मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
काऽऽफ

सूरह - काऽऽफ

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ४५)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

काऽऽफ. शपथ आहे महान कुरआनची-किबहुना या लोकांना आश्चर्य या गोष्टीचे वाटले की एक खबरदार करणारा खुद्द यांच्यातूनच यांच्याजवळ आला. मग इन्कार करणारे म्हणू लागले, “ही तर अजब गोष्ट आहे, काय जेव्हा आम्ही मरू आणि माती बनून जाऊ (तेव्हा दुसर्‍यांदा उठविले जाऊ)? हे पुनरागमन तर बुद्धी पत्नीकडचे आहे. (वास्तविकत:) जमीन यांच्या शरीरांतून जे काही खाते ते आम्हाला ज्ञात आहे, आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे ज्यात सर्वकाही सुरक्षित आहे. (१-४)

किंबहुना या लोकांनी तर ज्यावेळी सत्य यांच्यापाशी आले त्याचवेळी ते साफ खोटे ठरविले. याच कारणाने आता हे गोंधळात पडले आहेत. (५)

बरे, तर काय यांनी कधी आपल्यावरील आकाशाकडे पाहिले नाही? कशाप्रकारे आम्ही ते बनविले आणि सुशोभित केले, आणि त्यात कोठे कसली उणीव नाही. आणि पृथ्वीला आम्ही अंथरले आणि त्यात पर्वत रोवले व त्यात हरतर्‍हेच्या सुदृश्य वनस्पती उगविल्या. या सर्व वस्तू डोळे उगडविणार्‍या आणि बोधप्रद आहेत त्या प्रत्येक दासासाठी जो (सत्याकडे) रुजू होणारा असेल. आणि आकाशांतून आम्ही समृद्धशाली जल उतरविले. मग त्यापासून बागा आणि धान्याची पिके, आणि उंच उंच खजुरीची झाडे निर्माण केली, ज्यांना फळांनी भरलेले घड थरावर थर लागतात. अशी व्यवस्था आहे दासांना उपजीविका देण्याची, या पाण्याने आम्ही एका मृत जमिनीला जीवन प्रदान करतो (मेलेल्या माणसांचे जमिनीतून) निघणेसुद्धा अशाच प्रकारेच असेल. (६-११)

यांच्यापूर्वी नूह (अ.) चे राष्ट्र आणि अर्रसवाले व समूद, आणि आद व फिरऔना आणि लूतचे भाऊ आणि ऐकावाले व तुब्बअच्या राष्ट्रातील लोकांनीसुद्धा खोटे ठरविले आहे. प्रत्येकाने प्रेषितांना खोटे ठरविले आणि सरतेशेवटी माझी धमकावणी त्यांच्यावर लागू झाली. (१२-१४)

पहिल्या वेळेच्या निर्मितीला आम्ही असमर्थ होतो काय? परंतु एका नवीन निर्मितीसंबंधी हे लोक शंकाग्रस्त झालेले आहेत. (१५)

आम्ही मनुष्याला निर्माण केले आहे आणि त्यांच्या मनात उद्भवणारे ‘वसवसे’ सुद्धा आम्ही जाणतो. आम्ही त्याच्या मानेच्या शिरेपेक्षाही आधिक त्याच्याजवळ आहोत, (आणि आमच्या या प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय) दोन नोंदणारे त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला बसून प्रत्येक गोष्टीची नोंद घेत आहेत. कोणताही शब्द त्याच्या तोंडातून असा निघत नाही ज्याला सुरक्षित करण्यासाठी एक विद्यमान निरीक्षक हजर नाही. मग पहा ती मृत्यूकळा सत्यानिशी येऊन ठेपली, ही तीच गोष्ट आहे ज्यापासून तू पळ काढीत होतास. आणि मग नरसिंघ फुंकले गेले. हा आहे तो दिवस ज्याचे भय तुला दाखविले जात होते. प्रत्येक इसम अशा स्थितीत आला की त्याच्याबरोबर एक हांकून आणणारा आहे आणि एक साक्ष देणारा या गोष्टीपासून तू गाफिल होतास, आम्ही तो पडदा दूर केला जो तुझ्यापुढे पडलेला होता आणि आज तुझी दृष्टी खूप तीक्ष्ण आहे. त्याच्या साथीदाराने सांगितले, हा जो माझ्या स्वाधीन होता, हजर आहे, आज्ञा दिली गेली, “फेकून द्या नरकामध्ये प्रत्येक कट्टर अश्रद्धावंताला जो सत्याचा द्वेष करीत असे, भलाईला रोखणारा आणि मर्यादांचे उल्लांघन करणारा होता. शंकेत गुरफटलेला होता. आणि अल्लाहच्या समवेत कुणा दुसर्‍याला उपास्य बनवून बसला होता, टाका त्याला कठोर यातनेत. त्याच्या सोबत्याने विनविले. “हे प्रभू, मी याला दुर्वर्तनी बनविले नाही तर हा स्वत:च पराकोटीच्या पथभ्रष्टतेत पडलेला होता.” उत्तरादाखल फर्माविले गेले, “माझ्या पुढे भांडण करू नका, मी तुम्हाला अगोदरच वाईट परिणामांपासून खबरदार केले होते. माझ्या येथे शब्द बदलला जात नाही, आणि मी आपल्या दासांवर जुलूम करणारा नाही.” (१६-२९)

तो दिवस जेव्हा आम्ही नरकाला विचारू, काय तू भरून गेलीस? आणि ती म्हणेल, आणखीन काही आहे? आणि स्वर्ग ईशपरायणांच्या जवळ आणला जाईल, जरादेखील दूर असणार नाही. फर्माविले जाईल, “ही आहे वस्तू जिचे तुम्हाला वचन दिले जात असे, त्या प्रत्येक माणसासाठी जो रूजू होणारा आणि खूप खबरदारी घेणारा होता. जो न पाहता ‘रहमान’ (परमदयाळू अल्लाह) ला भीत असेल आणि जो ईश्वरासक्त ह्रदयाने आला असेल. सांगितले जाईल, “दाखल व्हा स्वर्गामध्ये सुखरूपपणे.” त्या दिवशी शाश्वत जीवनाचा दिवस असेल. तेथे त्यांच्यासाठी ते सर्वकाही असेल जे ते इच्छितील, आणि आमच्याजवळ त्यापेक्षाही जास्त बरेचसे त्यांच्यासाठी असेल. (३०-३५)

आम्ही त्यांच्या अगोदर बर्‍याचशा राष्ट्रांना नष्ट करून टाकले आहे जे त्यांच्यापेक्षा खूप अधिक शक्तिमान होते आणि त्यांनी जगाच्या देशांना पालथे घातले होते. मग काय ते एखादे आश्रयस्थान प्राप्त करू शकले? या इतिहासात बोधप्रद वह्य आहे त्या प्रत्येक माणसासाठी जो ह्रदय बाळगतो अथवा जो लक्षपूर्वक म्हणणे ऐकतो. (३६-३७)

आम्ही पृथ्वी व आकाशांना आणि त्यांच्या दरम्यानच्या सार्‍या वस्तूंना सहा दिवसांत निर्माण केले. आणि आम्हाला थकव्याने स्पर्शसुद्धा केला नाही. म्हणून हे पैगंबर (स.), ज्या गोष्टी हे लोक बनवितात; त्यावर संयम राख आणि आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबर त्याचे पावित्र्यागान करीत रहा, सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी. आणि रात्रीच्या वेळी पुन्हा त्याचे पाठित्र्यगान करा आणि नतमस्तक होणे पूर्ण झाल्यानंतरसुद्धा. (३८-४०)

आणि ऐका ज्या दिवशी दवंडी देणारा (प्रत्येक व्यक्तीच्या) जवळूनच पुकारील. ज्या दिवशी सर्व लोक उत्थान-कल्लोळ ठीकठीक ऐकत असतील, तो जमिनीतून मृतांचा निघण्याचा दिवस असेल. आम्हीच जीवन प्रदान करतो आणि आम्हीच मृत्यू देतो, आणि आमच्याकडेच सर्वांना त्या दिवशी परतावयाचे आहे, जेव्हा जमीन भंग पावेल आणि लोक तिच्यातून निघून भरधाव पळत सुतले असतील. हे उत्थान आमच्यासाठी फार सोपे आहे. (४१-४४)

हे पैगंबर (स.), ज्या गोष्टी हे लोक बनवीत आहेत, त्यांना आम्ही चांगलेच जाणतो, आणि तुमचे काम यांच्याकडून जबरीने म्हणणे मान्य करविणे नव्हे. फक्त तुम्ही या कुरआनद्वारे त्या प्रत्येक माणसाला उपदेश करा जो माझ्या ताकीदीला भीत असेल. (४५)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP