सद्गुरु पदी होई रत ॥ मना तूं ॥ सद्गुरु पदीं होई रत ॥धृ०॥
सद्गुरुपद असें अविनाश । होईल तेथे सुख जीवास ।
एकाग्र करीतां हें चित्त ॥मना तूं० ॥ सद्गुरु पदीं० ॥१॥
एकाग्र चित्त स्वरुपीं होतां । देहबुद्धीची नुरे अहंता ।
चिद्रूप होय त्वरीत ॥ मना तूं ॥ सद्गुरु पदीं. ॥२॥
सद्गुरु पदीं आनंद भारी । होशील मुक्त ह्या संसारीं ।
होशी मना तूं शांत ॥मना तूं० ॥सद्गुरु पदीं० ॥३॥
सद्गुरु सखा जिवलग असुनी । भटकसी कां तूं रानोरानीं ।
कां न कळे तुज हीत ॥मना तूं० ॥ सद्गुरु पदीं० ॥४॥
वारी म्हणे बा सांगु किती तुज । जाणुनी घेई अंतरींचें गुज ।
अखंड राही सुखात ॥ मना तूं० ॥सद्गुरु पदीं० ॥५॥