मना तूं पाही, मना तूं पाही । स्फूर्ती ती कोठुनी होई ॥धृ०॥
शोधुनी पाही मूळ तूं स्फुरण । होईल तेणें समाधान ।
तेंची स्वसुखाचें स्थान । अनुभव घेई, अनुभव घेई ।
स्फूर्ती ती कोठुनी होई ॥१॥
स्फूर्तीपासुनी होईल वृत्ती । तेथुनी गुणाची उत्पत्ती ।
स्पष्ट दशेला तीच पुढे येती । पंचभूतें हीं, पंचभूतें हीं । स्फूर्ती ती० ॥२॥
पंचभूतांचा हा विस्तार । तेणें झाले स्थूल हें शरीर ।
जीव शिवाचा करी व्यापार । प्रकृती ही, प्रकृती ही । स्फूर्ती ती० ॥३॥
प्रकृतीयोगें जीवा बंधन । मुक्त होण्या पाहिजे ज्ञान ।
सद्गुरुवांचुनी देईल कोण । शरण तूं जाई, शरण तूं जाई ।स्फूर्ती ती० ॥४॥
वारी म्हणे शरण जातां । कळेल तुजला स्वरुप सत्ता ।
मूळ पाहातां होय ऐक्यता । निजस्वरुपीं, निजस्वरुपीं । स्फूर्ती ती० ॥५॥