मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
याऽसीऽऽन

सूरह - याऽसीऽऽन

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ८३)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

याऽसीऽऽन. शपथ आहे प्रबुद्ध कुरआनची की तुम्ही नि:संशय प्रेषितांपैकी आहात. सरळ मार्गावर आहात. (आणि हे कुरआनची की तुम्ही नि:संशय प्रेषितांपैकी आहात. सरळ मार्गावर आहात. (आणि हे कुरआन) प्रभुत्वशाली आणि दयावान अस्तित्वाकडून अवतरित आहे जेणेकरून तुम्ही सावध करावे अशा जनसमुदायाला ज्याचे पूर्वज सावध केले गेले नव्हते व या कारणाने ते गाफील पडलेले आहेत. (१-६)

यांच्यापैकी बहुतेक लोक शिक्षेस पात्र ठरले आहेत, याच कारणास्तव ते श्रद्धा ठेवत नाहीत. आम्ही त्यांच्या मानेत जोखड घातले आहे ज्यामुळे ते हनुवटीपर्यंत जखडले गेले आहेत, म्हणून ते डोके वर करून उभे आहेत. आम्ही एक भिंत त्यांच्यापुढे उभी केली आहे आणि एक भिंत त्यांच्यामागे, आम्ही त्यांना अच्छादले आहे, त्यांना आता काही सुचत नाही. यांच्याकरिता समान आहे; तुम्ही यांना सावध करा अथवा करू नका; हे मानणार नाहीत. तुम्ही तर त्याच माणसाला  सावध करू शकता; जो उपदेशाचे अनुसरण करील आणि न पाहता मेहरबान ईश्वराला भीत असेल. त्याला क्षमा आणि सन्मान्य मोबदल्याची शुभवार्ता द्या. (७-११)

आम्ही निश्चितच एके दिवशी मृतांना जिवंत करणार आहोत. जी काही कृत्ये त्यांनी केलेली आहेत, ती सर्व आम्ही लिहित आहोत आणि जे काही अवशेष त्यांनी मागे सोडले आहेत तेसुद्धा आम्ही अंकित करीत आहोत. प्रत्येक गोष्ट आम्ही एका उघड ग्रंथात नोंद करून ठेवली आहे. (१२)

यांना उदाहरणार्थ त्या वस्तीवाल्यांची कथा ऐकवा, जेव्हा त्यात प्रेषित आले होते. आम्ही त्यांच्याकडे दोन प्रेषित पाठविले आणि त्यांनी दोघांना खोटे ठरविले. मग आम्ही तिसरा मदतीसाठी पाठविला आणि त्या सर्वांनी सांगितले, “आम्ही तुमच्याकडे प्रेषित म्हणून  पाठविले गेलो आहोत.” वस्तीवाल्यांनी सांगितले, “तुम्ही काहीच नाही परंतु आमच्याचसारखी काही माणसे आणि परमकृपाळू ईश्वराने कोणतीच वस्तू मुळीच उतरविली नाही, तुम्ही निव्वळ खोटे बोलत आहात.” (१३-१५)

प्रेषितांनी सांगितले, “आमचा पालनकर्ता जाणतो की आम्ही निश्चितच तुमच्याकडे प्रेषित म्हणून पाठविले गेलो आहोत, आणि आमच्यावर स्पष्टपणे संदेश पोहचविण्याव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी नाही.” वस्तीवाले म्हणू लागले, “आम्ही तर तुम्हाला आमच्यासाठी अपशकून मानीत आहोत. जर तुम्ही परावृत्त झाला नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी मारून टाकू आणि आमच्याकडून तुम्ही भयंकर यातनादायक शिक्षा भोगाल.” प्रेषितांनी उत्तर दिले, “तुमचे अशुभ फलित तर तुमच्या स्वत:बरोबरच आहे. काय या गोष्टी तुम्ही यासाठी करीत आहात की तुम्हाला आदेश केला गेला? वस्तुत: गोष्ट अशी आहे की तुम्ही मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहात.” (१६-१९)

इतक्यात  शहरातील दूरवरच्या कोपर्‍याहून एक मनुष्य धावत आला आणि म्हणाला, “हे माझ्या देशबांधवांनो, प्रेषितांचे अनुकरण करा. अनुकरण करा त्या लोकांचे जे तुमच्याकडून कोणताही मोबदला इच्छित नाहीत आणि योग्य मार्गावर आहेत. मी त्या अस्तित्वाची भक्ती का करू नये ज्याने मला निर्माण केले आणि ज्याकडे तुम्हा सर्वांना रुजू व्हायचे आहे? काय मी त्याला  सोडून दुसर्‍यांना उपास्य बनवावे? वास्तविकत: जर परमकृपाळू ईश्वराने मला काही हानी पोहचवू इच्छिली तर त्यांची शिफारसही माझ्या काही उपयोगी पडणार नाही किंवा ते मला सोडवूदेखील शकणार नाहीत. जर मी असे केले तर मी स्पष्ट पथभ्रष्टतेत गुरफटून जाईन. मी तर तुमच्या पालनकर्त्यावर श्रद्धा ठेवली, तुम्ही सुद्धा माझे म्हणणे ऐका.” (२०-२५)

(सरतेशेवटी त्या लोकांनी त्याला ठार मारले आणि) त्या माणसाला सांगितले गेले की प्रवेश कर स्वर्गामध्ये. त्याने सांगितले, “माझा जातीबांधवांना हे माहीत झाले असते! की माझ्या पालनकर्त्याने कोणत्या कारणास्तव मला क्षमादान केले आणि मला प्रतिष्ठित लोकांत सामील केले.” (२६-२७)

त्यानंतर त्याच्या जातीबांधवांवर आम्ही आकाशांतून एखादे लष्कर उतरविले नाही. आम्हाला लष्कर पाठविण्याची काही गरज नव्हती. केवळ एक विस्फोट झाला आणि अकस्मात ते सर्व विझले. खेद आहे दासांच्या दशेवर जो कोणी प्रेषित त्याच्यापाशी आला त्याची ते थट्टाच करीत राहिले. काय यांनी पाहिले नाही की यांच्यापूर्वी आम्हीज कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही त्यांच्याकडे परतून आले नाहीत? त्या सर्वांना एके दिवशी आमच्यासमोर हजर केले जाणार आहे. (२८-३२)

या लोकांकरिता निर्जीव जमीन एक संकेत आहे. आम्ही तिला जीवन प्रदान केले आणि तिच्यापासून धान्य उत्पन्न केले जे हे खातात. आम्ही  तिच्यात खजुरीच्या व द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि तिच्यातून झरे प्रवाहित केले जेणेकरून यांनी तिची फळे खावीत. हे सर्वकाही यांच्या स्वत:च्या हातांनी निर्माण केलेले नाही. तरीही काय हे कृतज्ञता दाखवत नाहीत? पवित्र आहे ते अस्तित्व ज्याने सर्व प्रकारच्या जोडया निर्माण केल्या, मग त्या जमिनीतील वनस्पतीपैकी असोत अथवा खुद्द यांच्या स्वजातीय (अर्थात मनुष्य) पैकी, अथवा त्या वस्तूंपैकी ज्यांची यांना माहितीदेखील नाही. (३३-३६)

यांच्याकरिता आणखीन एक संकेत रात्र आहे, आणि तिच्यावरून दिवस हटवितो तेव्हा यांच्यावर अंधकार पसरतो. आणि सूर्य, तो आपल्या ठराविक स्थानाकडे जात आहे. जबरदस्त सर्वज्ञ अस्तित्वाकडून सुनिश्चित केलेला हा हिशोब आहे. आणि चंद्रासाठी आम्ही मजल ठरविल्या आहेत येथपावेतो की तो त्यातून वाटचाल करीत पुन्हा खजुरीच्या शुष्क फांदीसमान उरतो. सूर्याच्या आवाक्यात हे नाही की त्याने जाऊन चंद्राला गाठावे आणि रात्रही दिवसावर मात करू शकत नाही. सर्व एका नभोमंडळात तरंगत आहेत. (३७-४०)

यांच्यासाठी हासुद्धा एक संदेश आहे की आम्ही यांच्या वंशजांना भरलेल्या नौकेत स्वार केले. आणि मग यांच्याकरिता तशाच प्रकारच्या नौका आणखीन निर्माण केल्या ज्वावर हे स्वार होत असतात. आम्ही इच्छिले तर यांना बुडवून टाकू, कोणीही यांची दाद घेणारा नसेल आणि कोणत्याही प्रकारे त्यांचा बचाव होणार नाही. आमची कृपाच आहे जी यांना तारले आणि एका विशिष्ट वेळेपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी बहाल करते. (४१-४४)

या लोकांना जेव्हा सांगण्यात येते की स्वत:ला वाचवा त्या परिणामापासून जो तुमच्यापुढे येत आहे आणि तुमच्यापूर्वी ओढावला होता. कदाचित तुमच्यावर दया केली जाईल. (तर हे ऐकल्या न ऐकल्यासारखे करतात) यांच्यासमोर यांच्या पालनकर्त्याकडून संकेतामधून जो कोणता देखील संकेत येतो हे त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि जेव्हा यांना सांगितले जाते की अल्लाहने जी उपजीविका तुम्हाला प्रदान केली आहे तिच्यापैकी काही अल्लाहच्या मार्गातसुद्धा खर्च करा, तर हे लोक ज्यांनी द्रोह केला आहे, श्रद्धा ठेवणार्‍यांना उत्तर देतात, “आम्ही त्या लोकांना जेवू घालावे काय ज्यांना अल्लाहने इच्छिले असते तर स्वत: जेवू घातले असते? तुम्ही तर पुर्णपणे बहकलेले आहात.” (४५-४७)

हे लोक म्हणतात की, “ही पुनरुत्थानाची धमकी पूरी तरी केव्हा होणार? सांगा, जर तुम्ही खरे असाल.” वास्तविकत: हे ज्या गोष्टीची वाट पाहात आहेत तो एक स्फोट आहे जो अकस्मात यांना अशा स्थितीत गाठील जेव्हा हे (आपल्या ऐहिक व्यवहारांत) भांडत असतील, आणि त्यावेळी हे मृत्यूपत्रदेखील करू शकणार नाहीत, आपल्या घरीदेखील परतू शकणार नाहीत. मग एक नरसिंघ फुंकले जाईल आणि अकस्मात हे आपल्या पालनकर्त्यांच्या पुढे हजर होण्य़ाकरिता आपापल्या कबरीतून बाहेर पडतील. घाबरून म्हणतील. “हे आम्हाला आमच्या शयनगृहातून कोणी उठविले?”-“हि तीच गोष्ट आहे जिचे परमदय़ाळू ईश्वराने वचन दिले होते आणि प्रेषितांचे प्रतिपादन सत्य होते.” एकच प्रचंड मोठा आवाज होईल आणि सर्वच्या सर्व आमच्यासमोर हजर केले जातील. (४८-५३)

आज कोणावर यत्किंचितही अन्याय केला जाणार नाही आणि तुम्हाला तसाच मोबदला दिला जाईल जशी तुम्ही कृत्ये करीत होता. आज स्वर्गातील लोक मौज करण्यात मग्न आहेत. त्यांची जोडपी गडद छायेत आहेत. आसनावर लोड लावून, हर तर्‍हेचे स्वादिष्ट पदार्थ खाण्यापिण्यासाठी त्यांच्याकरिता तेथे उपलब्ध आहेत, जे काही ते मागतील त्यांच्यासाठी हजर आहे. परमकृपाळू पालनकर्त्याकडून त्यांना सलाम सांगितला गेला आहे. आणि हे गुन्हेगारांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की शैतानाची भक्ती करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहे आणि माझीच भक्ती करा, हा सरळमार्ग आहे? परंतु असे असूनदेखील त्याने तुमच्यापैकी एका मोठया गटाला मार्गभ्रष्ट केले. तुम्हीला सुबुद्धी नव्हती काय? हा तोच नरक आहे ज्याची तुम्हाला भीती दाखविली जात होती, जो द्रोह तुम्ही करीत होता त्यापायी आता त्याचे इंधन बना. (५४-६४)

आज आम्ही यांची तोंडे बंद करून टाकत आहोत, यांचे हात आम्हाला सांगतील आणि यांचे पाय ग्वाही देतील की हे जगात कोणती कमाई करीत होते. (६५)

आम्ही इच्छिले तर यांचे डोळे बंद करून टाकू, मग यांनी रस्त्याकडे धाव घेऊन पाहावे, कुठून यांना रस्ता उमगेल? आम्ही इच्छिले तर यांना यांच्या जागीच अशाप्रकारे विकृत करून टाकू की यांना पुढेही जाता येऊ नये आणि मागेही फिरता येऊ नये, ज्या माणसाला आम्ही दीर्घायुष्य देतो त्याचा पाया आम्ही उखडून टाकतो, (ही दशा पाहून) यांना सुबुद्धी येत नाही का? (६६-६८)

आम्ही या (पैगंबर (स.)) ला काव्य शिकविले नाही आणि याला काव्यरचना शोभतही नाही. हा तर एक उपदेश आहे आणि स्पष्ट वाचला जाणारा ग्रंथ, जेणेकरून त्याने त्या प्रत्येक माणसाला सावध करावे जो जिवंत असेल. आणि इन्कार करणार्‍यांवर प्रमाण सिद्ध होईल. (६९-७०)

काय हे लोक पहात नाहीत की आम्ही आपल्या हाताने बनविलेल्या वस्तूंपैकी यांच्यासाठी प्राणीमात्र निर्माण केले आहेत आणि हे आता त्यांचे मालक आहेत? आम्ही त्यांना अशाप्रकारे यांच्या अधीन केले आहे की त्यांच्यापैकी कुणावर हे स्वार होतात, तर कोणाचे मांस खातात, आणि त्याच्यात यांच्यासाठी नाना प्रकारचे लाभ आणि पेये आहेत. मग काय हे कृतज्ञ होत नाहीत? हे सर्वकाही असूनसुद्धा यांनी अल्लाहशिवाय इतर उपास्य बनविले आहेत आणि हे आशा बाळगतात की यांना मदत दिली जाईल. ते यांना कोणतीच मदत करू शकत नाहीत किंबहुना हे लोक उलट त्यांच्यासाठी खडे लष्कर बनलेले आहेत. बरे ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यांनी तुम्हाला  दु:खी बनवू नये. यांच्या अंतर्बाह्य गोष्टींना आम्ही जाणतो. (७१-७६)

काय मनुष्य पाहात नाही की आम्ही त्याला वीर्यापासून निर्माण केले आणि मग तो भांडखोर बनून उभा ठाकला? आता तो आम्हावर दृष्टांत लावीत आहे आणि आपल्या निर्मितीस विसरत आहे. सांगतो, “कोण या हाडांना जिवंत करील जेव्हा ती जीर्ण झाली असतील?" त्याला सांगा, यांना तोच जिवंत करीत ज्याने यांना पूर्वी निर्मिले होते आणि तो निर्मितीचे प्रत्येक कार्य जाणतो. तोच ज्याने तुम्हांकरिता हिरव्यागार झाडापासून अग्नी उत्पन्न केला आणि तुम्ही त्यापासून आपल्या चुली प्रज्वलित करता. काय तो, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले; यावर प्रभुत्व राखत नाही की यासारख्यांना निर्माण करू शकेल? का नाही, ज्याअर्थी तो निर्मितीत निष्णात आहे. तो तर जेव्हा एखाद्या वस्तूचा संकल्प करतो तेव्हा त्याचे काम फक्त एवढेच की तिला आज्ञा द्यावी की अस्तित्व धारण कर, आणि ती अस्तित्वात येते. पवित्र आहे तो ज्याच्या हाती प्रत्येक वस्तूचे संपूर्ण अधिपत्य आहे, आणि त्याच्याकडेच तुम्ही रुजू केले जाणार आहात. (७७-८३)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP