मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
हूद

सूरह - हूद

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने १२३)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत
व असीम कृपावंत आहे,

अलिफ, लाऽऽम, रा. फर्मान आहे, ज्याची वचने परिपक्व व तपशीलवार सांगितली गेली आहेत, एक ज्ञानी व जाणत्या अस्तित्वाकडून की तुम्ही भक्ती करू नये परंतु केवळ अल्लाहची, मी त्याच्यातफें तुम्हाला खबरदार करणारा देखील आहे व शुभवार्ता देणारादेखील. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्यापाशी क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या तर तो तुम्हाला एका विशिष्ट मुदतीपर्यंत चांगली जीवनसामग्री देईल आणि प्रत्येक श्रेष्ठीला त्याचे श्रेष्ठत्व प्रदान करील. परंतु जर तुम्ही तोंड फिरविले तर मी तुमच्यासंबंधी एका मोठया भयंकर दिवसाच्या प्रकोपासून घाबरतो. तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतावयाचे आहे आणि तो सर्वकाही करू शकतो. (१-४)

पहा, हे लोक आपली छाती वळवितात की जेणेकरून त्याच्यापासून लपावे. खबरदार, जेव्हा हे वस्त्रांनी स्वत:ला झाकतात, अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो व प्रकट गोष्टींनादेखील, त्याला तर रहस्यांचेदेखील ज्ञान आहे जे मनात आहेत.भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याच्या उपजीविकेची जबाबदारी अल्लाहवर नाही आणि ज्याच्यासंबंधो तो जाणत नाही की त्याचे वास्तव्य कोठे आहे? सर्वकाही एका स्पष्ट दप्तरांत नोंदलेले आहे. (५-६)

आणि तोच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले आणि त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते जेणेकरून तुम्हाला अजमावून पाहावे तुमच्यात कोण उत्तम काम करणारा आहे, आता जर हे पैगंबर (स.), तुम्ही म्हणता, की लोकहो, मृत्यूनंतर तुम्ही पुन्हा उठविले जाल तर इन्कार करणारे उद्‌गारतात, ही तर स्पष्ट जादूगिरी आहे. आणि जर आम्ही एका विशिष्ट मुदतीपर्य्त त्यांची शिक्षा टाळली तर ते म्हणू लागतात की बरे कोणत्या गोष्टीने तिला थोपवून ठेवले आहे? ऐका! ज्या दिवशी त्या शिक्षेची वेळ येऊन ठेपेल तेव्हा ती कोणाच्याही परतविण्याने परतणार नाही आणि तीच गोष्ट त्यांना वेढून टाकील जिची चेष्टा ते करीत आहेत. (७-८)

जर एखादेवेळी आम्ही माणसाला आपल्या कृपेने उपकृत केल्यानंतर परत त्यापासून वंचित करतो तर तो निराश होतो आणि कृतघ्नता दाखवू लागतो. आणि जर त्या संकटानंतर जे त्याच्यावर आले होते त्याला आम्ही देणगीचा आस्वाद देतो तेव्हा तो म्हणतो की माझे तर सर्व अशुभ दूर झाले मग तो हषोंन्मादित होतो व ऐटीत मिरवतो.
या दोषापासून जर कोणी मुक्त आहेत तर केवळ ते लोक होत जे संयमी व सदाचारी आहेत आणि तेच होत ज्यांच्यासाठी क्षमाही आहे व मोठ मोबदलादेखील. (९-११)

तर हे पैगंबर (स.)! असे होऊ नये की तुम्ही त्या गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीला (न सांगता) सोडून द्यावे ज्या तुमच्याकडे दिव्या प्रकटनाने पाठविल्या जात आहेत आणि या गोष्टीने संकुचित ह्रदयी होऊन त्यांनी म्हणावे की, “या व्यक्तीवर एखादा खजिना का उतरविला गेला नाही? अथवा याच्या बरोबर एखादा दूत का आला नाही?” तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात, नंतर प्रत्येक वस्तूची देखरेख करणारा अल्लाह आहे. (१२)

काय हे म्हणतात की पैगंबराने हा ग्रंथ स्वत: रचला आहे? सांगा, “असे असेल तर यासारख्या रचलेल्या दहा सूरती तुम्ही रचून आणा आणि अल्लाहव्यतिरिक्त जे जे (तुमचे उपास्य) आहेत त्यांना सहाय्यासाठी बोलवू शकत असाल तर बोलवून घ्या, जर तुम्ही (त्यांना उपास्य समजण्यात) खरे असाल. आता जर ते (तुमचे उपास्य) तुमच्या मदतील पोहचत नसतील तर जाणून असा की हा अल्लाहच्या ज्ञानाने उतरला आहे आणि असे की अल्लाहशिवाय अन्य कोणीही खरा ईश्वर नाही. मग काय तुम्ही (या सत्य गोष्टीपुढे) समर्पित होणार?” (१३-१४)

जे लोक केवळ या जगातील जीवन व त्याच्या शोभेचे इच्छुक असतात त्यांच्या कर्तृत्वाचे संपूर्ण फळ आम्ही त्यांना येथेच देऊन टाकतो आणि याच्यात त्यांच्यासाठी कोणतीही उणीव केली जात नाही. परंतु परलोकात असल्या लोकांसाठी अग्रीशिवाय काहीही नाही (तेथे कळून चुकेल की) जे काही त्यांनी जगात केले ते सर्व धुळीस मिळाले आणि आता त्यांचे सर्व केले सवरले केवळ मिथ्या आहे. (१५-१६)

मग बरे ती व्याक्ती जी आपल्या पालनकर्त्याकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होती, यानंतर के साक्षीदार देखील पालनकर्त्याकडून (त्या साक्षीच्या समर्थनार्थ) आला, आणि अगोदरच मूसा (अ.) चा ग्रंथ मार्गदर्शक व कृपा म्हणून आलेला देखील उपस्थित होता, (तोसुद्धा भौतिकवाद्यांप्रमाणे याचा इन्कार करू शकतो काय?) असले लोक तर त्याच्यावर श्रद्धा ठेवतील. आणि मानवसमूहापैकी जो कोणी त्याचा इन्कार करील त्याच्यासाठी ज्या जागेचा वायदा आहे ती नरकाग्नी होय. म्हणून हे पैगंबर (स.), तुम्ही या गोष्टीच्या बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नका, हे सत्य आहे तुमच्या पालनकर्त्याकडून  परंतु बहुतेक लोक मानत नाहीत. (१७)

आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी अन्य कोण आहे जो अल्लाहवर असत्व रचतो? असले लोक आपल्या पालनकर्त्याच्या ठायी सादर होतील आणि साक्षीदार साक्ष देतील की हे आहेत ते लोक ज्यांनी आपल्या पालनकर्त्यावर असत्य रचले होते. ऐका! अल्लाह धिक्कार करीत आहे अत्याचार्‍यांचा. त्या अत्याचार्‍यांचा जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखतात, त्याच्या मार्गास वाकडा बनवू इच्छितात, आणि मरणोत्तर जीवनाचा इन्कार करतात, ते पृथ्वीवर अल्लाहला अगतिक करणारे नव्हते आणि अल्लाहच्याविरूद्ध त्याचा संरक्षकदेखील कोणी नव्हता. त्यांना आता दुहेरी यातना दिली जाईल, ते कोणाचे ऐकू देखील शकत नव्हते आणि त्यांना स्वत:लाही काही उमजत नव्हते. हे ते लोक आहेत ज्यांनी स्वत: आपल्याला तोटयात टाकले आणि ते सर्वकाही यांच्याकडून हरविले गेले जे यांनी रचले होते. नि:संशय तेच मरणोत्तर जीवनामध्ये सर्वात अधिक तोटयात राहतील. उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली आणि आपल्या पालनकर्त्याचेच बनून राहिले तर निश्चितच ते स्वर्गीय लोक होत आणि स्वर्गामध्ये ते सदैव राहतील. या दोन्ही पक्षांचे उदाहरण असे आहे जसे एक मनुष्य आहे आंधळा-बहिरा आणि दुसरा पाहणारा व ऐकणारा, हे दोघे समान असू शकतात काय? तुम्ही (या उदाहरणाने) कोणताही बोध घेत नाही काय? (१८-२४)

(आणि अशीच परिस्थिती होती जेव्हा) आम्ही नूह (अ.) ला त्याच्या लोकांकडे पाठविले होते. (त्याने म्हटले) “मी तुम्ही लोकांना स्पष्टपणे खबरदार करतो, की अल्लाहशिवाय इतर कोणाची भक्ती करू नका अन्यथा मला भीती आहे की तुम्हांवर एके दिशी डु:खदायक प्रकोप कोसळे.” उत्तरादाखल त्याच्या अमुदायाचे पुढारी ज्यांनी त्याचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला होता, म्हणाले, म्हणाले, “आमच्या दुष्टीत तर तुम्ही यापेक्षा वेगळे काही नाही की तुम्ही केवळ एक मनुष्य  आहात आमच्यासारखे आणि आम्ही पाहात आहोत की आमच्यापैकी केवळ त्या लोकांनी जे आमच्या येथे कनिष्ठ होते त्यांनी विचार न करता तुमचे अनुकरण स्वीकारले आहे आणि आम्हाला अशी कोणतीही गोष्ट आढळत नाही की ज्यांत तुम्ही लोक आमच्यापेक्षा काही पुढारलेले आहात, उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो.” त्याने म्हटले “हे देशबंधुंनो, जरा विचार तरी करा जर मी आपल्या पालनकर्त्याकडून एका स्पष्ट साक्षीवर अटळ होतो आणि त्याने मला आपल्या विशेष कृपेने देखील उपकृत केले. परंतु ती तुम्हाला दिसली नाही तर शेवटी आमच्याजवळ कोणते साधन आहे की तुम्ही मान्य करू इच्छित नाही आणि आम्ही जबरदस्तीने तुमच्या माथी मारावे? आणि हे देशबंधुंनो, मी या कामासाठी तुमच्याकडून कोणताही माल मागत नाही, माझा पोबदला तर अल्लाहपाशी आहे, आणि मी त्या लोकांना पिटाळू शकत नाही ज्यांनी माझे ऐकले आहे, ते स्वत:च आपल्या पालनकर्त्याच्या पुढे हजर होणार आहेत परंतु मी पाहात आहे की तुम्ही अडाणीपणा करीत आहात. आणि हे देशबंधुंनो, जर मी या लोकांना हाकलून लावले तर अल्लाहच्या तावडीतून मला वाचविण्यासाठी कोण येईल? तुम्हा लोकांना एवढी गोष्ट देखील कळत नाही का? आणि मी तुम्हाला सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत, हे देखील सांगत नाही की मला परोक्षाचे ज्ञान आहे, हासूद्धा माझा दावा नाही की मी दूत आहे आणि हेदेखील मी सांगू शकत नाही की ज्या लोकांना तुमचे डोळे तुच्छतेने पाहतात त्यांना अल्लाहने कोणताच भलेपणा दिला नाही, त्यांची मन:स्थिती अल्लाहच अधिक चांगली जाणतो, जर मी असे म्हटले तर अत्याचारी ठरेन.” (२५-३१)

सरतेशेवटी ते लोक म्हणाले की. “हे नूह (अ.) तुम्ही आमच्याशी भांडण केले आणि आता खूप झाले. आता तर फक्त तो प्रकोप घेऊन या ज्याची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, जर तुम्ही खरे असाल.” नूह (अ.) ने उत्तर दिले, “तो तर अल्लाहच आणील. जर त्याने इच्छिले आणि तुमच्यत ते सामर्थ्य नाही की तुम्ही त्याला रोखू शकाल. आता जर मी तुमचे काही हितचिंतन करू इच्छिले तरी माझे हितचिंतन तुम्हाला  कोणतेच लाभ देऊ शकणार नाही जेव्हा अल्लाहनेच तुम्हाला भटकविण्याचा इरादा केला असेल. तोच तुमच्या पालनकर्ता आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला परतावयाचे आहे.” (३२-३४)

हे पैगंबर (स.), हे लोक म्हणतात काय की या व्यक्तीने हे सर्वकाही स्वत:च रचले आहे? यांना सांगा, “जर मी स्वत: हे रचले असेल तर माझ्यावर माझ्या अपराधाची जबाबदारी आहे आणि जो अपराध तुम्ही करीत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे.” नूह (अ.) कडे दिव्य प्रकटन केले गेले की तुमच्या लोकांपैकी ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली, बस्स त्यांनीच ठेवली, आता कोणी मानणार नाही, त्यांच्या कृत्यांवर दु:ख करण्याचे सोडून द्या आणि आमच्या देखरेखीत आमच्या दिव्य प्रकटनानुसार एक नौका बनविण्यास प्रारंभ करा. आणि पहा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे त्यांच्यासंबंधी माझ्याकडे कोणतीही शिफारस करू नका, हे सर्वच्यासर्व आता बुडणारे आहेत. (३५-३७)

नूह (अ.) नौका बनवीत होता आणि त्याच्या जनसमूहाच्या सरदारांपैकी जो कोणी त्याच्या जवळून जात असे तो त्याची टिंगल  उडवीत असे. त्याने सांगितले, “जर तुम्ही आमच्यावर हसत आहात तर आम्ही देखील तुमच्यावर हसत आहेत, लवकरच तुम्हाला स्वत: कळून चुकेल की कोणावर तो प्रकोप येईल ज्याने त्याची नामुष्की होईल आणि कोणावर ती आपत्ती कोसळेल जी टाळता टळणार नाही.” (३८-३९)

येथपावेतो की जेव्हा आमचा हुकूम आला आणि तो तुफान उफाळला तेव्हा आम्ही सांगितले, “प्रत्येक जातीच्या प्राण्याची एक, एक जोडी नावेत ठेवा, आपल्या कुटुंबियांनादेखील, त्या व्यक्तींना सोडून ज्यांचा निर्देश अगोदरच केला गेला आहे. तिच्यात स्वार व्हा आणि त्या लोकांनासुद्धा बसवा ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे.” आणि थोडेच लोक होते ज्यांनी नूह (अ.) बरोबर श्रद्धा ठेवली होती. नूह (अ.) यांनी सांगितले, “स्वार व्हा यात, अल्लाहच्या नांवनेच आहे हिचे चालणे आणि हिचे थांबणेसुद्धा, माझा पालनकर्ता मोठा क्षमाशील व कृपाळू आहे.” (४०-४१)

या लोकांना घेऊन नौका चालली होती आणि एक, एक लाट पर्वतासमान उसळत होती. नूह (अ.) चा मुलगा दूर अंतरावर होता. नूह (अ.) ने हाक देऊन सांगितले, “पुत्रा, आमच्याबरोबर स्वार हो, अश्रद्धावंतांबरोबर राहू नकोस.” त्याने उलट उत्तर दिले, “मी आताच एका पर्वतावर चढून जातो जो पाण्यापासून माझे रक्षण करील.” नूह (अ.) ने सांगिताले, “आज कोणतीही वस्तू अल्लाहच्या आज्ञेतून वाचविणारी नाही, याशिवाय की अल्लाह एखाद्यावर दया दाखवील.” इतक्यात एक लाट दोघांच्यामध्ये आली आणि तो देखील बुडणार्‍यांमध्ये सामील झाला. (४२-४३)

आज्ञा झाली, “हे पृथ्वी, आपले संपूर्ण पाणी गिळून टाक आणि हे आकाशा, थांब.” यावर पाणी जमिनीत ओसरले, निर्णय लावण्यात आला, नौका जुदीवर ठेपली आणि म्हटले गेले की दूर झाला अत्याचार्‍यांचा समूदाय. (४४)

नूह (अ.) ने आपल्या पालनकर्त्याला पुकारले. सांगितले, “हे पालनकर्त्या! माझा मुलगा माझ्या कुटुंबियांपैकी आहे. आणि तुझा वायदा खरा आहे आणि तू सर्व सत्ताधीशापेक्षा मोठा व श्रेष्ठ सत्ताधीश आहेस.” उत्तरात फर्माविले गेले, “हे नूह (अ.)! तो तुझ्या कुटुंबियांपैकी नाही, तो तर एक दुराचारी आहे. म्हणून तू त्या गोष्टीची याचना माझ्याकडे करू नकोस ज्याची वास्तविकता तुला माहीत नाही, मी तुला उपदेश करतो की आपल्या स्वत:ला अज्ञान्याप्रमाणे बनवू नकोस,” नूह (अ.) ने लगेच विनविले, “हे माझ्या पालनकर्त्या, मी तुझा आश्रय मागतो यापासून की ती गोष्ट तुझ्याजवळ मागावी जिचे ज्ञान मला नाही, जर तू मला माफ केले नाहीस आणि दया केली नाहीस तर मी नष्ट होऊन जाईन.” (४५-४७)

आज्ञा झाली, “हे नूह (अ.) उतर, आमच्याकडून सुरक्षा व समृद्धी आहे तुझ्यावर आणि त्या समुहावर जे तुझ्यासमवेत आहेत, आणि काही समूह असे देखील आहेत, ज्यांना आम्ही काही काळ जीवनसामग्री प्रदान करू मग त्यांना आमच्याकडून दु:खदायक यातना पोहचेल.” (४८)

हे पैगंबर (स.), या परोक्षाच्या वार्ता आहेत ज्या आम्ही तुमच्याकडे दिव्यप्रकटन करीत आहेत. यापूर्वी तुम्ही त्यांना जाणत नव्हता आणि तुमचे लोक देखील, म्हणून संयम बाळगा, कार्याचा शेवट तर ईशपरायण लोकांसाठीच आहे. (४९)

आणि ‘आद’कडे आम्ही त्याचे बंधू हूद (अ.) ला पाठविले, त्याने सांगितले, “हे देशबंधुंनो, अल्लाहची भक्री करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही, तुम्ही केवळ असत्य रचले आहे. हे देशबंधुंनो, या कार्यासाठी मी तुमच्याकडून काहीही मोबदला इच्छित नाही, माझा मोबदला तर त्याच्या पाशी आहे ज्याने मला निर्णाण केले, तुम्ही जरादेखील बुद्धिचा उपयोग करीत नाही काय? हे माझ्या देशबंधुंनो, आपल्या पालनकर्त्याकडे माफी मागा, नंतर त्याच्याकडेच परतणार आहात, तो तुमच्यावर आकाशाची दारे उघडी करील आणि तुमच्या सद्यशक्तीत अधिक शक्तीची वाढ करील. गुन्हेगार बनून (भक्तीपासून) तोंड फिरवू नका.” (५०-५२)

त्यांनी उत्तर दिले, “हे हूद (अ.) तू आमच्याजवळ कोणतीही स्पष्ट साक्ष घेऊन आलेला नाहीस आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही आमच्या उपास्यांना सोडू शकत नाही आणि तुज्यावर आम्ही श्रद्धा ठेवणारे नाही. आम्ही तर असे समजतो की तुझ्यावर आमच्या उपास्यांपैकी कोणाचे तरी अरिष्ट कोसळले आहे.” (५३-५४)

हूद (अ.) ने सांगितले. “मी अल्लाहची साक्ष प्रस्तुत करतो आणि तुम्ही साक्षी रहा की हे जे अल्लाहशिवाय इतरांना तुम्ही ईशत्वात भागीदार ठरविले आहे यापासून मी मुक्त आहे. तुम्ही सर्वच्या सर्व मिळून माझ्याविरुद्ध आपल्या कारवाईत कसूर ठेवू नका आणि मला यत्किंचितदेखील सवड देऊ नका, माझी भिस्त अल्लाहवर आहे जो माझाही पालनकर्ता आहे आणि तुमचा पालनकर्तादेखील, कोणताही प्राणी असा नाही ज्याच्या झिंज्या त्याच्या हातात नसतील. नि:संशय माझा पालनकर्ता सरळ मार्गावर आहे. जर तुम्ही तोंड फिरवीत असाल तर फिरवा. जो संदेश देऊन मी तुमच्याकडे पाठविला गेलो होतो तो मी तुम्हाप्रत पोहचविला आहे. आता माझा पालनकर्ता तुमच्या जागी दुसर्‍या लोकांना उठवील, आणि तुम्ही त्याचे काहीही बिघडवू शकणार नाही, खचितच माझा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा निरीक्षक आहे.” (-५४-५७)

मग जेव्हा आमची आज्ञा आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेने हूद (अ.) ची आणि त्या लोकांची ज्यांनी त्यांच्याबरोबर श्रद्धा ठेवली होती, सुटका केली आणि एका कठोर प्रकोपापासून त्यांना वाचविले, हे आहेत आद, आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचा यांनी इन्कार केला, त्यांच्या पैगंबराचे ऐकले नाही, आणि सत्याच्या प्रत्येक जबरदस्त शत्रूचे अनुकरण करीत राहिले. सरतेशेवटी या जगात देखील त्यांचा धिक्कार केला गेला आणि पुनरुत्थानाच्या दिवशीसुद्धा. ऐका! आदनी आपल्या पालनकर्त्याशी विद्रोह केला. ऐका! दूर फेकले गेले आद. हूद (अ.) यांच्या राष्ट्राचे लोक. (५८-६०)

आणि समूदकडे आम्ही त्यांचा भाऊ सालेह (अ.) ला पाठविले. त्याने सांगितले, “हे माझ्या देशबधुंनो, अल्लाहची भक्ती करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही. तोच आहे ज्याने तुम्हाला भूमीपासून निर्माण केले आणि येथे तुम्हाला वसविले, म्हणून तुम्ही त्याची क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या. निश्चितच माझा पालनकर्ता जवळच आहे आणि तो प्रार्थनांना उत्तर देणारा आहे.” (६१)

त्यांनी सांगितले, “हे सालेह (अ.)! याच्यापूर्वी तू आमच्यामध्ये असा इसम होतास ज्याच्याशी मोठया अपेक्षा निगडित होत्या. तू आम्हाला त्या उपास्यांच्या उपासनेपासून रोखू इच्छितोस काय ज्यांची पूजा आमचे वाडवडील करीत होते? तू ज्या पद्धतीकडे आम्हाला बोलवीत आहेस त्याच्याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे जिने आम्हाला संभ्रमात टाकले आहे.” (६२)

सालेह (अ.) ने सांगितले, “हे माझ्या देशबंधुंनो! तुम्ही कधी या गोष्टीचादेखील विचार केलात काय की जर मी आपल्या पालनकर्त्याकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होतो आणि त्याने आपल्या कृपेने देखील मला उपकृत केले तेव्हा यानंतर अल्लाहच्या तावडीतून मला कोण वाचवील जर मी त्याची अवज्ञा केली? तुम्ही माझ्या कोणत्या उपयोगी पडू शकता याखेरीज की मला जास्त तोटयात घालात. हे माझ्या देशबंधुंनो! पहा ही अल्लाहची सांड तुमच्यासाठी एक संकेत आहे. हिला अल्लाहच्या जमिनीत चरावयास मुक्त सोडा. हिची जरा देखील छेड काढू नका अन्यथा काही जास्त वेळ लागणार नाही की तुमच्यावर अल्लाहचा प्रकोप येईल.” (६३-६४)

पण त्यांनी सांडणीला मारून टाकले, यावर सालेह (अ.) ने त्यांना बजावले की, “आता केवळ तीन दिवस आणखी आपल्या घरात निवास करा, ही अशी मुदत आहे जी खोटी ठरणार नाही.” (६५)

सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेने सालेह (अ.) व त्या लोकांना ज्यांनी त्याच्याबरोबर श्रद्धा ठेवली होती, वाचविले आणि त्या दिवसाच्या नामुष्कीपासून त्यांना सुरक्षित ठेवले. नि:संशय तुझा पालनकर्ता वस्तुत: शक्तिशाली व वर्चस्व बाळगणारा आहे. उरले ते लोक ज्यांनी अत्याचार केले, एका भयंकर विस्फोटाने त्यांना धरले आणि ते आपल्या वस्तीत अशा प्रकारे निपचित पडलेले पडूनच राहिले, जणूकाही ते तेथे कधी वसलेच नव्हेत. ऐका, समूद लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी द्रोह केला. ऐका, दूर फेकले गेले समूद. (६६-६८)

आणि पहा, इब्राहीम (अ.) जवळ आमचे दूत शुभवार्ता घेऊन पोहचले, म्हणाले, “तुम्हावर सलाम असो.” इब्राहीम (अ.) नी उत्तर दिले, “तुमच्यावरदेखील सलाम असो,” मग विनाविलंब इब्राहीम (अ.) ने एक भाजलेले वासरू (त्यांच्या मेजवानीसाठी) आणले, परंतु जेव्हा पाहिले की त्यांचे हात जेवणासाठी पुढे होत नाहीत तेव्हा तो त्यांच्याविषयी साशंक झाला आणि मनात त्यांची भीती धरू लागला. त्यांनी सांगितले, “भिऊ नका, आम्ही तर लूत (अ.) च्या लोकांकडे पाठविले गेलो आहेत.” इब्राहीम (अ.) ची पत्नी देखील उभी होती. ती हे ऐकून हसली मग आम्ही तिला इसहाक (अ.) आणि इसहाक (अ.) नंतर याकूब (अ.) ची खुशखबरी दिली ती म्हणाली. “माझे दुर्दैव! आता मल संतती होईल काय जेव्हा मी चक्क म्हातारी झाले आणि माझे पती देखील म्हातारे झाले? ही तर मोठी विचित्र बाब आहे!” दूतांनी सांगितले, “अल्लाहच्या आज्ञेवर आश्चर्य करतेस? इब्राहीम (अ.) च्या कुटुंबियांनो, तुम्हावर तर अल्लाहची कृपा आणि त्याची समृद्धी आहे आणि निश्चितच अल्लाह अत्यंत प्रशंसेस पात्र व वैभवशाली आहे.” (६९-७३)

मग जेव्हा इब्राहीम (अ.) ची भीड चेपली आणि (संतानच्या सुवार्तेने) त्याचे मन प्रसन्न झाले तेव्हा त्याने लूतच्या लोकांसाठी आमच्याशी भांडण मांडले. वास्तविकत: इब्राहीम (अ.) मोठा सहिष्णू आणि कोमलह्रदयी मनुष्य होता आणि सर्व स्थितीत आमच्याकडे तो रूजू होत असे. (सरतेशेवटी आमच्या दूतांनी त्याला सांगितले) “हे इब्राहीम (अ.) यापासून परावृत्त व्हा, तुमच्या पालनकर्त्याची आज्ञा झालेली आहे. आणि आता त्या लोकांवर प्रकोप कोसळल्यावाचून राहणार नाही जो कोणाच्या परतविल्याने परतू शकणार नाही.” (७४-७६)

आणि जेव्हा आमचे दूत लूत (अ.) जवळ पोहोचले, तर त्यांच्या आगमनाने तो फार घाबरला आणि संकुचित ह्रदयी झाला. आणि म्हणू लागला, आज मोठया संकटाचा दिवस आहे. (या पाहूण्यांचे आगमन होताच) त्याच्या जातीचे लोक मोकाटपणे त्याच्या घराकडे धावले. अगोदरपासून ते अशा कुकर्माचे व्यसनी होते. लूत (अ.) ने त्यांना सांगितले, “बंधूनो, या माझ्या मुली मौजूद आहेत. या तुमच्याकरिता निर्मळ आहेत. अल्लाहचे काही तरी भय बाळगा आणि माझ्या पाहुण्यांच्या बाबतीत मला अपमानित करू नका, तुमच्यात कोणी भला माणूस नाही का?” त्यांनी उत्तर दिले, “तुला तर माहीतच आहे की तुझ्या मुलींमध्ये आमचा काहीच वाटा नाही. आणि तुला हे देखील माहीत आहे की आम्हाला काय हवे आहे.’ लूत (अ.) ने सांगितले, “जर माझ्याजवळ इतके सामर्थ्य असते तर मी तुम्हाला सरळ केले असते, अथवा एखादाअ भक्कम आधारच असता तर मी त्याचा आश्रय घेतला असता.” तेव्हा दूतांनी त्याला सांगितले, “हे लूत (अ.), आम्ही तुझ्या पालनकर्त्याचे पाठविलेले दूत आहोत, हे लोक तुझे काहीच बिघडवू शकणार नाहीत बस्स तू थोडी रात्र उरली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा. आणि पहा. तुमच्यापैकी कुणीही मागे वळून पाहू नये. पण तुझी पत्नी (बरोबर जाणार नाही) कारण तिच्यावरही तेच काही ओढवणार आहे जे या लोकांवर ओढवणार आहे. यांच्या विनाशासाठी सकाळची वेळ निश्चित आहे, आणि सकाळ. आता अवकाशच किती आहे! (७७-८१)

मग जेव्हा आमच्या निर्णयाची वेळ आली तेव्हा आम्ही त्या वस्तीला उलथेपालथे करून टाकले आणि तिच्यावर भाजलेल्या मातीच्या दगडांचा ताबडतोब वर्षाव केला, ज्यापैकी प्रत्येक दगड तुझ्या पालनकर्त्याच्या येथे चिन्हांकित होता. आणि अत्याचार्‍यांपासून ही शिक्षा काही दूर नाही. (८२-८३)

आणि मदयनवाल्याकडे आम्ही त्यांचा भाऊ शुऐब (अ.) याला पाठविले. त्याने सांगितले, “हे माझ्या देशबंधुंनो, अल्लाहची भक्ती करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही. आणि वजनमापात कमी देत जाऊ नका. आज मी तुम्हाला चांगल्या स्थितीत पाहात आहे परंतु मला भय आहे की उद्या तुमच्यावर असा दिवस येईल ज्याचा प्रकोप सर्वांना वेढून टाकील. आणि हे देशबंधुंनो, ठीक ठीक न्यायानिशी पूर्णपणे मोजमाप व वजन करा आणि लोकांना त्यांच्या वस्तूंमध्ये घट देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजवत फिरू नका. अल्लाहने दिलेली बचत तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही श्रद्धावंत असाल आणि कोणत्याही परिस्थितीत मी काही तुमच्यावर निरीक्षक नाही.” (८४-८६)

त्यांनी उत्तर दिले. “हे शुऐब (अ.)! तुझी नमाज तुला हेच शिकविते काय की आम्ही त्या सर्व उपास्यांना सोडावे ज्यांची उपासना  आमचे वाडवडील करीत होते? अथवा असे की आम्हाला आमच्या मालाचा आमच्या इच्छेनुरूप विनियोग करण्याचा अधिकार नाही? केवळ तूच का एक उदारवृत्ती आणि सत्यवादी मनुष्य उरला आहेस!” (८७)

शुऐब (अ.) ने सांगितले, “बंधूंनो, तुम्ही स्वत:च विचार करा की जर मी आपल्या पालनकर्त्याकडून एका स्पष्ट साक्षीवर होतो आणि मग त्याने मला आपल्याकडून चांगली उपजीविका देखील दिली. (तर त्यानंतर तुमच्या पथभ्रष्टतेत आणि हरामखोरीत तुमचा सहभागी कसा होऊ शकेन?) आणि मी हे मुळीच इच्छित नाही की ज्या गोष्टींपासून मी तुम्हाला रोखतो त्या गोष्टी मी स्वत: कराव्यात. मी तर सुधारणा घडवून आणू इच्छितो जितके मला शक्य आहे आणि हे जे काही मी करू इच्छितो ते सर्व अल्लाहप्रणीत सदबुद्धीवर अवलंबून आहे, त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि प्रत्येक बाबतीत मी त्याच्याकडेच रूजू होतो. आणि हे देशबंधुंनो, माझ्याविरुद्ध तुमच्या अट्टाहासाने एखादे वेळी अशी पाळी आणू नये की सरतेशेवटी तुमच्यावर देखील तोच प्रकोप कोसळावा जो नूह (अ.) अथवा हूद (अ.) चे लोक तर तुमच्यापासून काही दूरही नाहीत. पहा, आपल्या पालनकर्त्याची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परतून या, नि:संशय माझा पालनकर्ता फार दय़ाळू आहे आणि प्रेम करणारा आहे.” (८८-९०)

त्यांनी उत्तर दिले. “हे शुऐब (अ.)! तुझ्या पुष्कळशा गोष्टी तर आम्हाला कळतच नाहीत आणि आम्ही पाहतो की तू आमच्या दरम्यान एक दुर्बल मनुष्य आहेस, तुजी जातबिरादरी नसती तर आम्ही तुला केव्हाच दगडांनी ठेचून मारले असते. तुझे सामर्थ्य तर इतके  नाही की तू आम्हाला जड जावास.” (९१)

शुऐब (अ.) ने सांगितले, “बंधूनो, माझे कुटुंब तुमच्यावर अल्लाहपेक्षा वरचढ आहे काय की तुम्ही कुटुंबाची भीती बाळगता आणि) अल्लाहला पूर्णपणे पाठीमागे टाकता? समजून असा की जे काही तुम्ही करीत आहात ते अल्लाहच्या पकडीच्या बाहेर नाही. हे माझ्या समाजातील लोकांनो तुम्ही आपल्या पद्धतीने कार्य करीत राहा. आणि मी माझ्या पद्धतीने करीत राहीन, लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कुणावर अपमानजनक प्रकोप ओढवतो आणि कोण खोटा आहे. तुम्हीही प्रतीक्षा करा आणि मी देखील तुमच्याबरोबर वाट पाहात आहे.” (९२-९३)

सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तर आम्ही आमच्या कृपेने शुऐब (अ.) ला आणि त्याचे साथी श्रद्धावंतांना वाचविले, आणि ज्या लोकांनी अत्याचार केला होता त्यांना एका-भयंकर स्फोटाने असे गाठले की ते आपल्या वस्त्यांमध्ये जे निपचित पडले ते पडूनच राहिले, जणूकाय ते कधी तेथे राहिले, वसलेच नव्हते. ऐका, मदयनवालेसुद्धा दूर फेकले गेले ज्याप्रमाणे समूदवाले फेकले गेले होते. (९४-९५)

आणि मूसा (अ.) ला आम्ही आपल्या वचने व स्पष्ट नेमणूक प्रमाणासह, फिरऔन आणि त्याच्या राज्याच्या सरदारांकडे पाठविले पण त्यांनी फिरऔनच्या हुकूमाचे अनुसरण केले. वस्तुत: फिरऔनचा हुकूम सत्याधिष्ठित नव्हता. पुनरुत्थानाच्या दिवशी तो आपल्या लोकांच्या पुढे पुढे असेल आणि आपल्या नेतृत्वात त्यांना नरकाग्नीकडे नेई. किती वाईट आगमनस्थान आहे हे ज्यावर एखादा पोहचतो! आणि त्या लोकांचा जगातदेखील धिक्कार केला जाईल व पुनरुत्थानाच्या दिवशीही केला जाईल. किती हे वाईट फळ आहे जे एखाद्याला मिळेल. (९६-९९)

हा काही वस्त्यांचा वृत्तांत आहे जो आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत. काही अद्यापही उभ्या आहेत व काहींचे वस्तीरूप पीक कापले गेले आहे. आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही. त्यांनी आपण होऊन स्वत:वर अत्याचार केला. आणि जेव्हा अल्लाहची आज्ञा आली तेव्हा त्यांचे ते उपास्य ज्यांचा ते अल्लाहला सोडून धावा करीत असत, त्यांच्या काही उपयोगी पडले नाहीत आणि त्यांनी विनाश न विध्वंसाव्यतिरिक्त अन्य कोणताच फायदा त्यांना दिला नाही. (१००-१०१)

आणि तुझा पालनकर्ता जेव्हा एखाद्या अत्याचारी वस्तीला पकडतो तेव्हा त्याची पकड अशीच असते, खरोखरच त्याची पकड अत्यंत कठोर आणि दु:खदायक असते. वस्तुस्थिती अशी आहे की यात एक संकेत आहे त्या प्रत्येक माणसासाठी ज्याने परलोकातील यातनांचे भय बाळगले. तो एक दिवस असेल जेव्हा सर्व लोक जमा होतील आणि मग जे काही त्या दिवशी घडेल ते सर्वांच्या डोळ्यांदेखत घडेल. आम्ही त्याच्या आणण्यांत काही फार जास्त दिरंगाई करीत आहोत असे नाही, बस्स एक ठराविक वेळ त्याच्यासाठी निश्चित आहे. जेव्हा ती येईल, तेव्हा कोणाची बोलण्याची बिशाद राहणार नाही, याखेरीज की एखाद्याने अल्लाहच्या अनुमतीने काही विनंती करावी. मग काही लोक त्या दिवशी दुर्दैवी असतील व काहीजण सुदैवी. जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील. (तेथे उष्णता व तहानेच्या अतिरेकाने) ते उसासे टाकतील आणि हुंकार देतील आणि त्याच स्थितीत ते सदैव राहतील जोपर्यंत आकाश व पृथ्वी टिकून आहेत, याखेरीज की तुझा पालनकर्ता जी इच्छा करील. नि:संशय तुझा पालनकर्ता पूर्ण अधिकार राखतो की जी इच्छा असेल ते करतो. उरले ते लोक जे भाग्यवान ठरतील ते स्वर्गामध्ये जातील आणि तेथे सदैव राहतील जोपर्यंत आकाश व पृथ्वी टिकून आहेत.
याखेरीज की तुझ्या पालनकर्त्याने काही अन्य इच्छा करावी. असले बक्षीस त्यांना मिळेल ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही. (१०२-१०८)

म्हणून हे पैगंबर (स.), तू त्या उपास्यांच्या बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नकोस ज्यांची हे लोक उपासना करीत आहेत. हे तर (परिपाठाचे अंधानुकरण करणारे बनून) त्याचप्रमाणे पूजाअर्चा करीत आहेत ज्याप्रमाणे पूर्वी यांचे वाडवडील करीत होते, आणि आम्ही यांचा हिस्सा यांना भरपूर देऊ इतका की त्यात कसलीही काटकसर केली जाणार नाही. (१०९)

आम्ही यापूर्वी मूसा (अ.) लासुद्धा ग्रंथ दिलेला आहे त्याच्याबाबतीत देखील मतभेद केले गेले होते (ज्याप्रमाणे आज या ग्रंथाबद्दल केले जात आहेत जो तुम्हाला दिला गेला आहे.) जर तुझ्या पालनकर्त्याकडून एक गोष्ट अगोरच ठरविली गेली नसती तर त्या मतभेद करणार्‍यांच्या दरम्यान केव्हाच निकाल लावला गेला असता. ही वस्तुस्थिती आहे की हे लोक याकडून शंका व द्विधेत पडले आहेत आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की तुझा पालनकर्ता त्यांना त्यांच्या कृत्यांचा पुरेपूर मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही, खचितच तो यांच्या सर्व कारवायांची खबर राखणारा आहे. तर हे पैगंबर (स.), तुम्ही व तुमचे ते सोबती जे (द्रोह आणि बंडखोरीपासून श्रद्धा व आज्ञापालनाकडे) परत आले आहेत, ठीक ठीक सरळ मार्गावर दृढ राहा जशी तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे आणि भक्तीच्या मर्यादांचे उल्लंघन करू नका. जे काही तुम्ही करीत आहात ते तुमचा पालनकर्ता पाहात असतो. या अत्याचार्‍यांकडे यत्किंचितही झुकू नका अन्यथा नरकाच्या लपेटीत याल आणि तुम्हाला असा कोणी वाली किंवा पाठीराखा मिळणार नाही जो तुम्हाला अल्लाहपासून वाचवू शकेल आणि कोठूनही तुम्हाला मदत मिळणार नाही. आणि पहा, नमाज कायम करा दिवसाच्या दोन्ही टोकांवर आणि थोडी रात्र उलटल्यावर वस्तुत: पुण्याई पापांना दूर सारत असते. ही एक आठवण करून देणारी गोष्ट आहे त्या लोकांसाठी जे अल्लाहची आठवण ठेवणारे आहेत. आणि संयम राखा, अल्लाह सदाचार करणार्‍यांचा मोबदला कधी वाया घालवीत नाही. (११०-११५)

त्या लोकांत जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत, असली भली माणसे का शिल्लक राहिली नाहीत ज्यांनी लोकांना जमिनीत हिंसाचार माजविण्यापासून प्रतिबंधित केले असते? असले लोक निघाले तरी फारच थोडे ज्यांना आम्ही त्या लोकांमधून वाचविले, एरव्ही अत्याचारी लोक तर त्याच मौजमजेच्या नादी लागले ज्याची सामग्री त्यांना विपुल प्रमाणात दिली गेली होती आणि ते अपराधी बनून राहिले, तुझा पालनकर्ता असा नाही की वस्त्यांना नाहक उध्वस्त करीत राहील ज्याअर्थी त्यांचे निवासी सुधारणा करणारे असतील. नि:संशय जर तुझ्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर सर्व माणसांचा एक समुदाय बनविला असता, परंतु आता तर ते विभिन्न पद्धतीवरच चालत राहतील. आणि पथभ्रष्टतेपासून केवळ तेच लोक वाचतील ज्यांच्यावर तुझ्या पालनकर्त्याची कृपा आहे. याच (आवडी व निवडीचे स्वातंत्र्य आणि परीक्षे) साठी तर त्याने त्यांना निर्माण केले होते आणि तुझ्या पालनकर्त्याचे ते वचन पूर्ण झाले जे त्याने प्रतिपादिले होते की मी नरकाला जिन्न आणि माणसे या सर्वांनी भरून टाकीन. (११६-११९)

आणि हे पैगंबर (स.)! या प्रेषितांच्या गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत, या त्या गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे आम्ही तुमचे ह्रदय बळकट करतो. यांच्याद्वारे तुम्हाला सत्याचे ज्ञान मिळावे आणि श्रद्धावंतांना उपदेश आणि जागृती लाभावी. उरले ते लोक जे श्रद्धा ठेवीत नाहीत तर त्यांना सांगून टाका की तुम्ही आपल्या पद्धतीने कार्य करीत राहा आणि आम्ही आपल्या पद्धतीने करीत राहू, परिणामाची तुम्हीदेखील प्रतीक्षा करा आणि आम्हीदेखील प्रतीक्षेत आहोत. आकाशांत आणि पृथ्वीत जे काही लपलेले आहे ते सर्व अल्लाहच्या अधिकारक्षेत्रात आहे, आणि संपूर्ण मामला त्याच्याकडेच रुजू केला जातो. तर हे पैगंबर (स.), तू त्याचीच भक्ती कर आणि त्याच्यावरच विश्वास ठेव, जे काही तुम्ही लोक करीत आहात त्यापासून तुझा पालनकर्ता अनभिज्ञ नाही. (१२०-१२३)

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP