(मदीनाकालीन, वचने ७५)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत
व असीम कृपावंत आहे.
तुम्हाला ‘अनफाल’ संबंधी विचारतात सांगा, “हे अनफाल तर अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आहेत. म्हणून तुम्ही अल्लाहचे भय बाळगा व आपापसातील संबंध सुधारा आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराची आज्ञा पाळा, जर तुम्ही श्रद्धावंत असाल.” खरे श्रद्धावंत तर तेच लोक होत ज्यांची ह्रदये अल्लाहचा उल्लेख ऐकताच थरारून जातात आणि जेव्हा त्यांच्यासमोर अल्लाहच्या वचनांचे पठण होते तेव्हा त्यांची श्रद्धा अधिकच वाढत जाते, आणि ते आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात, जे नमाज कायम करतात आणि आम्ही त्यांना जे काही दिलेले आहे त्यातून (आम्च्या मार्गात) खर्च करतात. असलेच लोक खरे श्रद्धावंत आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ मोठमोठाले दर्जे आहेत, अपराधांची क्षमा आहे आणि सर्वोत्तम उपजीविका आहे. (या गनिमी मालासंबंधी तशीच परिस्थिती समोर येत आहे जशी त्यावेळी आली होती जेव्हा) तुझ्या पालनकर्त्याने तुला सत्यानिशी तुझ्या घरातून बाहेर आणले होते आणि ही गोष्ट श्रद्धावंतांपैकी एका गटाला अप्रिय होती. ते त्या सत्याबाबत तुमच्याशी वाद घालत होते, वस्तुत: ते अगदी स्पष्टपणे जाहीर झाले होते. त्यांची दशा अशी होती जणुकाय त्यांना त्यांच्या डोळ्यांदेखत मृत्यूकडे हाकून नेले जात आहे. (१-६)
स्मरण करा तो प्रसंग जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन्ही जमातीपैकी एक तुमच्या हाती लागेल, तुमची इच्छा होती की दुर्बल जमात तुमच्या हाती लागावी. परंतु अल्लाहचा इरादा असा होता की आपल्या वचनांनी सत्याला सत्य करून दाखवावे व अश्रद्धांचे मूळ कापून टाकावे-म्हणजे सत्य, सत्य सिद्ध व्हावे व असत्य, असत्य ठरावे, मग ही गोष्ट अपराधी लोकांना कितीही अप्रिय का वाटेना. (७-८)
आणि तो प्रसंग जेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्यापाशी फिर्याद करीत होता. उत्तरादाखल त्याने फर्माविले, मी तुमच्या मदतीकरिता लागोपाठ एक हजार दूत पाठवीत आहे. ही गोष्ट अल्लाहने तुम्हाला केवळ याकरिताच सांगितली की तुम्हाला शुभवार्ता मिळावी व तुमची मने त्याद्वारे समाधानी व्हावीत एरव्ही मदत तर जेव्हा कधीही होते अल्लाहकडूनच होत असते, नि:संशय अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. (९-१०)
आणि तो प्रसंग जेव्हा की अल्लाह आपल्याकडून गुंगीच्या स्वरूपात तुम्हावर समाधान व निर्भयतेची स्थिती पसरवीत होता, व आकाशांतून तुमच्यावर पर्जन्यवृष्टी करीत होता; की जेणेकरून तुम्हाला शूचिर्भूत करावे आणि तुमच्यावरून शैतानाने टाकलेला अमंगळपणा दूर करावा व तुमचे मनोधैर्य वाढवावे आणि त्यायोगे तुमचे पाय स्थिर करावेत. (११)
आणि तो प्रसंग जेव्हा तुमचा पालनकर्ता दूतांना इशारा करीत होता की, “मी तुमच्यासमवेत आहे, तुम्ही श्रद्धावंतांना स्थिर राखा, मी लगेच या अश्रद्धावंतांच्या मनावर वचक बसवितो, तर तुम्ही त्यांच्या मानांवर मारा व सांध्या सांध्यावर आघात करा. हे या कारणास्तव की या लोकांनी अल्लाह व त्याच्या पैगंबरांचा विरोध केला, आणि जो अल्लाह व त्याच्या पैगंबराचा विरोध करतो, अल्लाह त्याच्यासाठी अत्यंत कठोर पकड करणारा आहे. ही आहे तुम्हा लोकांची शिक्षा, आता याचा आस्वाद घ्या, आणि तुम्हाला माहीत व्हावे की सत्याचा इन्कार करणार्यांसाठी नरकाची यातना आहे. (१२-१४)
हे श्रद्धावंतांनो, जर तुमची एक लष्कराच्या रूपात अश्रद्धावंतांशी गाठ पडली तर त्यांच्या मुकाबल्यात पाठ दाखवू नका. ज्यांनी अशा प्रसंगी पाठ दाखविली-याव्यतिरिक्त की युद्धाचा पवित्रा म्हणून अथवा एखाद्या दुसर्या फौजेस जाऊन मिळण्यासाठी-तर तो अल्लाहच्या कोपात वेढला जाईल. त्याचे ठिकाण नरक असेल, आणि ते अत्यंत वाईट परतण्याचे ठिकाण आहे. (१५-१६)
तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही त्यांनी ठार केले नाही तर अल्लाहने त्यांना ठार केले, आणि हे पैगंबर (स.), तू फेकले नाहीस तर अल्लाहने फेकले. (आणि श्रद्धावंतांचे हात जे या कार्यात वापरले गेले) तर हे अशासाठी होते की अल्लाहने श्रद्धावंतांना एका उत्तम परीक्षेतून यशस्वीपणे पार पाडावे. खचितच अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे. असा व्यवहार तर तुमच्याशी आहे आणि अश्रद्धावंतांशी व्यवहार असा आहे की अल्लाह त्यांची कारस्थाने निष्प्रभ करणारा आहे, (या अश्रद्धावंतांना सांगा), “ज्याअर्थी तुम्हाला निर्णय हवा होता तर घ्या, निर्णय तुमच्यासमोर आलेला आहे. आता परावृत्त व्हा, हे तुमच्यासाठी उत्तम आहे, अन्यथा पुन्हा परतून त्याच मूर्खपणाची तुम्ही पुनरावृत्ती केली तर आम्हीदेखील त्याच शिक्षेची पुनरावृत्ती करू व तुमचा जमाव मग तो कितीही मोठा असो तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही, अल्लाह श्रद्धावंतांच्या समवेत आहे.” (१७-१९)
हे श्रद्धावंतांनो! अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करा. आणि आज्ञा ऐकल्यानंतर तिच्यापासून पराङमुख होऊ नका. या लोकांसमान होऊ नका ज्यांनी म्हटले की आम्ही ऐकले; वास्तविक ते काही ऐकत नाहीत. नि:संशय अल्लाहजवळ सर्वात वाईट प्रकारच्या जनावरांसारखे बहिरे व मुके लोक ते आहेत जे बुद्धिचा उपयोग करीत नाहीत. जर अल्लाहला माहीत असते की त्यांच्यात थोडादेखील चांगुलपणा आहे तर त्याने जरूर त्यांना ऐकण्याची सदबुद्धी दिली असती. (परंतु चांगुलपणाविना) जर त्याने त्यांना ऐकविले असते तर त्यांनी विमुखतेने पाठ फिरविली असती. (२०-२३)
हे श्रद्धावंतांनो! तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या हाकेला प्रतिसाद द्या जेव्हा की पैगंबराने तुम्हाला अशा गोष्टीकडे बोलवावे. जी तुम्हाला जीवन प्रदान करणारी असेल आणि लक्षात ठेवा, अल्लाह मनुष्य व त्याच्या ह्रदयाच्या दरम्यान विद्यमान आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्र केले जाल. आणि सावध राहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम प्रामुख्याने फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही ज्यांनी तुम्हापैकी पाप केलेले असेल आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे. स्मरण करा ती वेळ जेव्हा तुम्ही थोडे होतो, भूतलावर तुम्हाला दुर्बल लेखले जात होते, तुम्ही भीत होता की एखादेवेळी लोकांनी तुम्हाला नामशेष करू नये. मग अल्लाहने तुम्हाला आश्रयस्थान उपलब्ध करून दिले, आपल्या मदतीने तुमचे हात बळकट केले, आणि तुम्हाला चांगली उपजीविका पोहचविली की कदाचित तुम्ही कृतज्ञ बनाल. हे श्रद्धावंतांनो! जाणूनबुजून तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरांशी बेईमानी करू नका, आपल्या अमानतींमध्ये अफरातफर करू नका. हे जाणून असा की तुमची मालमत्ता व तुमची मुले-बाळे खरे पाहता परीक्षा-साधने होत आणि अल्लाहजवळ मोबदला देण्यासारखे बरेच काही आहे. हे श्रद्धावंतांनो! जर तुम्ही ईशपरायणाता अंगिकाराल तर अल्लाह तुमच्यासाठी कसोटी उपलब्ध करून देईल. व तुमच्यातील वाईटपणा तुम्हापासून दूर करील आणि तुमचे अपराध माफ करील. अल्लाह अत्यंत कृपा करणारा आहे. (२४-२९)
आणि तो प्रसंग देखील आठवण्याजोगा आहे जेव्हा सत्य नाकारणारे तुझ्याविरुद्धा युक्त्या योजीत होते की, एक तर तुला कैद करावे अथवा ठार मारावे किंवा देशांतर करावे. ते आपल्या चाली खेळत होते आणि अल्लाह आपली चाल खेळत होता. नि:संशय अल्लाह सर्वोत्तम चाल खेळणारा आहे जेव्हा त्यांना आमची वचने ऐकविली जात होती तेव्हा म्हणत होते की, “होय, ऐकले आम्ही! आम्ही इच्छिले तर अशाच गोष्टी आम्हीदेखील सांगू शकतो, या तर त्याच जुन्या कथा आहेत ज्या पूर्वापार लोक सांगत आले आहेत.” आणि ती गोष्ट देखील स्मरणात आहे जी त्यांनी सांगितली होती की, “हे अल्लाह, जर हे खरोखर सत्य आहे तुझ्याकडून तर आमच्यावर आकाशांतून दगडांचा वर्षाव कर किंवा एखादा दु:खदायक प्रकोप आमच्यावर आण.” त्यावेळेस तर अल्लाह त्यांच्यावर प्रकोप कोसळविणार नव्हता जेव्हा तू त्यांच्यामध्ये उपस्थित होतास, आणि हा अल्लाहचा शिरस्ता नव्हे की लोक क्षमा मागत आहेत आणि त्याने त्यांना यातना द्याव्यात, परंतु आता त्याने त्यांच्यावर कोप का पाठवू नये जेव्हा ते मसजिदेहराम (काबा मसजिद) चा मार्ग रोखत आहेत व खरे पाहता ते त्या मसजिदचे अधिकृत व्यवस्थापक नाहीत. तिचे अधिकृत व्यवस्थापक तर ईशपरायण लोकच असू शकतात परंतु बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहीत नाही. अल्लाहच्या घराजवळ या लोकांची नमाज काय असते? केवळ ते शिटया वाजवतात व टाळ्या पिटतात. तर घ्या आता या प्रकोपाचा आस्वाद, आपल्या त्या सत्याच्या इन्कारापायी जे तुम्ही करीत राहिला आहात, ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला ते मालमत्ता अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखण्यासाठी खर्च करीत आहेत व आता आणखीही खर्च करीत राहतील. परंतु सरतेशेवटी हेच प्रयत्न त्यांच्यासाठी पश्चात्तापाचे कारण बनतील मग पराभूत होतील, मग हे अश्रद्धावंत नरकाकडे घेरून आणले जातील. ते यासाठीकी अल्लाहने दुष्टांना सज्जनांपासून वेगळे करून समस्त दुष्टांना एकत्रितपणे नरकाग्नित झोकून द्यावे. हेच लोक खरे नुकसान प्राप्त करणारे आहेत. (३०-३७)
हे पैगंबर (स.), या अश्रद्धावंतांना सांगा की जर आता देखील परावृत्त झाले तर पूर्वी जे काही घडलेले आहे ते माफ केले जाईल, परंतु जर हे त्याच पूर्वीच्या चालीची पुनरावृत्ती करतील तर पूर्वीच्या लोकांशी जे काही घडले आहे ते सर्वांना माहीत आहे. (३८)
हे श्रद्धावंतांनो! या अश्रद्धावंतांशी युद्ध करा इथपर्यंत की हिंसाचार शिल्लक राहू नये आणि धर्म सर्वस्वी अल्लाहसाठी व्हावा. मग जर ते हिंसाचारापासून परावृत्त झाले तर त्यांची कृत्ये पाहणारा अल्लाह आहे, पण जर का त्यांनी मानले नाही तर समजून असा की अल्लाह तुमचा वाली आहे, आणि तो सर्वोत्तम सहायक व मदतगार आहे. (३९-४०)
आणि तुम्हाला माहीत असावे की जो काही गनिमीमाल तुम्ही हस्तगत केला आहे, त्याचा पाचवा वाटा अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) व नातेवाईक व अनाथ, व गोर-गरीब व वाटसरू यांच्याकरिता आहे. जर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे अल्लाहवर आणि त्या गोष्टीवर जी निर्णयाच्या दिवशी अर्थात दोन्ही सैन्याची गाठ पडण्याच्या दिवशी, आम्ही आमच्या दासावर अवतरली होती, (तर हा वाटा स्वखुशीने अदा करा) अल्लाह सर्व गोष्टींना समर्थ आहे. (४१)
आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही खोर्याच्या अलीकडे होता आणि ते पलीकडे पडाव टाकून होते आणि काफिला तुमच्या खालच्या बाजूला होता; जर एखादेवेळी पूर्वीच तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मुकाबल्याचा करार होता तर निश्चितच तुम्ही या प्रसंगाला बगल दिली असती, परंतु जे काही घडले त्याचे कारण असे की ज्या गोष्टीचा निर्णय अल्लाहने घेतलेला होता त्याला अल्लाहने प्रत्यक्षात आणावे म्हणजे जी नष्ट होणार आहे त्याने उघडपणे नष्ट व्हावे व ज्याला जिवंत राहावयाचे आहे त्याने उघडपणे जिवंत रहावे; खचितच अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे. (४२)
आठवा तो प्रसंग जेव्हा हे पैगंबर (स.) अल्लाह तुमच्या स्वप्नांत त्यांना थोडे करून दाखवीत होता. जर एखाद्या वेळेस तुम्हाला त्याने त्यांची संख्या जास्त दाखविली असती तर निश्चितच तुम्ही लोकांनी धीर सोडला असता आणि युद्धाच्या बाबतीत तुम्ही तंटा सुरू केला असता; परंतु अल्लाहनेच त्यापासून वाचविले. नि:संशय तो मनातील स्थिती देखील जाणणारा आहे. (४३)
आणि स्मरण करा की जेव्हा मुकाबल्याच्या वेळी अल्लाहने. तुम्हा लोकांच्या नजरेत शत्रूंना कमी दाखविले आणि त्यांच्या नजरेंत तुम्हाला कमी करून दाखविले जेणेकरून जी गोष्ट घडणार होती तिला अल्लाहने प्रत्यक्षात आणावे. आणि सरतेशेवटी सर्व मामले अल्लाहकडेच रुजू होतात. (४४)
हे श्रद्धावंतांनो! जेव्हा एखाद्या समूहाशी तुमचा सामना होईल तेव्हा दृढ राहा, आणि अल्लाहचे खूप स्मरण करा, अपेक्षा आहे की तुम्हाला यश मिळेल. व अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आज्ञा पाळा व आपसांत भांडू नका नाहीतर तुमच्यात दुर्बलता येईल व तुमचा वचक नाहीसा होईल. संयम राखा. निश्चितच अल्लाह संयमी लोकांबरोबर आहे. आणि त्या लोकांसमान रंगंढंग अंगिकारू नका जे आपल्या घरातून ऐटीत आणि लोकांना आपली शान दाखवीत निघाले व ज्यांचे वर्तन असे आहे की अल्लाहच्या मार्गापासून रोखतात, जे काही ते करत आहेत ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही. (४५-४७)
जरा विचार करा त्या प्रसंगाचा जेव्हा शैतानाने त्या लोकांच्या कारवाया त्यांच्या दृष्टीत शोभिवंत करून दाखविल्या होत्या आणि त्यांना सांगितले होते की आज कोणीही तुमच्यावर वर्चस्व मिळवू शकत नाही आणि असे की मी तुमच्या संगतीत आहेत, मग जेव्हा दोन्ही समूह समोरासमोर उभे ठाकले तेव्हा तो उलटया पाऊली फिरला आणि म्हणू लागला की माझी तुमची संगत नाही, मी काही पहात आहे ते तुम्ही पाहात नाही. मला अल्लाहची भीती वाटते, आणि अल्लाह फार कठोर शिक्षा देणारा आहे. जेव्हा दांभिक आणि ते सर्व लोक ज्यांच्या ह्रदयांना रोग जडला आहे म्हणत होते की या लोकांना तर त्यांच्या धर्माने पछाडले आहे. वस्तुत: जर एखाद्याने अल्लाहवर विश्वास ठेवला तर निश्चितच अल्लाह मोठा सामर्थ्यशाली व बुद्धिमान आहे. जर तुम्ही ते दृश्य पाहू शकला असता तर किती छान झाले असते! जेव्हा दूत विद्रोहींचे प्राण हरण करताना त्यांच्या चेहर्यावर व पाठीवर मारा करीत म्हणत होते, “घ्या आता जळण्याची शिक्षा भोगा, हा तो मोबदला आहे ज्याची सामग्री तुम्ही स्वहस्ते अगोदरच उपलब्ध करून ठेवलेली होती, एरव्ही अल्लाह तर आपल्या दासांवर मुळीच अत्याचार करणारा नव्हे.” हा प्रसंग यांच्यावर तसाच ओढवला जसा तो फिरऔनवाल्यांवर व त्यांच्या पूर्वीच्या लोकांवर ओढवत राहिला आहे, की त्यांनी अल्लाहच्या संकेतांना मान्य करण्यास नकार दिला आणि अल्लाहने त्यांच्या अपराधापायी त्यांना पकडले, अल्लाह शक्तिशाली व कठोर शिक्षा करणारा आहे. हे अल्लाहच्या या रीतीप्रमाणेच घडले की तो आपली कोणतीही श्रेष्ठ देणगी की जी त्याने एखाद्या जनसमूहाला बहाल केलेली असेल तोपर्यंत बदलत नाही योपर्यंत ते लोक स्वत:च्या कार्यपद्धतीत बदल करीत नाहीत. अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे. फिरऔनवाले व त्यांच्या पूर्वीच्या लोकांच्या संबंधाने जे काही घडले ते त्याच नियमाप्रमाणे होते. त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या वचनांना खोटे लेखले, तेव्हा आम्ही त्यांच्या अपराधामुळे त्यांना नष्ट करून टाकले आणि फिरऔनवाल्यांना बुडवून ताकले. हे सर्व अत्याचारी लोक होते. (४८-५४)
खचितच अल्लाहजवळ जमिनीवर चालणार्या निर्मितीपैकी सर्वात जास्त वाईट ते लोक आहेत ज्यांनी सत्य मानण्यास नकार दिला मग कोणत्याही प्रकारे ते स्वीकारण्यास ते तयार नाहीत. (विशेषत:) त्यांच्यापैकी ते लोक ज्यांच्याशी तू करार केला मग ते प्रत्येक प्रसंगी त भंग करतात आणि त्यांना जरा देखील ईश्वराच्या प्रकोपाचे भय वाटत नाही. म्हणून जर हे लोक तुम्हाला युद्धात सापडले तर त्यांचा असा समाचार घ्या की त्यांच्यानंतर जे लोक असले वर्तन अंगिकारणारे असतील त्यांचे भान हरपले जाईल. अपेक्षा आहे की करार-भंग करणार्यांच्या या अशा शेवटाने ते धडा घेतील, आणि जर तुम्हाला एखाद्या लोकसमुदायाकडून दगलबाजीची भीती असेल तर त्यांचे करार जाहीरपणे त्यांच्या तोंडावर फेकून द्या. निश्चितच अल्लाह विश्वासघातकी लोकांना पसंत करीत नाही. सत्याचा इन्कार करणार्यांनी या भ्रमात पडू नये की त्यांनी विजय मिळविला. खचितच ते आम्हाला हरवू शकत नाहीत. (५५-५९)
आणि तुम्ही लोक, यथाशक्ती जास्तीत जास्त सामर्थ्य आणि तयार बांधून ठेवले जाणारे घोडे सज्ज ठेवा. जेणेकरून त्यायोगे अल्लाहच्या व आपल्या शत्रूंना आणि त्या इतर वैर्यांना भयभीत करावे ज्यांना तुम्ही जाणत नाही परंतु अल्लाह जाणतो. अल्लाहच्या मार्गात जे काही तुम्ही खर्च कराल. त्याची पुरेपूर तुम्हाला परतफेड केली जाईल व तुमच्यावर कदापि अन्याय होणार नाही. (६०)
आणि हे पैगंबर (स.), जर शत्रूंचा कल, तह व शांततेकडे असेल तर तुम्ही देखील त्यासाठी तयार व्हा आणि अल्लाहवर भरोसा ठेवा. नि:संशय तोच सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे. आणि जर ते दगाफटका करण्याची नियत बाळगून असतील तर तुमच्यासाठी अल्लाह पुरेसा आहे. तोच तर आहे ज्याने आपल्या मदतीने व श्रद्धावंतांच्याद्वारे तुमचे समर्थन केले. आणि श्रद्धावंतांची ह्रदये एकमेकाशी जोडली. तुम्ही पृथ्वीतलावरील सारी संपत्ती जरी खर्च केली असती तरीसुद्धा या लोकांची ह्रदये जोडू शकला नसता: परंतु तो अल्लाह आहे ज्याने यांची ह्रदये जोडली. खचितच तो मोठा सामर्थ्यशाली व बुद्धिमान आहे. हे नबी (स.)! तुमच्यासाठी आणि तुमच्या श्रद्धावंत अनुयायांकरिता तर बस अल्लाह पुरेसा आहे. (६१-६४)
हे नबी (स.)! श्रद्धावंतांना युद्धाचे प्रोत्साहन द्या. जर तुमच्यापैकी वीस जण संयमी असतील तर ते दोनशे जणांवर मात करतील. आणि जर शंभर माणसे अशी असतील तर ते सत्य नाकारणार्यांपैकी हजार माणसांना भारी ठरतील; कारण ते असले लोक आहेत ज्यांना जाण नाही. बरे, आता अल्लाहने तुमचे भार हलके केले आणि त्याला कळून आले की अजून तुमच्यात दुर्बलता आहे, म्हणून जर तुमच्यापैकी शंभर जण संयमी असतील तर ते दोनशेवर आणि तुमच्या असे एक हजार असतील तर ते अल्लाहच्या हुकुमाने दोन हजारांना भारी ठरतील. आणि अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे संयमी आहेत. (६५-६६)
कोणत्याही नबीसाठी हे उचित नाही की त्याच्याजवळ कैदी असावेत जोपर्यंत तो पृथ्वीतलावरील शत्रूंना पुरेपूर ठेचून काढत नाही. तुम्ही लोक लौकिक लाभाची इच्छा करता, वास्तविकत: अल्लाहच्या दृष्टीसमोर मरणोत्तर जीवन आहे; आणि अल्लाह प्रभुत्वसंपन्न आणि बुद्धिमान आहे. जर अल्लाहचे लिखित यापूर्वीच लिहिले गेले नसते तर जे काही तुम्ही लोकांनी घेतले आहे त्यापाय़ी तुम्हाला मोठी शिक्षा दिली गेली असती. तर जे काही माल तुम्ही हस्तगत केला आहे तो खा कारण की तो वैध व शुद्ध आहे आणि अल्लाहचे भय बाळगून असा. नि:संशय अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे. (६७-६९)
हे नबी (स.), तुम्हा लोकांच्या ताब्यात जे कैदी आहेत त्यांना सांगा की जर अल्लाहला कळून आले की तुमच्या ह्रदयात काही चांगुलपणा आहे तर तो तुम्हाला त्यापेक्षा वरचढ देईल जे तुमच्याकडून घेण्यात आले आहे, आणि तो तुमचे अपराध माफ करील, अल्लाह क्षमाशील व दय़ाळू आहे. परंतु ते जर तुझ्याशी विश्वासघाताचा मानस ठेवत आहेत तर यापूर्वी त्यांनी अल्लाहशी प्रतारणा केलेली आहे, म्हणून त्याचीच अल्लाहने शिक्षा त्यांना दिली की ते तुझ्या ताब्यात आले, अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे. ज्या लोकांनी श्रद्धा स्वीकारली आणि स्थलांतर केले आणि अल्लाहच्या मार्गात आपले प्राण पणाला लावले व आपली मालमत्ता खर्च केली व ज्या लोकांनी स्थलांतर करणार्या लोकांना आश्रय दिला व त्यांना मदत केली; ते खरोखर एकमेकाचे वाली आहेत. उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा तर ठेवली परंतु ज्यांनी स्थलांतर केले नाही त्यांच्याशी पालकत्वाचे तुमचे काहीही संबंध नाहीत जोपर्यंत ते स्थलांतर करून येत नाहीत. परंतु जर ते धर्माच्या बाबतीत तुमच्याकडून मदत मागतील तर त्यांना मदत करणे तुमचे कर्तव्य होय; परंतु अशा कोणत्याही जनसमुदायाच्याविरूद्ध नव्हे की ज्यांच्याशी तुमचा करार झालेला आहे. जे काही तुम्ही करता ते अल्लाह पाह्तो. (७०-७२)
आणि जे सत्याचा इन्कार करणारे आहेत ते एकमेकाचे सहाय्य करीत असतात. जर तुम्ही हे केले नाही तर पृथ्वीवर उत्पात आणि भयंकर बिघाड उद्धवेल. ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरदारांचा त्याग केला, संघर्ष केला व ज्यांनी आश्रय दिला व मदत केली तेच खरे श्रद्धावंत आहेत. त्यांच्यासाठी अपराधांची क्षमा व सर्वोत्तम उपजीविका आहे. आणि ज्या लोकांनी नंतर श्रद्धा ठेवली आणि स्थलांतर करून आले व तुमच्याशी मिळून संघर्प करू लागले, त्यांचासुद्धा तुमच्यात समावेश आहे. पण अल्लाहच्या ग्रंथात रक्ताचे नातेवाईक आपापसांत एक दुसर्याचे अधिक ह्क्कदार आहेत. नि:संशय अल्लाह प्रत्येक गोष्टीला जाणतो. (७३-७५)