मना धरी छंद. । जेणें होईल ब्रम्हानंद ॥धृ०॥
छंद लागू दे स्वस्वरुपाचा । निरास करी या चौ देहाचा ।
विचार करी तूं अंतरीं याचा । तुटेल मग बंध ।
जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥१॥
बोध परिसुनी सद्गुरुचा । अभ्यास करी नित्य त्याचा ।
ब्रम्हरुप होशील साचा । मग नित्यानंद ।
जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥२॥
जिकडें पाहे तिकडे तेची । आस्ती भाती प्रिय आत्माची ।
वार्ता नाही नामरुपाची । सच्चिदानंद ।
जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥३॥
ऐसा छंद ज्या लागला । जन्ममृत्यू नाही त्याला ।
वारी म्हणे प्राप्त झाला । त्या गोविंद ।
जेणें होईल ब्रम्हानंद । मना० ॥४॥