केलें पाहीजे । ऐसें केलें पाहीजे ॥मनारे॥ केलें पाहीजे ।
नरदेहाचें सार्थक होईल । ऐसें केलें पाहीजे ॥धृ०॥
साधन चतुष्ठाय साधुनी । नित्यानित्य विचार करुनी ।
अनित्याचा त्याग करुनी । नित्य वस्तू घेईजे ॥मनारे॥ऐसें०॥१॥
ईहपर भोगा उदास असुनी । देहबुद्धीचा त्याग करुनी ।
शमदम साधन षटक साधुनी । मोक्षाते लाहीजे ॥मनारे॥ऐसें०॥२॥
सद्गुरुचरणीं शरण जावुनी । अनन्य तत्पदीं लीन होवुनी ।
कोण मी मजला सांगा म्हणुनी । पुसलें पाहीजे ॥मनारे॥ऐसें०॥३॥
अभय वचन सद्गुरु देतां । श्रवणीं सादर व्हावें तत्वता ।
बोध पटवुनी घ्यावा चित्ता । सांगती ते जें जें ॥मनारे॥ऐसें०॥४॥
बोधामृत तें पान करीतां । शांती येईल हळुहळु चित्ता ।
संधी मध्ये पाहातां पाहातां । अनुभवा घेईजे ॥मनारे॥ऐसें.॥५॥
अनुभव येतां दृढ अभ्यासें । समरस होईल चिद्विलासें ।
ऐशाकरिता अभ्यासाते. । स्वसुखा पाविजे ॥मनारे॥ऐसें०॥६॥
वारी म्हणे बा सद्गुरुकृपा । संपादुनी ती घ्यावी बाप्पा ।
चुकवी चौर्यांशीच्या खेपा । अखंड सौख्या भोगीजे ॥मनारे॥ऐसें०॥७॥