मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अश्‌शूरा

सूरह - अश्‌शूरा

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ५३)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

हामीऽऽम. ऐ‍ऽऽन सीऽऽन काऽऽफ, अशाच प्रकारे प्रभुत्वसंपन्न व बुद्धिमान अल्लाह तुमच्याकडे व तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या (प्रेषितां) कडे दिव्यबोध पाठवीत राहिला आहे. आकाशात आणि पृथ्वीत जे जे काही आहे त्याचेच आहे, तो उच्चतर व महान आहे. दूर नव्हे की आकाश वरून फाटले असेल. दूत आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच पावित्र्यगान करीत असतील आणि पृथ्वीवासियांसाठी क्षेमची याचना करीत असतील. जाणून असा की खरोखरच अल्लाह क्षमाशील व दयावान आहे. ज्या लोकांनी त्याला सोडून काही अन्य आपले वाली बनविले आहेत, अल्लाहच त्यांच्यावर निरीक्षक आहे, तुम्ही त्यांचे हवालदार नाही. (१-६)

होय, अशाच प्रकारे हे पैगंबर (स.), हा अरबी कुरआन आम्ही तुमच्याकडे ‘वह्य’ (दिव्यबोध) केला आहे, जेणेकरूज्न तुम्ही वस्त्यांचे केंद्र (मक्का शहर) आणि त्याच्या भोवती राहणार्‍यांना खबरदार करावे, आणि एकत्र होण्याच्या दिवसाचे भय दाखवावे, ज्याच्या आगमनात कोणतीही शंका नाही. एका गटाला स्वर्गामध्ये जावयाचे आहे आणि दुसर्‍या गटाला नरकात. (७)

जर अल्लाहने इच्छिले असते तर या सर्वांना एकच ‘धार्मिक समुदाय’ बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपाछत्राखाली घेतो, आणि अत्याचार्‍यांचा कोणी वालीही नाही व सहायकही नाही. काय हे (इतके नादान आहेत की) यांनी त्याला सोडून इतर वाली बनवून ठेवलेले आहेत? वाली तर अल्लाहच आहे. तोच मृतांना जीवित करतो आणि तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. (८-९)

तुमच्या दरम्यान ज्या बाबतीतही मतभेद असेल, त्याचा निर्णय लावणे अल्लाहचे काम होय. तोच अल्लाह माझा पालनकर्ता आहे, त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि त्याच्याकडेच मी रुजू होतो. आकाशांला व पृथ्वीला बनविणारा, ज्याने तुमच्या सजातीपासून तुमच्यासाठी युगल निर्माण केली आणि त्याचप्रमाणे चतुष्यादांनासुद्धा (त्यांचेच सजातीय) युगल बनविली आणि अशा प्रकारे तो तुमचे वंश पसरवितो. सृष्टीतील कोणतीही वस्तू त्याच्या समान नाही, तो सर्वकाही ऐकणारा व पाहणारा आहे. आकाशांच्या व पृथ्वीच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्याजवळ आहेत, ज्याला इच्छितो विपूल उपजीविका देतो आणि ज्याला इच्छितो त्याला बेताची देतो. त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे. (१०-१२)

त्याने तुमच्यासाठी धर्माची तीच पद्धत निश्चित केली आहे जिची आज्ञा त्याने नूह (अ.) ला दिली होती आणि जिला (हे मुहम्माद (स.)) आता तुमच्याकडे आम्ही दिव्यबोधाद्वारे पाठविले आहे, आणि जिचा आदेश आम्ही इब्राहीम (अ.) आणि मूसा (अ.) व ईसा (अ.) यांना दिलेला आहे, या ताकीदसह की प्रस्थापित करा या धर्माला आणि यात फाटाफूट होऊ देऊ नका. हीच गोष्ट या अनेकेश्वरवाद्यांना अत्यंत अप्रिय झाली आहे, जिचे (हे मुहम्मद (स.)) तुम्ही यांना आमंत्रण देत आहात. अल्लाह ज्याला  इच्छितो आपला बनवितो आणि तो आपल्याकडे येण्याचा मार्ग त्यालाच दाखवितो जो त्याच्याकडे रुजू होत असतो. (१३)

लोकांत जी फाटाफूट उद्भवली ती यानंतर उद्भवली की त्यांच्यापाशी ज्ञान आलेले होते, आणि हे यामुळे झाले की ते आपसात एक दुसर्‍याची आगळीक करू इच्छित होते. जर तुझ्या पालनकर्त्याने अगोदरच हे फर्माविले नसते की एका निश्चित वेळेपर्यंत निर्णय स्थागित ठेवला जाईल. तर त्यांचा निर्णय केव्हाच केला गेला असता आणि वस्तुस्थिती अशी आहे की अगोदर होऊन गेलेल्यानंतर जे लोक ग्रंथाचे वारस बनविले गेले, ते त्याकडून मोठया अस्वस्थजनक शंकेत गुरफटलेले आहेत. (१४)

(ज्या अर्थी अशी स्थिती निर्माण झाली आहे) म्हणून हे मुहम्मद (स.), आता तुम्ही त्याच धर्माकडे आमंत्रित करा आणि जशी तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे त्यावर भक्कमपणे कायम राहा आणि या लोकांच्या इच्छेचे अनुसरण करू नका, आणि यांना सांगा की, “अल्लाहने जो ग्रंथही अवतरला आहे, मी त्यावर श्रद्धा ठेवली. मला आज्ञा दिली गेली आहे की मी तुमच्या दरम्यान न्याय करावा. अल्लाहच आमचाही पालनकर्ता आहे आणि तुमचा पालनकर्तासुद्धा. आमची कृत्ये आमच्यासाठी आहेत व तुमची कृत्ये तुमच्यासाठी. आमच्या दरम्यान कोणताही तंटा नाही. अल्लाह एके दिवशी आम्हा सर्वांना एकत्र करील आणि त्याच्याकडेच सर्वांना जावयाचे आहे.” (१५)

अल्लाहच्या आमंत्रणाला साद दिल्यानंतर जे लोक (साद देणार्‍यांशी) अल्लाहच्या बाबतीत वाद घालीत असतात, त्यांची हुज्जतखोरी त्यांच्या पालनकर्त्याजवळ खोटी आहे आणि त्यांच्यावर त्याचा क्रोध आहे आणि त्यांच्यासाठी भयंकर प्रकोप आहे. (१६)

तो अल्लाहच आहे ज्याने सत्यानिशी हा ग्रंथ आणि तराजू अवतरला आहे. आणि तुम्हाला काय माहीत कदाचित निर्णयाची घटका जवळच येऊन ठेपली असेल. जे लोक तिच्या येण्यावर श्रद्धा ठेवीत नाही; ते तर तिच्यासाठी घाई करतात, परंतु जे तिच्यावर श्रद्धा ठेवतात ते तिला भितात आणि जाणतात की ती निश्चितपणे येणार आहे.
चांगले ऐकून घ्या, जे लोक त्या घटकेच्या आगमनात शंका निर्माण करणारे वादविवाद करतात, ते मार्गभ्रष्टतेत फार दूरवर गेले आहेत. (१७-१८)

अल्लाह आपल्या दासांवर फार मेहरबान आहे. ज्याला जे काही इच्छितो देतो, आणि तो मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. जो कोणी परलोकाची शेती इच्छितो त्याच्या शेतीत आम्ही वाढ करतो, आणि जो जगाची शेती इच्छितो त्याला जगातूनच देतो. परंतु परलोकात त्याचा कोणताही वाटा नाही. (१९-२०)

काय हे लोक काही ईश्वराचे असले भागीदार ठेवतात ज्यांनी यांच्यासाठी धर्माचे स्वरूप असलेली एक अशी पद्धत निश्चित केली आहे ज्याची अल्लाहने परवानगी दिलेली नाही? जर निर्णयाची गोष्ट ठरली गेली नसती तर यांचा खटला निकालात काढला गेला असता. खचितच या अत्याचार्‍यांसाठी यातनादायक प्रकोप आहे. तुम्ही पाहाल की हे अत्याचारी त्यावेळी त्यांनी जी कृत्ये केली त्यांच्या परिणामापासून भीत असतील व तो त्यांच्यावर बेतल्याशिवाय राहणार नाही. याउलट ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सत्कृत्ये केली आहेत ते स्वर्गाच्या उद्यानात राहतील. जे जे काही ते इच्छितील ते त्यांना आपल्या पालनकर्त्याच्या तेथे प्राप्त होईल. हीच मोठी कृपा आहे. ही आहे ती गोष्ट ज्याची शुभवार्ता अल्लाह आपल्या त्या दासांना देतो ज्यांनी मानले आणि सत्कृत्ये केली. हे पैगंबर (स.), या लोकांना सांगा की, “मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक नाही, तथापि आप्तेष्ट संबंधाचे प्रेम निश्चितच इच्छितो. जो कोणी भलेपणा कमवील, आम्ही त्याच्यासाठी त्या भलेपणांत उत्तमतेची भर करू. नि:संदेह अल्लाह मोठा क्षमाशील आणि गुणग्राहक आहे. (२१-२३)

काय हे लोक असे म्हणतात की या व्यक्तीने अल्लाहवर खोटे कुभांड रचले आहे? जर अल्लाहने इच्छिले तर तुमच्या ह्रदयांवर मोहोर करील. तो असत्याला नष्ट करतो आणि सत्याला आपल्या आदेशांनी खरे करून दाखवितो. तो उरांतील लपलेली गुपिते जाणतो. तोच आहे जो आपल्या दासांकडून पश्चात्ताप मान्य करतो आणि वाईट गोष्ट माफ करतो, वास्तविकत: तुम्हा लोकांच्या सर्व कृतीचे त्याला ज्ञान आहे. तो श्रद्धा ठेवणार्‍या व सत्कृत्ये करणार्‍यांची पार्थना मान्य करतो आणि आपल्या मेहरबानीने त्यांना अधिक जास्त देतो. उरले इन्कार करणारे तर त्यांच्यासाठी कठोर शिक्षा आहे. (२४-२६)

जर अल्लाहने आपल्या सर्व दासांना विपुल उपजीविका दिली असती तर त्यांनी भूतलावर दुर्वर्तनाचे तुफान माजविले असते परंतु तो एका हिशेबाने जितके इच्छितो तितके उतरवितो, नि:संदेह तो आपल्या दासांची खबर राखणारा आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवतो. तोच आहे जो, लोक निराश झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी करतो आणि आपली कृपा पसरवितो, आणि तोच प्रशंसेस योग्य वाली आहे, त्याच्या संकेतांपैकी आहे या आकाशाची व पृथ्वीची निर्मिती आणि ही प्राणीमात्र निर्मिती , जिचा त्याने दोन्ही ठिकाणी विस्तार केला आहे. तो हवे तेव्हा त्यांना एकत्रित करू शकतो. तुम्हा लोकांवर जे जे कोणते संकट आले आहे. ते तुम्ही स्वत:च ओढवलेले आहे, आणि बर्‍याचशा चुकांकडे तो सहज दुर्लक्ष करीत असतो. तुम्ही पृथ्वीवर आपल्या ईश्वराला जेरीस आणणारे नाहीत. आणि अल्लाहच्याविरूद्ध तुमचा कोणताही समर्थक व सहायक नाही. त्याच्या संकेतांपैकी आहेत ह्या नौका ज्या समद्रात पर्वतासमान दिसत असतात. अल्लाहने हवे तेव्हा वार्‍याला स्थिर करावे अणि यांनी समुद्राच्या पाठीवर उभेच्या उभे राहावे, यात मोठे संकेत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी जास्तीत जास्त संयम व कृतज्ञता दाखविणारी असेल. अथवा (त्यांच्यावर स्वार होणार्‍यांच्या) पुष्कळशा अपराधांकडे दुर्लक्ष करीत त्यांच्या थोडयाच कृत्यांच्यापायी त्यांना बुडवून टाकील, आणि त्यावेळी आमच्या वचनांमध्ये वाद घालणार्‍यांना कळेल की त्यांच्यासाठी कोणतेही आश्र्यस्थान नाही. (२७-३५)

जे काही तुम्हा लोकांना दिले गेले आहे ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे, आणि जे काही अल्लाहपाशी आहे ते उत्तम आहे आणि सदैव राहणारेदेखील. ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे आणि जे आपल्या पालनकर्त्यावर भरोसा ठेवतात, जे भयंकर पाप आणि अश्लील कृत्यांपासून अलिप्त राहतात आणि जर राग आला तर क्षमा करतात, जे आपल्या पालनकर्त्याची आज्ञा पाळतात, नमाज कायम करतात, आपले व्यवहार आपापसातील सल्लामसलतीने चालवितात, आम्ही जी काही उपजीविका त्यांना दिली आहे तिच्यातून खर्च करतात आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो तेव्हा त्याचा मुकाबला करतात, वाईट कृत्यांचा बदला तेवढयाच प्रमाणात आहे मग जो कोणी माफ करील आणि सुधारणा करील त्याचा मोबदला अल्लाहकडे आहे. अल्लाह अत्याचार्‍यांना पसंत करीत नाही. आणि जे लोक अत्याचार झाल्यानंतर बदला घेतील त्यांची निर्भर्त्सना केली जाऊ शकत नाही, निर्भर्त्सनेलायक तर ते आहेत जे दुसर्‍यावर अत्याचार करतात आणि पृथ्वीवर हकनाक आगळीक करतात. अशा लोकांसाठी यातनादायक प्रकोप आहे. तथापि जो मनुष्य संयमाने वागेल आणि क्षमा करील तर हे मोठया साहसी कर्मांपैकी होय. (३६-४३)

ज्याला अल्लाहनेच पथभ्रष्टतेत फेकले, त्याचा सांभाळ करणारा कोणी अल्लाहशिवाय नाही. तुम्ही पाहाल की हे अत्याचारी जेव्हा प्रकोप पाहतील तेव्हा सांगतील की आता परतण्याचाही एखादा मार्ग आहे? आणि तुम्ही पाहाल की हे नरकाच्या समोर जेव्हा आणले जातील तेव्हा अपमानामुळे ते वाकले जात असतील. आणि त्याला नजर चुकवून कटाक्षाने पाहात असतील, त्यावेळी ते लोक ज्यांनी श्रद्धा ठेवलीं होती सांगतील की प्रत्यक्षात खरे दिवाळखोर तेच लोक होत ज्यानी आज पुनरुत्थानाच्या दिवशी आपल्या स्वत:ला व आपल्या संबंधितांना तोटयात घातले. सावध राहा, अत्याचारी लोक कायमचे प्रकोपात राहतील. आणि त्यांचे कोणी समर्थक आणि वाली नसतील ज्यांनी अल्लाहविरूद्ध त्यांच्या मदतीस यावे. ज्याला अल्लाहने पथभ्रष्टतेत फेकले त्याच्यासाठी बचावाचा कोणताही मार्ग नाही. (४४-४६)

मान्य करा आपल्या पालनकर्त्याचे म्हणणे यापूर्वी की तो दिवस टळण्याचा कोणताही उपाय अल्लाहकडून होणार नाही. त्यादिवशी तुमच्यासाठी कोणतेही आश्रयस्थान असणार नाही, आणि तुमच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणारासुद्धा कोणी नसेल. आता जर हे लोक तोंड फिरवतील तर हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला यांच्यावर रक्षक म्हणून तर पाठविलेले नाही. तुमच्यावर तर केवळ संदेश पोहचविण्याची जबाबदारी आहे. माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही त्याला आपल्या कृपेचा आस्वाद देतो तर त्यावर फुलून जातो आणि जर त्याच्या स्वत:च्या हस्ते केले-सवरलेले एखाद्या संकटाच्या रूपाने त्याच्या अंगलट येते तर अत्यंत कृतघ्न बनतो. (४७-४८)

अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो. आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्वकाही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे. (४९-५०)

कोणत्याही मनुष्याचा हा दर्जा नाही की अल्लाहने त्याच्याशी समक्ष बोलणी करावी. त्याची बोलणी एक तर वह्य (संकेता) च्या स्वरूपात होते, अथवा पडद्यामागून, अथवा मग तो एखादा संदेशवाहक (फरिश्ता) पाठवितो आणि तो त्याच्या आज्ञेने जे काही इच्छितो ‘वह्य’ (बोध) करतो, तो उच्चतर आणि बुद्धिमान आहे. आणि अशाच प्रकारे (हे पैगंबर (स.)) आम्ही आपल्या आज्ञेने एक ‘रूह’ तुमच्याकडे ‘वह्य’ (दिव्यबोध) केली आहे. तुम्हाला काही माहीत नव्हते की ग्रंथ काय असतो व श्रद्धा काय आहे. परंतु त्या ‘रूह’ला आम्ही एक प्रकाश बनविले ज्याद्वारे आम्ही मार्ग दाखवितो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो. निश्चितच तुम्ही सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करीत आहात, त्या ईश्वराच्या मार्गाकडे जो पृथ्वी आणि आकाशातील प्रत्येक वस्तुचा मालक आहे. सावधान, सर्व बाबी अल्लाहकडेच रुजू होतात. (५१-५३)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP