जाऊं दे मला निजसदना । किती अडविसी तूं रे मना ॥धृ०॥
आंत जातें बाहेर येतें । येरझारा मी करितें ।
शीण होतो किती पाहाना । जाऊं दे० ॥१॥
हा त्रास सोसुं किती याचा । नाश होतो मम सुखाचा ।
तेणें होती बहु यातना । जाऊं दे० ॥२॥
कल्प कल्पना कल्प कोटी । यातना तेणें होते मोठी ।
स्वस्थ आता कां राहीना । जाऊं दे० ॥३॥
शांती सुख हें घालवुनी माझें । वेदशास्त्राचें घेवुनी ओझें ।
करीसी उगा शद्ब वल्गना । जाऊं दे० ॥४॥
चटक लागली शांती सुखाची । शद्ब स्वरांची वाटे अरुची ।
गमेना वारीसी एकांताविना । जाऊं दे० ॥५॥