मना तूं पाही, मना तूं पाही । संसारीं सुख मुळी नाही ॥धृ०॥
प्रवृत्तीचा मार्ग बिकट । तेथे असती बहुतची कष्ट ।
म्हणुनी तुजला सांगतें स्पष्ट । निवृत्त होई, निवृत्त होई ।
संसारीं सुख मुळी नाही० ॥१॥
जन्ममरण यातायाती । दुःख त्याचें सांगूं किती ।
भ्रमण त्याचें चुकें न कल्पांतीं । चौर्यांशी पाही, चौर्यांशी पाही ।
संसारीं सुख मुळी नाही० ॥२॥
ऐशा करीतां येरझारा । न मिळे सुखाचा तो वारा ।
सोडी ना तो सगासोयरा । आप्त तेही, आप्त तेही ।
संसारीं सुख मुळी नाही० ॥३॥
ह्यास्तव निवृत्ती मार्ग धरी । त्यांत सौख्य तुज होय भारी ।
स्वानंदाच्या येतील लहरी । सुख मग होई, सुख मग होई ।
संसारीं सुख मुळी नाही० ॥४॥
स्वानंदाचा हाची मार्ग । टाकुनी देई हा अपवर्ग ।
नाही कुणाचा तिथे संसर्ग । तद्रूप होई, तद्रूप होई ।
संसारीं सुख मुळी नाही० ॥५॥
सद्गुरु सांगती मार्ग हा नीट । मानु नको त्याचा वीट ।
वारी म्हणे धरी ही वाट । मग भय नाही, मग भय नाही ।
संसारीं सुख मुळी नाही० ॥६॥