हें मना, सोडी कल्पना, धरी तूं ध्याना, सत्य सांगतें । सत्य सांगतें ।
ध्यानांत मुक्ति ती तात्काळची रे होते ॥धृ०॥
हो दक्ष, लावीतें लक्ष, करुनी आलक्ष, ज्ञान मग होई, ज्ञान मग होई ।
स्वस्वरुपीं मग तूं पूर्ण मिळुनीया जाई ।
तें स्वरुप, असे अमूप, पाहे तूं खूप, जिकडे तिकडे, जिकडे तिकडे ।
मग स्वानंदाने वृत्ती त्यांतची बुडे ॥चाल॥
तूं बुडी मारुनी राहे क्षणभरी । भोगुनी सौख्य तें येई बाहेरी ॥चा.पू.॥
मग म्हणें, नको वर येणें, स्वरुपीं ठाणें, देवुनी बैसे, देवुनी बैसे ।
सद्गुरुरायें हें न कळें केलें कैसें । हें मना, सोडी कल्पना, धरी तूं घ्याना,
सत्य सांगतें, सत्य सांगतें० ॥१॥
तें रुप, भरलेसें खूप, दिसें अमूप, नसे त्या उपमा, नसे त्या उपमा ।
मन मुरुनी गेलें, विसरुनी समूळ कामा । हें जग, भासेना मग,
देहासी भोग, प्रारब्धें होती, प्रारब्धें होती । मग नाही तयाचें सुखदुःख तें चित्तीं ॥चाल॥
हा देह पडे जरी उकिरडयावरी । अथवा तो राहो सुंदर शेजेवरी ॥चा.पू.॥
त्यागुनी, पाहे त्या दुरुनी, साक्षी होवुनी, दृश्य तो मजला, दृश्य तो मजला ।
मी दृष्टा साक्षी सर्वांहुनी वेगळा । हें मना, सोडी कल्पना, धरी तूं ध्याना,
सत्य सांगतें, सत्य सांगतें० ॥२॥
तो क्षर आणि अक्षर, त्याहुनी पर, असें मी वरती, असें मी वरती ।
उत्तम पदीं मी म्हणुनी पुरुष मज म्हणती । तें पद, असे अति शुद्ध,
नसे त्या बांध, जगाचा कांही, जगाचा कांही ।
बा मना तिथे तूं बुडी मारुनी पाहा ॥चाल॥
तिथे ज्ञान आणि अज्ञान नसे मुळीं तें सुखदुःख हें समूळ रे गिळा ॥चा०पू०॥
तें रुप, तुझें स्वरुप, स्वानंद खूप, तिथे तूं राही, तिथे तूं राही ।
सद्गुरुपद हें वारी म्हणे तूं पाही । हें मना, सोडी कल्पना,
धरी तूं ध्याना, सत्य सांगतें, सत्य सांगतें० ॥३॥