काया ही पंढरी । आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥धृ॥
भावभक्ती भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥१॥
स्नान दान पुजा, विवेक आनंद । हाची वेणूनाद शोभतसे ॥२॥
दया, क्षमा शांती, हेची वाळवंट । मिळालासे गट वैष्णवांचा ॥३॥
दश इंद्रियांचा एक मेळा केला । ऐसा गोपाळकाला होतसे ॥४॥
देही देखली ही, पंढरी जनीवनी । एका जनार्दन वारी करी ॥५॥