मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
बनीइस्राईल

सूरह - बनीइस्राईल

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने १११)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत
व असीम कृपावंत आहे.

पवित्र आहे तो जो घेऊन गेला एका रात्री आपल्या भक्ताला मस्जिदेहराम (काबा मस्जिद) पासून दूरच्या त्या मस्जिदपर्यंत जिच्या वातावरणाला त्याने समृद्धी दिली आहे जेणेकरून त्याला आपल्या काही संकेतांचे निरीक्षण घडवावे. वास्तविकपणे तोच आहे सर्वकाही ऐकणारा व पाहणारा. आम्ही यापूर्वी मूसा (अ.) ला ग्रंथ दिला होता आणि त्याला बनी इस्राईलसाठी मार्गदर्शनाचे साधन बनविले होते या आदेशासह की माझ्याशिवाय कोणालाही आपला वकील बनवू नये. तुम्ही त्या लोकांचे वंशज आहात ज्यांना आम्ही नूह (अ.) सह नावेवर स्वार केले होते आणि नूह (अ.) एक कृतज्ञ दास होता. मग आम्ही आपल्या ग्रंथात बनीइस्राईलना या गोष्टीवरसुद्धा सावधान केले होते की तुम्ही पृथ्वीवर दोन वेळा मोठे उपद्रव माजवाल आणि मोठी शिरजोरी दाखवाल. सरतेशेवटी जेव्हा त्यापैकी पहिल्या शिरजोरीची वेळ आली. तेव्हा हे बनी इस्राईल! आम्ही तुमच्या विरोधात आमचे असे दास उभे केले जे फार सामर्थ्यवान होते आणि ते तुमच्या देशात सर्वत्र पसरले, हे एक वचन होते जे फार सामर्थ्यवान होते आणि ते तुमच्या देशात सर्वत्र परसरले. हे एक वचन होते जे साकार होणारच होते. त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी दिली आणि तुम्हाला संपत्ती आणि संततीद्वारे मदत केली आणि तुमची संख्या पहिल्यापेक्षा वाढविली.

पहा! तुम्हीद भलाई केली तर ती तुमच्या स्वत:साठीच भलाई होती आणि वाईट केले तर ते तुमच्या स्वत:साठी वाईट सिद्ध झाले. मग जेव्हा दुसर्‍या वचनाची वेळ आली तेव्हा काही दुसर्‍या शत्रुंना तुमच्यावर लादले जेणेकरून त्यांनी तुमचे चेहरे विद्रुप करावेत आणि मसजिद (बैतुलमकूदिस) मध्ये तसेच शिरावे जसे पहिले शत्रू शिरले होते आणि ज्या वस्तूवर त्यांचे हात पडतील तिला नष्ट करून टाकावे. शक्य आहे की आता तुमचा पालनकर्ता तुमच्यावर दया दाखवील, परंतु जर तुम्ही पुन्हा आपल्या जुन्या चालीची पुनरावृत्ती केली तर आम्हीदेखील पुन्हा आपल्या शिक्षेची पुनरावृत्ती करू आणि देणगीला लपविणार्‍यांसाठी नरकात तुरुंग बनवून ठेवले आहे. (१-८)

वस्तुस्थिती अशी आहे की हा कुरआन तो मार्ग दाखवितो जो अगदी सरळ आहे, जे लोक याला मान्य करून भली कृत्ये करू लागतील त्यांना हा शुभवार्ता देतो की त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे. आणि जे लोक मरणोत्तर जीवनाला मानत नसतील त्यांना ही वार्ता देतो की त्यांच्यासाठी आम्ही दु:खदायक शिक्षा तयार ठेवली आहे. (९-१०)

मनुष्य अरिष्ट असे मागतो जसे भले मागितले पाहिजे. मनुष्य फारच उतावीळ ठरला आहे. (११)

पहा, आम्ही रात्र आणि दिवस असे दोन संकेत बनविले आहेत. रात्रीचा संकेत आम्ही प्रकाशहीन बनविला, आणि दिवसाच्या संकेताला प्रकाशमान केले जेणेकरून तुम्ही आपल्या पालनकर्त्याची कृपा शोधावी आणि महिना व वर्षाचा हिशेब माहीत करून घ्यावा. अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गोष्टीचे पृथ:करण केले आहे. (१२)

प्रत्येक माणसाचा शकून आम्ही त्याच्या स्वत:च्या गळ्यात लटकविलेला आहे. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी आम्ही एक लेख त्याच्यासाठी काढू जो त्याला उघड पुस्तकाप्रमाणे आढळल. वाच, आपल्या कृत्यांची नोंद, आज स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस. (१३-१४)

जो कोणी सरळ मार्गाचा अवलंब करील त्याचे सरळ मार्गावर चालणे त्याच्या स्वत:साठीच लाभदायक आहे. आणि जो पथभ्रष्ट होईल त्याच्या पथभ्रष्टतेचा दुष्परिणाम त्याच्यावरच होणार आहे. एखादा ओझे उचलणारा दुसर्‍याचे ओझे उचलणार नाही. आणि आम्ही शिक्षा देणार नाही जोपर्यंत की (लोकांना सत्य-असत्याचा फरक समजाविण्यासाठी) आम्ही एक पैगंबर पाठवीत नाही. जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीला नष्ट करण्याचा इरादा करतो तेव्हा तिच्या सुखवस्तू लोकांन हुकूमं देतो आणि ते तिच्यात अवज्ञा करू लागतात. तेव्हा प्रकोपाचा निर्णय त्या वस्तीवर लागू होतो आणि आम्ही तिला उद्‌ध्वस्त करून टाकतो. पाहून घ्या, कित्येक अशा पिढया आहेत ज्या नूह (अ.) नंतर आमच्या आज्ञेने नष्ट झाल्या. तुझा पालनकर्ता आपल्या दासांच्या पापांची पुरेपूर खबर राखणारा आहे आणि सर्वकाही पाहात आहे. (१५-१७)

जो कोणी (या जगात) झटपट लाभाचा इच्छुक असेल त्याला जे द्यायचे ते आम्ही येथेच देऊन टाकतो. मग त्यांच्या नशीबी नरक लिहितो. ज्यात तो होरपळेल निर्भर्त्सित आणि कृपेला वंचित होऊन, आणि जो मरणोत्तर जीवनाचा इच्छुक असेल व त्यासाठी प्रयत्न करील जसे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि तो श्रद्धावंत असेल तर अशा प्रत्येक माणसाच्या प्रत्यत्नांची कदर केली जाईल.

यांनाही व त्यांनाही  उभयपक्षांना आम्ही (जगात) जीवनसामग्री देत आहोत, ही तुझ्या पालनकर्त्याची देणगी आहे आणि तुझ्या पालनकर्त्याच्या देणगीला प्रतिबंध करणारा कोणीही नाही. परंतु पहा, जगातच आम्ही एका गटाला दुसर्‍यावर कसे श्रेष्ठत्व दिलेले आहे. आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्याचे दर्जे आणखी जास्त होतील आणि त्याची प्रतिष्ठा आणखी वरचढ असेल. (१८-२१)

तू अल्लाहबरोबर कोणी दुसरा ईश्वर बनवू नकोस नाहीतर धिक्कारलेला व अगतिक बनून राहशील.(२२)

तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही भक्ती करू नये परंतु केवळ त्याची. आई-वडिलांशी सद्‌वर्तन करा, जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ‘ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला, आणि नरमी व दयार्द्रतेने त्यांच्यासमोर नमून रहा. आणि प्रार्थना करीत जा की, “हे पालनकर्त्या, यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे यांनी दया व वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले.” तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्या मनात काय आहे. जर तुम्ही सदाचारी बनून रहाल तर तो अशा सर्व लोकांना क्षमा करणारा आहे जे आपल्या अपराधासंबंधी सावध होऊन भक्तीच्या वर्तनाकडे परततील. नातेवाईकाला त्याचा ह्क्क द्या आणि गरीब व वाटसरूला त्याचा ह्क्क. वायफळ खर्च करू नका. वायफळ खर्च करणारे शैतानचे बंधू होत, आणि शैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.

जर त्यांच्यापैकी (अर्थात गरजू नातेवाईक, गरीब व वाटसरूंपैकी कोणास) तुम्हाला टाळावयाचे असेल या सबबीवर की अद्याप तुम्ही अल्लाहच्या त्या कृपेला जिचे तुम्ही उमेदवार आहात, शोधत आहात तर त्यांना सौम्य उत्तर द्या. आपला हात गळ्यात अडकवू नका आणि त्याला एकदम मोकळेदेखील सोडू नका की तुम्ही निर्भर्स्तित व लाचार बनून राहावे. तुझा पालनकर्ता ज्याच्यासाठी इच्छितो, विपूल उपजीविका करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग करतो, तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर ठेवणारा आहे आणि त्यांना पहात आहे. आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ आणि तुम्हालासुद्धा. वस्तुत: त्यांना ठार करणे एक मोठा अपराध आहे. व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. कोणाचीही हत्या करू नका जिला अललाहने निषिद्ध ठरविले आहे, परंतु सत्यानिशी आणि जी व्यकी अन्यायाने ठार केली गेली असेल तिच्या वारसास आम्ही किसास (बदला) च्या मागणीचा हक्क दिला आहे. म्हणून त्याने हत्या करण्यात मर्यादा ओलांडू नये त्याला मदत दिली जाईल. अनाथाच्या संपत्तीजवळ फिरकू नका परंतु उत्तम रीतीने, येथपावेतो की तो आपल्या तारुण्यापर्यंत पोहचेल. वचनाचे पालन करा. नि:संशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल. मापाने द्याल तेव्हा पूर्ण भरून द्या आणि वजन कराल तेव्हा ठीक तराजूने वजन करा.

ही चांगली पद्धत आहे आणि परिणामाच्या दृष्टीनेदेखील हीच उत्तम आहे. एखाद्या अशा गोष्टीमागे लागू नका जिचे तुम्हाला ज्ञान नसेल. निश्चितच डोळे. कान व ह्रदय या सर्वांच्याकडे जाब विचारला जाईल. पृथ्वीवर घमेंडीत चालू नका. तुम्ही पृथ्वीला फाडूही शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला गाठू शकत नाही. (२३-३७)

या गोष्टीपैकी प्रत्येकाचा वाईट पैलू तुझ्या पालनकर्त्याजवळ अप्रिय आहे. या त्या विवेकाच्या गोष्टी आहेत ज्यांना तुझ्या पालनकर्त्याने तुझ्यावर दिव्यप्रकटन केले आहे. (३८)

आणि पहा! अल्लाहबरोबर कोणी दुसर्‍याला ईश्वर बनवू नकोस नाहीतर तू नरकात घातला जाशील, धिक्कारलेला आणि प्रत्येक चांगुलपणापासून वंचित होऊन, किती चमत्कारिक बाब आहे की तुमच्या पालनकर्त्याने तर तुम्हाला पुत्रसंततीने उपकृत केले आणि आपल्या स्वत:साठी दूतांना मुली बनविल्या? मोठी असत्य गोष्ट आहे जी तुम्ही लोक उच्चारता. (३९-४०)

आम्ही या कुरआनात वेगवेगळ्या प्रकारे लोकांना समजाविले की शुद्धीवर या, परंतु ते सत्यापासून अधिकच दूर पळून जात आहेत. हे, पैगंबर (स.), यांना सांगा जर अल्लाहबरोबर दुसरेदेखील उपास्य असते जसे हे लोक म्हणतात, तर राजसिंहासनाच्या स्वामीच्या स्थानावर पोहचण्याचा त्यांनी जरून प्रयत्न केला असता. पवित्र आहे तो आणि फार उच्च व श्रेष्ठ आहे त्या गोष्टीपासून, ज्या हे लोक सांगत आहेत. त्याचे पावित्र्य तर सप्त आकाश.

आणि पृथ्वी व त्या सर्व वस्तू वर्णन करीत आहेत ज्या आकाश व पृथ्वीत आहेत. कोणतीही वस्तू अशी नाही जी त्याच्या स्तुतीबरोबर त्याचे पावित्र्य-गान करीत नाही, परंतु तुम्हाला त्यांचे पावित्र्य-गान समजत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्याधिक सहिष्णू व क्षमा करणारा आहे. (४१-४४)

जेव्हा तुम्ही कुरआन पठण करता तेव्हा आम्ही तुमच्या आणि मरणोत्तर जीवनावर श्रद्धा न ठेवणार्‍यांदरम्यान एक पडदा उभा करतो, आणि त्यांच्या ह्रदयावर असे अवरण घालतो की त्यांना काही समजत नाही, आणि त्यांचे श्रवणेंद्रिय बधिर करतो. आणि जेव्हा तुम्ही कुरआनमध्ये आपल्या एकमेव पालनकर्त्याचा उल्लेख करता तेव्हा ते तिरस्काराने तोंड फिरवितात. आम्हाला माहीत आहे की जेव्हा ते कान लावून तुमच्या गोष्टी ऐकतात तर खरोखर काय ऐकतात. आणि जेव्हा बसून आपापसात कान गोष्टी करतात तेव्हा काय म्हणतात. हे अत्याचाही आपापसात म्हणतात की हा तर एक जादूग्रस्त मनुष्य आहे ज्याच्या पाठीमागे तुम्ही लोक जात आहात. पहा! कशा गोष्टी आहेत ज्या हे लोक तुमच्यावर रचतात, हे भटकलेले आहेत. यांना मार्ग सापडत नाही. (४५-४८)

ते म्हणतात, “जेव्हा आम्ही केवळ हाडे आणि माती बनून राहू तेव्हा काय आमचे पुनर्निर्माण व पुनरुत्थान केले जाईल?” यांना सांगा, “तुम्ही दगड अथवा लोखंड जरी झालात, अथवा त्याहूनसुद्धा कठीण एखादी वस्तू जी तुमच्या मनात जीवधारणेपासून दूर असेल.” (तरीसुद्धा तुम्ही पुनरुत्थानापासून वाचणार नाही).

ते जरूर विचारतील, “कोण आहे तो जो आम्हाला पुन्हा जीवन देईल?” उत्तरादाखल सांगा, “तोच, ज्याने तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले.” ते डोके हलवून हलवून विचारतील. “बरे तर हे घडणार केव्हा?” तुम्ही सांगा, “काय आश्चर्य की ती घटका जवळच येऊन ठेपली असेल. ज्या दिवशी तो तुम्हाला पुकारील तर तुम्ही त्याची स्तुती करीत त्याच्या हाकेला ओ म्हणून निघून याल आणि तुमची कल्पना त्यावेळी अशी असेल की आम्ही तर केवळ थोडयाच वेळेपर्यंत या स्थितीत पडून राहिलो आहोत. (४९-५२)

आणि हे पैगंबर (स.), माझ्या दासांना (म्हणजे श्रद्धावंत दासांना) सांगा की मुखाने ती गोष्ट काढत जा, जी उत्तम असेल. खरे पाहता हा शैतान आहे जो माणसांच्या दरम्यान उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. वस्तुस्थिती अशी आहे की शैतान मानवाचा उघड शत्रू आहे. तुमचा पालनकर्ता तुमच्या स्थितीशी चांगलाच परिचित आहे, त्याने इच्छिले तर तुमच्यावर दया करावी अथवा इच्छिले तर तुम्हाला यातना द्यावी. आणि हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला लोकांवर हवालदार करून पाठविलेले नाही. (५३-५४)

तुझा पालनकर्ता पृथ्वी व आकाशातील सृजनांना अधिक जाणतो. आम्ही काही पैगंबरांना काहीपेक्षा वरचढ दर्जे दिले. आणि आम्हीच दाऊद (अ.) ला ‘जबूर’ (ग्रंथ) दिला होता, (५५)

यांना सांगा, “अल्लाह व्यतिरिक्त ज्यांचा तुम्ही धावा करता ते कोणताही त्रास तुमच्यापासून दूरही करू शकत नाहीत अथवा बदलूदेखील शकत नाहीत. ज्यांचा धावा हे लोक करतात ते तर स्वत:च आपल्या पालनकर्त्याच्या ठायी पोहचण्यासाठी वशिला शोधत आहेत की कोण त्यांच्या अधिक जवळचा होतो आणि ते त्याच्या कृपेचे इच्छुक आणि त्याच्या प्रकोपापासून भयभीत आहेत.

वस्तुस्थिती अशी आहे की तुझ्या पालनकर्त्याचा प्रकोप आहेच भीती धरण्यालायक. (५६-५७)

आणि कोणतीही वस्ती अशी नाही जिला आम्ही पुनरुत्थानापूर्वी नष्ट करणार नाही अथवा भयंकर यातना देणार नाही. हे ईश्वरी लेखात नमूद केलेले आहे. (५८)

आणि आम्हाला संकेत पाठविण्यास प्रतिबंध केला नाही, परंतु या गोष्टीने की यांच्यापूर्वीच्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले आहे. (म्हणून पहा) समूद लोकांना आम्ही जाहिररीत्या सांडणी आणून दिली आणि त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. आम्ही संकेत याचसाठी पाठवीत असतो की लोकांनी ते पाहून भयभीत व्हावे. स्मरण करा हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला सांगून टाकले होते की तुझ्या पालनकर्त्याने या लोकांना वेढून टाकले आहे. आणि हे जे काही आम्ही तुम्हाला आता दाखविले आहे याला आणि त्या झाडाला ज्याला कुरआनमध्ये धिक्कारले गेले आहे, आम्ही या लोकांसाठी केवळ एक उपद्रव बनवून ठेवले आहे. आम्ही ज्यांना इशार्‍यावर इशारा देत राहिलो आहोत, परंतु प्रत्येक इशारा त्यांच्या शिरजोरीत वाढ करीत राहिला आहे. (५९-६०)

आणि स्मरण कर जेव्हा आणि दूतांना सांगितले की, आदमपुढे नतमस्तक व्हा तेव्हा सर्व नतमस्तक झाले पण इब्लीस (शैतान) नतमस्तक झाला नाही. त्याने सांगितले, “काय मी त्याच्यापुढे नतमस्तक होऊ ज्याला तू मातीने बनविले आहेस? मग तो म्हणाला, “पहा तर खरे, काय हा माझ्यावर श्रेष्ठत्व प्रदान करण्यायोग्य होता? जर तू मला पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत सवड दिलीस तर मी याच्या संपूर्ण वंशाचे समूळ उच्चाटन करून टाकीन, केवळ थोडेच लोक माझ्यापासून वाचतील.” सर्वश्रेष्ठ अल्लाहने फर्माविले, “बरे तर जा, यांच्यापैकी जे कोणी तुझे अनुकरण करतील.

तुझ्यासह त्या सर्वांसाठी नरकातच भरपूर मोबदला आहे. तू ज्याला ज्याला आपल्या आमंत्रणाने फूस लावू शकतो, लाव. त्यांच्यावर आपले स्वार व प्यादे चालून आण, संपत्ती आणि संततीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर आणि त्यांना आश्वासनाच्या जाळ्यात अडकव आणि शैतानाचे आश्वासन एका फसवणुकीशिवाय काहीही नाही, नि:संशय माझ्या दासांवर तुला कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही आणि भिस्त ठेवण्यासाठी तुझा पालनकर्ता पुरेसा आहे.” (६१-६५)

तुमचा (खरा) पालनकर्ता तर तो आहे, जो समुद्रात तुमची नौका वल्हवितो जेणेकरून तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. वस्तुस्थिती अशी आहे की तो तुमच्या स्थितीवर अत्यंत मेहरबान आहे. जेव्हा समुद्रात तुमच्यावर संकट येते, तेव्हा त्या एकाशिवाय अन्य ज्यांचा तुम्ही धावा करीत असता ते सर्व हरवलेले असतात. परंतु जेव्हा तो तुम्हाला वाचवून खुष्कीवर पोहचवितो तेव्हा तुम्ही त्याच्यापासून विमुख होता. मनुष्य खरोखरच मोठा कृतघ्न आहे. बरे तर काय तुम्ही या गोष्टीपासून अगदीच निर्भय आहांत की अल्लाहने तुम्हाला एखादे वेळी खुष्कीवरच जमिनीत खचवावे किंवा तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे वादळ पाठवावे आणि त्यापासून तुम्हाला वाचविणारा कोणीही संरक्षक सापडू नये? आणि काय तुम्हाला याची भीती नाही की अल्लाहने पुन्हा एखादेवेळी तुम्हाला समुद्रात न्यावे आणि तुमच्या कृतघ्नतेबद्दल भयंकर वादळी वारा पाठवून तुम्हाला बुडवून टाकावे आणि तुमच्या या दुर्दशेची खबरबात विचारणारा कोणीच सापडू नये, ही तर आमची मेहरबानी आहे.

की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुष्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मल पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्‍याचशा निर्मितीवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले. मग विचार करा त्या दिवसाचा जेव्हा आम्ही प्रत्येक मानवगटाला त्याच्या नेत्यासह बोलवू त्यावेळी ज्या लोकांना त्यांचा कृति-लेख उजव्या हातात दिला गेला ते आपली कार्यनोंद वाचतील आणि त्यांच्यावर तिळमात्रदेखील अन्याय होणार नाही. आणि जो या जगात अंध बनून राहिला तो परलोकातसुद्धा नेत्रहीनच राहील, किंबहुना मार्गप्राप्तीत नेत्रहीनाहूनदेखील अधिक अपयशी. (६६-७२)

हे पैगंबर (स.), या लोकांनी या प्रयत्नांत कोणतीही उणीव राहू दिली नाही की तुम्हाला उपद्रवात टाकून त्या दिव्य प्रकटनापासून परावृत करावे, जो आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे. जेणेकरून तुम्हीज आमच्या नावाने स्वत:कडून एखादी गोष्ट रचावी. जर तुम्ही असे केले असते तर त्यांनी जरूर तुम्हाला आपले मित्र बनविले असते. आणि तर आम्ही तुम्हाला दृढ ठेवले नसते तर तुम्ही त्यांच्याकडे काही ना काही अंशी झुकला असता. परंतु जर तुम्ही असे केले असते तर आम्ही तुम्हाला जगातसुद्धा दुहेरी यातना चाखावयास लावली असती आणि परलोकातसुद्धा दुहेरी यातना, मग आमच्याविरूद्ध तुम्हाला कोणीच सहायक मिळाला नसता. (७३-७५)

आणि हे लोक या गोष्टीलासुद्धा तप्तर राहिलेले आहेत की तुमचे पाय या भूमीवरून उखडून टाकावेत व  तुम्हाला येथून बाहेर घालवून द्यावे, परंतु हे जर असे करतील तर तुमच्यानंतर हे स्वत: येथे काही जास्त काळ टिकू शकणार नाहीत. (७६)

हा आमचा कायमचा शिरस्ता आहे, जो त्या सर्व पैगंबरांसंबंधी आम्ही अवलंबिला आहे, ज्यांना तुमच्यापूर्वी आम्ही पाठविले होते आणि आमच्या शिरस्त्यात तुम्हाला कोणताही बदल आढळणार नाही. (७७)

नमाज कायम करा मध्यान्हीनंतर ते रात्रीच्या अंधारापर्यंत. आणि प्रात:कालीन कुरआन (पठण) देखील आवश्यक करा. कारण प्रात:कालीन कुरआन साक्षात असतो. मध्यरात्री ‘तहज्जूद’ (विशिष्ट नमाज) पठण करा, ही तुम्हासाठी ‘नफ्ल’ (अतिरिक्त) देणगी आहे. जेणेकरून तुमच्या पालनकर्त्याने तुम्हास स्तुत्यस्थानावर आरूढ करावे. (७८-७९)

आणि प्रार्थना करा, “हे पालनकर्त्या, मला जेथे कोठे तू नेशील सत्यानिशी ने आणि जेथून काढावयाचे असेल, सत्यानिशी काढ आणि आपल्याकडून एका सत्ताधिकारास माझे सहायक बनव. (८०)

आणि घोषणा कर की, “सत्य आले आणि असत्य नष्ट झाले असत्य तर नष्ट होणारच आहे.” (८१)

आम्ही या कुरआनच्या अवतरणक्रमात ते काही उतरवित आहोत जे त्याच्या अनुयायांसाठी तर रोगनिवारक आणि कृपा आहे, परंतु अत्याचार्‍यांकरिता हानीव्यतिरिक्त अन्य कोणत्याच गोष्टीत वाढ करीत नाही. मानवाची अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा त्याला देणगी प्रदान करतो तेव्हा तो ऐटीत येतो व पाठ दाखवतो आणि जेव्हा जरा संकटात सापडतो तेव्हा निराश होऊ लागतो. हे पैगंबर (स.) या लोकांना सांगा की, “प्रत्येक आपल्या पद्धतीने काम करीत आहे, आता तुमचा पालनकर्ताच हे उत्तम जणतो की सरळ मार्गावर कोण आहे.” (८२-८४)

हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात, सांगा, “हा आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना अल्पज्ञान मिळाले आहे.”

आणि हे पैगंबर (स.), आम्ही इच्छिले तर ते सर्वकाही तुमच्याकडून हिरावून घेऊ, जे आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनाद्वारे प्रदान केले आहे. मग आमच्याविरूद्ध तुम्हाला कोणी समर्थक मिळणार नाही, जो ते परत मिळवून देऊ शकेल. हे तर जे काही तुम्हाला प्राप्त झाले आहे तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने मिळाले आहे, वस्तुस्थिती अशी आहे की त्याची कृपा तुम्हावर फार मोठी आहे. सांगून टाका की मानव आणि जिन (अदृश्य निर्मिती) सर्वच्या सर्वजाणांनी मिळून जरी या कुरआनसारखी एखादी वस्तू आणण्य़ाचा प्रयत्न केला तरी आणू शकणार नाही, मग ते सर्व एक दुसर्‍याचे सहायक का असेनात. (८५-८८)

आम्ही या कुरआनात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने समजाविले पण बहुतेक लोक नकार देण्यावरच दृढ राहिले. आणि त्यांनी सांगितले, “आम्ही तुझे म्हणणे मान्य करणार नाही, जोपर्यंत तू आमच्यासाठी जमीन चिरून एक झरा प्रवाहित करीत नाहीस. अथवा तुझ्यासाठी खजूर व द्राक्षांची एक बाग निर्माण व्हावी आणि तू त्यात कालवे प्रवाहित कारावेस. अथवा तू आकाशाचे तुकडे-तुकडे करून आमच्यावर कोसळवावेस जसा की तुझा दावा आहे. अथवा अल्लाह आणि दूतांना आमच्या समक्ष समोरासमोर आणावे. अथवा तुझ्यासाठी सोन्याचे एक घर बनवावे. अथवा तू आकाशावर चढून जावे आणि तुझ्या चढण्यावरदेखांल आम्ही विश्वास करणार नाही, जोपर्यंत तू आमच्यावर एक असा.

लेख उतरवून आणत नाहीस ज्यास आम्ही वाचावे.” हे पैगंबर (स.), यांना सांगा, “पवित्र आहे माझा पालनकर्ता काय एक संदेश आणणार्‍या मानवाशिवाय मी अन्य काही आहे?” (८९-९३)

लोकांसमोर जेव्हा कधी मार्गदर्शन आले तेव्हा त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीने रोखले नाही परंतु त्यांच्या याच वचनाने की, “काय अल्लाहने मानवाला पैगंबर बनवून पाठविले?” यांना सांगा, जर भूतलावर ईशदूत समाधानाने वावरू लागले असते, तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या ईशदूतालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठविले असते. (९४-९५)

हे पैगंबर (स.), यांना सांगून टाका की माझ्या व तुमच्या दरम्यान केवळ एक अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणारा आहे. आणि सर्व काही पहात आहे. (९६)

ज्याला अल्लाहने बोधित केले तोच मार्गदर्शन मिळविणारा आहे, आणि ज्याला तो मार्गभ्रष्ट करील त्याच्याशिवाय अशा लोकांसाठी  तुला कोणीच समर्थक व सहायक मिळू शकत नाही. या लोकांना आम्ही पुनरुत्थानाच्या दिवशी तोंडघशी फरफटत आणू. आंधळे, मुके आणि बहिरे, यांचे ठिकाण नरक आहे, जेव्हा जेव्हा तिची आग मंद पडू लागेल आम्ही तिला आणखीन प्रदिप्त करू. हा बदला आहे त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटले, “आम्ही जेव्हा केवळ हाडे व माती बनून जाऊ तेव्हा नव्याने आम्हाला निर्माण करून उभे केले लाईल काय?” काय त्यांना हे उमगले नाही की ज्या अल्लाहने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो या सारख्यांना निर्माण करण्याचे सामर्थ्य अवश्य राखतो?.

त्याने यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचे येणे नि:संशय आहे, पण अत्याचार्‍यांचा हट्ट आहे की ते त्याचा इन्कारच करतील. हे पैगंबर (स.), यांना सांगा, “जर एखादे वेळी माझ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीने त्यांना जरूर रोखून ठेवले असते, खरोखरच मनुष्य मोठा संकुचित मनाचा आहे. (९७-१००)

आम्ही मूसा (अ.) ला नऊ संकेतचिन्हे प्रदान केली होती, ती स्पष्टपणे दिसत होती. आता तुम्ही स्वत: बनी इस्राईलना हे विचारा की जेव्हा मूसा (अ.) त्यांच्याकडे आले तेव्हा फिरऔनने हेच सांगितले होते ना की, “हे मूसा (अ.) मी समजतो की तू जरूर एक जादूपीडित आहेस.” मूसा (अ.) ने त्याच्या उत्तरादाखल सांगितले, “तुला चांगलेच माहीत आहे की, हे दृष्टी वृद्धींगत करणारे संकेत जमीन व आकाशाच्या पालनकर्त्याशिवाय कोणीही उतरविलेले नाहीत, आणि माझी कल्पना अशी आहे की हे फिरऔन तू जरूर एक शापित मनुष्य आहेस.” सरतेशेवटी फिरऔनने बेत केला की मूसा (अ.) आणि बनीइस्राईलचे पृथ्वीवरून उच्चाटन करून टाकावे परंतु आम्ही त्याला व त्याच्या सोबत्यांना एकत्रितपणे बुडवून टाकले. आणि त्यानंतर बनीइस्राईलना सांगितेले की आता तुम्ही धरतीवर रहा, मग जेव्हा मरणोत्तर जीवनाच्या वचनाच्या पूर्ततेची वेळ येऊन ठेपेल तर आम्ही तुम्हा सर्वांना एकत्र आणून हजर करू. (१०१-१०४)

या कुरआनला आम्ही सत्यानिशी उतरविले आहे आणि सत्यानिशीच हा अवतरला आहे आणि हे पैगंबर (स.)! तुम्हाला आम्ही याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामारिता पाठविले नाही की (जो मान्य करील त्याला) शुभवार्ता द्या आणि (जो मान्य करणार नाही त्याला) ताकीद द्या. आणि या कुरआनला आम्ही थोडे थोडे करून उतरविले आहे जेणेकरून तुम्ही थांबून थांबून सावकाशपणे ते लोकांना ऐकवावे. आणि याला आम्ही (वेळोवेळी) क्रमश: उरतविले आहे. हे पैगंबर (स.)! या लोकांना सांगा, तुम्ही याला माना अथवा मानू नका.

ज्या लोकांना यापूर्वी ज्ञान दिले गेले आहे त्यांना जेव्हा हा ऐकविला जातो तेव्हा ते साष्टांग नतमस्तक होतात, आणि म्हणतात, “पवित्र आहे आमचा पालनकर्ता त्याचे वचन तर पूर्ण होणारच होते.” आणि ते रुदन करत साष्टांग घालतात आणि याला ऐकून त्यांची विनम्रता आणखी वृद्धिंगत होते. (१०५-१०९)

हे पैगंबर (स.)! यांना सांगा, “अल्लाह म्हणून  साद घाला अथवा कृपावंत म्हणून, ज्या नावानेदेखील तुम्ही साद घालाल त्याच्याकरिता सर्व चांगलीच नावे आहेत.” आणि आपली नमाज फार मोठया आवाजानेही अदा करू नका न फार खालच्या आवाजात, या दोहो दरम्यान मध्यम स्वरूपाच्या स्वराचा अवलंब करा. आणि म्हणा, स्तुती आहे त्या अल्लाहसाठी ज्याने कुणाला स्वत:चा पुत्रही बनविले नाही व कोणी त्याच्या साम्राज्यात त्याचा भागीदार नाही आणि तो लाचारही नाही की एखादा त्याचा पाठीराखा असावा. आणि त्याचा महिमा वर्णन करा. कमाल दर्जाचा महिमा. (११०-१११)

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP