तुझी शेतवाडी विठूचा देव्हारा, पाटपाणीयाचा वाहे जसा शिवारा । धूळ तोची बुक्का होतो घास तेची चंदन, अहोरात्र सेवा हेचि हरीचे पूजन ॥१॥
अन्य रूप घेओनी येती अनंत आकाश, नको पंढरीची वारी नको रे उपास, कणाकणा माजी आहे प्रभुचा निवास । नित्य राबे त्याला देतो श्रीहरी निवारा ॥२॥
बीज ईश्वराचे रूप कृपा ते रोपटे । उभ्या शिवाराच्या लेखी वेदही धाकुटे । निर्गुणास येतो येथे गुणांचा फुलोरा ॥३॥