मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌फुरकान

सूरह - अल्‌फुरकान

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ७७)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अत्यंत समृद्धशाली आहे तो ज्याने हा फूरकान (निकष) आपल्या दासांवर अवतरला जेणेकरून सर्व जगवासियांसाठी खबरदार करणारा ठरावा. तो जो पृथ्वी व आकाशांचा स्वामी आहे ज्याने कोणाला पुत्र बनविलेले नाही, साम्राज्यामध्ये ज्याच्याबरोबर कोणीही भागीदार नाही, ज्याने प्रत्येक वस्तू निर्माण केली, मग तिचे एक मोजमाप (तकदीर) निश्चित केले. लोकांनी त्याला सोडून असले उपास्य बनविले जे कोणत्याही वस्तूची निर्मिती करीत नाहीत तर जे स्वत: निर्मिले जातात. जे खुद्द आपल्यासाठीसुद्धा कोणत्याही नफा व नुकसानीचा अधिकार बाळगत नाहीत. जे मारू शकत नाहीत, चैतन्य देऊ शकत नाहीत आणि मृतांना पुन्हा उत्थापितही करू शकत नाहीत. (१-३)

ज्या लोकांनी पैगंबरांची गोष्ट मान्य करण्यास नकार दिलेला आहे ते सांगतात की, ‘हा कुरआन’ एक स्वरचित गोष्ट आहे जी या व्यक्तीने स्वत:च रचली आहे आणि अन्य काही लोकांनी या कामात याला मदत केली आहे.” मोठा अत्याचार आणि अतिशय खोटेपणा आहे ज्यावर हे लोक उठले आहेत. म्हणतात, “या जुन्या लोकांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत ज्या हा माणूस उद्‌धृत करवितो. आणि त्या याला सकाळ-संध्याकाळ ऐकविल्या जात असतात.” हे पैगंबर (स.) यांना सांगा, “याला अवतरले आहे त्याने, जो पृथ्वी व आकाशांचे रहस्य जाणतो.” वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंत क्षमाशील, दयावान आहे. (४-६)

ते म्हणतात, “कसा हा प्रेषित आहे जो अन्न खातो आणि बाजारात हिंडतो फिरतो? याच्याजवळ एखाडा दूत का पाठविला गेला नाही जो याच्यासोबत राहिला असता व (नकार देणार्‍यांना) त्याने धमकावले असते? अथवा याच्यासाठी एखादा खजिनाच उतरविला गेला असता अथवा ज्याच्यापाशी एखादी बागच असती जिच्यापासून (समाधानाची) याने उपजीविका प्राप्त केली असती? आणि हे अत्याचारी म्हणतात, “तुम्ही लोक तर एका जादू केल्या गेलेल्या माणसाच्या नादी लागला आहांत.” पहा. कशा कशा हुज्जती हे लोक तुमच्यासमोर घालीत आहेत. असे बहकले आहेत की कोणतीही उचित गोष्ट यांना उमजत नाही. अत्यंत समृद्ध आहे तो, ज्याने इच्छिले तर त्यांनी सुवविलेल्या वस्तुंपेक्षाही वरचढ तो तुम्हाला देऊ शकतो. (एक नव्हे) अनेक उद्याने, ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, आणि मोठमोठाले महाल. (७-१०)

मुळात गोष्ट अशी आहे की या लोकांनी त्या घटकेला खोटे मानले आहे. आणि जो त्या घटकेला खोटे ठरवील त्याच्यासाठी आम्ही भडकलेली आग उपलब्ध करून ठेवली आहे. ती जेव्हा दुरून यांना पाहील तेव्हा हे तिच्या क्रोधाचे व आवेशाचे आवाज ऐकून घेतील. आणि जेव्हा हे हाता-पायांनी बंदिस्त तिच्यात एका अरुंद जागेत घुसडले जातील तेव्हा आपल्या मृत्यूला पुकारू लागतील. (तेव्हा त्यांना सांगितले जाईल) आज एका मृत्यूला नव्हे तर अनेक मृत्यूंना पुकारा. (११-१४)

यांना विचारा, हा शेवट चांगला आहे की तो शाश्चत स्वर्ग ज्याचे वचन ईशपरायण पापभीरूंशी केले गेले आहे? जे त्यांच्या कृतींचा मोबदला व त्यांच्या सफरीची शेवटची मजल असेल, ज्यात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, ज्यात ते सदासर्वदा राहतील, जी प्रदान करणे तुमच्या पालनकर्त्याकडून एक पूर्ततायोग्य वचन आहे. (१५-१६)

आणि तोच दिवस असेल जेव्हा (तुमचा पालनकर्ता) या लोकांनादेखील घेऊन आणील आणि यांच्या त्या आराध्य दैवतांनासुद्धा बोलावून घेईल अल्लाहला सोडून ज्यांना. आज हे पूजत आहेत, मग तो त्यांना विचारील. “काय तुम्ही माझ्या या दासांना मार्गभ्रष्ट केले होते? अथवा हे स्वत:च सरळ मार्गापासून भटकले होते?” ते सांगतील, “हे अल्लाह, पवित्र आहेस तू! आमची तर हीदेखील हिंमत नव्हती की तुझ्याशिवाय इतर कोणास आमचा वाली बनवावे. परंतु तू यांना व यांच्या वाडवडिलांना भरपूर जीवन-सामग्री दिली येथपावेतो की हे पाठ फिरवून गेले आणि अरिष्टपीडित होऊन राहिले,” असे खोटे ठरवतील ते (तुमचे दैवत) तुमच्या त्या गोष्टी ज्या आज तुम्ही बोलत आहात, मग तुम्ही आपल्यावरील अरिष्ट टाळू शकणार नाही की तुम्ही कोठून मदतही मिळवू शकणार नाही. आणि तुमच्यापैकी जो कोणी अत्याचार करील त्याला आम्ही कठोर प्रकोपाची चव चाखवू. (१७-१९)

हे पैगंबर (स.), तुमच्यापूर्वी जे कोणतेही पैगंबर आम्ही पाठविले होते, ते सर्वही अन्न खाणारे आणि बाजारात हिंडणारे, फिरणारे लोकच होते. वस्तुत: आम्ही तुम्हा लोकांना एक दुसर्‍यासाठी परीक्षेचे माध्यम बनविलेले आहे, काय तुम्ही सहनशीलता बाळगता? तुमचा पालनकर्ता सर्वकाही पाहतो. (२०)

जे लोक आमच्या पुढे हजर होण्याची शक्यता बाळगत नाहीत ते म्हणतात, “आमच्यापाशी दूत का पाठविले जात नाहीत? मग आम्ही आमच्या पालनकर्त्याला पाहू.” मोठा अहंकार बाळगला आहे यांनी आपल्या मनात, आणि सीमा ओलांडली यांनी आपल्या दुराचारात. ज्या दिवशी हे दूतांना पाहतील तो गुन्हेगारांसाठी काही शुभ दिवस नसेल. किंचाळून उठतील की परमेश्वराचा आश्रय असो, आणि जे काही यांनी केले सवरले आहे ते घेऊन आम्ही धुळीसारखे उडवून देऊ. बस्स, तेच लोक जे स्वर्गाला पात्र आहेत त्या दिवशी चांगल्या जागा मिळवतील आणि दुपार घालविण्यासाठी चांगली जागा मिळवतील. आकाशाला कापीत एक ढग त्या दिवशी प्रकट होईल आणि दूतांचे थवेच्या थवे उतरविले जातील. त्या दिवशी खरी बादशाही केवळ कृपावंताचीच असेल आणि तो इन्कार करणार्‍यांसाठी अत्यंत कठोर दिवस असेल. अत्याचारी मनुष्य आपल्या हाताचा चावा घेईल आणि खेदाने म्हणेल, “मी पैगंबरांना साथ दिली असती! माझे दुर्दैव! मी अमूक इसमाला मित्र बनविले नसते! त्याच्या बहकविण्यामुळे मी तो उपदेश मानला नाही जो माझ्याकडे आला होता, शैतान माणसासाठी मोठा घातकी ठरला.” आणि पैगंबर म्हणेल की, “हे माझ्या पालनकर्त्या, माझ्या लोकांनी या कुरआनला थट्टेचे लक्ष्य बनविले होते.” (२१-३०)

हे पैगंबर (स.), आम्ही तर अशाच प्रकारे गुन्हेगारांना प्रत्येक पैगंबराचे शत्रू बनविले आहे. आणि तुमच्यासाठी तुमचा पालनकर्ता मार्गदर्शनासाठी व सहाय्यासाठी पुरेसा आहे. (३१)

इन्कार करणारे म्हणतात, “या इसमावर संपूर्ण कुरआन एकाच वेळी का अवतरला गेला नाही?”- होय, असे यासाठी केले गेले आहे की याला चांगल्या प्रकारे आम्ही तुमच्या मनात बिंबवीत आहोत. आणि (याच हेतूने) आम्ही याला एका विशिष्ट क्रमाने वेगवेगळ्या विभागांचे रूप दिले आहे. आणि (यात हा गर्भित उद्देशही आहे) की जेव्हाकधी ते तुमच्यासमोर एखादी निराळी गोष्ट (अथवा चमत्कारिक प्रश्न) घेऊन आले त्याचे योग्य उत्तर वेळीच आम्ही तुम्हाला देऊन टाकले आणि उत्तम प्रकारे गोष्टीची उकल केली.-जे लोक तोंडघशी नरकाकडे लोटले जाणार आहेत त्यांची भूमिका अत्यंत वाईट आहे आणि त्याचा मार्ग परकोटीचा चुकीचा आहे. (३२-३४)

आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ दिला आणि त्याच्याबरोबर त्याचा भाऊ हारून (अ.) ला मदतीला दिले. आणि त्यांना सांगितले की जा, त्या लोकसमूहाकडे ज्याने आमच्या वचनांना खोटे ठरविले आहे. सरतेशेवटी त्या लोकांना आम्ही नष्ट करून सोडले. हीच स्थिती नूह (अ.) च्या लोकासमूहाची झाली, जेव्हा त्यांनी पैगंबरांना खोटे ठरविले, आम्ही त्यांना बुडवून टाकले आणि जगभरातील लोकांसाठी एकधडा देणारे संकेत बनविले, आणि या अत्याचार्‍यांसाठी आम्ही एक वेदनादायक प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. अशाप्रकारे आद व समूद आणि असहाबुर्रस्स आणि दरम्यानच्या शतकातील बरेच लोक नष्ट केले गेले, त्यांच्यापैकी प्रत्येकाला आम्ही (अगोदर नष्ट होणार्‍यांची) उदाहरणे देऊन देऊन समजाविले आणि सरतेशेवटी प्रत्येकाला गारद करून टाकले. आणि त्या वस्तीवरून तर हे लोक गेलेच आहेत ज्यावर अत्यंत वाईट वृष्टी केली गेली होती. यांनी तिची स्थिती पाहिलि नसेल काय? परंतु हे मृत्यूनंतर दुसर्‍या जीवनाची अपेक्षाच करीत नाहीत. (३५-४०)

हे लोक जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुमची कुचेष्टा करतात, (म्हणतात) “हाच का तो ज्याला अल्लाहने पैगंबर बनवून पाठविले आहे? याने तर आम्हाला पथभ्रष्टा करून आमच्या उपास्यांपासून परङमुखच केले असते जर आम्ही त्यांच्यावरील श्रद्धेवर ठाम  राहिलो नसतो.” ती घटका दूर नाही जेव्हा प्रकोप पाहून यांना खुद्द कळून येईल की कोण पथभ्रष्टतेत दूर भरकटला गेला होता. (४१-४२)

कधी तुम्ही त्या माणसाच्या स्थितीचा विचार केला आहे काय ज्याने आपल्या मनोवासनेला आपला देव बनविला आहे? तुम्ही अशा माणसाला सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी घेऊन शकता काय? तुम्हाला असे वाटते की यापैकी बहुतेक लोक ऐकतात व समजतात? हे तर पशुप्रमाणे आहेत किंबहुना त्यांच्याहूनही पुढे निघालेले. (४३-४४)

तुम्ही पाहिले नाही की तुमचा पालनकर्ता कशाप्रकारे सावली पसरवितो? जर त्याने इच्छिले असते तर तिला त्याने कायमस्वरूपी सावली बनविले असते. आम्ही सूर्याला त्यावर पुरावा बनविले. मग (जसजसा सूर्य वर येत जातो) आम्ही त्या सावलीला हळूहळू आमच्याकडे आवळीत जातो. (४५-४६)

आणि तो अल्लाहच आहे ज्याने रात्रीला तुमच्यासाठी पोशाख, आणि झोपेला मृत्यू-शांती, आणि दिवसाला जिवंत होण्याची घटका बनविले. (४७)

आणि तोच आहे जो आपल्या कृपेच्या पुढेपुडे वार्‍यांना शुभवार्ता बनवून पाठवितो, मग आकाशांतून स्वच्छ पाणी उतरवितो जेणेकरून त्याद्वारे एका मृत भूभागाला जीवनदान द्यावे. आणि आपल्या निर्मितीपैकी अनेक जनावरे व मानवांना तृप्त करावे. हा चमत्कार आम्ही वरचेवर त्यांच्यासमोर आणतो जेणेकरून त्यांनी काही बोध घ्यावा, परंतु बहुतेक लोक इन्कार व कृतघ्नतोशिवाय अन्य कोणतेही वर्तन अंगिकारण्यास नकार देतात. (४८-५०)

जर आम्ही इच्छिले असते तर एक एक वस्तीत एक एक सावध करणारा उभा केला असता. तर हे पैगंबर (स.), अश्रद्धावंतांचे म्हणणे मुळीच ऐकू नका आणि या कुरआननिशी त्यांच्याबरोबर जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा करा. (५१-५२)

आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना मिळवून ठेवले आहे. एक चवदार व गड आणि दुसरे कडू व खारे, आणि दोघांच्या दरम्यान एक पडदा आड आहे, एक अडवणूक आहे ज्याने त्यांना सरमिसळ होण्यापासून रोखले आहे. आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून मनुष्य निर्माण केला, मग त्याच्यापासून वंश व सासरच्या दोन वेगळ्य़ा शृंखला चालविल्या. तुझा पालनकर्ता मोठाच सामर्थ्यवान आहे. (५३-५४)

त्या उपास्याला सोडून लोक अशांची उपासना करीत आहेत जे त्यांचा फायदाही करू शकत नाहीत व हानीही नाही. आणि याउपर अधिक असे की अश्रद्धावंत, आपल्या पालनकर्त्याच्या विरोधात प्रत्येक बंडखोराचा सहायक बनलेला आहे. (५५)

हे पैगंबर (स.), तुम्हाला तर आम्ही केवळ एक खुशखबर देणारा व सावध करणारा बनवून पाठविले आहे. यांना सांगा, “मी या कामासाठी तुमच्याकडून काही मोबदला मागत नाही. माझा मोबदला केवळ हाच आहे की ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाचा अवलंब करावा.” (५६-५७)

हे पैगंबर (स.), त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जो जिवंत आहे आणि कधीही मरणार नाही, त्याच्या स्तुतीसमवेत त्याचे पावित्रगान करा. आपल्या दासांच्या अपराधापासून केवळ त्याचेच माहितगार असणे पुरेसे आहे. तोच ज्याने सहा दिवसात पृथ्वी व आकाश आणि त्या सर्व वस्तू निर्माण केल्या ज्या पृथ्वी आणि आकाशांच्या दरम्यान आहेत, मग स्वत:च अर्श (ईश-आसना) वर विराजमान झाला-कृपावंत त्याची शान बस्स कुणा जाणकारालाच विचारा. (५८-५९)

या लोकांना जेव्हा सांगितले जाते की त्या कृपावंताला सजदा करा (नतमस्तक व्हा), तर सांगतात, “कृपावंत काय असतो? तू ज्याला सांगशील त्याला आम्ही सजदा करीत राहावे का?” हे आवाहन त्यांच्या तिरस्कारात उलट आणखी भर टाकते. (६०)

फार समृद्ध आहे तो ज्याने आकाशांत बुरूज उभारले आणि त्यात एक दिवा व एक चमकणारा चंद्र प्रकाशित केला. तोच आहे ज्याने रात्र व दिवसाला एकमेकाचा उत्तराधिकारी बनविले त्या प्रत्येक मानवासाठी जो बोध घेऊ इच्छितो अथवा कृतज्ञ होऊ इच्छितो. (६१-६२)

कृपावंताचे (अस्सल) दास ते आहेत जे जमिनीवर नम्रपणे चालतात आणि अडाणी त्यांच्या तोंडी लागले तर म्हणतात की तुम्हाला सलाम. ते आपल्या पालनकर्त्याच्या ठायी नतमस्तक होण्यात अहोरात्र उभे राहतात. जे प्रार्थना करीत असतात की, “हे आमच्या पालनकर्त्या, नरकाच्या यातनांपासून आम्हाला वाचव, त्याच्या यातना तर जीवघेण्या आहेत, ते तर फारच वाईट निवास व ठिकाण आहे.” जो खर्च करतात तो न फाजील खर्च करतात, न कंजुषपणा, त्यांचा खर्च दोन्ही टोकांच्या दरम्यान संतुलनावर आधारित असतो. ते अल्लाहशिवाय इतर कोणत्याही उपास्याचा धावा करीत नाहीत, अल्लाहने निषिद्ध ठरविलेल्या कोणत्याही जिवाला हकनाक ठार करीत नाहीत आणि व्यभिचारही करीत नाहीत, हे कृत्य जो कोणी करील तो आपल्या गुन्ह्याचे फळ भोगील, पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला सतत यातना दिली जाईल आणि त्यातच तो सदैव अपमानित पडून राहील. याशिवाय की एकाद्याने (या अपराधानंतर) पश्चात्ताप केलेला असेल आणि श्रद्धा ठेवून तो सत्कृत्ये करू लागला असेल. अशा लोकांच्या वाईट गोष्टींना अल्लाह भल्या गोष्टींनी बदलून टाकील, आणि तो अत्यंत क्षमाशील, दयावान आहे, जो मनुष्य पश्चात्ताप करून सदाचारांचा अवलंब करतो तो तर अल्लाहकडे परत येतो जसा की खर्‍या अर्थाने परतावयास इवे. (आणि कृपावंताचे दास ते आहेत) जे असत्याचे साक्षी बनत नाहीत आणि एखाद्या वायफळ गोष्टीजवळून गेल्यस ते सज्जनाप्रमाणे निघून जातात. ज्यांना त्यांच्या पालनकर्त्याचे संकेत ऐकवून जर उपदेश केला गेला तर ते त्यावर आंधळे व बहिरे बनून राहात नाहीत. जे प्रार्थना करीत असतात, “हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला आमच्या पत्नीं व संततीपासून नेत्रसुख प्रदान कर आणि आम्हाला पापभीरूंचा नेता (मार्गदर्शक) बनव.”- हे आहेत ते लोक जे आपल्या संयमाचे फळ उत्तुंग मजल्यांच्या रूपाने प्राप्त करतील. शुभचिंतन व सलामाने त्यांचे स्वागत होईल. ते सदासर्वदा तेथे राहतील. किती छान आहे ते निवास व ते ठिकाण! हे पैगंबर (स.), लोकांना सांगा, “माझ्या पालनकर्त्याला तुमची काय गरज पडली आहे जर तुम्ही त्याचा धावा करीत नसाल. आता ज्याअर्थी तुम्ही खोटे लेखलेच आहे, लवकरच ती शिक्षा भोगाल की जीव वाचविणे कठीण होईल.” (६३-७७)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP