मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌कसस

सूरह - अल्‌कसस

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ८८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

तॉऽ सीऽऽम्‌ मीऽऽम. ही स्पष्ट ग्रंथाची वचने आहेत. आम्ही मूसा (अ.) आणि फिरऔनचा काही वृत्तांत खरा खरा तुम्हाला ऐकवितो. अशा लोकांच्या लाभासाठी जे श्रद्धा ठेवतील. (१-३)

हकीकत अशी आहे की फिरऔनने भूतलावर दुर्वर्तन केले आणि तिच्या निवासींयांना गटागटांत विभागले. त्यांच्यापैकी एका गटाला तो अपमानित करीत असे, त्यांच्या मुलांना ठार करीत असे व त्यांच्या मुलींना जिवंत ठेवीत असे. खरोखरच तो हिंसाचारी लोकांपैकी होता. आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहेरबानी करावी त्या लोकांवर, ज्यांना भूतलावर दुर्बल बनवून ठेवले गेले होते आणि त्यांना नेते बनवावे आणि त्यांनाच वारस बनवावे आणि भूतलावर त्यांना सत्ता प्रदान करावी आणि त्यांच्याकडून फिरऔन आणि हामान आणि त्यांच्या सैन्यांना तेच सर्वकाही दाखवावे. ज्यांचे त्यांना भय वाटत होते. (४-६)

आम्ही मूसा (अ.) च्या आईला संकेत दिला की, “याला दूध पाज, मग जेव्हा तुला त्याच्या जिवाचे भय वाटेल तेव्हा त्याला नदीत सोडून दे आणि कसलेही भय आणि दु:ख बाळगू नकोस. आम्ही त्याला तुझ्यापाशीच परत घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांत समाविष्ट करू.” सरतेशेवटी फिरऔनच्या कुटुंबियांनी त्याला (नदीतून) काढून घेतले की जेणेकरून तो त्यांचा शत्रू आणि त्यांच्यासाठी दु:खाचे करण ठरेल. खरोखरच फिरऔन आणि हामान व त्यांचे लष्कर (आपल्या युक्तीमध्ये) मोठे दुराचारी होते. फिरऔनच्या पत्नीने (त्याला) सांगितले, “हा माझ्या आणि तुझ्यासाठी नेत्रसुख आहे, याला ठार करू नकोस, कदाचित हा आमच्यासाठी लाभदायक ठरेल अथवा आम्ही याला पुत्रच मानू.” आणि ते (परिणामापासून) बेसावध होते. (७-९)

तिकडे मूसा (अ.) ची आई हवालदिल होत होती. तिने तिचे रहस्य उघड केले असते जर आम्ही तिचे धैर्य दृढ केले नसते जेणेकरून ती (आमच्या वचनावर) श्रद्धा ठेवणार्‍यांपैकी होती. तिने बाळाच्या बहिणीला सांगितले, याच्या मागेमागे जा, म्हणून ती अलग राहून त्याला अशा प्रकारे पाहात राहिली की (शत्रूंना) ते कळले नाही. आणि आम्ही स्तनपान करविणार्‍यांना बाळावर निषिद्ध केले होते. (ही स्थिती पाहून) त्या मुलीने त्यांना सांगितले, “मी तुम्हाला अशा घराचा पत्ता देऊ का जेथील लोक याच्या संगोपनाची जबाबदारी घेतील आणि त्याचे हितचिंतक होतील?” अशाप्रकारे आम्ही मूसा (अ.) ला त्याच्या आईकडे परत आणले जेणेकरून तिचे नेत्र सुखावले जावेत. आणि ती दु:खी होऊ नये व तिने जाणावे की अल्लाहचे वचन खरे होते, परंतु बहुतेक लोक ही गोष्ट जाणत नाहीत. (१०-१३)

जेव्हा मूसा (अ.) ने तारुण्य गाठले आणि तो समर्थ झाला. तेव्हा आम्ही त्याला हुकूम आणि ज्ञान प्रदान केले, आम्ही सदाचारी लोकांना असाच मोबदला देत असतो. (एके दिवशी) तो शहरात अशावेळी प्रविष्ट करता झाला जेव्हा शहरवासी बेसावध पडले होते. तेथे त्याने पाहिले की दोन माणसे भांडत आहेत. एक त्याच्या लोकांपैकी होता आणि दुसरा त्याच्या शत्रुशी संबंधित होता. त्याच्या स्वकीयांपैकी माणसाने शत्रू लोकांतील माणसांविरूद्ध त्याला मदतीसाठी हाक दिली. मूसा (अ.) ने त्याला एक ठोसा मारला आणि त्याचा शेवट केला. (हे कृत्य घडताच) मूसा (अ.) ने सांगितले, “ही शैतानाची कामगिरी होय, तो कट्टर शत्रू आणि स्पष्टपणे मार्गभ्रष्ट करणारा आहे.” मग तो म्हणू लागला, “हे माझ्या पालनकर्त्या, मी आपल्या स्वत:वर अत्याचार केला, मला क्षमा कर” म्हणून अल्लाहने त्याला क्षमा केली, तो क्षमा करणारा कृपाळू आहे. मूसा (अ.) ने प्रतिज्ञा केली, “हे माझ्या पालनकर्त्या, हा उपकार जो तू माझ्यावर केला आहेस. यानंतर आता कधीही मी अपराध्यांचा मदतनीस बनणार नाही.” (१४-१७)

दुसर्‍या दिवशी तो सकाळीच भीतभीत आणि सर्व बाजूंनी धोक्याची चाहूल घेत शहरातून जात असता त्याने अकास्मात काय पाहिले की तोच इसम ज्याने काल त्याला मदतीसाठी हाक दिली होती. आज पुन्हा त्याला हाक देत आहे. मूसा (अ.) ने सांगितले, “तू तर मोठा बहकलेला मनुष्य आहेस.” मग जेव्हा मूसा (अ.) ने इरादा केला की शत्रू लोकांच्या माणसावर हल्ला चढवावा तेव्हा त्याने ओरडून सांगितले, “हे मूसा (अ.) काय आज तू मला त्याचप्रमाणे ठार करू पाहात आहेस ज्याप्रकारे काल एका इसमाला ठार केले आहेस? तू या देशात कठोर बनून राहू इच्छितो, सुधार करू इच्छित नाहीस.” यानंतर एक मनुष्य नगराच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला, “हे मूसा! सरदार लोकांत तुला ठार मारण्याची सल्लामसलत होऊ लागली आहे. येथून निघून जा, मी तुझा हितचिंतक आहे.” ही वार्ता ऐकताच मूसा (अ.) भीत व घाबरत निघाला आणि त्याने प्रार्थना केली की, “हे माझ्या पालनकर्त्या, मला अत्याचार्‍यांपासून वाचव.” (१८-२१)

(इजिप्तहून निघून) जेव्हा मूसा (अ.) ने मदयनची वाट धरली तेव्हा तो म्हणाला. “आशा आहे की माझा पालनकर्ता मला योग्य मार्गावर लावील.” आणि जेव्हा तो मदयनच्या विहिरीवर पोहचला तेव्हा त्याने पाहिले की बरेचसे लोक आपल्या जनावरांना पाणी पाजत आहेत आणि त्यांच्यापासून अलग एका बाजूला दोन स्त्रिया आपल्या जनावरांना थोपवीत आहेत. मूसा (अ.) ने त्या स्त्रियांना विचारले, “तुम्हाला काय अडचण आहे?” त्यांनी सांगितले, “आम्ही आपल्या जनावरांना पाणी पाजू शकत नाही. जोपर्यंत हे मेंढपाळ आपली जनावरे घेऊन जात नाहीत आणि आमचे वडील म्हातारे गृहस्थ आहेत.” हे ऐकून मूसा (अ.) ने त्यांच्या जनावरांना पाणी दिले, नंतर एका सावलीच्या जागी जाऊन बसला आणि म्हणाला, “हे पालनकर्ता, जे काही इष्ट तू माझ्यावर अवतरशील मी त्याचा गरजवंत आहे.” (काही जास्त वेळ गेली नव्हती की) त्या दोन्ही स्त्रियांपैकी एक लाजत लाजत त्यांच्याजवळ आली आणि म्हणू लागली, “माझे वडील आपणास बोलवीत आहेत जेणेकरून आपण आमच्यासाठी जनावरांना जे पाणी पाजले आहे त्याचा मोबद्ला आपणास द्यावा.” मूसा (अ.) जेव्हा त्याच्याजवळ पोहचला आणि आपला सर्व किस्सा त्याला सांगितला तेव्हा तो म्हणाला, “काही भय बाळगू नकोस, आता तू अत्याचारी लोकांपासून वाचून आला आहेस.” (२२-२५)

त्या दोन्ही स्त्रियांपैकी एकीने आपल्या वडिलास सांगितले, “हे पिता, या माणसाला नोकर म्हणून ठेवून घ्या. उत्तम माणूस ज्याला आपण नोकर म्हणून ठेवावे असा तोच असू शकतो जो धष्टपुष्ट आणि विश्वासू असेल.” तिच्या वडिलाने (मूसा (अ.) ला) सांगतले, “मी इच्छितो की आपल्या या दोन मुलीपैकी एकीचा विवाह आपल्याशी करावा या अटीवर की तुम्ही माझ्याकडे आठ वर्षे नोकरी करावी. आणि जर दहा वर्षे पूर्ण केलीत तर हे तुमच्या मर्जीवर आहे. मी तुमच्यावर सक्ती करू इच्छित नाही, अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला प्रामाणिक मनुष्य आढळेन.” मूसा (अ.) ने उत्तर दिले, “ही गोष्ट माझ्या व आपल्या दरम्यान ठरली. या दोन्ही मुदतीपैकी जी कोणती मी पूर्ण करीन त्यानंतर पुन्हा कोणतीही आगळीक मजवर होऊ नये आणि जो काही करार-मदर आम्ही करीत आहोत, अल्लाह त्यावर रक्षक आहे.” (२६-२८)

जेव्हा मूसा (अ.) ने मुदत पूर्ण केली आणि तो आपल्या कुटुंबियांना घेऊन निघाला तेव्हा तूर पर्वताच्या दिशेने त्याला एक अग्नी दृष्टीस पडला. त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितले. “थांबा, मी एक अग्नी पाहिला आहे, कदाचित मी तेथून एखादी खबर आणीन किंवा त्या अग्नीपासून एखादा निखारा तरी आणीन की ज्याने तुम्ही ऊब घेऊ शकाल.” तेथे पोहचला तर खोर्‍याच्या उजव्या किनार्‍यावर शुभक्षेत्रात एका वृक्षापासून पुकारले गेले की, “हे मूसा (अ.), मीच अल्लाह आहे, सर्व सवगाल्यांचा स्वामी.” आणि (आज्ञा दिली गेली की) “टाक, आपली काठी.” ज्याक्षणी मूसा (अ.) ने पाहिले की ती काठी सर्पाप्रमाणे वळसे घेत आहे  तेव्हा तो पाठ फिरवून पळत सुटला. आणि त्याने वळूनसुद्धा पाहिले नाही. (फर्माविले गेले) “मूसा (अ.), परत ये आणि भिऊ नकोस. तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. आपला हात छातीजवळ ने, चकाकत निघेल कोणत्याही अडचणीशिवाय आणि भीतीपासून वाचण्यासाठी आपले बाहू आवळून घे दोन उज्ज्वल संकेत आहेत तुझ्या पालनकर्त्याकडून फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी. ते मोठे अवज्ञाकारी लोक आहेत.” मूसा (अ.) ने विनविले, “हे स्वामी, मी तर त्यांचा एक माणूस ठार केलेला आहे. भय वाटते की ते मला ठार करतील. आणि माझा भाऊ हारून माझ्यापेक्षा जास्त वाक्‌चतुर आहे. त्याला माझ्यासमवेत सहायक म्हणून पाठव की जेणेकरून तो माझे समर्थन करील. मला भय आहे की ते लोक मला खोटे ठरवतील.” फर्माविले. “आम्ही तुझ्या भावाच्या सहाय्याने तुझे हात मजबूत करू आणि तुम्हा दोघांना असा प्रताप बहाल करू की ते तुमचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. आमच्या संकेतांच्या जोरावर वर्चस्व तुमचे व तुमच्या अनुयायांचेच होईल.” (२९-३५)

मग जेव्हा मूसा (अ.) त्या लोकांजवळ आमचे उघड उघड संकेत घेऊन पोहचला तेव्हा ते म्हणाले की, “हे अन्य काही नसून एक बनावटी जादू आहे. आणि या गोष्टी तर आम्ही आपल्या वाडवडिलांच्या काळात कधीही ऐकत्या नाहीत.” मूसा (अ.) ने उत्तर दिले, “माझा पालनकर्ता त्या माणसाच्या स्थितीशी चांगला परिचित आहे जो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आला आहे आणि तोच उत्तम जाणतो की अखेरीस कोणाचा शेवट चांगला होणार आहे, सत्य असे आहे की अत्याचारी कधीही सफल होत नाहीत.” (३६-३७)

आणि फिरऔनने सांगितले, “हे दरबारी लोकहो, मी तर स्वत: खेरीज तुमच्या कोणत्याही उपास्याला जाणत नाही. हामान, जरा विटा भाजवून माझ्यासाठी एक उंच इमारत बनव तर खरे. कदाचित त्यावर चढून मी मूसा (अ.) च्या ईश्वराला पाहू शकेन. मी तर त्याला खोटा समजतो.” (३८)

त्याने आणि त्याच्या लष्करांनी पृथ्वीवर कोणत्याही अधिकाराविना आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि कल्पना केली की त्यांना कधीही आमच्याकडे परतावयाचे नाही. सरतेशेवटी आम्ही त्याला व त्याच्या लष्करांना पकडले आणि समुद्रात फेकून दिले. आता पहा की या अत्याचार्‍यांचा कसा शेवट झाला. आम्ही त्यांना नरकाकडे निमंत्रित करणारे म्होरके बनविले, आणि पुनरुत्थानाच्या दिवशी ते कोठूनही कोणतीही मदत प्राप्त करू शकणार नाहीत. आम्ही या जगात त्यांच्यामागे धिक्कार लावला. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी ते मोठया घृणेत गुरफटलेले असतील. (३९-४२)

पूर्वीच्या पिढयांना नष्ट केल्यानंतर आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ प्रदान केला, लोकांकरिता डोळसपणाचे साधन बनवून, मार्गदर्शन व कृपा बनवून, जेणेकरून लोक कदाचित बोध घेतील. (हे पैगंबर (स.), तुम्ही त्यावेळी पश्चिमी कोपर्‍यांत हजर नव्हता, जेव्हा आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ प्रदान केला. आणि तुम्ही साक्षीदारांतही सामील नव्हता. किंबहुना त्यानंतर (तुमच्या काळापर्यंत) आम्ही अनेक पिढया उभ्या केल्या आहेत आणि त्यांच्यावर दीर्घकाळ लोटला आहे. तुम्ही मदयनच्या निवासियांदरम्यानदेखील हजर नव्हता की तुम्ही त्यांना आमचे संकेत  ऐकवीत राहिला असतात. परंतु (त्यावेळच्या या वार्ता) पाठविणारे आम्ही आहोत. आणि तुम्ही तूरच्या पायथ्याशीसुद्धा  त्यावेळी हजर नव्हता जेव्हा आम्ही (मूसा (अ.) ला पहिल्यांदा) पुकारले होते, परंतु ही तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे (की तुम्हाला ही माहिती दिली जात आहे) जेणेकरून तुम्ही त्या लोकांना सावध करावे, ज्याच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही, कदाचित ते जागे होतील (आणि आम्ही हे अशासाठी केले की) एखादे वेळी असे होऊ नये की त्यांनी केलेल्या आपल्या कृत्यापायी एखादे संकट जर त्यांच्यावर आले तर सांगतील की, “हे पालनकर्त्या, तू आमच्याकडे एखादा पैगंबर का पाठविला नाहीस की आम्ही तुझ्या वचनांचे अनुसरण केले असते आणि श्रद्धावंतांपैकी बनलो असतो.” (४३-४७)

परंतु जेव्हा आमच्या येथून सत्य त्यांच्यापाशी आले तेव्हा ते म्हणू लागले, “का बरे दिले गेले नाही याला तेच काही जे मूसा (अ.) ला दिले गेले होते?" काय या लोकांनी त्याचा इन्कार केला नाही, जे यापूर्वी मूसा (अ.) ला दिले गेले होते? त्यांनी सांगितले, “दोन्ही जादू आहेत ज्या एकमेकाला मदत करतात.” आणि म्हणाले “आम्ही कोणाला मानत नाही.” (हे पैगंबर (स.) यांना सांगा, “बरे तर आणा, अल्लाहकडून एखादा ग्रंथ जो या दोघांपेक्षा जास्त मार्गदर्शन करणारा असेल. तर तुम्ही खरे असाल, मी त्याचेच अनुयायित्व स्वीकारीन.” आता जर ते तुमची ही मागणी पूर्ण करणार नसतील तर समजा की मूलत: हे आपल्या इच्छांचे अनुसरण करणारे आहेत. आणि त्या व्यक्तीपेक्षा जास्त कोण मार्गभ्रष्ट असेल जी अल्लाहच्या मार्गदर्शनाविना केवळ आपल्या इच्छांचे अनुकरण करीत असेल? अल्लाह असल्या अत्याचार्‍यांना कदापि मार्गदर्शन करीत नाही. आणि (उपदेशाची) गोष्ट लागोपाठ आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचविली आहे जेणेकरून यांनी गफलतीतून जागे व्हावे. (४८-५१)

ज्या लोकांना यांच्यापूर्वी आम्ही ग्रंथ दिला होता ते या (कुरआन) वर श्रद्धा ठेवतात. आणि जेव्हा हे त्यांना ऐकविले जाते तेव्हा ते म्हणतात की. “आम्ही यांच्यावर श्रद्धा ठेवली, हा खरोखरच सत्य आहे आमच्या पालनकर्त्याकडून. आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत.” हे ते लोक आहेत ज्यांना त्यांचा मोबदला दोन वेळा दिला जाईल, त्या दृढतेबद्दल जी त्यांनी दाखविली. ते वाईटाचे भल्याने निवारण करतात आणि जी काही उपजीविका त्यांना आम्ही दिली आहे, त्यातून ते खर्च करतात, आणि जेव्हा त्यांनी बाष्कळ गोष्ट ऐकली तेव्हा हे सांगून त्यापासून अलिप्त झाले की, “आमची कृत्ये आमच्यासाठी आणि तुमची कृत्ये तुमच्यासाठी, तुम्हाला सलाम आहे, आम्ही असभ्य लोकांसारखी पद्धत अनुसरू इच्छित नाही.” हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत. (५२-५६)

ते सांगतात, “जर आम्ही तुमच्याबरोबर या मार्गदर्शनाचे अनुसरण स्वीकारले तर आम्हाला आमच्या भूमीतून हिरावून टाकले जाईल.” काय ही वस्तुस्थिती नाही की आम्ही एका शांतीपूर्ण ‘हरम’ला यांच्याकरिता निवासस्थान बनविले, ज्याच्याकडे हरप्रकारची फळे आणलो जातात, आमच्याकडून उपजीविका म्हणून? परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत. आणि कित्येक अशा वस्त्या आम्ही नष्ट केल्या आहेत, ज्यांच्यातील लोक आपल्या उपजीविकेवर गर्व करीत होते, तर पहा. ती त्यांची निवासस्थाने पडलेली आहेत ज्यात त्यांच्यानंतर क्वचितच कोणी वसले आहे, सरतेशेवटी आम्हीच वारस होऊन राहिलो. आणि तुझा पालनकर्ता कोणत्याही वस्तीला तोपर्यंत नष्ट करीत नाही जोपर्यंत त्यामध्ये तो एखादा प्रेषित पाठवित नाही. जो त्यांना आमची वचने ऐकवील. आणि आम्ही कोणतीही वस्ती नष्ट करीत नाही, जोपर्यंत तेथील लोक अत्याचारी होत नाहीत. (५७-५९)

तुम्हा लोकांना जे काही दिले आहे ते केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री व त्याची शोभा आहे आणि जे काही अल्लाहजवळ आहे ते यापेक्षा उत्तम व शेषतप आहे. काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करीत नाही? बरे, तो मनुष्य ज्याला आम्ही चांगले वचन दिले असेल व तो त्याला प्राप्त करणारा असेल. कधी त्या माणसासारखा होऊ शकेल काय ज्याला आम्ही केवळ ऐहिक जीवनाची सामुग्री दिली असेल आणि मग तो पुनरुत्थानाच्या दिवशी शिक्षेकरिता हजर केला जाणार असेल? (६०-६१)

आणि (विसरू नये या लोकांनी) त्या दिवसाला, जेव्हा तो यांना पुकारील आणि विचारील, “कोठे आहेत ते माझे भागीदार ज्यांच्यासंबंधी तुम्ही कल्पना बाळगत होता?” हे कथन ज्यांना लागू पडेल ते म्हणतील, “हे आमच्या पालनकर्त्या! नि:संशय हेच ते लोक आहेत ज्यांना आम्ही पथभ्रष्ट केले होते, यांना आम्ही त्याचप्रकारे पथभ्रष्ट केले ज्याप्रकारे आम्ही स्वत: मार्गभ्रष्ट झालो, आम्ही आपल्यासमोर यांच्या जबाबदारीतून मुक्त असल्याचे जाहीर करतो. हे आमची तर भक्ती करीत नव्हते.” मग यांना सांगितले जाईल की धावा करा आता आपल्या मानलेल्या भागीदारांचा. हे त्यांना हांका मारतील परंतु ते यांना काहीच उत्तर देणार नाहीत. आणि हे लोक प्रकोप पाहून खेदाने म्हणतील की हे मार्गदर्शन स्वीकारणारे असते तर! (६२-६४)

आणि (विसरू नये या लोकांनी) त्या दिवसाला, जेव्हा तो याना पुकारील आणि विचारील की, “जे प्रेषित पाठविले गेले होते त्यांना तुम्ही काय उत्तर दिले होते?” त्यावेळेस कोणतेही उत्तर यांना सूचणार नाही आणि हे परस्पर एकमेकांशी विचारूदेखील शकणार नाहीत. तथापि ज्याने आज तौबा (पश्चात्तप) केली आणि श्रद्धा ठेवली व सत्कृत्ये केली तोच ही अपेक्षा करू शकतो की तो तेथे सफलता प्राप्त करणार्‍यांपैकी असेल. (६५-६७)

तुझा पालनकर्ता निर्माण करतो जे काही इच्छितो आणि (तो स्वत:च आपल्या कार्याकरिता ज्याला इच्छितो) निवड करतो, ही निवड करणे या लोकांचे काम नव्हे. अल्लाह पवित्र आहे आणि फार उच्चतम आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करतात. तुझा पालनकर्ता जाणतो जे काही हे मनांत लपवून ठेवतात आणि जे काही हे प्रकट करतात. तोच एक अल्लाह आहे ज्याच्याशिवाय कोणी भक्तीला पात्र नाही. त्याच्याचकरिता स्तुती आहे इहलोकांतही व परलोकातदेखील. शासन त्याचेच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतविले जाणार आहात. हे पैगंबर (स.)! यांना सांगा, कधी तुम्ही लोकांनी विचार केला आहे काय? जर अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत सदैव तुमच्यावर रात्र पसरविली तर अल्लाहखेरीज तो कोण असा ईश्वर आहे जो तुम्हासाठी प्रकाश आणील? तुम्ही ऐकत नाही काय? यांना विचारा कधी तुम्ही विचार केला आहे की अल्लाहने पुनरुत्थानापर्यंत तुम्हावर सदैव दिवस राहू दिला तर अल्लाहखेरीज तो कोण ईश्वर आहे जो तुमच्याकरिता रात्र आणील जेणेकरून तुम्ही त्यात विश्रांती घ्याल? काय तुम्हाला उमगत नाही? ही त्याचीच कृपा आहे की त्याने तुम्हीकरिता रात्र व दिवस बनविले जेणेकरून तुम्ही (रात्री) विश्रांती मिळवाल आणि (दिवसा) आपल्या पालनकर्त्याचा कृपाप्रसाद शोधाल. कदाचित तुम्ही कृतज्ञ व्हाल. (६८-७३)

(लक्षात ठेवावा या लोकांनी) तो दिवस जेव्हा तो यांना पुकारील मग विचारील, “कोठे आहेत माझे ते भागीदार, ज्यांची इच्छा तुम्ही बाळगत होता?” आणि आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक साक्षीदार बाहेर आणू, मग सांगू, “आणा आता आपले प्रमाण” त्या वेळेस यांना कळून चुकेल की सत्य अल्लाहच्या बाजूने आहे, आणि नष्ट होईल त्यांचे ते सगळे खोटेनाटे जे यांनी रचले होते. (७४-७५)

ही एक हकीकत आहे की कारून हा मूसा (अ.) च्या लोकसमूहातील एक माणूस होता, मग तो आपल्या लोकसमूहाविरुद्ध दुर्वर्तनी झाला, आणि त्याला आम्हीज इतके खजिने देऊन ठेवले होते की त्यांच्या किल्ल्या बलवान माणसांच्या समुहाला देखील ते उचलणे अवघड होते, जेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितले, “गर्व करू जाऊ नकोस, अल्लाह गर्व करणारांना पसंत करीत नाही. जी संपत्ती अल्लाहने तुला दिली आहे त्यापासून मरणोत्तर जीवनाचे घर बनविण्याची काळजी घे आणि जगातीलही आपला वाटा विसरू नकोस. उपकार कर ज्याप्रकारे अल्लाहने तुझ्यावर उपकार केले आहेत आणि जमिनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नकोस. अल्लाहला उपद्रवी आवडत नाहीत. “ तेव्हा तो म्हणाला, “हे सर्वकाही तर मला त्या ज्ञानामुळे दिले गेले आहे जे मला अवगत आहे.” काय त्याला हे माहीत नव्हते की अल्लाहने त्याच्यापूर्वी अनेक अशा लोकांना नष्ट केले आहे जे त्याच्यापेक्षा  अधिक शक्ती आणि जमाव बाळगत होते?.अपराध्यांना तर त्यांचे अपराध विचारले जात नाहीत. (७६-७८)

एके दिवशी तो आपल्या लोकांच्यासमोर दिमाखात निघाला, जे लोक ऐहिक जीवनाचे इच्छुक होते ते त्याला पाहून म्हणू लागले, “आम्हालासुद्दा ते सर्वकाही मिळाले असते जे कारूनला दिले गेले आहे, हा तर मोठा भाग्यवान आहे.” परंतु जे लोक ज्ञान बाळगणारे होते ते म्हणू लागले, “खेद आहे तुमच्या स्थितीवर, अल्लाहचा मोबदला उत्तम आहे त्या माणसासाठी जो श्रद्धा ठेवील आणि सत्कृत्ये करील आणि ही संपत्ती संयम बाळगणार्‍यांनाच प्राप्त होते.” (७९-८०)

सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या घराला जमिनीत धसवून टाकले. मग कोणत्याही त्याच्या समर्थकाचा असा समूह नव्हता जो अल्लाहच्याविरूद्ध त्याच्या मदतीसाठी धावला असता आणि तो स्वत:देखील आपली मदत करू शकला नाही. आता तेच लोक जे काल त्याच्या स्थानाची मनीषा बाळगत होते, म्हणू लागले, “खेद आहे, आम्ही विसरून गेलो होतो की अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याची उपजीविका मुबलक करतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताचीच देतो. जर अल्लाहने आमच्यावर उपकार केले नसते तर आम्हालासुद्धा जमिनीत धसविले असते. खेद आहे की आमच्या स्मरणात राहिले नाही की अश्रद्धावंतांना यश प्राप्त होत नसते.”(८१-८२)

ते मरणोत्तर जीवनाचे घर तर आम्ही त्य लोकांसाठी खास करू जे पृथ्वीवर आपली शेखी मिरवू इच्छित नाहीत आणि उपद्रवदेखील माजवू इच्छित नाहीत आणि शेवटी भले ईशपरायणांसाठी आहे, जो कोणी भलेपणा घेऊन येईल त्याच्यासाठी त्यापेक्षा श्रेष्ठ भलाई आहे आणि जो वाईट घेऊन येईल तर अपकृत्ये करणार्‍यांना तसाच मोबदला दिळेल जसे कृत्य ते करीत आहेत. (८३-८४)

हे पैगंबर (स.), विश्वास ठेवा की ज्याने हे कुरआन तुमच्यासाठी अनिवार्य ठरविले आहे तो तुम्हाला एका उत्तम परिणतीपर्यंत पोह्चविणारा आहे. या लोकांना सांगा, “माझा पालनकर्ता भल्याप्रकारे जाणतो की मार्गदर्शन घेऊन कोण आलेला आहे आणि कोण उघड प्रथभ्रष्टतेत गुरफटलेला आहे. तुम्ही या गोष्टीचे मुळीच मात्र नाहीत की तुम्हावर ग्रंथ अवतरला जाईल. हा तर केवळ तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने (तुमच्यावर अवतरला आहे) म्हणून तुम्ही अश्रद्धावंतांचे सहायक बनू नका. आणि असे कधी घडता कामा नये की अल्लाहचे संकेत जेव्हा तुमच्यावर अवतरले जातील तर अश्रद्धावंतांनी तुम्हाला त्यापासून परावृत्त करावे. आपल्या पालनकर्त्याकडे निमंत्रित करा आणि कदापि अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नका, आणि अल्लाहसह कोणत्याही अन्य उपास्याचा धावा करू नका. त्याच्याशिवाय दुसरा कोणी उपास्य नाही. प्रत्येक वस्तू नश्वर आहे केवळ त्या अस्तित्वाखेरीज, सत्ताधिकार त्याचाच आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही सर्व परतविले जाणार आहात. (५५-८८)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP