सद्गुरुचें ध्यान सदा । हृदयीं मना ध्याईरे ॥धृ०॥
ध्येय ध्याता धरुनी ध्यान । समरस ही वृती करुन ।
द्वैतभाव देई टाकुन । तरीच सुख होईरे । सद्गुरुचें० ॥१॥
जैसी अळी भृंगी होय । तैसें गुरुरुप ध्याय ।
जीवभाव समुळ जाय । ऐक्य स्वरुपीं होई रे । सद्गुरुचें० ॥२॥
वारी म्हणे ध्यान करीतां । ध्येय रुप होय स्वतः ।
मग काय भय चिंता । स्वानंदांतची राहीरे । सद्गुरुचें० ॥३॥