फिरविले देऊळ जगामध्ये, ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला ॥धृ॥
भरियली हुंडी नरसिंह मेहत्याची, धनाजी तात्याची शेतेपरी ॥१॥
मीराबाई साठी घेतो विषत्याला, दामाजीचा झाला पाडेवार ॥२॥
कबिराच्या मागे विणू लागे शेले मूल उठविले कुंभाराचे ॥३॥
आता तुम्ही दया करा पंढरीराया, तुका लागे पाया वेळोवेळा ॥४॥