मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अर्‌रह्‌मान

सूरह - अर्‌रह्‌मान

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने ७८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अत्यंत मेहरबान (ईश्वरा) ने कुरआनचे शिक्षण दिले आहे. त्यानेच मानवाला निर्माण केले, आणि त्याला बोलणे शिकविले. (१-४)

सूर्य आणि चंद्र एका हिशेबाने बांधलेले आहेत. आणि तारे व वृक्ष सर्व नतमस्तक आहेत. आकाशाला त्याने उंच केले आणि संतुलन प्रस्थापित केले. याची निकड अशी आहे की तुम्ही संतुलन बिघडक नका. न्यायपूर्ण रीतीने ठीकठीक वजन करा आणि तराजूने तोलताना वजन कमी करू नका. (५-९)

पृथ्वीला त्याने संपूर्ण प्राणिमात्रासाठी बनविले. त्यात हरतर्‍हेची विपुल चवदार फळे आहेत. खजुरीचे वृक्ष आहेत ज्याची फळे वेष्टनात गुंडाळलेली आहेत. वेगवेगळी धान्ये आहेत ज्यात भुसाही असतो आणि दाणेसुद्धा. तर हे जिन्न व मानव तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या देणग्यांचा इन्कार कराल? (१०-१३)

मानवाला त्याने चिखलमातीपासून बनविले आणि जिन्नला अग्नीच्या ज्वालापासून निर्माण केले. मग हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्ये खोटी ठरवाल? (१७-१८)

दोन समुद्रांना त्याने सोडले की ते परस्परात मिळावे तरीपण त्यांच्या दरम्यान एक पडदा आड आहे ज्याचे उल्लंघन ते करीत नाहीत, मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या सामर्थ्याच्या कोणकोणत्या चमत्कारांना खोटे ठरवाल? या समुद्रातून मोती आणि प्रवाळ निघतात. तर हे जिन्न आणि मानव. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या सामर्थ्यांच्या कोणकोणत्या वैशिष्टयांना खोटे ठरवाल? (१९-२३)

आणि ही जहाजे त्याचीच आहेत, जी समुद्रात पर्वतासमान उंच गेलेली आहेत, म्हणून हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना नाकाराल? (२४-२५)

प्रत्येक वस्तू जी या पृथ्वीवर आहे लोप पावणारी आहे आणि तुझ्या पालनकर्त्याचे प्रतापी आणि उदार रूपच तेवढे बाकी राहणार आहे. मग हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या खुबींना खोटे ठरवाल? पृथ्वी व आकाशात जे जे कोणी आहेत. सर्वजण आपल्या गरजा त्याच्याकडेच मागत आहेत. प्रत्येक क्षणी त्याचे वैभव नवनवीनच. मग हे जिन्न व मानव, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या स्तुत्य गुणांना खोटे ठरवाल? हे धरणीच्या भारांनो, लवकर आम्ही तुमची विचारणा करण्यासाठी मोकळे होत आहोत, (मग पाहून घेऊ की) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरविता. हे जिन्न व मानव समूहांनो, जर तुम्ही पृथ्वी व आकाशांच्या सरहद्दीतून निघू शकत असाल तर निघून पहा. नाही जाऊ शकत. त्याच्याकरिता मोठे बळ हवे आहे. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटे ठरवाल? (पळ काढण्याचा प्रयत्न केला तर) तुमच्यावर अग्नीज्वाळा व धूर सोडेले जातील ज्याचा मुकाबला तुम्ही करू शकणार नाही. हे जिन्न व मानव. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांचा इन्कार कराल? मग (काय बेतेल त्यावेळी) जेव्हा आकाश फाटेल आणि लाल कातडयाप्रमाणे तांबडा होईल? हे जिन्न व मानव (त्यावेळी) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटे ठरवाल? (२६-३८)

त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिन्नला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही. मग (पाहून घेतले जाईल की) तुम्ही दोन्ही समूह आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना नाकारता? गुन्हेगार तेथे आपल्या चेहर्‍यावरून ओळखून घेतले जातील आणि त्यांना कपाळाचे केस आणि पाय धरधरून फरफटले जाईल. (त्यावेळी) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटे लेखाल? (त्यावेळी सांगितले जाईल) हा तोच नरक आहे ज्यास गुन्हेगार खोटे ठरवीत असत. त्याच नरक व उकळत्या पाण्यादरम्यान ते भ्रमण करीत राहतील. मग आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटे ठरवाल? (३९-४५)

आणि त्या प्रत्येक इसमासाठी जो आपल्या पालनकर्त्याच्या पुढे पेश होण्याची भीती बाळगत असेल. दोन उद्याने आहेत. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? हिरव्यागार शाखानी भरपूर. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? दोन्ही उद्यानांत दोन झरे प्रवाहित. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? दोन्ही उद्यानांत प्रत्येक फळाचे दोन प्रकार. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? जन्नती लोक अशा बिछाईतीवर लोड लावून बसतील ज्यांचे अस्तर दाट रेशमाचे असेल आणि उद्यानाच्या (झाडांच्या) शाखा फळांनी वाकल्या जात असतील. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल. या ऐश्वर्यादरम्यान लाजाळू नजरवाल्या असतील, ज्यांना या स्वर्गस्थ लोकांच्या अगोदर कधी कोणा मानवाने अथवा जिन्नाने स्पर्श केलेला नसेल, आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? अशा सुंदर जणू हिरे आणि मोती, आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना खोटे ठरवाल? (४६-५९)

सदाचाराचा बदला सदाचाराव्यतिरिक्त काय बरे असू शकतो? तर हे जिन्न व मानव, आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या प्रशंसनीय गुणांचा तुम्ही इन्कार कराल? आणि त्या दोन उद्यानांशिवाय दोन उद्याने आणखीन असतील. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? टवटवीत हिरवी गडद उद्याने. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? दोन्ही उद्यानांत दोन झरे कारंजाप्रमाणे उसळत असलेले. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? त्यांत विपुल फळे आणि खजुरी व डाळिंबे. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? या ऐश्वर्यांच्या दरम्यान सुचरित्र आणि सुस्वरूप पत्नीं. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? तंबूत ठेवल्या गेलेल्या अप्सरा. आपल्या पालनकर्त्याच्या  कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? या स्वर्गस्थ लोकांपूर्वी कधी कोणा मानवाने अथवा जिन्नने त्यांना स्पर्श केलेला नसेल. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या देणग्यांना तुम्ही खोटे ठरवाल? ते स्वर्गस्थ लोक हिरवे गालीचे आणि सुंदर व दुर्मिळ बिछान्यांवर तक्के लावून बसतील. आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटे ठरवाल? (६०-७७)

अत्यंत समृद्धशाली आहे तुझ्या प्रतापी व उदार पालनकर्त्याचे नाव. (७८)


Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP