मना तूं न दवडी । मना तूं न दवडी । स्वानंद सुखाची घडी ॥धृ०॥
अखंड स्वरुपीं होई रत । गुंतूं नको रे ह्या विषयांत ।
तेणें तुझा होईल घात । ह्यास्तव सोडी, ह्यास्तव सोडी ।
स्वानंद सुखाची घडी० ॥१॥
अमोल्य आयुश्य जातें वाया । पुनरपी न मिळे नरतनु काया ।
ह्यास्तव शरण जा गुरुपाया । स्वसुख जोडी, स्वसुख जोडी ।
स्वानंद सुखाची घडी० ॥२॥
जातो एक एक क्षण । क्षण नव्हे तो अनर्घ्य रत्न ।
वेचिली ती बिनमोलान । घेवुनी विषय कवडी, विषय कवडी ।
स्वानंदसुखाची घडी० ॥३॥
ऐसा नरदेह मिळेना पुन्हा । करुनी घे रे आत्मसाधना ।
वारी म्हणे जन्ममरणा । विचारे तोडी विचारे तोडी ।
स्वानंद सुखाची घडी० ॥४॥