कितीतरी शिकवुं तुजसी सख्या मानसारे ॥धृ०॥
मिथ्या हें जगत सारें । वाटेना तुजसी कारे ।
यांत काय असें खरें । सांग तूं मसीरे । कितीतरी शिकवुं० ॥१॥
जे जे तुज विषय दिसती । मृगजलवत जाण असती ।
त्यांत काय सौख्य प्राप्ती । होय बा तुजसीरे । कितीतरी शिकवुं० ॥२॥
सुखाचें वा हेंची साधन । सद्गुरुचे धरी तूं चरण ।
होवुनी त्यासी अनन्य शरण । चुकवी संसृतीसीरे । कितीतरी शिकवुं० ॥३॥
सारासार करुनी विचार । स्वस्वरुपी होई स्वार ।
जाई तरुनी भवपार । वारी सांगे ऐशी रे । कितीतरी शिकवुं० ॥४॥