मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अत्‌तौबा

सूरह - अत्‌तौबा

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने १२९)

मुक्तीची घोषणा आहे, अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) कडून त्या अनेकेश्वरवादी लोकांसाठी ज्यांच्याशी तुम्ही करार केले होते. तर तुम्ही देशात आणखी चार महिने संचार करून घ्या आणि जाणून असा की तुम्ही अल्लाहला असफल करणारे नाहीत. आणि अल्लाह सत्याचा इन्कार करणार्‍यांना अपमानित करणारा आहे. (१-२)

आम सूचना आहे, अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) कडून ह्ज्जे अकबर च्या दिवशी, तमाम लोकांच्यासाठी, की अल्लाह अनेकेश्वरवादी लोकांकडून जबाबदारीपासून मुक्त आहे, आणि त्याचा पैगंबरसुद्धा. आताही जर तुम्ही पश्चात्ताप केला तर ते तुमच्यासाठीच उत्तम आहे आणि जर तोंड फिरवीत आहात तर चांगले लक्षात ठेवा की तुम्ही अल्लाहला असफल करणारे नाहीत, आणि हे पैगंबर (स.)! सत्याचा इन्कार करणार्‍यांना कठोर यातनेची खुशखबरी ऐकवा त्या अनेकेश्वरवादींखेरीज ज्यांच्याशी तुम्ही करार केले. आणि   त्यांनी तुमच्याशी आपला करार पाळण्यांत कोणतीही कसूर केली नाही व तुमच्याविरूद्ध कुणाला मदतही केली नाही, तेव्हा अशा लोकांशी तुम्ही देखील कराराची मुदत पूर्ण होईपर्यंत प्रामाणिक राहा; कारण अल्लाह ईशपरायण लोकांनाच पसंत करतो (३-४)

मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांच्या समाचार घेण्यासाठी सज्ज रहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे. आणि जर अनेकेश्वरवादीपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल जेणेकरून अल्लाहची वाणी ऐकावी तर त्याला आश्रय द्या येथपावेतो की त्याने अल्लाहची वाणी ऐकावी. मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवा. हे अशासाठी करावयास पाहिजे की या लोकांना ज्ञान नाही. (५-६)

या अनेकेश्वरवाद्यांसाठी अल्लाह व त्याच्या पैगंबराजवळ कोणताही करार कसा बरे असू शकतो?-त्या लोकांखेरीज ज्यांच्याशी मसजिदेहरामजवळ तुम्ही करार केला होता. म्हणून जोपर्यंत ते तुमच्याशी सरळ राहतील तोपर्यंत तुम्ही देखील त्यांच्याशी सरळ राहा, कारण अल्लाह ईशपरायण लोकांना पसंत करतो. परंतु यांच्याशिवाय इतर अनेकेश्वरवाद्यांशी कोणताही करार कसा बरे होऊ शकतो; जेव्हा त्यांची स्थिती अशी आहे की तुमच्यावर ताबा मिळविला तर ते तुमच्यासंबंधी नात्यागोत्याचाही विचार करणार नाहीत एखाद्या कराराच्या जबाबदारीचा? ते आपल्या संभाषणाने तुम्हाला प्रसन्न करु पाहतात परंतु ह्रदये त्यांची नाकारतात व त्यांच्यापैकी बरोचजण अवज्ञाकारी आहेत. त्यांनी अल्लाहच्या वचनांचा बदल्यात थोडीशी किंमत स्वीकारली, मग अल्लाहच्या मार्गात अडथळा बनून उभे राहिले. फारच वाईट कृत्ये आहेत जी हे करीत राहिले आहेत. कोणत्याही श्रद्धावंताच्या बाबतीत हे नात्या-गोत्याचाही विचार करीत नाहीत किंवा एखाद्या कराराच्या जबाबदारीचादेखील नाही. आणि अतिरेक नेहमी यांच्याकडूनच झालेला आहे. पण जर यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली व जकात दिली तर हे तुमचे धर्मबंधू आहेत. आणि जाणणार्‍या लोकांसाठी आम्ही आमचे आदेश स्पष्ट करीत आहोत. आणि जर प्रतिज्ञा घेतल्यानंतर यांनी पुन्हा आपल्या शपथा मोडल्या आणि तुमच्या धर्मावर हल्ले करण्यास सुरवात केली तर द्रोहाच्या ध्वजधारकांशी युद्ध करा कराण त्यांच्या शपथा विश्वासमात्र नाहीत, कदाचित (मग तलवारीच्या जोरानेच) ते परावृत्त होतील. (७-१२)

काय तुम्ही लढणार नाहीत अशा लोकांशी जे आपल्या प्रतिज्ञा भंग करीत राहिले व ज्यांनी पैगंबराला देशातून काढून टाकण्याचा निश्चय केला होता व अतिरेकास प्रारंभ करणारे तेच होते? तुम्ही त्यांना भिता काय? जर तुम्ही श्रद्धावंत असाल तर अल्लाह या गोष्टीला जास्त पान्न आहे की तुम्ही त्याची भीती बाळगावी. त्यांच्याशी लढा. अल्लाह तुमच्या हाताने त्यांना शिक्षा देईल आणि त्यांना अपमानित करील व त्यांच्या मुकाबल्यात तुम्हाला मदत करील आणि बर्‍याचशा श्रद्धावंतांचे काळीज थंड करील व ह्रदयाची आग शांत करील आणि ज्याला इच्छील त्याला पश्चात्ताप व्यक्त करण्याची सुबुद्धीदेखील देईल. अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे. तुम्ही लोकांनी असासमज करून घेतला आहे काय की असेच तुम्हाला सोडून दिले जाईल? वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण आहेत ज्यांनी (अल्लाहच्या मार्गात) प्राण पणास लावले आणि अल्लाह व त्याचा पैगंबर व श्रद्धावंत यांच्याशिवाय इतर कोणासही जिवलग मित्र बनविले नाही. जे काही तुम्ही करता अल्लाह त्याचा जाणकार आहे. (१३-१६)

अनेकेश्ववादींचे हे काम नव्हे की त्यांनी अल्लाहच्या मस्जिदीचे सेवक बनावे ज्याअर्थी की आपल्याविरूद्ध ते स्वत:च द्रोहाची साक्ष देत आहेत, यांची सर्व कर्मे वाया गेलीत आणि नरकामध्ये यांना सदैव राहावयाचे आहे. अल्लाहच्या मस्जिदीमध्ये निर्यामेत उपासना करणारे तर केवळ तेच लोक होऊ शकतात ज्यांनी अल्लाह आणि परलोकाला मानावे आणि नमाज कायम करावी, जकात द्यावी व अल्लाहव्यतिरिक्त कोणाचीही भीती बाळगू नये. यांच्याकडूनच अपेक्षा आहे की ते सरळमार्गावर चालतील. हज यात्रेकरूंना पाणी पाजणे आणि मसजिदेहराम (काबा मसजिद) ची सेवा करणे याला तुम्ही त्या व्यक्तीच्या कामाबरोबर ठरविले आहे काय ज्याने श्रद्धा ठेवली अल्लाहवर व ‘मरणोत्तर’ जीवनावर व ज्याने प्राण वेचले अल्लाहच्या मार्गात. अल्लाहपाशी तर हे दोघे समान नाहीतव अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवीत नाही. अल्लाहच्या येघे तर त्याच लोकांचा दर्जा मोठा आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरेदारे सोडली आणि जीवित व वित्तानिशी संघर्ष (जिहाद) केले, तेच यशस्वी आहेत. त्यांचा पालनकर्ता त्यांना आपली कृपा व प्रसन्नता आणि अशा स्वर्गाची शुभवार्ता देतो जेथे त्यांच्यासाठी चिरस्थायी ऐश्वर्याचा सरंजाम आहे. त्यांच्यात ते सदैव राहतील. निश्चितपणे अल्लाहजवळ सेवेचे फळ देण्यासाठी बरेच काही आहे. (१७-२२)

हे श्रद्धावंतांनो! आपले वडील व आपले बंधू यांना देखील आपले मित्र बनवू नका जर ते श्रद्धेवर अश्रद्धेला प्राधान्य देत असतील. तुम्हापैकी जे त्यांना आपले स्नेही बनवतील तेच अत्याचारी ठरतील. हे पैगंबर (स.)! सांगून टाका की जर तुमचे वडील, तुमची मुले आणि तुमचे बंधू व तुमच्या पत्नीं व तुमचे आप्तेष्ट व नातेवाईक व तुमची ती धनदौलत जी तुम्ही कमाविली आहे व तुमचे ते व्यापार-उदीम ज्यांच्या मंदावण्याची तुम्हाला भीती वाटते अणि तुमची ती घरे जी तुम्हाला पसंत आहेत, तुम्हाला अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) आणि अल्लाहच्या मार्गात धर्मयुद्धा (जिहाद) पेक्षा अधिक प्रिय असतील तर वाट पहा इथपर्यंत की अल्लाहने आपला निर्णय तुमच्या समक्ष आणावा, आणि अल्लाह अवज्ञाकारी लोकांना मार्ग दाखवीत नसतो. (२३-२४)

अल्लाहने यापूर्वी अनेक प्रसंगी तुम्हाला मदत केलेली आहे. नुकतेच हुनैनच्या युद्धाच्या दिवशी (त्याने केलेल्या मदतीचे वैभव तुम्ही पाहिले आहे) त्या दिवशी तुम्हाला आपल्या मोठया संख्येचा गर्व होता, पण ती तुमच्या काहीच उपयोगी पडली नाही व जमीन विस्तृत असूनदेखील तुमच्याकरिता तंग झाली व तुम्ही पाठ दाखवून पळत सुटला. मग अल्लाहने आपली ‘सकीनत’ (मन:शांती) आपल्या पैगंबरावर व श्रद्धावंतांवर उतरविली; आणि ते लष्कर उतरविले जे तुम्हाला दिसत नव्हते आणि सत्याचा इन्कार करणार्‍यांना शिक्षा दिली की हाच बदला आहे त्यांच्याकरिता जो सत्याचा इन्कार करतील. मग (तुम्ही हे सुद्धा पाहिले आहे की) अशा प्रकारे शिक्षा दिल्यानंतर अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पश्चात्तापाची सुबुद्धीसुद्धा प्रदान करतो. अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे. (२५-२७)

हे श्रद्धावंतांनो! अनेकेश्वरवादी अपवित्र आहेत, म्हणून या वर्षानंतर हे मसजिदेहरामजवळ फिरकतादेखील कामा नये व जर तुम्हाला हलाखीची स्थिती येण्याचे भय वाटत असेल तर दूर नव्हे की अल्लाहने इच्छिले तर त्याने आपल्या कृपेने तुम्हाला श्रीमंत करावे. अल्लाह सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. (२८)

युद्धा करा ग्रंथधारकांपैकी त्या लोकांविरूद्ध जे अल्लाहवर व मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवत नाहीत, आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराने जे काही निषिद्धा ठरविले आहे त्याला निषिद्ध करीत नाहीत, आणि सत्य धर्माला आपला धर्म बनवीत नाहीत. (त्यांच्याशी युद्धा करा) इथपावेतो की त्यांनी स्वहस्ते जिझिया द्यावा व छोटे बनून रहावे. यहूदी म्हणतात की ‘उजैर’ अल्लाहचा पुत्र आहे, आणि ‘ईसाई’ म्हणतात की मसीह (येशू) अल्लाहचा पुत्र आहे, या अवास्तव गोष्टी आहेत ज्या ते आपल्या तोंडातून काढतात, हे त्या लोकांचे अंधानुकरण आहे, जे त्यांच्यापूर्वी द्रोहामध्ये गुरफटले होते. अल्लाहचा कोप त्यांच्यावर. कोठून हे बहकविले जात आहेत. यांनी आपल्या धर्मपंडितांना व जोगींना अल्लाहशिवाय आपला पालनकर्ता बनविले आहे. आणि अशाचप्रकारे मरियमपुत्र मसीहला देखील. वास्तविक पाहता  त्यांना एक उपास्याशिवाय इतर कोणाचीही भक्ती करण्याचा आदेश दिला गेला नव्हता, तो ज्याच्याशिवाय इतर कोणीही भक्तीचा अधिकारी नाही, पवित्र आहे तो त्या अनेकेश्वरवादी गोष्टींपासून ज्या हे लोक करीत आहेत. हे लोक इच्छितात की अल्लाहच्या प्रकाशाला आपल्या फुंकरांनी विझवून टाकावे. पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, मग ते अश्रद्धावंतांना कितीही असह्य का होईना! तो अल्लाहच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन व सत्य धर्मासह पाठविले आहे जेणेकरून त्याने या सत्य धर्माचे सर्व धर्म पद्धतींवर वर्चस्व प्रस्थापित करावे. मग अनेकेश्वरवादींना हे कितीही असह्य का होईना! हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडित व साधु-संन्यासी लोकांनी स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दु:खदायक शिक्षेची खुशखवर द्या त्यांना जे सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने आणि चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजू आणि पाठींना, डागले जाईल-हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वत:साठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद. (२९-३५)

वस्तुस्थिती अशी आहे की, महिन्यांची संख्या, ज्या दिवसापासून अल्लाहने पृथ्वी व आकाशांना निर्माण केले आहे. अल्लाहच्या लेखी बाराच आहेत आणि त्यापैकी चार महिने अवैध आहेत. हाच योग्य नियम आहे म्हणून या चार महिन्यात स्वत:वर जुलूम करू नका व सर्व मिळून अनेकेश्वरवाद्यांशी लढा द्या, जसे ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात. आणि समजून असा की अल्लाह-ईशपरायणांच्या समवेतच आहे. नसी (महिने बदलणे) तर द्रोधामध्ये आणखीच एक द्रोही कृती आहे, त्यामुळे हे अश्रद्धावंत लोक मार्गभ्रष्ट केले जातात. एखाद्या वर्षी एखाद्या महिन्याला वैध उरवितात व एखाद्या वर्षी त्याला अवैध करून टाकतात, जेणेकरून अल्लाहने निषिद्ध ठरविलेल्या महिन्यांची संख्याही पूर्ण करता यावी व अल्लाहने ज्याला निषिद्ध केलेले आहे त्याला वैधसुद्धा करून घेता यावे त्यांची अपकृत्यें त्यांच्यासाठी शोभिवंत करण्यात आलेली आहेत, व अल्लाह सत्याचा इन्कार करणार्‍यांना मार्गदर्शन करीत नसतो. (३६-३७)

हे श्रद्धावंतांनो! तुम्हाला झाले तरी काय की जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या मार्गात निघण्यासठी सांगण्यात आले तेव्हा तुम्ही जमिनीशी खिळून राहिलात? तुम्ही मरणोत्तर जीवनाच्या तुलनेत लौकिक जीवनाला पसंत केले आहे काय? असे असेल तर तुम्हाला माहीत असावे. की ऐहिक जीवनाचा हा सर्व सरंजाम मरणोत्तर जीवनामध्ये फारच थोडा भरले. तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दु:खदायक शिक्षा देईल, आणि तुमच्या जागी दुसर्‍या एखाद्या समूहाला उभे करील आणि तुम्ही ईश्वराचे काहीही वाईट करू शकणार नाही, तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. जर तुम्ही पैगंबराला मदत केली नाही. तर काही पर्वा. नाही. अल्लाहने त्याला त्याप्रसंगी मदत केली आहे जेव्हा अश्रद्धावंतांनी त्याला काढून टाकले होते. जेव्हा तो फक्त दोनपैकी-दुसरा होता, जेव्हा ते दोघे गुहेत होते, तेव्हा तो आपल्या साथीदाराला सांगत होता. “दु:खी होऊ नकोस. अल्लाह आमच्यासमवेत आहे. त्यावेळी अल्लाहने आपल्याकडून त्याच्यावर मन:शांती उतरविली आणि त्याला अशा लष्कराद्वारे मदत केली जे तुम्हाला दिसत नव्हते व अश्रद्धावंतांचे वचन खाली पाडले व अल्लाहचे वचन तर उच्चच आहे, अल्लाह जबरद्स्त आणि द्रष्टा व बुद्धिमान आहे. (३८-४०)

निघा, मग तुम्ही हलके असा अगर बोजड असा व संघर्ष करा अल्लाहच्या मार्गात आपल्या जीवित व वित्तानिशी, हे तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल. (४१)

हे पैगंबर (स.), जर फायदा सहज साध्य असता व प्रवास सोपा असता तर ते जरूर तुमच्यामागे चालण्यास तयार झाले असते, परंतु त्यांच्यासाठी हा मार्ग तर अत्यंत बिकट झालेला आहे. आता ते अल्लाहची शपथ घेऊन घेऊन सांगतील की जर आम्ही निघू शकलो असतो तर खचितच तुमच्याबरोबर निघालो असतो, ते स्वत:ला विनाशांत झोकत आहेत. अल्लाह चांगलेच जाणतो की ते लबाड आहेत. (४२)

हे पैगंबर (स.), अल्लाह तुम्हाला क्षमा करो. तुम्ही त्यांना परवानगी का दिली? (तुम्ही खुद्द त्यांना परवानगी द्यावयास नको होती) जेणेकरून कोण खरे आहेत हे तुम्हावर उघड झाले असते व खोटयांना देखील तुम्ही ओळखले असते. जे लोक अल्लाहवर व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवतात ते तर कदापि तुमच्याकडे अशी विनंती करणार नाहीत की त्यांना आपल्या जीवित व वित्तानिशी युद्ध करण्यापासून माफ केले जावे. अल्लाह ईशपरायण लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो. अशी विनवणी तर तेच लोक करतात जे अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रद्धा ठेवत नाहीत, त्यांच्या ह्रदयांत शंका आहे आणि ते आपल्या शंकेतच द्विधाग्रस्त झाले आहेत. (४३-४५)

जा खरोखरच त्यांचा निघण्याचा इरादा असता तर त्यासाठी त्यांनी काही तरी तयारी केली असती, परंतु अल्लाहला त्यांचे उत्यान पसंतच नव्हते, म्हणून त्याने त्यांना आळशी करून टाकले आणि सांगितले गेले की, बसून राहा बसणार्‍यांच्या बरोबर. जर ते तुमच्याबरोबर निघाले असते तर तुमच्यात वाईटपणा वाढविण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नसते. त्यांनी तुमच्या दरम्यान दरम्यान उपद्रव माजविण्यासाठी धावपळ केली असती आणि तुमच्या जमातीची स्थिती तर अशी आहे की त्यात अद्याप पुष्कळसे असे लोक उपस्थित आहेत जे त्यांच्या गोष्टी कान लावून ऐकतात, अल्लाह या अत्याचार्‍यांना चांगलेच जाणतो. यापूर्वीसुद्धा या लोकांनी उपद्रव पसरविण्याचे प्रयत्न केले आहेत आणि तुम्हा अपयशी बनविण्यासाठी सर्व प्रकारच्या क्लृप्त्यांची उलाढाल केली आहे, येथपावेतो की त्यांच्या इच्छेविरूद्ध सत्य प्रकट झाले व अल्लाहचे कार्य सिद्धीस गेल्याशिवाय राहिले नाही. (४६-४८)

त्याच्यापैकी कोणी असा आहे जो म्हणतो की “मला परवानगी द्या व मला संकटात टाकू नका.” ऐकून घ्या! उपद्रवातच तर हे लोक गुरफटले आहेत आणि नरकाने या अश्रद्धावंतांना वेढून ठेवले आहे. (४९)

तुमचे भले झाले तर यांना दु:ख होते व तुम्हांवर एखादे संकट येते तेव्हा हे तोंड फिरवून खुश होऊन परततात व म्हणत जातात की बरे झाले. आम्ही अगोदरच आमचा मामला ठीकठाक केला होता. यांना सांगा, “आम्हाला कदापि काहीही (चांगले-वाईट) पोहचत नाही परंतु ते जे अल्लाहने आमच्यासाठी लिहिले आहे. अल्लाहच आमचा वाली आहे. आणि श्रद्धावंतांनी त्याच्यावरच भिस्त ठेवली पाहिजे.” (५०-५१)

यांना सांगा, “तुम्ही आमच्याबाबतीत ज्या गोष्टीची वाट पाहात आहात ती याशिवाय अन्य काय आहे की दो चांगल्या गोष्टीपैकी एक चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही तुमच्याबाबतील ज्या गोष्टीची प्रतीक्षा करीत आहोत ती अशी की अल्लाह स्वत:च तुम्हाला शिक्षा करतो की आमच्या हस्ते करवितो? बरे तर आता तुम्हीही वाट पहा आणि आम्हीदेखील तुमच्याबरोबर प्रतीक्षेत आहोत.” (५२)

यांना सांगा, “तुम्ही आपली संपत्ती राजीखुशीने खर्च करा किंवा नाराजीने ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. कारण तुम्ही अवज्ञाकारी लोक आहात. यांनी दिलेली संपत्ती स्वीकृत न होण्याचे कारण याशिवाय दुसरे काही नाही की यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी द्रोह केला आहे. नमाजकरीता येतात तर मरगळत येतात आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करतात तेही अनिच्छापूर्वक खर्च करतात, यांची धनदौलत आणि यांची संतती-विपुलता पाहून फसू नका. अल्लाह तर असे इच्छितो की याच वस्तुद्वारे यांना ऐहिक जीवनात देखील कोपग्रस्त करावे आणि यांना मृत्यू आला तरी तो सत्याच्या इन्काराच्या स्थितीतच यावा. (५३-५५)

ते अल्लाहची शपथ घेऊन घेऊन सांगतात की आम्ही तुमच्यापैकीच आहोत, वास्तविक पाहता ते मुळीच तुमच्यापैकी नाहीत. खरेतर ते असे लोक आहेत जे तुम्हापासून भयभीत आहेत. जर त्यांना एखादे आश्रयस्थान मिळाले अथवा एखादी गुहा किंवा लपून बसण्यासाठी एखादी जागा, तर पळत जाऊन त्यात लपतील, (५६-५७)

हे पैगंबर (स.), यांच्यापैकी काही लोक दानाच्या वाटपासंबंधी तुमच्यावर आक्षेप घेतात, जर या मालामधून काही यांना दिले गेले तर हे खुश होतात आणि दिले गेले नाही तर नाक मुरडू लागतात. किती छान झाले असते की अल्लाह आणि पैगंबराने जे काही त्यांना दिले होते त्यावर ते संतुष्ट राहिले असते व सांगितले असते की. “अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे, तो आपल्या कृपेने आम्हाला आणकी खूपसे देईल आणि त्याचा पैगंबरदेखील आमच्यावर मेहरबानी करील. आम्ही अल्लाहकडेच डोळे लावून बसलेलो आहोत.” हे दान तर खर्‍या अर्थी फकीर आणि गोरगरिबांसाठी आहे. आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मद्त करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्या आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकाही जाणणारा द्रष्टा व बुद्धिमान आहे. (५८-६०)

यांच्यापैकी काहीजण आहेत जे आपल्या शब्दांनी प्रेषिताला दु:ख देतात आणि म्हणतात की हा माणूस कानाचा हलका आहे, सांगून टाका, “तो तुमच्या भल्यासाठी तसा आहे, अल्लाहवर श्रद्धा ठेवतो व श्रद्धावंतांवर विश्वास करतो, आणि सर्वस्वी कृपा आहे त्या लोकांसाठी जे तुम्हापैकी श्रद्धावंत आहेत. आणि जे लोक अल्लाहच्या पैगंबराला दु:ख देतात त्यांच्यासाठी दु:खदायक शिक्षा आहे.” (६१)

हे लोक तुमच्यासमोर शपथा घेतात जेणेकरून तुम्हाला प्रसन्न करावे, वास्तविक पाहता हे जर श्रद्धावंत आहेत तर अल्लाह आणि पैगंबर या गोष्टीचे जास्त हक्कदार आहेत की यांनी त्यांना प्रसन्न करण्याची काळजी घ्यावी. यांना माहीत नाही कीज जो अल्लाह व त्याच्या पैगंबराचा मुकाबला करतो त्याच्यासाठी नरकाची आग आहे ज्यात तो सदैव राहील? ही फार मोठी नामुष्की आहे. (६२-६३)

हे दांभिक भीत आहेत की एखादे वेळेस मुसलमानावर एखादा असा अध्याय अवतरू नये की ज्याने त्यांच्या ह्रदयातील भेद उघड होईल. हे पैगंबर (स.) यांना सांगा, “उपहास करा. अल्लाह ती गोष्ट उघड करणाअ आहे जी उघड होण्याची तुम्हाला भीती वाटते.” जर यांना विचारले की तुम्ही काय बोलत होता तर ते लगेच उत्तर देतात की, “आम्ही तर थट्टा मस्करी आणि मनोरंजन करीत होतो. यांना सांगा, “काय तुमची थट्टा मस्करी अल्लाह आणि त्याच्या वचनांशी व त्याच्या पैगंबराशीच होती?” आता निमित्त शोधू नका. तुम्ही श्रद्धा ठेवल्यानंतर सत्य नाकारले आहे. आम्ही तुमच्यापैकी एका समूहास माफ जरी केले तरी दुसर्‍या समूहाला आम्ही अवश्य शिक्षा देऊ कारण तो अपराधी आहे. (६४-६६)

दांभिक पुरुष व दांभिक स्त्रिया सर्व एकमेकाशी सारखेच आहेत. दुष्कर्माचा आदेश देतात आणि सत्कर्मापासून परावृत्त करतात आणि आपले हात सत्कर्मापासून रोखतात, हे अल्लाहला विसरले म्हणून अल्लाह देखील यांना विसरला. निश्चितपणे हे दांभिकच अवज्ञाकारी आहेत. या दांभिक पुरुष. स्त्रिया व अश्रद्धावंतांच्याकरिता अल्लाहने नरकाग्नीचे वचन दिले आहे, ज्यात हे सदैव राहतील, तोच यांच्यासाठी योग्य आहे. यांच्यावा अल्लाहचा धिक्कार आहे व यांच्यासाठी कायम राहणारी यातना आहे.- तुम्हा लोकांचे रंगढंग तर तेच आहेत जे तुमच्या पूर्वजांचे होते. ते तुमच्यापेक्षा अधिक शक्तीशाली व तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती व संततीवाले होते. मग त्यांनी जगातच आपल्या वाटयाचा आनंद लुटला व तुम्हीदेखील आपल्या वाटयाचा आनंद त्याचप्रमाणे लुटला जसा त्यांनी लुटला होता. आणि तशाच विवादात तुम्ही देखील पडलात जशा विवादात ते पडते होते, म्हणून त्यांचा शेवट असा झाला की या लोकात व परलोकात त्यांचे केले सवरले सर्व वाया गेले आणि तेच तोटयात आहेत.-या लोकापर्यंत यांच्या पूर्वजांचा इतिहास पोहचला नाही काय? नूह (अ.) चे लोक आद, समूद, इब्राहीम (अ.) चे लोक, मदयनचे लोक आणि त्या वस्त्या ज्यांना उलथून टाकले गेले, त्यांचे प्रेषित त्यांच्यापाशी उघड उघड संकेत घेऊन आले, मग हे अल्लाहचे काम नव्हते की त्यांच्यावर अत्याचार करावा, तर ते स्वत:च आपल्यावर अत्याचार करणारे होते. (६७-७०)

श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एक दुसर्‍याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात. व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूरव बुद्धिमान आहे. या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागंत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे. (७१-७२)

हे नबी (स.)! अश्रद्धावंत आणि दांभिक दोघांचा सर्व शक्तिनिशी सामना करा आणि त्यांच्याशी कठोर व्यवहार करा. सरतेशेवटी यांचे ठिकाण नरक आहे आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे. हे लोक अल्लाहची शपथ घेऊन घेऊन सांगतात की आम्ही ती गोष्ट सांगितली नाही, वास्तविक पाहता त्यांनी जरूर ती विद्रोही गोष्ट सांगितली आहे. त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर सत्याचा इन्कार केला आणि त्यांनी ते सर्वकाही करण्याचा निश्चय केला जे करू शकले नाहीत. हा सर्व त्यांचा राग याच गोष्टीवर आहे ना की अल्लाह व त्याच्या पैगंबराने आपल्या कृपेने यांना श्रीमंत केले आहे! आता जर हे आपल्या या वर्तनापासून परावृत्त झाले. तर हे यांच्यासाठीच उत्तम आहे, आणि जर हे परावृत्त झाले नाहीत तर अल्लाह यांना अत्यंत दु:खदायक शिक्षा करील. इहलोकात व परलोकातसुद्धा. व पृथ्वीवर कोणीही नाही जो यांचा संरक्षक व सहायक असेल. (७३-७४)

यांच्यापैकी काहीजण असेही आहेत ज्यांनी अल्लाहशी प्रतिज्ञा केली होती की जर त्याने आपल्या कृपेने आम्हाला उपकृत केले तर आम्ही दानधर्म करू आणि सदाचारी बनून राहू. पण जेव्हा अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना धनवान केले तेव्हा हे कंजूषपणाला प्रवृत्त झाले. आणि आपल्या प्रतिज्ञेपासून असे फिरले की यांना त्याची पर्वासुद्धा नाही. परिणाम असा झाला की त्यांच्या या प्रतिज्ञाभंगापायी जी त्यांनी अल्लाहशी केली व त्या असत्यामुळे जे ते बोलत राहिले, अल्लाहने यांच्या ह्रदयांत दंभ रुजविला जो त्याच्या ठायी हे हजर होण्याच्या दिवसापर्यंत यांचा पिच्छा सोडणार नाही. या लोकांना माहीत नाही काय की अल्लाहला यांचे गुप्त रहस्थ आणि यांच्या गुप्त कानगोष्टीसुद्धा माहीत आहेत आणि तो तमाम परोक्षांच्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे जाणकार आहे? (तो चांगल्या प्रकारे ओळखतो त्या कजूष श्रीमंतांना) जे, स्वेच्छेने आणि आवडीने देणार्‍या श्रद्धावंतांच्या आर्थिक कुर्बानीवर बाता मारतात आणि त्या लोकांची थट्टा उडवितात ज्यांच्याजवळ (ईश्वराच्या मार्गात देण्यासाठी) त्याशिवाय काहीच नाही जे ते स्वत:वर कष्ट ओढवून देतात. अल्लाह या थट्टा उडविणार्‍यांचा उपहास करतो व त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे. हे पैगंबर (स.)! मग तुम्ही अशा लोकांसाठी क्षमेची याचना करा अथवा न करा, जर तुम्ही सत्तर वेळा देखील त्यांना क्षमा करण्याची विनवणी कराल तरी अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही. कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी द्रोह केला आहे, आणि अल्लाह अवज्ञाकारी लोकांना मुक्तिमार्ग दाखवीत नसतो.(७५-८०)

ज्या लोकांना मागे राहण्याची परवानगी देण्यात आली होती, ते अल्लाहच्या पैगंबराला साथ न देण्यावर व घरात बसून राहण्यावर खुश झाले. आणि त्यांना हे असह्य वाटले की अल्लाहच्या मार्गात जीवित व वित्तानिशी युद्ध करावे. त्यांनी लोकांना सांगितले की, “या कडक उन्हाळ्यात निघू नका.” यांना सांगा की नरकाची आग याच्याही पेक्षा अधिक उष्ण आहे, किती छान झाले असते जर यांना याचा विवेक असता! आता या लोकांनी हसणे कमी केले पाहिजे व अधिक रडले पाहिजे. कारण ज्या दुष्टतेची कमाई हे करीत राहिले आहेत त्याचा मोबदला असाच आहे (की यांनी त्यावर रडले पाहिजे.) जर अल्लाहने तुम्हाला त्यांच्यात परत नेले आणि यापुढे त्यांच्यापैकी एखाद्या गटाने युद्धासाठी निघण्याची तुमच्याकडून परवानगी मागितली तर स्पष्ट सांगा, “आता तुम्ही माझ्याबरोबर मुळीच निघू शकत नाही आणि माझ्या सोबत देखील कोणा शत्रूशी लढू शकणार नाही. तुम्ही पहिल्यांदा बसून राहणे पसंत केले होते तर आता मागे राहणार्‍यांच्याबरोबर मागे राहा.” (८१-८३)

आणि यापुढे यांच्यापैकी जो कोणी मृत्यू पावेल त्याच्या जनाजाची नमाज सुद्धा तुम्ही मुळीच पढू नका व त्यांच्या कबरीजवळ देखील कधी उभे राहू नका. कारण त्यांनी अल्लाह व त्याच्या पैगंबराशी द्रोह केला आहे. आणि ए मृत्यू पावले आहेत अशा अवस्थेत की ते अवज्ञाकारी होते. यांच्या श्रीमंती व विपुल संततीने तुमची फसगत होता कामा नये, अल्लाहने तर निश्चय केला आहे की या संपत्ती व संततीच्याद्वारे या जगातच यांना शिक्षा द्यावी आणि यांचे प्राण या अवस्थेत निघावे की हे द्रोह करणारे असतील, (८४-८५)

जेव्हा कधी एखादी सूरत या आशयाची अवतरली की अल्लाहला माना आणि त्याच्य पैगंबराच्या संगतीने युद्ध करा तेव्हा तुम्ही पाहिले की यांच्यापैकी जे क्षमता बाळगणारे होते तेच तुम्हाला विनवू लागले की त्यांना युद्धामध्ये सामील होण्यापासून माफ केले जावे व त्यांनी सांगितले की आम्हाला सोडा की आम्ही बसणार्‍याबरोबर बसून राहावे. या लोकांनी घरी बसणार्‍यात सामील होणे पसंत केले आणि त्यांच्या ह्रदयांवर मुहर लावण्यात आली, म्हणून त्यांच्या लक्षात आता काहीच येत नाही. याउलट पैगंबर (स.) ने व त्या लोकांनी ज्यांनी त्यांच्याबरोबर श्रद्धा ठेवली होती, आपल्या जीवित व वित्तानिशी युद्धा (जिहाद) केले आणि आता सर्व भलाई त्यांच्यासाठीच आहे आणि तेच सफल होणारे आहेत. अल्लाहने त्यांच्यासाठी असले बाग तयार करून ठेवले आहेत की ज्यांच्याखालून कालवे वाहात आहेत. त्यात ते सदैव राहतील, हे आहे महान यश. (८६-८९)

बदावी अरबांपैकी देखील बरेचसे लोक आले ज्यांनी निमित्ते केली जेणेकरून त्यांनाही मागे राहण्याची परवानगी दिली जावी. अशा प्रकारे बसून राहिले ते लोक ज्यांनी अल्लाह व त्याच्या पैगंबराशी (स.) श्रद्धेची खोटी प्रतिज्ञा केली होती. या बदावींपैकी ज्या लोकांनी विद्रोहाची पद्धत अंगिकारली आहे, लवकरच त्यांना दु:खदायक शिक्षेला तोंड द्यावे लागेल. (९०)

अशक्त व आजारी लोक व ते ज्यांना धर्म युद्धात प्रवेशाकरिता सामग्री प्राप्त नाही, जर मागे राहिले तर काहीही हरकत नाही, जर ते स्वच्छ मनाने अल्लाह व पैगंबरांशी एकनिष्ठ असतील. अशा सत्कर्मींवर आक्षेप घेण्यास कोणतीही जागा नाही आणि अल्लाह क्षमा करणारा व दया दाखविणार आहे. अशाच प्रकारे त्या लोकांवरदेखील आक्षेपास कोणतेही स्थान नाही ज्यांनी स्वत: येऊन तुम्हाला विनंती केली होतीकी आम्हाला स्वारी उपलब्ध करून दिली जावी आणि जेव्हा तुम्ही सांगितले की मी तुमच्यासाठी स्वारीची व्यवस्था करू शकत नाही तेव्हा ते निरुपाय होऊन परत गेले आणि स्थिती अशी होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते व त्यांना या गोष्टीचे अतोनात दु:ख होते की तेस्वखर्चाने युद्ध प्रवेशाची ऐपत बाळगत नव्हते. नव्हते. तथापि आक्षेप अशा लोकांवर आहे जे धनवान आहेत आणि तरीदेखील तुमच्यापाशी विनवणी करतात की त्याना युद्धप्रवेशाची माफी देण्यात यावी, त्यांनी घरी बसून राहणार्‍यांमध्ये सामील होणे पसंत केले व अल्लाहने त्यांची ह्रदये मुहर केली म्हणून आता त्यांना काही समजत नाही (की अल्लाहजवळ त्यांच्या या वागणुकीचा काय परिणाम निघणार आहे.) (९१-९३)

तुम्ही जेव्हा परतून त्यांच्याकडे पोहचाल तेव्हात निरनिराळी निमित्ते सादर करतील परंतु तुम्ही स्पष्ट सांगून टाका, निमित्त पुढे करू नका! आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वास ठेवणार नाही. अल्लाहने आम्हाला तुमच्या हकीगती दाखविल्या आहेत. आता अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचे वर्तन पाहील. मग तुम्ही त्याच्याकडे परतविले जाल, जो परोक्ष व अपरोक्ष सर्वकाही जाणणारा आहे. आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत होता. तुम्ही परतल्यावर ते तुमच्यासमोर अल्लाहच्या शपथा वाहतील जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा कराल. तर बेलाशक तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळाच करा, कारण हे अपवित्र आहेत व त्यांचे खरे ठिकाण नरक आहे,-जे त्यांच्या कमाईच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी येईल. ते तुमच्यासमोर शपथा वाहतील जेणेकरून तुम्ही यांच्याशी प्रसन्न व्हावे. वास्तविकत: तुम्ही यांच्याशी प्रसन्न झाला तरी अल्लाह कदापि अशा अवज्ञाकारी लोकांशी प्रसन्न होणार नाही. (९४-९६)

हे बदावी अरब द्रोह व दांभिकतेत अधिक कठोर आहेत व यांच्याबाबतीत या गोष्टीची शक्यता जास्त आहे की त्या धर्माच्या मर्यादापासून अपरिचित असतील जो धर्म अल्लाहने आपल्या पैगंबरावर अवतरला आहे. अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे. या बदावींमध्ये असे असे लोक उपस्थित आहेत जे अल्लाहच्या मार्गात काही खर्च करतात तर त्याला आपल्यावर जबरदस्तीचा भुर्दंड समजतात आणि तुमच्याबाबतीत आपत्तीची वाट पाहात आहेत (की तुम्ही एखाद्या चक्रात अडकावे तेव्हा त्यांनी आपल्या मानगुटीवरील या व्यवस्थेच्या ताबेदारीचे जू झुगारावे ज्यात तुम्ही त्यांना जखडले आहे.) वास्तविकपणे दुष्टतेचे चक्र खुद्द यांच्याच  मानगुटीवर आहे. आणि अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो. आणि याच बदावीमध्ये काही लोक असेसुद्धा आहेत जे अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवतात, आणि जे काही ए खर्च करतात त्याला अल्लाहच्या पाशी सान्निध्य व त्याच्या पैगंबराकडून कृपेची दुआ मिळविण्याचे साधन बनवितात. होय, ते अवश्य त्यांच्याकरिता जवळीकीचे साधन आहे, आणि अल्लाह अवश्य त्यांना आपल्या कृपेत दाखल करील. नि:संशय अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे. (९७-९९)

ते मुहाजिर व अन्सार ज्यांनी सर्वप्रथम श्रद्धेच्या हाकेला ओ देण्यात पुढाकार घेतला व तसेच जे प्रांजळपणे त्यांच्या मागे आले, अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न झाला व ते अल्लाहशी प्रसन्न झाले. अल्लाहने त्यांच्याकरिता अशा बागा उपलब्ध केल्या आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील व ते त्यांच्यात सदैव राहतील, हेच महान यश आहे. (१००)

तुमच्या सभोवती जे बदावी राहतात त्यांच्यापैकी बरेचसे दांभिक आहेत, आणि याचप्रमाणे खुद्द मदीनावासियांतसुद्धा दांभिक आहेत, जे दांभिकपणामध्ये पटाईत झालेले आहेत, तुम्ही त्यांना ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखतो. जवळ आहे ती वेळ जेव्हा आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ, मग ते जास्त मोठया शिक्षेसाठी परत आणले जातील. (१०१)

आणखी काही लोक आहेत ज्यांनी आपल्या चुका कबुल केल्या आहेत. त्यांचे कृत्य मिश्रित आहे, काही प्रामाणिक आहेत तर काही दुष्ट. अशक्य नव्हे की अल्लाह यांच्यावर पुन्हा मेहरबान होईल कारण अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे. हे पैगंबर (स.), तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा आणि (सद्‌वर्तनाच्या मार्गात) यांना पुढे करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुआ यांच्यासाठी समाधानकारक ठरेल, अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो. काय या लोकांना माहीत नाही की तो अल्लाहच आहे जो आपल्या भक्ताम्चा पश्चात्ताप स्वीकारतो, आणि त्यांच्या दानधर्माला स्वीकृती प्रदान करतो, आणि हे की अल्लाह अत्यंत क्षमाशील व दयाळू आहे? आणि हे पैगंबर (स.)! या लोकांना सांगा की तुम्ही कर्म करा, अल्लाह आणि त्याचा पैगंबर व श्रद्धावंत सर्व पाहतील की तुमची कार्यपद्धती आता कशी राहले, मग तुम्ही त्याच्याकडे परतविले जाल जो दॄश्य आणि अदृश्य सर्व गोष्टी जाणतो, आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत राहिला होता. (१०२-१०५)

काही दुसरे लोक आहेत ज्यांचा मामला अजून अल्लाहच्या हुकूमावरून स्थगित आहे. वाटल्यास त्यांना शिक्षा करील आणि वाटल्यास तो पुनरपि त्यांच्यावर मेहरबान होईल. अल्लाह सर्वकाही जाणतो आणि तो बुद्धिमान आहे. (१०६)

काही अन्य लोक आहेत ज्यांनी एक मसजिद बनविली या हेतूपोटी की (सत्याच्या आवाहनाला) हानी पोहोचवावी, आणि (ईश्वराची भक्ती करण्याऐवजी) द्रोह करावा आणि श्रद्धाळूंमध्ये फूट पाडावी, व (त्या सकृतदर्शनी प्रार्थनागृहास) त्या व्यक्तीसाठी पाळतीची जागा बनवावी जो यापूर्वी अल्लाह व त्याच्या पैगंबराविरूधा लढण्यासाठी तयार राहिला आहे. ते निश्चितच शपथा घेऊन घेऊन सांगतील की आमचा हेतू तर भलाईखेरीज दुसरा कोणत्याही गोष्टीचा नव्हता, पण अल्लाह साक्षी आहे की ते पुरते लबाड आहेत.
तुम्ही  त्या इमारतीत कदापि उभे राहू नका. जी मसजिद प्रथम दिनापासून ईशपरायणतेवर स्थापन करण्यात आली होती तीच यासाठी अधिक योग्य आहे की तुम्ही तिच्यात (उपासनेसाठी) उभे राहावे; तिच्यात असे लोक आहेत जे शुद्ध राहणे पसंत करतात, आणि अल्लाहला स्वच्छता बाळगणारेच पसंत आहेत. मग तुमची काय कल्पना आहे की उत्तम मनुष्य तो आहे ज्याने आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचे भय व त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला आहे अथवा तो ज्याने आपली इमांरत एका दरीच्या पोकळ व निराधार कडयावर उभारली आणि ती त्याला घेऊन सरळ नरकाच्या आगीत जाऊन कोसळली? असल्या अत्याचारी लोकांना अल्लाह कधीही सरळमार्ग दाखवीत नसतो. ही इमारत जी त्यांनी बनविली आहे सदैव त्यांच्या ह्रदयांत अविश्वसाचे मूळ बनून राहील. (ज्याच्या उच्चाटनाची आता कोणतीच शक्याता नाही) याशिवाय की त्यांच्या ह्रदयांची शकले होतील. अल्लाह अत्यंत जाणकार व बुद्धिमान आहे. (१०७-११०)

वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहने श्रद्धावंतांकडून स्वत: त्यांना व त्यांच्या मालपत्तेला स्वर्गाच्या मोबदल्यात खरीदिले आहे. ते अल्लाहच्या मार्गात लक्षतात आणि मारतात व मरतात, त्यांच्याशी (स्वर्गाचे अभिवचन) अल्लाहच्या पाशी एक पक्के अभिवचन आहे तौरात, इंजील आणि कुरआनमध्ये. आणि कोण आहे जो अल्लाहपेक्षा अधिक आपली प्रतिज्ञा पूर्ण करणारा असेल? तर आनंद साजरा करा आपल्या या सौद्यावर जो तुम्ही अल्लाहशी पूर्ण केला आहे, हेच सर्वात महान यश आहे. अल्लाहकडे पुन्हा पुन्हा वळणारे. त्याची भक्ती करणारे, त्याचे महिमागान करणारे, त्याच्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करणारे, त्याच्यासमोर झुकणारे व नतमस्तक होणारे सत्कर्माचा हुकूम देणारे व दुष्टकर्मापासून रोखणारे आणि अल्लाहच्या मर्यादांचे रक्षण करणारे, (अशी शान असते त्या श्रद्धावंतांचीजे अललाहशी खरेदी-विक्रीचा हा सौदा चुकता करतात) आणि हे पैगंबर (स.)! या श्रद्धावंतांना शुभवार्ता द्या. (१११-११२)

नबी आणि त्या लोकांसाठी ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, हे उचित नाही की अनेकेश्वरवादींसाठी क्षमेची प्रार्थना करावी; मग ते त्यांचे नातेवाईक का असेनात, ज्याअर्थी ही गोष्ट त्यांच्यावर उघड झालेली आहे की ते नरकाच्या लायकीचे आहेत. इब्राहीस (अ.) ने आपल्या वडिलांकरिता जी क्षमेची प्रार्थना केली होती ती तर त्या वचनामुळे होती जे त्याने आपल्या वडिलांना दिलेले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्याच्यावर उघड झाली की त्याचा पिता अल्लाहचा शत्रू आहे तेव्हा तो त्यापासून अलिप्त राहिला. सत्य असे आहे की इब्राहीस (अ.) मोठा कोमलह्रदयी ईशपरायण आणि सहिष्णू माणूस होता. (११३-११४)

अल्लाहची ही रीत नव्हे की लोकांना मार्गदर्शन दिल्यानंतर पुन्हा मार्गभ्रष्ट करावे-जोपर्यंत की त्यांना स्पष्टपणे हे दाखविले जात नाही की त्यांनी कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहिले पाहिजे, वास्तविक पाहता अल्लाह सर्वज्ञ आहे. आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की अल्लाहच्याच ताब्यात पृथ्वी व आकाशांचे राज्य आहे, त्याच्याच अधिकारांत जीवन व मरण आहे आणि तुमचा कोणीही समर्थक व सहायक असा नाही जो तुम्हाला त्यापासून वाचवू शकेल. (११५-११६)

अल्लाहने क्षमा केली नबीला व त्या मुहाजिरीन व अन्सार लोकांना (देशांतर करणार्‍या व त्यांची मदत करणार्‍या लोकांना) ज्यांनी मोठया विपत्तीच्या प्रसंगी नबीला साथ दिली. यद्यपि त्यांच्यापैकी काही लोकांची ह्रदये डळंमळू लागली होती. (परंतु जेव्हा त्यांनी नबीला साथ दिली तेव्हा) अल्लाहने त्यांना क्षमा केली. नि:संशय त्याचा व्यवहार या लोकांशी अत्यंत प्रेमळ व कृपेचा आहे-आणि त्या तिघांनादेखील त्याने माफ केले ज्यांचे प्रकरण पुढे ढकलले गेले होते-जेव्हा जमीन सर्वथैव विस्तीर्ण असूनदेखील त्यांच्यावर तंग झाली आणि त्यांच्या स्वत:चे जीवदेखील त्यांना भारी वाटू लागले आणि त्यांनी जाणून घेतले की अल्लाहपासून वाचण्यासाठी कोणतेही आश्रयस्थान खुद्द अल्लाहच्या कृपाछत्राशिवाय नाही; तेव्हा अल्लाह आपल्या कृपेने त्यांच्याकडे वळला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे परत यावे. नि:संशय अल्लाह अत्य़ंत क्षमाशील व परम दय़ाळू आहे. (११७-११८)

हे श्रद्धावंतांने! अल्लाहचय कोपाचे भय बाळगा आणि सत्यवादी लोकांना साथ द्या. मदीनानिवासी व सभोवतालच्या बदावींना हे मुळीच शोभले नाही की अल्लाहच्या पैगंबराला सोडून घरी बसून राहावे आणि त्यांच्यापासून बेपर्वा होऊन आपापल्या जीवाचीच काळजी घेण्यात लागले असावे कारण असे कधीही घडणार नाही की अल्लाहच्या मार्गात भूक, तहान आणि शारीरिक कष्टाचा एखादा त्रास त्यांनीसोसावा आणि सत्याचा इन्कार करणार्‍यांना जो मार्ग अप्रिय आहे, त्यावर एखादे पाऊल त्यांनी टाकावे आणि एखाद्या शत्रूवर त्यांनी (सत्याशी शत्रुत्वाचा) सूड उगवावा. आणि याच्या मोबदल्यात त्यांच्या हिशेबी एखादे सत्कृत्य लिहिले जाऊ नये. नि:संशय अल्लाहजवळ परोपकारींच्या सेवेचा ह्क्क हिरावला जात नाही. अशाच प्रकारे हे देखील कधी घडणार नाही की (अल्लाहच्या मार्गात) त्यांनी थोडा किंवा फार खर्च सोसावा आणि (युद्धाची पराकाष्ठा करताना) त्यांनी एखादी दरी पार करावी आणि त्यांच्या हिशेबी त्याची नोंद होऊ नये, जेणेकरून अल्लाह त्यांच्या या उत्तम कामगिरीचे फळ त्यांना प्रदान करील. (११९-१२०)

आणि हे काही आवश्यक नव्हते की सर्वचेसर्व श्रद्धावंत निघाले असते, परंतु असे का घडले नाही की त्यांच्या वस्तीतील प्रत्येक भागातून काही लोक निघाले असते आणि धर्माचा बोध प्राप्त केला असता, आणि परत जाऊन आपल्या प्रदेशातील रहिवाशांना सावध केले असते, जेणेकरून (मुस्लिमेतर वर्तन) त्यांनी वर्ज्य केले असते. (१२१-१२२)

हे श्रद्धावंतांनो! युद्धा करा त्या सत्याचा इन्कार करणार्‍यांशी जे तुमच्या निकट आहेत. आणि हे आवश्यक आहे की त्यांना तुमच्यात कठोरपणा आढळावा, व समजून असा की अल्लाह ईशपरायण लोकांसमवेत आहे. जेव्हा एखादी नवीन ‘सूरत’ अवतरते, तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण (टिंगल म्हणून मुसलमानांना) विचारतात की, “सांगा, तुम्हांपैकी कोणाच्या श्रद्धेमध्ये यामुळे वाढ झाली?” ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे त्यांच्या श्रद्धेमध्ये तर खरोखर (प्रत्येक अवतरलेल्या सूरतने) वाढच केलेली आहे आणि ते तिच्यामुळे समाधानी आहेत. परंतु ज्या लोकांच्या ह्रदयांना (दांबिकतेचा) रोग जडलेला होता, त्यांच्या पूर्वीच्या मलीनतेवर आणखी एका मलीनतेची भर पडली. आणि ते मरेपर्यंत अश्रद्धेमध्येच गुरफटून राहिले. काय हे लोक पाहात नाहीत की प्रत्येक वर्षी एक दोनदा हे परीक्षेत टाकले जात असतात परंतु तरी देखील हे पश्चात्तापही करीत नाहीत व काही बोधही घेत नाहीत. जेव्हा एखादी सूरत अवतरते तेव्हा हे लोक नजरेनेच एकदुसर्‍याशी बोलतात की, एखादे वेळी तुम्हाला कुणी पाहात तर नाही ना? मग गुपचुपपणे निसटतात. अल्लाहने यांची ह्रदये फिरविली आहेत कारण हे अजाण लोक आहेत. (१२३-१२७)

पहा! तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला हे जो खुद्द तुम्हापैकीच आहे. तुम्हाला नुकसान पोहचणे त्याला जड वाटते. तुमच्या कल्याणाचा तो इच्छुक आहे. श्रद्धावंतांसाठी तो प्रेमळ आणि दयाळू आहे.-आता जर हे लोक तुमच्याशी विमुख होत आहेत तर हे पैगंबर (स.) यांना सांगून टाका की, “माझ्यासाठी अल्लाह पुरेसा आहे. त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि तो स्वामी आहे महान राजसिंहासनाचा.” (१२८-१२९)

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP