मनारे तुला वाटतें सौख्य व्हावें । तरी अंतरीं श्रीहरीते भजावें ॥धृ०॥
सुख तें अंतरीं, । जाशी तूं बाहेरी । नाकळे जरी तरी ।
शोधुनी पाहावें । म्हणुनी जाई सदा ।
शरण गुरुच्या पदा । नाही मग आपदा ।
सुख घ्यावें । मनारे तुला वाटतें सौख्य व्हावें ॥१॥
सोडुनी चरणा । फिरसी कां वणवण ।
भज त्या नारायणा । ऐक्य भावें ।
सुख ह्या संसारीं नाही तें तीळभरी ।
म्हणुनी तूं श्रीहरी । नित्य गावें ।मनारे तुला० ॥२॥
नाम हें संसारीं । भव हा दुर करी ।
शांतीच्या ओवरी । नित्य राहावें ।
वारी म्हणे नाम तें । देई सुख धाम तें ।
पुरवी मग काम तें । सर्व भावें । मनारे तुला० ॥३॥