बा मना, सोडी कल्पना, करीती बंघना, सांगतें मी तुजला, सांगतें मी तुजला ।
मग भटकत फिरणें लागे चौर्यांशी तुजला ॥धृ०॥
ती सोडी, विषय गोडी, तुजला पाडी, संसारामाजीं, संसारामाजीं ।
मग करणें लागे तुज, सर्वांची हांजी हांजी ।
ती आशा, घाली तुज फाशा, करील दुर्दशा, दुःख अनिवार, दुःख अनिवार ।
मग मृत्यू येवुनी ठाकेल तव समोर ॥चाल॥
या माया पाशामाजीं पडतां । तुज नाही त्यांतुनी कोणी काढीतां ॥चा.पू.॥
नौमास, होय अतीं त्रास, दुःख बालकास, नरकयातना, नरकयातना,
बाहेर येतां त्रिविध ताप ते नाना ।बा मना०॥१॥
ते ताप, देती संताप, नसे त्या माप, नाही विश्रांती, नाही विश्रांती ।
मग कशी मिळे ती सांग तुला बा शांती ।
तूं कर्म, करीसी ना धर्म, कळेना वर्म, म्हणुनी असे बंध,
म्हणुनी असे बंध । लागला वाईट विषयाचा तुज छंद ॥चाल॥
बाईल तुजलारे ओढी ती । हीं पोरें द्रव्य काढा म्हणती ॥चा.पू॥
ही आशा, करील दुर्दशा, घालुनी फासा, संसारीं नेई, संसारीं नेई ।
तिथे सोडवितां तुज सद्गुरुवांचुनी नाही । बा मना० ॥२॥
हो सावध, धरी गुरुपद, ऐकुनी बोध, रत हो गुरुपायीं, रत हो गुरुपायीं ।
ह्या नरदेहाचें सार्थक करुनी घेई । हा पुन्हा, देह मिळेना, जाणुनी हें मना,
साधन कर कांही, साधन कर कांही । सद्गुरुवांचुनी लागेना ती सोई ॥चाल॥
जावुनी सद्गुरुच्या सदना । घे परोक्षापरोक्ष ज्ञाना ॥चा.पू.॥
तें ज्ञान, देई समाधान, चुकवी जन्ममरण स्वानंद होई, स्वानंद होई ।
वारी म्हणे सद्गुरुवांचुनी प्राप्त नाही । बा मना० ॥३॥