मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
यूनुस

सूरह - यूनुस

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने १०९)

अल्लाहच्या नावाने,
जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अलिफ लाऽऽम रा. ही त्या ग्रंथाची वचने आहेत जी विवेक व बोधपूर्ण आहेत. (१)

लोकांकरिता ही एक अजब गोष्ट झाली काय की आम्ही खुद्द त्यांच्यातीलच एका माणसावर दिव्य प्रकटन (वह्य) पाठविले. की (गफलतीत पडलेल्या) लोकांना सावध करावे, आणि जे श्रद्धा ठेवतील त्यांना शुभवार्ता द्यावी की त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ खराखुरा मानसन्मान व प्रतिष्ठा आहे? (यावर) इन्कार करणार्‍यांनी म्हटले की ही व्यक्ती तर उघडपणे-जादूगार आहे. (२)

वस्तुस्थिती तर अशी आहे की तुमचा पालनकर्ता तोच ईश्वर आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले मग राजसिंहासनावर निराजमान होऊन सृष्टीची व्यवस्था चालवीत आहे. कोणीही शिफारस करणारा नाही त्याच्या परवानगीशिवाय. हाच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे, म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती करा. मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही? (३)

त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परतावयाचे आहे, हे अल्लाहचे पक्के वचन आहे. नि:संशय निर्मितीचा प्रारंभ तोच करतो, मग तोच दुसर्‍यांदा निर्माण करील जेनेकरून ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी सत्कृत्ये केली त्यांना न्यायपूर्ण मोबदला द्यावा, आणि ज्यांनी विद्रोही पद्धत अवलंबिली त्यांनी उकळते पाणी प्यावे व दु:खदायक शिक्षा भोगावी, सत्याच्या त्या इन्कारापायी जे ते करीत राहिले. (४)

तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे ट्प्पे योग्यरीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. अल्लाहने हे सर्वकाही सत्याधिष्ठित निर्माण केलेले आहे. तो आपले संकेत उघड करून करून प्रस्तुत करीत आहे त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. नि:संशय रात्र व दिवसाच्या आलटून पालटून येण्यात व त्या प्रत्येक वस्तूमध्ये जी अल्लाहने पृथ्वी व आकाशांत निर्माण केली आहे त्या लोकांकरिता संकेत आहेत जे (चुकीची दृष्टी व चालीपासून) दूर राहू इच्छितात. (५-६)

वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे ऐहिक जीवनावर संतुष्ट व समाधानी बनले आहेत व जे लोक आमच्या संकेतांपासून गाफील आहेत-त्यांचे शेवटचे ठिकाण नरक असेल त्या दुष्टतेपायी ज्यांची कमाई ते (आपल्या या चुकीच्या श्रद्धेमुळे व चुकीच्या आचरणामुळे) करीत राहिले. (७-८)

आणि हे देखील वस्तुस्थिती आहे की ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कृत्ये करीत राहिले त्यांना त्यांचा पालनकर्ता त्यांच्या श्रद्धेमुळे सरळमार्गी बनवील, ऐश्वर्यसंपन्न स्वर्गांमध्ये, त्यांच्या खालून कालवे वाहतील, तेथे त्यांची उद्‌घोषणा अशी असेल की, “पवित्र आहेस तू हे परमेश्वरा!” त्यांची प्रार्थना अशी असेल. “शांती व सुरक्षितता असो” आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट असा असेल. “सर्व स्तुती सर्व जगांच्या पालनकर्त्या अल्लाहसाठीच आहे.” (९-१०)

जर एखादे वेळी अल्लाहने लोकांशी वाईट व्यवहार करण्यात तितकीच घाई केली असती जितकी ते लोक ऐहिक भले मागण्यासाठी घाई करतात तर त्यांची कार्यमुदत केव्हाच संपुष्टात आणली गेली असती. (परंतु ही आमची रीत नव्हे) म्हणून आम्ही त्या लोकांना ज्यांना आम्हाला भेटण्याची अपेक्षा नाही त्यांच्या शिरजोरीतच भटकत राहण्याची सूट देत असतो. माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा त्याच्यावर एखादा बिकट प्रसंग ओढवतो तेव्हा उभा असता,-बसता व पहुडला असता आमचा धावा करतो, पण जेव्हा आम्ही त्याचे संकट निवारण करतो तेव्हा अशाप्रकारे तो चालता होतो जणूकाही त्याने कधीही त्याच्या कोणत्याही बिकट प्रसंगी आमचा धावा केलाव नव्हता. अशा प्रकारे मर्यादा ओलांडणार्‍यासाठी त्यांची कृत्ये शोभिवंत बनविली गेली आहेत. लोकहो! तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले जेव्हा त्यांनी अन्यायाचे वर्तन अवलंबिले आणि त्यांचे पैगंबर त्यांच्यापाशी उगडउघड संकेत घेऊन आले आणि त्यांनी श्रद्धा ठेवलीच नाही. अशा प्रकारे आम्ही गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचा बदला देत असतो. आता त्यांच्यानंतर आम्ही तुम्हाला भूतलावर त्यांची जागा दिली आहे जेणेकरून पाहावे, तुम्ही कशी कृत्ये करता. (११-१४)

जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकविल्या जातात तेव्हा ते लोक जे आम्हाला भेटण्याची अपेक्षा करीत नाहीत, म्हणतात, “याच्याऐवजी एखादा अन्य कुरआन आणा अथवा याच्यात काही बदल करा.” हे पैगंबर (स.) त्यांना सांगा, “माझे हे काम नव्हे की मी आपल्याकडून याच्यात काही फेरबदल करावा. मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचे अनुसरण करणारा आहे, जे माझ्याकडे पाठविले जाते, जर मी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला एका मोठया भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे.” आणि सांगा, “जर अल्लाहची अशीच इच्छा असती तर मी हा कुरआन तुम्हाला कधीच ऐकविला नसता आणि अल्लाहने तुम्हाला याची खबरसुद्धा दिली नसती. तसे पाहिले तर मी यापूर्वी तुमच्यातच आयुष्य व्यतीत केले आहे, तुम्ही बुद्धीचा उपयोग करीत नाही काय? मग त्याच्यापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असेल जो एक असत्य गोष्ट रचून अल्लाहशी तिचा संबंध जोडील अथवा अल्लाहच्या सत्य संकेतांना खोटे ठरवील. नि:संशय गुन्हेगार कधीच सफल होऊ शकत नाहीत.” (१५-१७)

हे लोक अल्लाहशिवाय त्यांची उपासना करीत आहेत जे यांना नुकसान आणि फायदादेखील पोहचवू शकत नाहीत, आणि म्हणतात की हे अल्लाहच्या येथे आमचे शिफारसी आहेत. हे पैगंबर (स.), यांना सांगा, “तुम्हा अल्लाहला त्या गोष्टीची खबर देता काय जिला तो आकाशांतही जाणत नाही व पृथ्वीवरही?” पवित्र आहे तो आणि श्रेष्ठ व उच्चतर आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करतात. (१८)

प्रारंभी सर्व मानव एकव धर्मसमुदायी होते, नंतर त्यांनी विविध श्रद्धा व पंथ बनविले, आणि जर तुझ्या पालनकर्त्याकडून अगोदरच एक गोश्ट निश्चित केली गेली नसती तर ज्या गोष्टीत ते परस्पर मतभेद करीत आहेत, तिचा निर्णय लावला गेला असता. (१९)

आणि हे जे ते सांगत आहेत की या पैगंबरावर याच्या पालनकर्त्याकरून एखादे संकेतवचन का अवतरले गेले नाही. तर यांना सांगा, “परोक्षचा स्वामी व मुखत्यार तर अल्लाहच आहे, बरे तर प्रतीक्षा करा, मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करीत राहतो.” (२०)

लोकांची स्थिती अशी आहे की संकटानंतर जेव्हा आम्ही त्यांना कृपेचा स्वाद चाखवितो तेव्हा ते लगेच आमच्या संकेतांच्या बाबतीत क्लप्त्या सुरू करतात. यांना सांगा, “अल्लाह आपल्या चालीत तुमच्यापेक्षा अधिक चपळ आहे, त्याचे फरिश्ते तुमच्या सर्व कुटिलतेची नोंद करीत आहेत.” तो अल्लाहच आहे जो तुम्हाला खुष्की व पाण्यावर चालवितो तद्वतच जेव्हा तुम्ही नौकेत स्वार होऊन. अनुकूल वार्‍यात आनंदी व अल्लसित प्रवास करीत असता, आणि मग अकस्मात प्रतिकूल वार्‍याला जोर वाढतो आणि सर्व बाजूंनी लाटांचा मारा बसू लागतो आणि प्रवाशांना कळून चुकते की आपण वादळांत वेढले गेलो, त्याप्रसंगी सर्वजण अल्लाहसाठीच आपल्या धर्माला निर्भेळ करून अल्लाहजवळ प्रार्थना करतात की, “जर तू आम्हाला या संकटातून तारलेस तर आम्ही कृतज्ञ दास बनू.” परंतु जेव्हा तो त्यांना वाचवितो तर तेव्हा तेच लोक सत्यापासून विमुख होऊन पृथ्वीतलावर बंड करू लागतात, लोकहो, तुमचे हे बंड तुमच्याचविरूद्ध होत आहे. ऐहिक जीवनाची काही दिवसाची मौजमजा आहे (लुटुन घ्या) नंतर आमच्याकडे तुम्हाला परत यावयाचे आहे, त्यावेळी आम्ही तुम्हाला दाखवून देऊन की तुम्ही काय काय करीत होता. जगातील हे जीवन (ज्याच्या नशेत मस्त होऊन तुम्ही आमच्या संकेतांकडे दुर्लक्ष करीत आहात) याचे उदाहरण असे आहे की जसे आकाशांतून आम्ही पाण्याचा वर्षाव केला तर जमिनीचे पीक जे माणसे व जनावरे सर्वजण खात असतात खूप घनदाट झाले, मग ऐन वेळी जेव्हा जमीन अत्यंत बहरलेली होती आणि शेते नटून थटून उभी होती आणि त्यांचे मालक अशा कल्पनेत होते की आम्ही आता याचा उपभोग घेण्यास समर्थ आहोत, अकस्मात रात्री किंवा दिवसा आमची आज्ञा आली आणि आम्ही तिला असे नष्ट करून टाकले जणूकाही काल तेथे काहीच नव्हते. अशा प्रकारे आम्ही संकेत उघड करून करून दाखवितो त्या लोकांसाठी जे विचार करणारे आहेत. (तुम्ही या नश्वर जीवनाच्या मोहपाशात पडला आहात) आणि अल्लाह तुम्हाला शांतिभुवन (दारुस्सलाम) कडे आमंत्रित करीत आहे. (मार्गदर्शन त्याच्या अधिकारात आहे) तो ज्याला इच्छितो त्याला सरळमार्ग दाखवितो. ज्या लोकांनी भलाईची पद्धत अंगिकारली त्यांच्यासाठी भले आहे आणि कृपादेखील. व त्यांच्या मुखावर काळिमा व मानहानी पसरणार नाही, ते स्वर्गासाठी पात्र आहेत, जेथे ते सदैव राहतील आणि ज्या लोकांनी दुष्कर्म प्राप्त केले त्यांचे जसे दुष्कर्म असेल तसाच त्यांना मोबदला मिळेल. मानहानी त्यांच्यावर पसरली असेल. अल्लाहपासून त्यांना कोणीही वाचविणारा असणार नाही. त्यांच्या चेहर्‍यावर असा काळिमा पसरला असेल जणू रात्रीचे कृष्णपटल त्यांच्यावर पडले असतील, ते नरकाला पात्र आहेत जेथे ते सदैव राहतील. ज्या दिवशी आम्ही त्या सर्वांना (अपाल्या न्यायालयात) एकत्र जमा करू, मग त्या लोकांना ज्यांनी अनेकेश्वरवादाचा अंगिकार केला-सांगू की, थांबा तुम्ही आणि तुमचे ठरविलेले भागीदारदेखील, मग आम्ही त्यांच्यामधील अनोळखीपणाचा पडदा दूर करू आणि त्यांचे भागीदार म्हणतील की, “तुम्ही आमची भक्ती तर करीत नव्हता. आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे की (तुम्ही आमची भक्ती करीत असाल तरी) आम्ही तुमच्या त्या भक्तीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो.” त्यावेळी प्रत्येकजण आपल्या कर्माची फळे चाखील, सर्वजण आपल्या खर्‍या स्वामीकडे परतविले जातील आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचले होते हरवतील. (२१-३०)

यांना विचारा, कोण तुम्हाला आकाश व पृथ्वीतून उपजीविका देतो? या ऐकण्याच्या व पाहण्याच्या शक्ती कोणाच्या अधिकारात आहेत? कोण निर्जीवमधून सजीव आणि सजीवांमधून निर्जीव काढतो? कोण या विश्वव्यवस्थेची उपाययोजना करीत आहे? ते अवश्य म्हणतील की अल्लाह. सांगा, मग तुम्ही त्याच्याशी परायण का रहात नाही? तेव्हा हाच अल्लाह तुमचा खरा पालनकर्ता आहे. मग सत्यानंतर पथभ्रष्टतेशिवाय आणखी काय उरले आहे? शेवटी तुम्ही कोठे वळविले जात आहात? (हे पैगंवर (स.) पहा) प्रकारे अवज्ञेचा अंगिकार करणार्‍यावर तुमच्या पालनकर्त्याचे वचन सत्यप्रमाणित झाले, की ते मान्य करणार नाहीत. (३१-३३)

यांना विचारा तुम्ही ठरविलेल्या भागीदारांपैकी कोणी आहे जो निर्मितीचा प्रारंभसुद्धा करीत असेल आणि मग त्याची पुनरवृत्तीदेखील करीत असेल? सांगा, तो केवळ अल्लाह आहे जो निर्मितीचा प्रारंभही करतो व त्याची पुनरावृत्तीदेखील, मग तुम्ही या कोणत्या उलटया मार्गावर चालविले जात आहात? (३४)

यांना विचारा की तुम्ही ठरविलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करीत आहे? सांगा, तो केवळ अल्लाहच आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करतो. मग सांगा, जो सत्याकडे मार्गदर्शन करतो तो याचा आधिक हक्कदार आहे की त्याचे अनुकरण केले जावे अथवा त्याचे ज्याला स्वत:ला मार्ग सापडत नाही, याशिवाय की त्याला मार्गदर्शन केले जाईल? शेवटी तुम्हाला झाले तरी काय आहे, कसले विपरीत निर्णय घेत आहात? (३५)

वस्तुस्थिती अशी आहे की यांच्यपैकी बहुतेक लोक केवळ अनुमान व कल्पनांच्या पाठीमागे जात आहेत, वास्तविक पाहता कल्पना, सत्याची गरज यत्किंचितही भागवीत नाही, जे काही हे करीत आहेत अल्लाह ते चांगलेच जाणतो. (३६)

आणि हा कुरआन ती वस्तू नव्हे जी अल्लाहच्या दिव्य-प्रकटना व ज्ञानाविना रचली जावी. उलट हा तर जे काही पूर्वीच आलेले आहे त्याचे समर्थन आणि त्या विशिष्ट ग्रंथाचा तपशील आहे. यात काहीच शंका नाही की हा विश्वाच्या अधिपतीकडून आहे. (३७)

हे लोक असे म्हणतात काय की पैगंबरांनी स्वत: हा रचला आहे? सांगा, “जर तुम्ही या आपल्या आरोपात खरे असाल तर एक अध्याय या सारखा रचून आणा, आणि एक अल्लाहला सोडून इतर ज्यांना ज्यांना बोलविणे शक्य असेल त्यांना मदतीला बोलवा.” मुळात असे आहे की जी गोष्ट यांच्या ज्ञानकक्षेत आली नाही आणि ज्याचा शेवटही यांच्यासमोर आला नाही, याला त्यांनी खोटे ठरविले. अशाच प्रकारे यांच्या पूर्वीच्या लोकांनीदेखील खोटे ठरविले आहे, मग पहा त्या अत्याचारींचा शेवट कसा झाला. यांच्यापैकी काहीहण श्रद्धा ठेवतील आणि काहीजण ठेवणार नाहीत, आणि तुझा पालनकर्ता या उपद्रवी लोकांना चांगलेच जाणतो. (३८-४०)

हे तुला जर खोटे ठरवीत असतील तर तू यांचा सांगून टाक की, “माझे कर्म माझ्यासाठी आहेत व तुमचे कर्म तुमच्यासाठी. जे काही मी करतो त्याच्या जबाबदारीतून तुम्ही मुक्त आहात. व जे काही तुम्ही करीत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे.” यांच्यात बरेचसे लोक असे आहेत जे तुझ्या गोष्टी ऐकतात, पण काय तू बहिर्‍यांना ऐकविणार मग ते काहीच का समजत नसतील? यांच्यात बरेचसे लोक आहेत जे तुला पाहतात परंतु काय तू आंधळ्यांना मार्ग दाखवशील जर त्यांना काहीच उमजत नसेल तरी? वस्तुस्थिती आशी आहे की अल्लाह लोकांवर अत्याचार करीत नाही, लोक स्वत:च आपल्यावर अत्याचार करतात, (आज हे ऐहिक जीवनात मस्त आहेत) आणि ज्या दिवशी अल्लाह यांना एकत्र करील तेव्हा (हेच ऐहिक जीवन यांना असे वाटू लागेल) जणू हे केवळ एक घटकाभर आपापसात ओळख करून घेण्यासाठी थांबले होते. (त्या प्रसंगी सत्यता पटेल की) खरोखरी भयंकर तोटयात आले ते लोक ज्यांनी अल्लाहच्या भेटीला खोटे ठरविले आणि मुळीच ते सरळ मार्गावर नव्हते. ज्या वाईट परिणामाचे भय आम्ही यांना दाखवीत आहोत, त्यातील काही अंश तुझ्या जिवंतपणीच आम्ही दाखवावे अथवा त्या अगोदरच तुला उचलून घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत यांना यावयाचे आमच्याकडेच आहे आणि जे काही हे करीत आहेत याला अल्लाह साक्षी आहे. (४१-४६)

प्रत्येक जनसमुदाया (उम्मत) साठी एक प्रेषित आहे मग जेव्हा एखाद्या लोकसमूहाजवळ त्याचा प्रेषित येतो, तेव्हा पूर्ण न्यायानिशी त्यांचा निर्णय लावला जातो आणि त्यांच्यावर तिळमात्र देखील अत्याचार केला जात नाही. (४७)

म्हणतात, जर तुमची ही धमकी खरी असेल तर ती पूर्ण तरी केव्हा होईल? सांगा, “माझ्या अखत्यारीत तर माझी स्वत:ची हानी व लाभ देखील नाही. सर्वकाही अल्लाहच्या इच्छेवर अवलंबून आहे. प्रत्येक लोकामूहाकरिता एक कालावधी आहे. जेव्हा ही मुदत भरून येते तेव्हा क्षणभर देखील ती पुढे मागे होत नाही.” यांना सांगा, कधी तुम्ही याचा विचार तरी केला काय की जर अल्लाहचा प्रकोप अकस्मात रात्री अथवा दिवसा येऊन ठेपला (तर तुम्ही काय करू शकाल?) बरे ही अशी कोणती गोष्ट आहे जिच्याकरिता अपराध्यांनी घाई करावी? ज्या वेळेस तो तुम्हावर कोसळेल तेव्हाच तुम्ही त्याला मानणार काय? आता वाचू इच्छिता? वस्तुत: तुम्ही स्वत:च तो लवकर येण्याकरिता तगादा लावीत होता. मग अत्याचार्‍यांना सांगितले जाईल की आता कायमस्वरूपी प्रकोपाचा आस्वाद घ्या, जे काही तुम्ही कमवीत राहिला आहात त्यासाठी या मोबदल्याशिवाय अन्य कोणता बदला तुम्हाला दिला जाऊ शकतो?” (४८-५२)

मग विचारतात, खरोखरच हे सत्य आहे काय जे तुम्ही सांगत आहात? सांगा, “माझ्या पालनकर्त्यांची शपथ, हे सर्वस्वी सत्य आहे, आणि तुमच्यात इतके सामर्थ्य नाही की प्रकट होण्यापासून त्याला तुम्ही रोखावे.” जर त्या प्रत्येक व्यक्तीजवळ जिने अत्याचार केला आहे, पृथ्वीची संपत्ती जरी असली तरी त्या प्रकोपापासून वाचविण्यासाठी ती सर्व मोबदला म्हणून देण्यास तयार होईल. जेव्हा हे लोक त्या प्रकोपाला पाहतील तेव्हा मनातल्या मनात पश्चात्ताप करतील. परंतु त्यांच्या दरम्यान पूर्ण न्यायानिशी निर्णय लावला जाईल. कसलाही अत्याचार त्यांच्यावर होणार नाही. ऐका, आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे अल्लाहचे आहे. अल्लाहचे वचन सत्य आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. तोच जीवन प्रदान करतो व तोच मृत्यू देतो आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परतावयाचे आहे. (५३-५६)

लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे, हो ती गोष्ट आहे जी अंत:करणात जो विकार आहे त्यावर उपाय आहे आणि जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्याकरिता मार्गदर्शन आणि कृपा आहे. हे पैगंबर (स.)! सांगा की, “ही अल्लाहची कृपा व त्याची मेहेरबानी आहे की ही गोष्ट त्याने पाठविली यावर तर लोकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. हे त्या सर्व नस्तूपेक्षा उत्तम आहे ज्यांना लोक गोळा करीत आहेत.” हे पैगंबर (स.)! यांना सांगा, “तुम्ही लोकांनी कधी याचा विचार तरी केला आहे की जी उपजीविका अल्लाहने तुमच्याकरिता उतरविली होती त्यापैकी तुम्ही स्वत:च कुणाला निषिद्धा व कुणाला वैद्य ठरविले?” यांना विचारा अल्लाहने याची तुम्हाला परवानगी दिली होती? की तुम्ही अल्लाहवर कुभांड रचीत आहात? जे लोक अल्लाहवर हे मिथ्या कुभांड रचीत आहेत त्यांची काय कल्पन्न आहे की पुनरूत्यानाच्या दिवशी यांच्याशी कसा व्यवहार होईल. अल्लाह तर लोकांवर कृपादृष्टी ठेवतो परंतु बहुतेक लोक असे आहेत जे कृतज्ञता दाखवीत नाहीत. (५७-६०)

हे पैगंबर (स.)! तुम्ही ज्या अवस्थेत असता आणि कुरआनमधून जे काही ऐकविता आणि लोकहो! तुम्ही देखील जे काही करता त्या सर्व काळात आम्ही तुम्हाला पाहात असतो. कोणतीही तिळमात्र वस्तू पृथ्वी व आकाशांत अशी नाही न लाहन, न मोठी, जी तुझ्या पालनकर्त्याच्या दृष्टीपासून लपलेली आहे आणि एका स्पष्ट दप्तरात नोंद केलेली नाही. ऐका, जे अल्लाहचे मित्र आहेत, ज्यांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी ईशपरायण वर्तन अंगिकारले, त्यांच्याकरिता कसलेच भय अथवा दु:खाचा प्रसंग नाही, इहलोक व परलोक दोन्ही जीवनांत त्यांच्याकरिता आनंदाच्या वार्ता आहेत, अल्लाहची वचने बदलू शकत नाहीत, हेच मोठे यश आहे, हे पैगंबर (स.)! ज्या गोष्टी हे तुझ्यावर रचतात, त्या तुला  दु:खी करू नयेत, प्रतिष्ठा सर्वस्वी अल्लाहच्या अधिकारात आहे आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो. (६१-६५)

सावधान! आकाशात वास्तव्य करणारे असोत अथवा पृथ्वीवर, सर्वचे सर्व अल्लाहच्या मालकीचे आहेत. आणि जे लोक अल्लाहशिवाय काही (आपले स्वरचित) भागीदारांचा धावा करीत आहेत, ते निव्वळ मिथ्या व भ्रामक कल्पनेचे अनुयायी आहेत, व केवळ कल्पनाविलास करीत आहेत. तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनविली की तिच्यात संतोष प्राप्त करावा, व दिवसाला प्रकाशमान बनविले, यात संकेत आहेत त्या लोकांकरिता जो (उघडया कानांनी पैगंबराचे आवाहन) ऐकतात. (६६-६७)

लोक म्हणतात की, अल्लाहने एखाद्याला पुत्र बनविले आहे. पवित्र आहे अल्लाह! तो तर निस्मृह आहे, आकाशांत व पृथ्वीत जे काही आहे सर्व त्याच्या मालकीचे आहे, तुमच्यापाशी या कथनाचे काय बरे प्रमाण आहे? तुम्ही अल्लाहसंबंधी त्या गोष्टी सांगता काय ज्याचे ज्ञान तुम्हाला नाही? हे पैगंबर (स.)! सांगा, जे लोक अल्लाहवर खोटे कुभांड रचतात ते कदापि सफल होऊ शकत नाहीत. जगातील काही दिवसाच्या जीवनांत मौजमजा करून घ्या, मग आमच्याकडे त्यांना परतावयाचे आहे, मग त्या द्रोहाच्या बदल्यात जे ते करीत आहेत आम्ही त्यांना कठोर यातनेचा आस्वाद चाखवू. (६८-७०)

या लोकांना नूह (अ.) ची कथा ऐकवा, त्या वेळेची कथा जेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले होते की, “हे देशबंधुंनो, जर माझे तुमच्या दरम्यान  राहणे व अल्लाहची वचने ऐकवून ऐकवून तुम्हाला गाफिलपणातून जागे करणे तुम्हाला असह्य झाले आहे तर माझा विश्वास अल्लाहवर आहे, तुम्ही आपल्या मानलेल्या भागीदारांना बरोबर घेऊन एकमुखी निर्णय घ्या आणि जी योजना तुमच्या दृष्टीसमोर असेल तिच्यावर खूप विचारविनिमय करा जेणेकरून तिचा कोणताही पैलू तुमच्या दृष्टीतून सुटू नये, मग ती माझ्याविरूद्ध अंमलात आणा आणि मला मुळीच सवड देऊ नका. तुम्ही माझ्या उपदेशापासून तोंड फिरविले (तर माझे कोणते नुकसान केले?) मी तुमच्यापासून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नव्हतो, माझा मोबदला तर अल्लाहपाशी आहे आणि मला आज्ञा दिली गेली आहेकी (मग कुणी मान्य करो वा न करो) मी स्वत: मुस्लिम (आज्ञाकारी) बनून राहावे.” त्यांनी त्याला खोटे ठरविले आणि परिणाम असा झाला की आम्ही त्याला व त्या लोकांना जे त्याच्याबरोबर नावेत होते वाचविले आणि त्यांनाच भूतलावर उत्तराधिकारी बनविले आणि त्या सर्व लोकांना बुडवून टाकले ज्यांनी आमच्या संकेतांना खोटे ठरविले होते. तर मग पहा ज्यांना सावध केले गेले होते (आणि तरी देखील त्यांनी मान्य केले नाही) त्यांचा कसा शेवट झाला. (७१-७३)

मग नूह (अ.) नंतर आम्ही वेगवेगळ्या पैगंबरांना त्यांच्या लोकसमूहाकडे पाठविले आणि ते त्यांच्याकडे उघड-उघड संकेत घेऊन आले, परंतु ज्या गोष्टीला त्यांनी अगोदर खोटे ठरविले होते त्याला पुन्हा मानले नाही. अशा प्रकारे आम्ही मर्यादेचे उल्लंघन करणार्‍यांना ह्रदयावर मोहर लावतो. (७४)

मग त्याच्यानंतरा आम्ही मूसा (अ.) आणि हाऊन (अ.) यांना आपल्या संकेतांसहित फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे पाठविले परंतु त्यांनी आपल्या मोठेपणाची घमेंड केली आणि ते अपराधी लोक होते. मग जेव्हा आमच्याकडून सत्य त्यांच्यासमोर आले तेव्हा त्यांनी सांगितले की ही तर उघड जादू आहे. मूसा (अ.) ने सांगितले की, “तुम्ही सत्याला असे बोलता जेव्हा ते तुमच्यासमोर आले? ही जादू आहे काय? खरे पाहता जादूगार सफल होत नसतात. त्यांनी उत्तरात सांगितले, “तू याकरिता आला आहेस काय की आम्हाला त्या पद्धतीपासून परावृत्त करावेस ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आणि पृथ्वीवर मोठेपणा तुम्हा दोघांचा चालावा? तुमचे म्हणणे तर आम्ही ऐकणारे नाहीच.” आणि फिरऔन ने (आपल्या माणसांना) सांगितले की, “प्रत्येक कलानिपुण जादूगारास माझ्यासमोर हजर करा.” जेव्हा जादूगार आले तेव्हा मूसा (अ.) नी त्यांना सांगितले, “जे काही तुम्हाला फेकावयाचे आहे फेका.” मग जेव्हा त्यांनी फेकले तेव्हा मूसा (अ.) नी सांगितले, “हे जे काही तुम्ही फेकले आहे ती जादू आहे, अल्लाह आताच यांना रद्दबातल करीत आहे,” उपद्रवी लोकांच्या कामाला अल्लाह सुधारू देत नाही. आणि अल्लाह आपल्या आदेशाने सत्याला सत्य करून दाखवितो मग अपराध्यांना ते कितीही अप्रिय का वाटेना.” (७५-८२)

(मग पहा की) मूसा (अ.) ना त्यांच्या लोकांपैकी काही तरुणांखेरीज कोणीही मानले नाही, फिरऔनच्या भीतीने आणि आपल्या लोकांतील श्रेष्ठजनांच्या भीतीपायी (ज्यांना भय होते की) फिरऔन त्यांना छ्ळ करील. वस्तुस्थिती अशी आहे की फिरऔन भूतलावर वर्चस्व बाळगत होता आणि तो त्या लोकांपैकी होता जे कोणत्याही मर्यादेवर थांबत नाहीत. (८३)

मूसा (अ.) नी आपल्या लोकांना सांगितले की, “लोकहो! तुम्ही खरोखरच अल्लाहवर श्रद्धा ठेवत असाल तर त्याच्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही मुसलमान असाल.” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अल्लाहवरच भिस्त ठेवली. हे आमच्या पालनकर्त्या! अत्याचारी लोकांच्या स्वाधीन करून आमची परीक्षा घेऊ नकोस. आणि आपल्या कृपेने आम्हाला  अश्रद्धावंतांपासून मुक्ती दे.” (८४-८६)

आणि आम्ही मूसा (अ.) आणि त्याच्या बंधूला संकेत दिला की, “मिस्रमध्ये काही घरे आपल्या लोकांकरिता उपलब्ध करा. आणि आपल्या त्या घरांना उपासना-दिशा ठरवा आणि नमाज कायम करा आणि श्रद्धावंतांना खूषखबर द्या. (८७)

मूसा (अ.) ने प्रार्थना केली, “हे आमच्या पालनकर्त्या! तू फिरऔन आणि त्याच्या सरदारांना ऐहिक जीवनात ऐश्वर्य व मालमत्तेने उपकृत केले आहेस, हे पालनकर्त्या, काय हे अशाकरिता आहे की-त्यांनी लोकांना तुझ्य़ा मार्गापासून बहकवावे? हे पालनकर्त्या! यांची संपत्ती नष्ट कर आणि यांच्या ह्रदयांवार अशी मोहर लाव की यांनी श्रद्धा ठेवू नये जोपर्यंत की ते दु:खदायक प्रकोप पाहात नाहीत. सर्वश्रेष्ठ अल्लाहने उत्तरादाखल फर्माविले, “तुम्हा दोघांची प्रार्थना स्वीकारली गेली, दृढ रहा आणि त्या लोकांच्या पद्धतीचे मुळीच अनुकरण करू नका ज्यांना ज्ञान नाही.” (८८-८९)

आणि आम्ही बनीइस्राईलना समुद्रपार नेले, मग फिरऔन व त्याचे सैत्य जुलूम व अत्याचाराच्या हेतूने त्यांच्या मागे निघाले येथपावेतो की जेव्हा फिरऔन बुडू लागला तेव्हा उद्‌गारला, “मी मान्य केले की खरा ईश्वर त्याच्याशिवाय कोणीही नाही ज्यावर बनीइस्त्राईलनी श्रद्धा ठेवली आणि मी देखील आज्ञाधारकांपैकीच आहे.” (उत्तर दिले गेले) “आता श्रद्धा ठेवतोस? एरव्ही या आगोदरपर्यंत तर अवज्ञा करीत राहिलास आणि उपद्रव माजविणार्‍यांपैकी होतास. आता तर आम्ही तुझ्या केवळ प्रेतासच वाचवू जेणेकरून तू नंतरच्या पिढयांकरिता उद्‌बोध-चिन्हा ठरावे. जरी बरीचशी माणसे अशी आहेत जे आमच्या संकेताकडे दुर्लक्ष करीत आहेत. (९०-९२)

आम्ही बनीइस्राईलना फार चांगले ठिकाण दिले व फार उत्तम उपजीविका प्रदान केली मग त्यांनी आपापसात मतभेद केले नाही परंतु त्यावेळी जेव्हा ज्ञान त्यांच्यापर्यंत आले होते, नि:संशय तुझा पालनकर्ता पुनरुत्यानाच्या दिवशी त्यांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निर्णय लावील ज्यामध्ये ते मतभेद करीत राहिले आहेत. (९३)

आता जर तुला या मार्गदर्शनासांबंधी काही देखील शंका असेल जे आम्ही तुझ्यावर अवरतले आहे तर तू त्या लोकांना विचारून घे जे अगोदरपासून ग्रंथ वाचीत आहेत, प्रत्यक्षत तुझ्याजवळ हे सत्यच आले आहे, तुझ्या पालनकर्त्याकडून. म्हणून तू शंका घेणार्‍यांपैकी बनू नकोस. आणि त्या लोकांमध्ये सामील होऊ नकोस ज्यांनी अल्लाहची वचने खोटी ठरविली, अन्यथा तू नुकसान सोसणार्‍यांपैकी होशील. (९४-९५)

वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांवर तुझ्या पालनकर्त्याचे वचन खरे ठरले आहे त्यांच्यासमोर मग कोणते का संकेत येवोत ते कदापि श्रद्धा ठेवणार नाहीत जोपर्यंत दु:खदायक प्रकोप समोर येताना ते पाहणार नाहीत. पण असे एखादे उदाहरण आहे काय की एका वस्तीने प्रकोप पाहून श्रद्धा ठेवली आणि तिची श्रद्धा तिला लाभदायक सिद्ध झाली? युनूस (अ.) च्या लोकांखेरीज (अन्य कोणतेही असे उदाहरण नाही) त्या लोकांनी जेव्हा श्रद्धा ठेवली होती अलबत तेव्हा आम्ही त्यांच्यावरील ऐहिक जीवनात अपमानजनक प्रकोप टाळला होता. आणि त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी दिली होती. (९६-९८)

जर तुझ्य पालनकर्त्याची इच्छा अशी असती (की पृथ्वीतलावर सर्व श्रद्धावंत व आज्ञाधारकच असावेत) तर सर्व भूतलवासीयांनी श्रद्धा ठेवली असती. मग तू लोकांना भाग पाडशील का की ते श्रद्धावंत बनतील? कोणताही जीव अल्लाहच्या आज्ञेविना श्रद्धा ठेवू शकत नाही, आणि अल्लाहचा प्रघात असा आहे की जे लोक बुद्धीचा उपयोग करीत नाहीत, तो त्यांच्यावर मार्गभ्रष्टता टाकून देतो. (९९-१००)

यांना सांगा, “पृथ्वी आणि आकाशांत जे काही आहे ते डोळे उघडून पहा.” आणि जे लोक श्रद्धा ठेवूच इच्छित नाहीत त्यांच्याकरिता संकेत आणि सूचना काय लाभदायक होऊ शकतात? आता हे लोक याशिवाय अन्य कोणत्या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत की तेच वाईट दिवस पहावेत जे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी पाहिले.” मग (जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा) आम्ही आपल्या पैगंबरांना व त्या लोकांना वाचवितो ज्यांनी श्रद्ध ठेवली असेल, आमचा असाच प्रघात आहे. आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही श्रद्धावंतांना वाचवावे. (१०१-१०३)

हे पैगंबर (स.) सांगून टाका की, “लोकहो, जर अद्यापही माझ्या धर्मासंबंधी तुम्ही एखाद्या शंकेत असाल तर ऐकून घ्या की तुम्ही अल्लाहशिवाय ज्यांची भक्ती करता मी त्यांची भक्ती करीत नाही तर केवळ त्याच ईश्वराची भक्ती करतो ज्याच्या अधिकारात तुमचा मृत्यू आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी श्रद्धावंतांपैकी व्हावे. आणि मला फर्माविले गेले आहे की एकाग्र बनून आपल्या स्वत:ला ठीक ठीक या धर्मावर कायम करावे आणि कदापि देखील अनेकेश्वरवादीपैकी असू नये. आणि अल्लाहला सोडून अशा कोणत्याही अस्तित्वाचा धावा करून नकोस जो तुला फायदाही पोहचवू शकत नाही आणि नुकसानही नाही. जर तू असे करशील तर अत्याचार्‍यांपैकी बनशील. जर अल्लाहने तुला एखाद्या संकटात घातले तर स्वत: त्याच्याशिवाय इतर कोणी नाही जो संकट निवारण करील. आणि जर त्याने तुझ्यासाठी एखाद्या कल्याणाचा इरादा केला तर त्याच्या कृपेला रद्द करणारा देखील कोणी नाही. तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपेने उपकृत करतो, आणि तो क्षमा करणारा व दया करणारा आहे.” (१०४-१०७)

हे मुहम्मद (स.) सांगून टाका की, “लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य आलेले आहे. आता जो सरळ मार्ग अनुसरील त्याचे सद्‌वर्तन त्याच्यासाठीच हिताचे होय आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे. आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही.” आणि हे पैगंबर (स.) तुम्ही मार्गदर्शनाचे अनुसरण करीत रहा जे तुमच्याकडे दिव्य प्रकटन (वह्य) द्वारे पाठविले जात आहे, आणि संयम राखा इथपावेतो की अल्लाह निर्णय करील आणि तोच सर्वोत्तम निर्णय लावणारा आहे. (१०८-१०९)

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP