मनारे धरी तूं ध्यान ॥ तेणें होईल तुजला ज्ञान ॥धृ०॥
ध्यान करीता ज्ञानी होशी ॥ निजस्वरुपीं मिळुनी जाशी ॥
तात्काळ ब्रम्हरुप होशी । म्हणुनी हें करी साधन ॥मनारे० ॥१॥
ध्यान करीता कल्पना सोडी । मग स्वरुपीं लागेल गोडी ।
रत होसी मग घडी घडी । तेणे होईल समाधान ॥मनारे० ॥२॥
ध्यान करीता होशील ब्रम्ह । मग करणें नाही कर्म ।
वारी म्हणे जाईल भ्रम । तुजला तें होतां ज्ञान ॥मनारे० ॥३॥