मना तूं चंचल फार । म्हणुनी सद्गुरुपद हे ध ॥धृ०॥
सद्गुरुचे ते पाय धरीतां । होशील निश्चयें स्थीर ।
शांती सुख तें देवुनी तुजला । करतील या भवपार । मना तूं० ॥१॥
गुरुपद कमलीं भ्रमर तूं होवुनी । अमृतपान कर ।
बोधामृत तें पान करीतां । होईल सुख अपार । मना तूं० ॥२॥
स्वरुपावांचुनी स्थीर कसा तूं । होशील करी विचार ।
वारी म्हणे तुज सद्गुरुनाथ । करतील स्वरुपाकार । मना तूं० ॥३॥