तिळगुळ घ्या मंजुळ बोला । सुप्रेमे मुखी घाला ॥धृ॥
हृदय शेगडी माझी, कोळसे अहंभूतीचे घालूनी खासे । हरिचे चिंतन मंदाग्नी विलसे । मन कढई योग्यची याला ॥१॥
नाम प्रभुचे तिळ स्नेहांकीत । भक्ती शर्करा कापे मंडित । दृढनिश्चय या हस्ते हलविता । समतेचा काटा उठला ॥२॥
सुप्रेमाचा रंग केशरी । या हलव्या वरी झळके भारी । ख्याती मुक्तीची या संसारी । हा अर्पण हरीपद कमला ॥३॥
अर्पीते तुम्हा संक्रमणाचा हलवा । स्विकार करूनी खावा । अनुदिन प्रेम द्या नवा । बोला आम्हासी सदैव शब्द गोडवा ॥४॥