येणे, वैर करणे, दिवसास निद्रायुक्त आळस, चिंता (वर पहाणे,) ग्लनि, अधोमुखत्व, ही घोडयांची चेष्टिते अशुभ होत ॥५॥
खोगीर अथवा पुरुष यांनी युक्त अश्व अन्याश्वावर चढेल, नेहमी बसावयाच्या घोडयास किंवा निरोगी घोडयास रोग होईल तर अशुभ होय ॥६॥
अश्वांचा क्रौंचपक्ष्यासारखा शब्द, मान न हालता वर तोंड करून शब्द करणे, जयप्रद होय. मधुर, उच्चस्वर, घंटेचा नाद ऐकून शब्द करणे, आनंदयुक्त घास तोंडात असून शब्द, असे जे घोडयांचे शब्द ते जयप्रद होत ॥७॥
पूर्णपात्र (तंडुलादिकाने भरलेले,) दही, ब्राम्हण, देव, गंध, पुष्प, फल, सुवर्ण, रुपे, मौक्तिकादि, अथवा दुसरे काही इष्टद्रव्य, ही शब्दकरणार्या घोडयाजवळ असतील तर जय होतो ॥८॥
भक्षणीयपदार्थ, उदक, लगाम, यांनीकरून आनंद पावणारे अथवा धन्यास आनंदकारक अथवा डाव्याबाजूस पाहणारे असे घोडे इच्छितफल देणारे होत ॥९॥
घोडा डाव्या पायांनी भूमीचे ताडन करील तर धन्यास प्रवास होईल. चार संध्या (सूर्योदय, मध्यान्ह, अस्तमय, अर्धरात्र) यांच्याठाई दीप्तदिशांकडे पाहून घोडा शब्द करील तर धन्यास बंध व पराजय हे होतील ॥१०॥
घोडे फारच शब्द करतील, त्यांचे आंगावरचे केश पसरतील, निरंतर निद्रिस्थ असे घोडे असतील तर धन्यस यात्रा होईल. घोडे आंगावरचे केश टाकतील, दीन व कठीण शब्द करतील, धूळ खातील, तर भय होईल ॥११॥
उजव्या आंगावर निजणारे, उजवा पाय उचलून उभे राहणारे असे घोडे जयप्रद होतात. अन्य वाहनांसही ही फले यथासंभव पंडिताने योजावी ॥१२॥
जो घोडा, राजा वर बसत असता नीतियुक्त, ज्या दिशेस जावयाचे तिकडे जातो, दुसरा घोडा आरडला अ० शब्द करतो, मुखाने आपल्या उजव्या बाजूस स्पर्शा करतो. असा घोडा धन्यास शीघ्र लक्ष्मीते देतो ॥१३॥
जो घोडा वारंवार मूत्र व विष्ठा करतो, चाबुकानी मारला असताही जावयाचे दिशेस जात नाही, कारणावाचून भितो, (महिष सूकरादिदर्शन हे कारण,) डोळ्यांतून पाणी गाळतो असा घोडा धन्याचे कल्याण करीत नाही ॥१४॥
हे घोडयांचे चेष्टित सांगीतले, यापुढे हत्तीचे सांगतो. त्यांचे चेष्टित दंतकल्पन, दंतभंग, म्लान इत्यादि चेष्टांनी सांगेन ॥१५॥
॥ इतिसर्वशाकुनेअश्वचेष्टितंनामाष्टमोध्याय: ॥८॥
॥ इतिबृहत्संहितायांत्रयोनवतितमोध्याय: ॥९३॥