(मक्काकालीन, वचने ४९)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
शपथ आहे ‘तूर’ ची आणि अशा एका उघड ग्रंथाची जो तलम कातडीवर लिहिला गेला आहे, आणि सदैव वावर असलेल्या गृहाची (काबागृहाची), आणि उंच छताची आणि उसळत्या समुद्राची, की तुझ्या पालनकर्त्याचा प्रकोप निश्चितपणे घडणार आहे, ज्याचे कोणी निवारण करू शकणार नाही. तो त्या दिवशी घडेल जेव्हा आकाश भयंकरपणे डगमगू लागेल आणि पर्वत उडत फिरतील. विनाश आहे त्या दिवशी त्या खोटे ठरविणार्यांसाठी जे आज खेळ म्हणून आपल्या वितंडवादात गुंतलेले आहेत. ज्या दिवशी त्यांना धक्के मारून मारून नरकाग्नीकडे चालते केले जाईल त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल की, “हा तोच अग्नी आहे ज्याला तुम्ही खोटे ठरवीत होता. आता सांगा, ही जादू आहे अथवा तुम्हाला उमजत नाही? जा आता होरपळले जा याच्यात, मग तुम्ही सहन करा अथवा न करा, तुमच्यासाठी एकसारखे आहे, तुम्हाला तसाच बदला दिला जात आहे जसे तुम्ही आचरण करीत होत.” (१-१६)
ईशपरायण लोक तेथे उद्यानांत व ऐश्वर्यात असतील. आनंद लुटत असतील त्या वस्तूपासून ज्या त्यांचा पालनकर्ता त्यांना देईल. आणि त्यांचा पालनकर्ता त्यांना देईल. आणि त्यांचा पालनकर्ता त्यांना नरकाच्या प्रकोपासून वाचवील. (त्यांना सांगितले जाईल) खा आणि प्या मजेत आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही करीत राहिला आहात. ते समोरासमोर मांडलेल्या आसनांवर तक्के लावून बसले असतील आणि आम्ही सुंदर डोळ्यांच्या अप्सरांशी त्यांचा विवाह करू. ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे. आणि त्यांच्या संततीनेदेखील एखादा श्रद्धा-श्रेणीत त्यांचे अनुकरण केले आहे. त्यांच्या त्या संततीलासुद्धा आम्ही (स्वर्गामध्ये) त्यांच्यात मिळवू आणि त्यांच्या कृत्यांत कोणतीही घट त्यांना होऊ देणार नाही. प्रत्येकजण आपल्या कमाईच्या मोबदल्यात गहाण आहे. आम्ही त्यांना हरतर्हेचे फळ आणि मांस, ज्या पदार्थाचीही त्यांना इच्छा होईल खूप देत राहू. ते एक दुसर्याकडून पेयपात्रे पुढे पुढे होऊन घेत असतील ज्यांत बकवास असणार नाही की दुराचार. आणि त्यांच्या सेवेत अशी मुले धावत फिरत असतील जी त्यांच्याच (सेवे) साठी खास असतील. असे सुंदर जणू लपवून ठेवलेले मोती. हे लोक आपापसांत एकमेकांशी (जगात ओढवलेल्या) प्रसंगांची हालहवाल विचारतील. हे म्हणतील की आम्ही पूर्वी आपल्या घरवाल्यांमध्ये भीत भीत जीवन व्यतीत करीत होतो, सरतेशेवटी अल्लाहने आमच्यावर मेहरबानी केली आणि आम्हाला होरपळून टाकणार्या वार्याच्या प्रकोपापासून वाचविले. आम्ही पूर्वीच्या जीवनात त्याचाच धावा करीत होतो. तो खरोखरच मोठा उपकारी व दयावान आहे. (१७-२८)
म्हणून हे पैगंबर (स.), तुम्ही उपदेश करीत रहा, आपल्या पालनकर्त्याच्या मेहरबानीने तुम्ही मांत्रिकही नाही आणि वेडेदेखील नाही. (२९)
काय हे लोक म्हणतात की हा मनुष्य कवी आहे ज्याच्यासाठी आम्ही आपत्तीची वाट पहात आहोत? यांना सांगा बरे, प्रतीक्षा करा, मीसुद्धा तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो. काय त्यांची बुद्धी यांना अशाच गोष्ट करण्यास सांगते? अथवा वस्तूत: हे शत्रुत्वांत मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहेत? (३०-३२)
काय हे म्हणतात की या माणसाने हा कुरआन स्वत:च रचला आहे? खरी गोष्ट अशी आहे की हे लोक श्रद्धा ठेवू इच्छित नाहीत. जर हे आपल्या या कथनात खरे असतील तर यांनी अशाच वैभवाची वाणी रचून आणावी. (३३-३४)
काय हे एखाद्या निर्मात्याविना स्वत:च जन्मले आहेत? अथवा हे खुद्द स्वत:चे निर्माते आहेत? अथवा पृथ्वी आणि आकाशांना यांनी निर्मिले आहे? खरी गोष्ट अशी आहे की हे विश्वास बाळगत नाहीत. (३५-३६)
काय तुझ्या पालनकर्त्याचे खजिने यांच्या ताब्यात आहेत? अथवा त्यांच्यावर यांचा हुकूम चालतो? (३७)
काय यांच्याजवळ एखादी शिडी आहे जिच्यावर चढून हे लोक वरील जगताचा कानोसा घेतात? यांच्यापैकी ज्याने कानोसा घेतला असेल त्याने आणावे एखादे स्पष्ट प्रमाण. काय अल्लाहसाठी तर आहेत मुली आणि तुम्हा लोकांसाठी आहेत मुले? (३८-३९)
काय तुम्ही यांच्यापाशी काही मोबदला मागता? की हे जबरदस्तीने लादलेल्या भुर्दंडाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत? काय यांच्यापाशी परोक्षाच्या हकीकतीचे ज्ञान आहे की त्याच्या आधारे हे लिहीत आहेत? (४०-४१)
काय हे एखादे कारस्थान करू इच्छितात? (जर अशी गोष्ट आहे) तर द्रोह करणार्यांवर त्यांचे कारस्थान उलटल्याशिवाय राहणार नाही. (४२)
काय अल्लाहशिवाय यांचा एखादा अन्य उपास्य आहे? अल्लाह पवित्र आहे त्या अनेकेश्वरवादापासून जो हे लोक करीत आहेत. (४३)
या लोकांनी आकाशाचे तुकडे कोसळताना जरी पाहिले तरी म्हणतील की हे ढग आहेत जे उसळून येत आहेत. म्हणून हे पैगंबर (स.), यांना यांच्या दशेत सोडा येथपावेतो की हे आपला तो दिवस गाठतील ज्यात हे हाणून पाडले जातील. ज्या दिवशी यांचा कोणताही डाव यांच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही की कुणी यांच्या मदतीलासुद्धा येणार नाही. आणि ती वेळ येण्यापूर्वीसुद्धा अत्याचार्यांसाठी एक प्रकोप आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेकजण जाणत नाहीत. हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याचा निर्णय येईपर्यंत धीर धरा. तुम्ही आमच्या नजरेत आहात. तुम्ही जेव्हा उठात तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबर त्याचे पावित्र्यगान करा, रात्रीसुद्धा त्याचे पावित्र्यगान करीत जा आणि तारे ज्यावेळी परततात त्यावेळीसुद्धा. (४४-४९)