मनारे किती तुज सांगुं । नको विषयांमध्ये रंगु ॥धृ०॥
हे विषय तुजसी फसविती । गोड गोड वरी दाविती ।
परी अंतीं नरका नेती । त्या पंथीं नको तूं जावुं ।मनारे किती०॥१॥
हे सुंदर हरीचे पाय । रंगुनी त्यांत तूं जाय ।
नाही जन्ममृत्येचें भय । तूं धरी बा संत संगु ।
मनारे किती तुला सांगुं० ॥२॥
संतसंगें विषय पळती । वासना समुळ त्या जळती ।
लागे मग हरीची प्रीती । मग वाटें गीत गांवुं ।
मनारे किती तुला सांगुं० ॥३॥
येवुनी या नरदेहीं । तूं सार्थक करी तरी कांही ।
सद्रुशी शरण जाई । तेणें होशील तूं अभंगु ।
मनारे किती तुला सांगुं ० ॥४॥
हें सांगे मना तुज वारी । चौर्यांशीची चुकवी फेरी ।
पुरुषार्थ साधी चारी । भवाचा करी भंगु ।
मनारे किती तुला सांगुं ० ॥५॥