स्वरुपा पाही तूं ॥ मनारे ॥ स्वरुपा पाही तूं ॥
सच्चिदानंद रुप हें अवघे । भरलें पाही तूं ॥मनारे॥स्वरुपा पाही तूं ॥धृ०॥
नामरुप हें अवघें खोटें । सत्चित स्वरुप त्यांत गोमटें ।
अनुभव घेतां स्वानंद प्रगटे । अखंड सेवी तूं ॥मनारे॥स्वरुपा० ॥१॥
ऐशा शुद्ध दृष्टी पाहातां । उघडें ब्रह्म येईल हातां ।
भवभयाची उरे न वार्ता । स्वानंद भोगी तूं ॥मनारे॥स्वरुपा० ॥२॥
अभ्यासाने पूर्ण सुखाते । पावशी वर दिधला गुरुमातें ।
वारी म्हणे धरी दृढ विश्वासाते । तरीच मुक्त होसी तूं ॥मनारे॥स्वरुपा० ॥३॥