मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अज्‌जारियात

सूरह - अज्‌जारियात

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ६०)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

शपथ आहे त्या वार्‍यांची जे धूळ उडविणारे आहेत, मग पाण्याने भरलेले मेघ उचलणारे आहेत, मग चपळतेने वाहणारे आहेत, मग एका मोठया कार्याचे (पावसाचे) वाटप करणारे आहेत, सत्य असे आहे की ज्या गोष्टीचे भय तुम्हाला दाखविले जात आहे ती खरी आहे. आणि कर्मफळनिष्पत्ती खचितच घडून येणार आहे. शपथ आहे भिन्नभिन्न रूपे असलेल्या आकाशाची, (मरणोत्तर जीवनासंबंधी) तुमचे म्हणणे एक दुसर्‍यापासून विभिन्न आहे. त्याच्यापासून तोच विमुख होतो जो सत्यापासून विमुख झाला आहे. (१-९)

विनाश पावले कयास आणि तर्काने हुकूम लावणारे जे अज्ञानांत गर्क आणि गफलतीत धुंद आहेत. विचारणा करतात की अखेर तो फलनिष्पत्तीचा दिवस येणार तरी केव्हा? तो त्या दिवशी येईल जेव्हा हे लोक अग्नीवर भाजले जातील. (यांना सांगितले जाईल) आता घ्या आस्वाद आपल्या उपद्रवाचा. ही तीच गोष्ट आहे ज्याची तुम्ही घाई करीत होता. मात्र ईशपरायण लोक त्या दिवशी उद्यानात आणि झर्‍यांच्या दरम्यान असतील, जे काही त्यांच्या पालनकर्ता त्याना देईल ते आनंदाने घेत असतील. ते त्या दिवसाच्या येण्यापूर्वी सत्कर्मी होते, रात्री कमीच झोपत असत, मग तेच रात्रीच्या शेवटच्या प्रहरी क्षमायाचना करीत असत, आणि त्यांच्या मालमत्तेत ह्क्क आहे याचकांचा आणि वंचितांचा. पृथ्वीवर बरेचसे संकेत आहेत विश्वास बाळगणार्‍यांसाठी, आणि खुद्द तुमच्या स्वत:च्या अस्तित्वात आहेत. तुम्हाला उमगत नाही काय? आकाशांतच आहे तुमची उपजीविकासुद्धा आणि ती गोष्टसुद्धा जिचे वचन तुम्हाला दिले जात आहे, तर शपथ आहे आकाश आणि पृथ्वीच्या स्वामीची, ही गोष्ट सत्य आहे. तशीच खात्रीलायक जशी तुम्ही बोलत आहात. (१०-२३)

हे पैगंबर (स.), इब्राहीम (अ.), च्या मान्यवर पाहुण्यांची कथाही तुम्हांपर्यंत पोहचली आहे, जेव्हा ते त्याच्या येथे आले तेव्हा त्यांनी सांगितले, आपल्याला सलाम. त्याने सांगितले, “आपणांससुद्धा सलाम-काही अनोळखी लोक आहेत.” मग तो गुपचुप आपल्या कुटुंबियांकडे गेला, आणि एक (भाजलेले) जाडजूड वासरू आणून पाहूण्यांच्या पुढे ठेवले. तो म्हणाला, महाशय, आपण खात नाही? मग तो मनातल्या मनात त्यांना भ्याला. त्यांनी सांगितले, भिऊ नका, आणि त्याला एका ज्ञानी मुलाच्या जन्माची शुभवार्ता एकविली. हे ऐकून त्याची पत्नी ओरडत पुढे सरसावली आणि तिने आपले तोंड बडवून घेतले आणि म्हणू लागली, वृद्धा वांझोटी. ते म्हणाले, “हे असेच फर्माविले आहे तुझ्या पालनकर्त्याने तो बुद्धिमान आहे आणि सर्वकाही जाणतो.” इब्राहीम (अ.) ने सांगितले, “हे ईश्वरी दूतांनो! कोणती मोहीम आपल्यासमोर आहे?” त्यांनी सांगितले, “आम्हाला एका गुन्हेगार लोकसमूहाकडे पाठविण्यात आले आहे, जेणेकरून त्यावर खंगरांच्या दगडांचा वर्षाव करावा. तुझ्य़ा पालनकर्त्याकडे त्या लोकांसाठी संकेतचिन्हे करण्यात आली आहेत जे मर्यादांचे उल्लंघन करीत आहेत. मग आम्ही त्या सर्व लोकांना काढून घेतले जे त्या वस्तीत श्रद्धावंत होते, आणि आम्हाला तेथे एका घराशिवाय ईमानधारकांचे कोणतेच घर आढळले नाही. यानंतर आम्ही तेथे केवळ एक निशाणी त्या लोकांसाठी सोडली जे यातनादायक प्रकोपाची भीती बाळगत होते. (२४-३७)

आणि (तुमच्यासाठी निशाणी आहे) मूसा (अ.) च्या कथेत. जेव्हा आम्ही त्याला स्पष्ट प्रमाणासहित फिरऔनपाशी पाठविले, तेव्हा तो आपल्या बळावर गर्विष्ठ बनला आणि म्हणाला, हा जादूगार आहे किंवा वेडा आहे. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या लष्करांना पकडले आणि सर्वांना समुद्रात फेकून दिले आणि तो निंदनीय बनून राहिला. (३८-४०)

आणि (तुमच्यासाठी निशाणी आहे) आद मध्ये, जेव्हा आम्ही त्यांच्यावर एक असा कल्याणरहित वारा पाठविला की ज्या ज्या वस्तूवरून तो वाहिला त्याला जर्जर करून टाकले. (४१-४२)

आणि (तुमच्यासाठी निशाणी आहे) समूदमध्ये, जेव्हा त्यांना सांगितले गेले होते की एका विशिष्ट वेळेपर्यंत मजा करून घ्या. परंतु या ताकीदीतसुद्धा त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची अवज्ञा केली. सरतेशेवटी त्यांना पाहता पाहताच एका अकस्मात कोसळणार्‍या प्रकोपाने त्यांना गाठले. मग त्यांच्यात उठण्याचेही त्राण नव्हते की ते आपला बचावदेखील करू शकत नव्हते. (४३-४५)

आणि या सर्वांअगोदर आम्ही नूह (अ.) च्या राष्टाला नष्ट केले कारण ते अवज्ञाकारी लोक होते. आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो. पृथ्वीला आम्ही अंथरले आहे आणि आम्ही फार चांगले समतोल करणारे आहोत आणि प्रत्येक वस्तूचे आम्ही युगल बनविले आहेत. कदाचित तुम्ही यावरून बोध घ्यावा. म्हणून धाव घ्या अल्लाहकडे, मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघडउघड खबरदार करणारा आहे. आणि बनवू नका अल्लाहच्या समवेत कोणी अन्य उपाम्य. मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघडउघड खबरदार करणारा आहे. असेच घडत आले आहे, यांच्यापूर्वीच्या राष्ट्रांकडेदेखील कोणी असा प्रेषित आलेला नाही ज्याला त्यांनी असे म्हटले नाही की हा जादूगार आहे अथवा वेडा. या सर्वांनी आपापसात यासंबंधी काही समझोता केला आहे काय? नव्हे तर हे सर्व शिरजोर लोक आहेत. म्हणून हे पैगंबर (स.), त्यांच्याकडून तोंड फिरवा. तुम्हावर काही दोषारोपण नाही. तथापि उपदेश करीत रहा कारण उपदेश श्रद्धावंतांसाठी लाभदायी आहे. (४६-५५)

मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी मी काही त्यांच्याकडून उपजीविका इच्छित नाही आणि असेही इच्छित नाही की त्यांनी मला जेवू घालावे. अल्लाह तर स्वत:च उपजीविका देणारा आहे, मोठा शक्तिमान आणि जबरदस्त, तर ज्या लोकांनी जुलूम केला आहे त्यांच्या हिश्श्याचा सुद्धा तसाच प्रकोप तयार आहे जसा यांच्याचसारख्या लोकांना त्यांच्या वाटयाचा मिळाला आहे, यासाठी या लोकांनी घाई करू नये. सरतेशेवटी, विनाश आहे द्रोह करणार्‍यांसाठी त्या दिवशी ज्याचे भय यांना दाखविले जात आहे. (५६-६०)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP