मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
इब्राहीम

सूरह - इब्राहीम

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ५२)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

अलिफ, लाऽऽम, रा, हे मुहम्मद (स,), हा एक ग्रंथ आहे जो आम्ही तुम्हावर अवतरित केला आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना अंधाराच्या गतेंतून काढून.

दिव्य प्रकाशाकडे आणावे, त्यांच्या पालनकर्त्याच्या इच्छेने जो जबरदस्त आणि स्वयंभू स्तुतीस पात्र आहे. अल्लाह असमंतातील व पृथ्वीरील सर्व चराचरांचा स्वामी आहे. (१)

आणि अत्यंत कठोर शिक्षा आहे सत्य स्वीकारण्यास नकार देणार्‍याकरिता जे ऐहिक जीवनाला पारलौकिक जीवनावर प्राधान्य देतात, जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखत आहेत आणि इच्छितात की हा मार्ग (त्यांच्या इच्छेनुसार) वक्र व्हावा. हे लोक पथभ्रष्टतेत फार दूर गेलेले आहेत. (२-३)

आम्ही आपला संदेश देण्यासाठी जेव्हा कधी एखादा प्रेषित पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे. मग अल्लाह ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो, तो प्रभुत्वसंपन्न व बुद्धिमान आहे. (४)

आम्ही यापूर्वी मूसा (अ.) ला देखील आपल्या संकेतांसहीत पाठविले आहे. त्यालाही आम्ही आज्ञा दिली होती की आपल्या लोकांना अंध:कारातून प्रकाशात आण. आणि त्यांना अल्लाहच्या ऐतिहासिक बोधप्रद घटना ऐकवून उपदेश दे. या घटनांमध्ये मोठे संकेत आहेत त्या प्रत्येक माणसासाठी जो संयम बाळगणारा व कृतज्ञ होणारा असेल. (५)

स्मरण करा जेव्हा मूसा (अ.) ने आपल्या लोकांना सांगितले, “अल्लाहच्या त्या उपकाराचे स्मरण ठेवा जे त्याने तुम्हावर केलेले आहे. त्याने तुम्हाला फिरऔन समर्थकांपासून सोडविले जे तुम्हाला कठोर यातना देत होते, ते तुमच्या मुलांची हत्या करीत असत. आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवीत असत. यात तुमच्या पालनकर्त्याकडून तुमची मोठी परीक्षा होंती. आणि स्मरण ठेवा, तुमच्या पालनकर्त्याने सावध केले होते की जर कृतज्ञ बनाल तर मी तुम्हाला आणखी जास्त उपकृत करीन आणि जर कृतघ्नता दर्शवाल तर माझी शिक्षा फारच कठोर आहे.” आणि मूसा (अ.) ने सांगितले, “जर तुम्ही द्रोह केला आणि सर्व पृथ्वीवासी देखील द्रोही झाले तरी (देखील) अल्लाह निरपेक्ष आणि आपल्या अस्तित्वात स्वयंभू स्तुतीपात्र आहे.” (६-८)

तुम्हां पर्यंत त्या जनसमूहांच्या हकीगती पोहचल्या नाहीत काय जे तुम्हीपूर्वी होऊन गेले आहेत? नूह (अ.) चे लोक, आद, समूद आणि त्यांच्यानंतर येणारे कित्येक जनसमूह ज्यांची संख्या केवळ अल्लाहलाच माहीत आहे? त्यांचे पैगंबर जेव्हा त्यांच्यापाशी स्पष्ट गोष्टी व उघड उघड निशाण्या घेऊन आले तेव्हा त्यांनी आपल्या तोंडात हात दाबले आणि सांगितले की, “ज्या संदेशानिशी तुम्ही पाठविला गेला आहात, आम्ही तो मानत नाही आणि ज्या गोष्टीचे तुम्ही आम्हाला आमंत्रण देता त्यासंबंधी आम्ही अत्यंत संभ्रमात आहोत.” त्यांच्या पैगंबरांनी सांगितले, “काय अल्लाहच्या बाबतीत शंका आहे जो आकाशांचा व पृथ्वीचा निर्माता आहे? तो तुम्हाला आवाहन करीत आहे की तुमचे अपराध माफ करावेत व तुम्हाला एका निश्चित कालावधीपर्यंत मोकळीक द्यावी.” त्यांनी उत्तर दिले. “तुम्ही आमच्या सारखेच माणसं आहात; त्यापेक्षा वेगळे काही नाही.
तुम्ही आम्हाला त्या विभूतीच्या भक्तीपासून रोखू इच्छिता ज्यांची भक्ती पूर्वजांपासून होत आली आहे. बरे, तर आणा एखादे सुस्पष्ट प्रमाण.” त्यांच्या पैगंबरांनी त्यांना सांगितले, “खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्याचसारखे मानव. परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला उपकृत करतो, आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादे प्रमाण आणून द्यावे. प्रमाण तर अल्लाहच्याच आज्ञेने येऊ शकते आणि अल्लाहवरच श्रद्धावंतांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि आम्ही अल्लाहवर का विश्वास ठेऊ नये ज्याने आमच्या जीवनमार्गात मार्गदर्शन केले आहे? ज्या यातना तुम्ही लोक आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळगू आणि विश्वास ठेवणार्‍यांचा विश्वास अल्लाहवरच असला पाहिजे.” (९-१२)

सरतेशेवटी इन्कार करणार्‍यांनी आपल्या पैगंबरांना सांगून टाकले की, “एक तर तुम्हाला आमच्या संप्रदायात परत यावे लागेल अन्यथा आम्ही तुम्हाला आपल्या देशांतून हुसकावून देऊ.” तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्याकडे दिव्य प्रकटन केले, “आम्ही या अत्याचार्‍यांना नष्ट करून टाकू. आणि त्यांच्यानंतर तुमचे भूतलावर पुनर्वसन करू. हे इनाम आहे त्याच्यासाठी जो माझ्या ठायी उत्तरदायी होण्याचे भय बाळागतो आणि माझ्या इशार्‍याला भितो.” त्यांना निर्णय हवा होता (तर असा त्यांचा निकाल लागला) आणि सत्याचा प्रत्येक उन्मत शत्रू तोंडघशी पडला. यानंतर त्यांच्यासाठी नरक आहे. येथे त्याला रक्त पू सारखे द्रव पिण्यास दिले जातील, ज्याला तो जबरदस्तीने घशाखाली उतरविण्याचा प्रयत्न करील आणि मोठया कष्टाने उतरवू शकेल. मृत्यू त्याच्यावर सर्व बाजूंनी आच्छादित राहील परंतु तो मरू शकणार नाही व पुढे एक कठोर यातना त्याच्या जिवाशी लागून राहील. (१३-१७)

ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी द्रोह केला आहे, त्यांच्या कृत्याचे उदाहरण त्या राखेप्रमाणे आहे जिला एका वादळी दिवसाच्या वावटळीने, उडविले असावे. त्यांनी केलेल्या कृत्यांचे त्यांना काहीही फळ मिळू शकणार नाही, हेच परकोटीचे हरविणे होय. तुम्ही पाहत नाही काय अल्लाहने आकाश व पृथ्वीची निर्मिती सत्याधिष्ठित केली आहे? त्याने इच्छिले तर तो तुम्हा लोकांना घेऊन जाईल आणि तुमच्या जागी नवनिर्मिती करील. असे करणे त्याच्यासाठी काहीच कठीण नाही. (१८-२०)

आणि हे लोक जेव्हा एकाचवेळी अल्लाहसमोर उघडे पडतील तर त्यावेळी त्यांच्यापैकी जे दुनियेत निर्बल होते ते बलवानांना सांगतील, “दुनियेत आम्ही तुमच्या आज्ञेत होतो, आताही तुम्ही अल्लाहच्या प्रकोपापासून आम्हाला वाचविण्यासाठी काही करू शकता काय?” ते उत्तर देतील. “जर अल्लाहने आम्हाला मुक्तीचा एखादा मार्ग दाखविला असता तर आम्हीदेखील जरूर तुम्हाला दाखविला असता. आक्रोश करणे किंवा धैर्य दाखवणे सर्वकाही सारखेच आहे, कोणत्याही परिस्थितीत आमच्या वाचण्याचा मार्ग नाही.” (२१)

आणि जेव्हा निकाल दिला जाईल तेव्हा शैतान म्हणेल, “खरे असे आहे की अल्लाहने तुम्हाला जी वचने दिली होती ती सर्व खरी होती आणि मी जितकी वचने दिली त्यापैकी कोणतेही पूर्ण केले नाही. माझा तुमच्यावर काही जोर तर नव्हता. मी याशिवाय काहीच केले नाही की आपल्या मार्गकडे तुम्हाला आमंत्रित केले व तुम्ही माझ्या हाकेला ओ दिली. आता माझी निर्भर्त्सना करू नका, आपल्या स्वत:चीच निर्भर्त्सना करा. येथे तर न मी तुमची दाद लावू शकतो व न तुम्ही माझी, पापूर्वी जो तुम्ही मला देवत्वात भागीदार बनविले होते. मी त्या जबाबदारीतून मुक्त आहे, अशा अत्याचार्‍यांसाठी तर दु:खदायक शिक्षा निश्चित आहे.” (२२)

याउलट ज्या लोकांनी जगात श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सदाचरण केले आहे, ते अशा बागेत दाखल केले जातील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. तेथे ते आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने सदैव राहतील. आणि तेथे त्यांचे स्वागत सलामतीच्या अभिनंदनाने होईल. तुम्ही पाहत नाही काय की अल्लाहने ‘पवित्र वचना’ ला कशाची उपमा दिली आहे? त्याची उपमा अशी आहे जणू एका चांगल्या जातीचा वृक्ष ज्याचे मूळ जमिनीत खोलवर रुजले आहे आणि फांद्या आकाशाला भिडल्या आहेत, प्रत्येक क्षणी ते आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने फळे देत आहे, ही उदाहरणे अल्लाह याकरिता देत आहे की लोकांनी यापासून बोध घ्यावा. आणि दुर्वचनाची उपमा एका हलक्या प्रतीच्या झाडासारखी आहे जे जमिनीच्या पृष्ठावरून उपटून फेकले जाते, त्यांच्यासाठी कसलीच दृढता नाही. श्रद्धावंतांना अल्लाह एका दृढ वचनाच्या आधारावर इहलोक व परलोक दोहोंमध्ये ‘स्थैर्य प्रदान करतो आणि अत्याचार्‍यांना अल्लाह पथभ्रष्ट करतो, अल्लाहला अधिकार आहे जे हवे ते करतो. (२३-२७)

तुम्ही पाहिले त्या लोकांना ज्यांना अल्लाहची देणगी लाभली आणि तिला त्यांनी कृतघ्नतेने बदलून टाकले (आणि आपल्या सोबत) आपल्या लोक समूहाला सुद्धा विनाशाच्या खाईत झोकून दिले अर्थात नरक ज्यात ते होरपळले जातील आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे. आणि अल्लाहच्या काही समकक्ष (दावेदारांनी) तजवीज केले आहे की, त्यांना अल्लाहच्या मार्गापासून पथभ्रष्ट करावे. यांना सांगा, बरे तर, मौज करा, सरतेशेवटी तुम्हाला परत नरकातच जावयाचे आहे. (२८-३०)

हे पैगंबर (स.), माझ्या ज्या दासांनी श्रद्धा ठेवली आहे त्यांना सांगा की नमाज कायम करावी आणि जे काही आम्ही त्यांना दिले आहे त्याच्यातून जाहीर आणि गुप्तपणे (सन्मार्गात) खर्च करावे तो दिवस येण्यापूर्वी ज्यात खरेदी-विक्रीही होणार नाही आणि मित्रत्वाचा व्यवहारही होणार नाही. (३१)

अल्लाह तोच तर आहे ज्याने पृथ्वी व आकाशांना निर्माण केले आणि आकाशातून जल वर्षाव केला मग त्याच्याद्वारे तुम्हाला उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारची फळे निर्माण केली. ज्याने नावेला तुमच्यासाठी अंकीत केले की समुद्रात त्याच्या आज्ञेने चालावे आणि नद्यांना तुमच्यासाठी वशीभूत केले. ज्याने सूर्य आणि चंद्राला तुमच्यासाठी वशीभूत केले की सतत ते वाटचाल करीत आहेत आणि रात्र आणि दिवसाला तुमच्यासाठी वशीभूत केले. त्याने ते सर्वकाही दिले जे तुम्ही मागितले, जर तुम्ही अल्लाहच्या देणगीची गणना करू पहाल तर करू शकणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य मोठाच अन्यायी आणि कृतघ्न आहे. (३२-३४)

आठवा ती वेळ जेव्हा इब्राहीम (अ.) ने प्रार्थना केली होती, “हे पालनकर्ता! या नगराला (मक्क्याला) शांतीचे नगर बनव आणि मला व माझ्या संततीला मूर्तीपूजेपासून वाचव. हे पालनकर्ता! या मूर्तीनी बहुतेकांना पथभ्रष्टतेत टाकले आहे (संभव आहे की माझ्या संततीलादेखील त्या पथभ्रष्ट करतील, म्हणून त्यांच्यापैकी) जो माझ्या पद्धतीवर चालेल तो माझा आहे आणि जो माझ्याविरूद्ध पद्धत स्वीकारील तर निश्चितच तू माफ करणारा मेहरबान आहेस. हे पालनकर्ता! मी एका निर्जल व ओसाड खोर्‍यात आपल्या संततीपैकी काहींना तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे, हे पानलकर्ता! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी, म्हणून तू लोकांच्या ह्रदयांना यांच्याकडे आकर्षित कर व यांना खावयास फळे दे, कदाचित हे कृतज्ञ होतील. पालनकर्ता! तू जाणतोस जे काही आम्ही लपवितो आणि जे काही प्रकट करतो.” आणि खरोखरच अल्लाहपासून काहीही लपलेले नाही, जमिनीतही नाही आणि आकाशातही नाही. “धन्यवाद त्या ईश्वराला ज्याने मला या वार्धक्यात इस्माईल (अ.) आणि इसहाक (अ.) सारखी मुले दिली, वस्तुस्थिती अशी आहे की माझा पालनकर्ता खचितच प्रार्थना ऐकतो. हे पालनकर्ता खचितच प्रार्थना ऐकतो. हे पालनकर्त्या! मला नमाज कायम करणारा बनव व माझ्या संततीपासूनदेखील (असे लोक उभे कर जे हे काम करतील) पालनकर्त्या! माझी प्रार्थना स्वीकार कर, हे पालनकर्त्या! मला आणि माझ्या आई-वडिलांना आणि सर्व श्रद्धावंतांना त्या दिवशी माफ कर जेव्हा हिशेब प्रस्थापित होईल.” (३५-४१)

आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील, डोळे वर लावून पळत सुटले असतील. नजरा वर खिळलेल्या आणि ह्रदये उडली सात असतील. हे पैगंबर (स.), त्या दिवसाचे यांना भय दाखवा जेव्हा प्रकोप यांना येऊन गाठील. त्यावेळी हे अत्याचारी सांगतील, “हे आमच्या पालनकर्ता! आम्हाला आणखी थोडी सवलत दे, आम्ही तुझ्या आवाहनास होकार देऊ आणि पैगंबरांचे अनुकरण करू.” (पण यांना स्पष्ट उत्तर दिले जाईल की) “तुम्ही तेच लोक नाहीत काय जे यापूर्वी शपथा घेऊन घेऊन सांगा होते की आमचा तर कधी र्‍हास होणारच नाही? वास्तविकत: तुम्ही त्या लोकांच्या वस्तीत वास्तव्य करून चुकला होता ज्यांनी स्वत:च आपल्यावर अत्याचार केला होता आणि पाहिले होते की आम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला आणि त्यांची उदाहरणे देऊन तुम्हाला आम्ही समजाविलेदेखील होते. त्यांनी आपली सर्व कटकारस्थाने करून पाहिली पण त्यांच्या प्रत्येक कारस्थानाला अल्लाहपाशी उत्तर होते त्यांची कारस्थाने इतकी भयंकर होती की पर्वतही मागे सरावेत” तर हे पैगंबर (स.), तुम्ही कदापि असा समज करून घेऊ नका की अल्लाह कधी आपल्या पैगंबरांना दिलेल्या वचनांच्याविरूद्ध वागेल. अल्लाह महान आहे आणि शिक्षांही करणारा आहे. सावध करा यांना त्या दिवसापासून जेव्हा पृथ्वी व आकाशाचे मूळ रूप बदलले जाईल, आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्लाहसमोर उघडे पडून हजर होतील. त्या दिवशी तुम्ही अपराध्यांना पाहाल की साखळदंडाने हातपाय जखडलेले असतील, वितळलेल्या सिशाचा पोषाख केलेला असेल आणि आगीच्या ज्वाला त्यांच्या चेहर्‍यावर आच्छादल्या जात असतील. हे अशासाठी घडेल की अल्लाहने प्रत्येक जीवाला त्याने केलेल्या कृत्यांचा बदला द्यावा. अल्लाहला हिशेब घेण्यास काही वेळ लागत नाही. (४२-५१)

हा एक संदेश आहे सर्व मानवांसाठी आणि हा पाठविला गेला आहे यासाठी की त्यांना याच्याद्वारे सावध केले जावे आणि त्यांनी जाणावे की वस्तुत: ईश्वर केवळ एकच आहे आणि जे बुद्धिमान आहेत त्यांनी (यावर) चिंतन करावे. (५२)

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP