भाद्रशुक्लचतुर्थीवरदचतुर्थी सामध्याह्नव्यापिनीग्राह्या प्रातः शुक्लतिलैः स्नात्वामध्याह्नेपूजयेन्नृपेतिहेमाद्रौभविष्येतत्रैवपूजोक्तेः मदनरत्नेप्येवं परदिनेएवांशेनसाकल्येनवामध्याह्नव्याप्त्यभावेसर्वपक्षेषुपूर्वाग्राह्या तथाचबृहस्पतिः चतुर्थीगणनाथस्यमातृविद्धाप्रशस्यते मध्याह्नव्यापिनीचेत्स्यात्परतश्चेत्परेहनीति मातृविद्धाप्रशस्तास्याच्चतुर्थीगणनायके मध्याह्नेपरतश्चेत्स्यान्नागविद्धाप्रशस्यत इति माधवीयेस्मृत्यंतराच्च तत्रगणेशरुपंस्कांदे एकदंतंशूर्पकर्णंनागयज्ञोपवीतिनं पाशांकुशधरंदेवंध्यायेत्सिद्धिविनायकमिति इयंरविभौमयोरतिप्रशस्ता भाद्रशुक्लचतुर्थीयाभौमेनार्केणवायुता महतीसात्रविघ्नेशमर्चित्वेष्टंलभेन्नर इतिनिर्णयामृतेवाराहोक्तेः । अत्रचंद्रदर्शनंनिषिद्धं तथाचापरार्केमार्कंडेयः सिंहादित्येशुक्लपक्षेचतुर्थ्यांचंद्रदर्शनं मिथ्याभिदूषणंकुर्यात्तस्मात्पश्येन्नतंसदेति चतुर्थ्यांनपश्येदित्यन्वयः प्रधानक्रियान्वयलाभात् तेनचतुर्थ्यामुदितस्यपंचम्यांननिषेधः गौडाअप्येवमाहुः पराशरोपि कन्यादित्येचतुर्थ्यांतुशुक्लेचंद्रस्यदर्शनं मिथ्याभिदूषणंकुर्यात्तस्मात्पश्येन्नतंसदा तद्दोषशान्तयेसिंहः प्रसेनमितिवैपठेदिति श्लोकस्तुविष्णुपुराणे सिंहः प्रसेनमवधीत्सिंहोजांबवताहतः सुकुमारकमारोदीस्तवह्येषस्यमंतक इति ।
भाद्रपदशुक्ल चतुर्थी वरदचतुर्थी - ती मध्याह्नव्यापिनी घ्यावी. कारण, “ प्रातःकालीं पांढरे तिल अंगास लावून स्नान करुन मध्याह्नीं पूजन करावें. ” अशी हेमाद्रींत भविष्यांत मध्याह्नींच पूजा उक्त आहे. मदनरत्नांतही असेंच आहे. तिथीचे सहा पक्ष आहेत ते असे - १ पूर्व दिवशींच मध्याह्नव्यापिनी, २ पर दिवशींच मध्याह्नव्यापिनी, ३ दोन्ही दिवशीं मध्याह्नव्यापिनी नाहीं, ४ दोन्ही दिवशीं सकल मध्याह्नव्यापिनी, ५ दोन्ही दिवशीं मध्याह्नीं अंशानें समव्यापिनी, ६ दोन्ही दिवशीं अंशानें विषमव्यापिनी. ह्या सहा पक्षांत पर दिवशींच मध्याह्नव्याप्ति आहे, मग ती सकल मध्याह्नव्याप्ति असो किंवा अंशतः मध्याह्नव्याप्ति असो, आणि पूर्व दिवशीं मुळींच मध्याह्नव्याप्ति नाहीं तर ह्या वरील दुसर्या पक्षीं पराच करावी. इतर सर्व पक्षीं पूर्वा करावी. तेंच सांगतो बृहस्पति - “ गणेशचतुर्थी मध्याह्नव्यापिनी असेल तर मातृविद्धा ( तृतीयायुक्त ) प्रशस्त होय. पर दिवशींच मध्याह्नव्यापिनी असेल तर पर दिवशींच करावी. ” आणि “ गणपतीचे पूजनाविषयीं चतुर्थी तृतीयायुक्त असून मध्याह्नीं असेल तर ती प्रशस्त होय; पर दिवशींच तशी ( मध्याह्नी ) असेल तर पंचमीविद्धा प्रशस्त आहे ” असें माधवीयांत स्मृत्यंतरही आहे. त्या चतुर्थीचे ठायीं गणेशाच्या ध्यानाचें स्वरुप सांगतो - स्कांदांत - “ एकदंतं शूर्पकर्णं नागयज्ञोपवीतिनं ॥ पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं. ” अर्थ - एकदंत, शूर्पकर्ण, सर्पाचें यज्ञोपवीत, पाश व अंकुश धरणारा, देव सिद्धिविनायक त्याचें ध्यान करावें. ह्या चतुर्थीस रवि किंवा भौम वार असतां अति प्रशस्त आहे. कारण, “ भाद्रपदशुक्ल चतुर्थी जी भौम किंवा रविवार यांनीं युक्त ती महती होय. तिचे ठायीं गणपतीचें पूजन केलें असतां मनुष्यांस इष्टप्राप्ति होते ” असें निर्णयामृतांत वाराहवचन आहे. ह्या चतुर्थींचे ठायीं चंद्रदर्शन निषिद्ध. तेंच सांगतो अपरार्कांत - मार्कंडेय - “ सिंहराशीस सूर्य असतां शुक्लपक्षीं चतुर्थीस चंद्रदर्शन झालें तर मिथ्यापवाददोष येतो. म्हणून त्या चंद्रास चतुर्थीत पाहूं नये ” चतुर्थीत पाहूं नये असा अन्वय करावा. असा केला असतां प्रधानक्रियेचा अन्वय होतो. तेणेंकरुन चतुर्थीत उदय झालेल्या चंद्राचें दर्शन पंचमींत झालें असतां तो दिवस विनायकव्रताचा असला तरी निषेध नाहीं. गौडही असेंच सांगतात. पराशरही “ कन्याराशीस सूर्य जातो त्या मासांत शुक्लपक्षीं चतुर्थीस चंद्राचें दर्शन झालें असतां मिथ्याभिदूषण प्राप्त होतें, म्हणून त्या चतुर्थीस सर्वदा चंद्रास पाहूं नये. आणि पाहिला असतां त्या दोषाचे शांतीकरितां ‘ सिंहः प्रसेन० ’ या श्लोकाचा जप करावा. ” तो श्लोक असा - विष्णुपुराणांत - “ सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जांबवता हतः ॥ सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमंतकः ”