पहिले मासी रुक्मीणीसी आली अन्नाची शिसारी । बाग केली नारळीचे त्रिपुर केळी पोफळीचे । ताकिद माळीयाला करा दिवस सोनियाचा आला । कृष्ण म्हणे रुक्मीणीला दिवस सोनियाचा आला ॥१॥
दुसरे मासी भिभक तनया ऐशी पडली गर्भछाया । पालटूनी स्वरूप काया कृष्ण म्हणे रुक्मीणीला ॥२॥
तिसरे मासी भिभक बाळी ऐशी ल्याली चीर चोळी । पाट समया रांगोळी भोजनाशी गूळ पोळी । उशीर भोजनाशी झाला ॥३॥
चौथे मासी उभी द्वारी पुसती द्वारकेच्या नारी विनोद करीती नानापरी हसे रुक्मीणी सुंदरी । आज वृतांत आम्हा कळला ॥४॥
पाचवा महिना लागला दिले मंडप बागेत । पाची पक्वान्नांचा थाट पंक्ती पडल्या अचाट । मध्ये बसवा रुक्मीणीला ॥५॥
सहाव्या महीन्याचे सोहोळे कृष्ण पुसतो डोहाळे आंबे पाडाचे पिवळे रूप रुक्मीणीचे काळे ॥६॥
सातव्या महीन्याच्या परी वळील्या अमलोक खिरी । पिवळे पातळे केशरी चोळी किनखापी भरजरी ॥७॥
आठवा महीना लागला । आठ अंगुळ रुक्मीणीला । हार तुरा श्रीकृष्णाला माळ उंबरीची घाली ॥८॥
नऊ मास नऊ दिन झालो प्रसुत रुक्मीणी । पुत्र जन्मले मदन जैसे सूर्याचे किरण चंन्द्र लाजूनीया गेला ॥९॥
दहावा महीना सरला आनंद त्रिभुवनी झाला गुड्या तोरणे उभारा कृष्ण म्हणे रुक्मीणीला दिवस सोनीयाचा आला ॥१०॥