मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अन्‌नूर

सूरह - अन्‌नूर

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने ६४)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

हा एक अध्याय आहे जो आम्ही अवतरला आहे, आणि याला आम्ही अनिवार्य ठरविला आहे आणि यात आम्ही सुस्पष्ट उपदेशपर वचने अवतरली आहेत, कदाचित तुम्ही बोध घ्यावा. (१)

व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरुष दोहोपैकी प्रत्येकास शंभर फटके मारा. आणि त्यांची कीव करू नका, अल्लाहच्या धर्माच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल, आणि त्यांना शिक्षा देते वेळेस श्रद्धावंतांचा एक समूह उपस्थित असावा. (२)

व्यभिचार्‍याने विवाह करता कामा नये परंतु केवळ व्यभिचारिणीबरोबर अथवा अनेकेश्वरवादी स्त्रीशी, आणि व्यभिचारीणी स्त्रीशी विवाह करता कामा नये परंतु केवळ व्यभिचारी अथवा अनेकेश्वरवादी पुरुषाने आणि हे निषिद्ध केले गेले आहे श्रद्धावंतांसाठी. (३)

आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना ऐंशी फटके मारा आणि त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणिज ते स्वत:च अवज्ञाकारी आहेत. त्या लोकांव्यतिरिक्त जे या कृतीनंतर पश्चात्ताप करतील व सुधारणा घडवून आणतील कारण की अल्लाह अवश्य (त्यांच्या बाबतीत) क्षमाशील व परम दय़ाळू आहे. (४-५)

आणि जे लोक आपल्या पत्नींवर आरोप ठेवतील आणि त्यांच्यापाशी त्यांच्या स्वत:खेरीज इतर कोणीही साक्षीदार नसेल तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीची साक्ष (अशी असावी की त्या व्यक्तीने) चार वेळा अल्लाहची शपथ घेऊन साक्ष द्यावी की तो (आपल्या आरोपात खरा आहे.) आणि पाचव्या वेळेस सांगावे की त्याचा अल्लाह धिक्कार करो,
जर तो (आपल्या आरोपात) खोटा असेल. आणि स्त्रीची शिक्षा अशाप्रकारे टळू शकेल की चार वेळा तिने अल्लाहची शपथ घेऊन साक्ष द्यावी की हा पुरुष (आपल्या आरोपात) खोटा आहे. आणि पाचव्या वेळेस सांगावे की तिच्यावर अल्लाहचा प्रकोप कोसळो जर तो (आपल्या आरोपात) खरा आहे. तुम्हा लोकांवर अल्लाहची कृपा व त्याची मेहेरबानी झाली नसती आणि ही गोष्ट नसती की अल्लाह मोठा करुणाकर व बुद्धिमान आहे (तर पत्नीवर दोषारोपाच्या मामल्याने तुम्हाला मोठया पेचात आणले असते.) (६-१०)

ज्या लोकांनी हे कुभांड रचून आणले आहे ते तुमच्यातीलच एक टोळके आहे. या घटनेस आपल्यासाठी अरिष्ट समजू नका किंबहुना हेदेखील तुमच्याबाबतीत कल्याणकारीच आहे. ज्याने याच्यात जेवढा वाटा उचलला त्याने त्यात तितकेच पाप कमविले. आणि ज्या व्यक्तीने याच्या जबाबदारीचा मोठा वाटा आपल्या शिरावर घेतला त्याच्याकरिता तर भयंकर प्रकोप आहे. ज्या वेळेस तुम्हा लोकांनी ते ऐकले होते त्या वेळेसच श्रद्धावंत पुरुषांनी व श्रद्धावंत स्त्रियांनी आपल्या स्वत:शीच सद्‌विचार का केला नाही? आणि का सांगून टाकले नाही की हा तर स्पष्ट आळ आहे? त्या लोकांनी (आपल्या दोषारोपणाच्या पुराव्यात) चार साक्षीदार का आणले नाहीत? आता ज्याअर्थी त्यांनी साक्षीदार आणले नाहीत अल्लाहजवळ तेच खोटे आहेत, जर तुम्हावर इहलोकात व परलोकात व परलोकात अल्लाहची कृपा, दया व मेहेरबानी नसती तर ज्या गोष्टीत तुम्ही गुंतला होता.
त्यापायी तुमच्यावर मोठ प्रकोप ओढवला असता. (जरा विचार तर करा त्या वेळेस तुम्ही किती भयंकर चूक करीत होता.) जेव्हा तुमच्यापैकी एकाच्या तोंडून दुसर्‍याच्या तोंडी ती खोटी गोष्ट पसरली आणि तुम्ही आपल्या तोंडाने ते सर्वकाही बोलले ज्याच्यासंबंधी तुम्हाला मुळीच माहिती नव्हती. तुम्ही याला एक क्षुल्लक गोष्ट समजत होता, वस्तुत: अल्लाहपाशी ही एक मोठी गोष्ट होती. (११-१५)

ही ऐकताक्षणीच तुम्ही असे का म्हटले नाही, “आम्हाला अशी गोष्ट तोंडाने उच्चारणे शोभत नाही, पवित्र आहे अल्लाह, हे तर एक भयंकर कुभांड आहे.” अल्लाह तुम्हाला उपदेश देतो की यापुढे कधीही असे कृत्य मुळीच करता कामा नये जर तुम्ही श्रद्धावंत असाल. अल्लाह तुम्हाला सुस्पष्ट सूचना देत आहे आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धीमान आहे (१६-१८)

जे लोक इच्छितात की श्रद्धावंतांच्या समुदायात अश्लीलता पसरावी ते लोक इहलोकात व परलोकात दु:खदायी शिक्षेस पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही. जर अल्लाहची कृपा व त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती आणि हे असे की अल्लाह मोठा प्रेमळ आणि दय़ाळू आहे. (तर या गोष्टीने जी नुकतीच तुमच्यात पसरविली गेली होती अत्यंत वाईट परिणाम दाखविले असते.) (१९-२०)

हे श्रद्धावंतानो, शैतानच्या पावलांचे अनुसरण करू नका. त्याचे अनुकरण कोणी करील तर तो अश्लीलता आणि दुराचाराचीच आज्ञा देईल. जर अल्लाहची कृपा व त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती तर तुमच्यापैकी कोणीही पवित्र होऊ शकला नसता, परंतु अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला पवित्र करतो, आणि अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे. (२१)

तुमच्यापैकी जे लोक कृपाविभूषित व ऐपत बाळगणारे आहेत त्यांनी अशी शपथ घेऊ नये की आपल्या नातेवाईक, गोरगरीब व अल्लाहच्या मार्गात हिजरत (देशत्याग) करणार्‍या लोकांना मदत करणार नाही. त्यांना माफ केले पाहिजे आणि त्याकडे कानाडोळा केला पाहिजे, काय तुम्हाला आवडत नाही की अल्लाहने तुम्हाला माफ करावे? आणि अल्लाहचा गुण असा आहे की तो क्षमाशील व दयाळू आहे. (२२)

जे लोक शीलवान, अजाण श्रद्धावंत स्त्रियांवर आळ घेतात त्यांचा इहलोक व परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे, त्यांनी त्या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वत:च्या जिभा, त्यांचे हात, पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाहच सत्य आहे, खर्‍याला खरे करून दाखविणारा. (२३-२५)

अपवित्र स्त्रिया अपवित्र पुरुषांसाठी आहेत आणि अपवित्र पुरुष अपवित्र स्त्रियांसाठी. पवित्र स्त्रिया पवित्र पुरुषांसाठी आहेत आणि पवित्र पुरुष पवित्र स्त्रियांसाठी. ते निष्कलंक आहेत त्या गोष्टीपासून जे आळ घेणारे घेतात. त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि सन्मानपूर्वक उपजीविका. (२६)

हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, आपल्या घराशिवाय दुसर्‍यांच्या घरात प्रवेश करीत जाऊ नका. जोपर्यंत त्या घरातील लोकांची सम्मती मिळत नाही आणि त्या घरातील लोकांना तुम्ही सलाम करीत नाही. ही पद्धत तुमच्यासाठी उत्तम आहे. अपेक्षा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. मग जर तेथे कोणी आढळला नाही तर प्रवेश करू नका जोपर्यंत तुम्हाला परवानगी दिली जात नाही, आणि जर तुम्हाला सांगितले गेले की, परत जा तर निघून जा. ही तुमच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. आणि जे काही तुम्ही करता ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. तथापि तुमच्यासाठी यात काही हरकत नाही की अशा घरात प्रवेश करावा जे कोणाच्या राहण्याचे स्थान नाही आणि ज्यात तुमच्या लाभाची (अथवा कामाची) एखादी वस्तू असेल. तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे काही लपविता सर्वांचे अल्लाहला ज्ञान आहे. (२७-२९)

हे पैगंबर (स.), श्रद्धावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी. आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. (३०)

आणि हे पैगंबर (स.), श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले आपल्या मेलमिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल.  हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप व्यक्त करा, अपेक्षा आहे की सफल व्हाल. (३१)

तुमच्यापैकी जे लोक अविवाहित असतील आणि तुमच्या दास-दासीपैकी जे सदाचारी असतील त्यांचे विवाह करून द्या. जर ते गरीब असतील तर अल्लाह त्यांना आपल्या कृपेने श्रीमंत बनवील. अल्लाह विशाल आणि सर्वज्ञ आहे. आणि ज्यांना विवाहाची संधी उपलब्ध नसेल त्यांनी संयम अंगिकारावा येथपावेतो की अल्लाह आपल्या कृपेने त्यांना समृद्ध बनवील, आणि तुमच्या दासदासीपैकी जे करार करण्याची विनंती करतील त्यांच्याशी करार करा जर तुम्हाला माहीत असेल की त्याच्यांत भलेपणा आहे आणि त्यांना त्या मालमत्तेतून द्या जी अल्लाहने तुम्हाला दिली आहे. (३२-३३)

आणि आपल्या दासींना. आपल्या ऐहिक लाभापोटी वेश्या व्यवसायासाठी अगतिक करू नका जेव्हा त्या स्वेत: सच्चरित्र राहू इच्छित असतील आणि जर कोणी बळजबरी केली तर या जबरदस्तीनंतर अल्लाह त्यांच्यासाठी क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे. (-३३)

आम्ही अगदी स्पष्ट मार्गदर्शन करणारी संकेतवचने तुमच्यापाशी पाठविली आहेत. आणि त्या लोकसमुदायांची बोधप्रद उदाहरणेदेखील आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत व ते उपदेश आम्ही दिलेले आहेत, जे भीती बाळगणार्‍यांसाठी असतात. (३४)

अल्लाह आकाशांचा व पृथ्वीचा प्रकाश आहे. (सृष्टीमध्ये) त्याच्या प्रकाशाची उममा अशी आहे जणू एका कोणाडयामध्ये दिव्याची ज्योत तेवत असेल. तो एका काचेमध्ये ठेवलेला. मोत्याप्रमाणे चमकणारा तारा. आणि तो एका अशा शुभ्र जैतुनच्या वृक्षाच्या तेलाने तेवत आहे. जो पौर्वात्यही नाही की पाश्चिमात्यही नाही. अग्नीचा स्पर्श देखील झाला नसला तरी तो तेजस्वी होतो. प्रकाशावर प्रकाश (वाढण्याची सर्व साधने एकवटली असतील), अल्लाह आपल्या प्रकाशाकडे ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो, तो लोकांना दृष्टांत देऊन गोष्ट समजावून देतो. प्रत्येक गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. (त्याच्या प्रकाशाकडे मार्ग प्राप्त करणारे) त्या घरात आढळतात ज्यांना उंच करण्याची व ज्यांच्यात आपले नामस्मरण करण्याचा अल्लाहने आदेश दिलेला आहे. त्यांच्यात असले लोक प्रात:-सांज त्याचे पावित्र्यगान करतात, ज्यांना व्यापार आणि खरेदी-विक्री अल्लाहच्या स्मरणापासून व नमाज कायम करण्यापासून व जकात अदा करण्यापासून बेसावध ठेवीत नाही. ते त्या दिवसाची भीती बाळगत असतात ज्या दिवशी ह्रदयात खळबळ माजण्याची व डोळे स्थिरावण्याची पाळी येईल, (आणि ते हे सर्वकाही यासाठी करतात) जेणेकरून अल्लाहने त्यांच्या उत्कृष्ट कृत्यांचा मोबदला त्यांना द्यावा आणि याउपर आपल्या कृपेने त्यांना उपकृत करावे. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला बेहिशेब देतो. (याच्या उलट) ज्यांनी सत्याचा इन्कार केला त्यांच्या कृत्याचे उदाहरण असे आहे जसे निर्जल वाळवंटातील मृगजळ, की तहानलेला त्याला पाणी समजून होता, परंतु तो जेव्हा तेथे पोहचला तेव्हा काहीही आढळले नाही, तर तेथे त्याला अल्लाह असलेला आढळला, ज्याने त्याचा हिशेब पुरेपूर चुकता केला आणि अल्लाहला हिशेब घेताना विलंब लागत नाही. अथवा त्याचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या खोल समुद्रातील अंधार की वर एक लाट आच्छदिली आहे. त्यावर आणखी एक लाट, आणि तिच्यावर ढग, अंध:कारावर अंध:कार आच्छादित आहे, माणसाने हात काढले तर तेही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लाहनेच प्रकाश प्रदान केला नाही त्याच्यासाठी मग कोणताही प्रकाश नाही. (३५-४०)

काय तुम्ही पाहात नाही की अल्लाहचे पावित्र्यगान करीत आहेत ते सर्वजण जे आकाशांत आणि पृथ्वीत आहेत आणि ते पक्षी जे  पंख पसरून उडत आहेत? प्रत्येक जण आपली भक्ती आणि पावित्र्यगान करण्याची पद्धत जाणतो, आणि हे सर्वजण जे काही करीत आहेत, अल्लाहला त्याची माहिती आहे. आकाश व पृथ्वीचे राज्य अल्लाहसाठीच आहे आणि त्याच्याकडेच सर्वांना परतावयाचे आहे. (४१-४२)

काय तुम्ही पाहात नाही की अल्लाह ढगाला हळू हळू चालवितो, मग त्याच्या तुकडयांना परस्परांशी जोडतो, मग त्याला एकवटून एक दाट मेघ बनवितो, मग तुम्ही पाहता की त्याच्या आवरणातून पावसाचे थेंब ठिबकत येतात. आणि तो आकाशांतून, त्या पर्वतांच्यामुळे जे त्यांच्यात उंचावले आहेत, गारांचा वर्षाव करवितो, मग ज्याला इच्छितो त्याला हानी पोहचवितो आणि ज्याला इच्छितो त्याला हानी पोहचवितो आणि ज्याला इच्छितो त्याला वाचवितो. त्याच्या विजेचा लखलखाट डोळे दिपवितो. रात्र व दिवसाची उलथापालथ तोच करीत आहे. याच्यात एक बोध आहे. डोळस लोकांसाठी. (४३-४४)

आणि अल्लाहने प्रत्येक जीवमात्र एक प्रकारच्या पाण्याने निर्माण केला. कुणी पोटावर चालत आहे तर कुणी दोन पायांवर आणि कुणी चार पायांवर. जे काही तो इच्छितो निर्माण करतो. तो प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे. (४५)

आम्ही अगदी स्पष्ट वस्तुस्थिती दर्शविणारी वचने अवतरली आहेत. पुढे सरळ मार्गाकडे मार्गदर्शन अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला करतो. (४६)

हे लोक म्हणतात की आम्ही श्रद्धा ठेवली अल्लाह व पैगंबर (स.) यांच्यावर आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली, परंतु यानंतर यांच्यापैकी एक गट (आज्ञाधारकतेपासून) तोंड फिरवितो. असले लोक मुळीच श्रद्धावंत नाहीत. जेव्हा त्यांना बोलाविले जाते अल्लाह आणि पैगंबराकडे जेणेकरून पैगंबराने त्यांच्या परस्परांतील तंटयाचा निकाल लावावा, तेव्हा यांच्यापैकी एक पक्ष त्याला बगल देतो. तथापि जर सत्य त्यांना अनुकूल असेल तर मोठे विनम्र बनून पैगंबरांकडे येतात. काय यांच्या ह्रदयांना (दांभिकतेचा) रोग जडलेला आहे? अथवा हे शंकेत गुरफटलेले आहेत?  किंवा या लोकांना अशी भीती आहे की अल्लाह व त्याचा पैगंबर त्यांच्यावर अत्याचार करील? खरी गोष्ट अशी आहे की अत्याचारी तर हे लोक स्वत:च आहेत. श्रद्धावंतांचे कर्तव्य तर असे आहे की जेव्हा त्यांना अल्लाह व पैगंबर (स.) कडे बोलाविले जाईल की पैगंबर त्यांच्या प्रकरणात निकाल देतील तेव्हा त्यांनी सांगावे की आम्ही ऐकले व आज्ञा पाळली. असलेच लोक सफलता प्रात करणारे आहेत, आणि यशस्वी तेच आहेत जे अल्लाह आणि पैगंबरांचे आज्ञापालन करतील आणि अल्लाहचे भय बाळगतील व त्याच्या अवज्ञेपासून स्वत:ला वाचवतील. (४७-५२)

हे (दांभिक) अल्लाहच्या नावाने कठोर शपथा घेऊन घेऊन सांगतात, “आपण जर आज्ञा दिली तर आम्ही घरातून बाहेर पडू.” यांना सांगा, “शपथा घेऊ नका, तुमच्या आज्ञापालनाची स्थिती माहीत आहे. तुमच्या कृत्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही.” सांगा, “अल्लाहचे आज्ञाधारक बना आणि पैगंबराचे आज्ञांकित बनून राहा, परंतु जर तुम्ही तोंड फिरवीत असाल, तर चांगले समजून असा की पैगंबरांवर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे, त्याला जबाबदार तो आहे आणि तुमच्यावर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे, त्याला जबाबदार तुम्ही. त्याचे आज्ञापालन कराल तर स्वत:च सन्मार्ग प्राप्त कराल, पैगंबराची जबाबदारी यापेक्षा अधिक काही नाही की त्याने स्पष्टपणे आज्ञा पोहचवाव्यात.” (५३-५४)

अल्लाहने वचन दिले आहे तुमच्यापैकी त्या लोकांना जे श्रद्धा ठेवतील आणि सत्कृत्ये करतील. तो त्यांना पृथ्वीतलावर त्याचप्रमाणे खलीफा (आपला नायब) बनवील ज्याप्रमाणे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांना बनविलेले आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या त्या धर्माची भक्कम पायावर उभारणी करील, ज्या धर्माला सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यासाठी पसंत केले आहे. आणि त्यांची (हल्लीची) भीतीची अवस्था शांततेत परिवर्तित करील, फक्त त्यांनी माझी भक्ती करावी आणि माझ्यासमवेत कोणालाही भागीदार बनवू नये आणि याउपर जे, द्रोह करतील तर असलेच लोक अवज्ञाकारी होत. नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर (स.) यांची आज्ञा पाळा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल. जे लोक द्रोह करीत आहेत, त्यांच्यासंबंधी असा गैरसमज करून घेऊ नका की ते पृथ्वीवर अल्लाहला नमवितील. त्यांचे स्थान नरक आहे आणि ते अत्यंत वाईट स्थान आहे. (५५-५७)

हे श्रद्धावंतांनो, हे आवश्यक आहे की तुमचे दास, दासी आणि तुमची ती मुले जी अद्याप सज्ञान नाहीत, अशांनी तीन घटिकेत परवानगी घेऊन तुमच्याजवळ येत जावे. सकाळच्या नमाजपूर्वी आणि दुपारच्या वेळी जेव्हा तुम्ही कपडे उतरून ठेवता. आणि रात्रीच्या नमाजनंतर. या तीन वेळा तुमच्यासाठी पडद्याच्या वेळा आहेत. यांच्यानंतर ते विना परवानगी आले तर तुमच्यावरही काही गुन्हा नाही आणि त्यांच्यावरही नाही. तुम्हाला एक दुसर्‍याकडे वरचेवर यावेच लागते. अशाप्रकारे अल्लाह तुमच्यासाठी आपल्या आदेशांचे स्पष्टीकरण करतो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. आणि जेव्हा तुमची मुले सज्ञान होतील तेव्हा हे आवश्यक आहे की त्यांनी तशाच प्रकारे परवानगी घेऊन यावे जसे त्यांची मोठी माणसे परवानगी घेत राहिली आहेत. अशाप्रकारे अल्लाह आपली वचने तुमच्यासमोर उलगडतो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. (५८-५९)

आणि ज्या स्त्रिया तारुण्य ओलांडून बसल्या असतील. विवाहाच्या उमेदवार नसतील, त्यांनी जर आपल्या चादरी उतरून ठेवल्या तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही परंतु अट अशी की त्या शृंगाराचे प्रदर्शन करणार्‍या नसाव्यात तथापि त्यांनीसुद्धा लज्जा बाळगून वागले तर त्यांच्यासाठीच उत्तम होय, आणि अल्लाह सर्वकाही ऐकतो आणि जाणतो. (६०)

काही हरकत नाही जर एखादा आंधळा किंवा पांगळा अथवा आजारी आणि तुमच्यासाठी यात काहीही हरकत नाही की आपल्या घरातून खा अथवा आपल्या वाडवडिलांच्या घरातून अथवा आपल्या आई-आजीच्या घरांतून, अथवा आपल्या भावांच्या घरांतून किंवा आपल्या बहिणींच्या घरांतून अथवा आपल्या चुलत्यांच्या घरांतून किंवा आपल्या आत्यांच्या घरांतून अथवा आपल्या मामांच्या घरांतून, किंवा आपल्या मावशींच्या घरांतून अथवा त्या घरांतून ज्यांच्या किल्ल्या तुमच्या सुपुर्द असतील किंवा आपल्या मित्रांच्या घरांतून. यातसुद्धा काही हरकत नाही की तुम्ही लोक मिळून खा अथवा वेगळे-वेगळे. तथापि जेव्हा घरांत प्रवेश कराल तेव्हा आपल्या लोकांना सलाम करीत जा-अभिष्टचिंतन, अल्लाहकडून निश्चित केले गेलेले, मोठया समृद्धीचे आणि पवित्र. अशाप्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्यासमोर संकेत वर्णन करतो, अपेक्षा आहे की तुम्ही समजुतदारपणा दाखवाल. (६१)

श्रद्धावंत तर वस्तुत: तेच लोक आहेत ज्यांनी अल्लाह व त्याच्या पैगंबराला मनापासून मानले आणि जेव्हा एखाद्या सामूहिज्क कार्याप्रसंगी पैगंबर (स.) समवेत ते असतील तेव्हा त्यांची परवानगी घेतल्याखेरीज त्यांनी जाऊ नये. हे पैगंवर (स.), जे लोक तुमच्यापासून परवानगी मागतात, तेच अल्लाह व पैगंबराला मानणारे आहेत. मग जेव्हा ते आपल्या एखाद्या कामानिमित्त परवानगी मागतील तर तुम्ही त्याला परवानगी देत जा, आणि अशा लोकांसाठी अल्लाहजवळ क्षमा-याचना करीत जा. अल्लाह निश्चितच क्षमाशील व कृपाळू आहे. (६२)

मुसलमानांनो, आपल्या दरम्यान पैगंबर (स.) यांचे बोलाविणे आपल्यातील एक दुसर्‍याचे बोलाविण्यासारखे समजू नका. अल्लाह त्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो जे तुमच्यापैकी असे आहेत जे एक दुसर्‍याचा आडोसा घेऊन गुपचुपपणे निसटतात. पैगंबर (स.) ची आज्ञा भंग करण्यार्‍यांना भीती असली पाहिजे की त्यांनी एखाद्या उपद्रवात अडकू नये अथवा त्यांच्यावर दु:खदायक प्रकोप कोसळू नये. सावध राहा, आकाश व पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचे आहे. तुम्ही ज्या कोणत्या वर्तनावर आहात, अल्लाह ते जाणतो. ज्या दिवशी लोक त्याच्याकडे परतविले जातील तेव्हा तो त्यांना दाखवील जे काही ते करून आले आहेत. त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे. (६३-६४)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP