मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥६२॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥६२॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


श्री विघ्नहर्त्या धूम्रवर्णा । लंबोदरा शूर्पकर्णा । राजीव लोचन गौरवर्णा । वंदिते श्रीगणेशा तव चरणी ॥१॥
श्रृंगेरी निवासिनी शारदांबे । विद्यादात्री जगदंबे । हंसगमने सुमुखी नितंबे । धाव पाव झडकरी ॥२॥
स्वामी परिज्ञानाश्रम चरित्र लिहिण्या । दे माते शब्द मौक्तिकांना । सत्यघटित चरित्र कथिताना । राही अखंड मम संगे ॥३॥
करिते गुरुपरंपरेसी नमन । सर्व कुलदेवतांसी वंदन । वंदूनी श्रीभवानीशंकर चरण । नमिते श्रीदुर्गापरमेश्वरीसी ॥४॥
आता परिसा गुरुचरित्र सत्वरी । भ्रमण करिती स्वामी भारतान्तरी । केले प्रयाण तीर्थक्षेत्रान्तरी । काही भक्त जनांसंगे ॥५॥
पर्यटन समयी स्वामींनी भारतात । भेटले अनेक नामवंत संत । कषिते पावन नावे ग्रंथांत । परिसा सज्जन भाविकहो ॥६॥
बालपणी भेटले श्री नित्यानंद स्वामी । जे सदा शांत अंतर्यामी । श्री श्रृंगेरी मठाधीश स्वामी । तसेची कर्मयोगी श्री दत्ता बाळ ॥७॥
कांची कामकोटीतीर्थ मठाधीश । जगद्गुरु शंकराचार्य विशेष । संगे असता आनंदाश्रम ईश । भेटले स्वामींसी ॥८॥
प्रसिद्ध काननगड तालुक्यामाजी । रामनगर येथील पूज्य माताजी । सहस्त्रावधी जन भजती आजी । विविध स्थळी त्यांसी जगान्तरी ॥९॥
माताजींनी प्रतिपाळिला सुगम । 'आनंदाश्रम' नामक आश्रम । निर्मिला स्वामी रामदासांनी अनुपम । स्वकष्टे प्रयत्नांतरी ॥१०॥
सन बाहत्तरामाजी । श्री परिज्ञानाश्रम येता आश्रमात सहजी । रामनगरच्या पूज्य माताजी । करिती साष्टांग दंडवत ॥११॥
स्वामींचे आरोग्य विचलित होता । आदेशले माताजींनी सद्भक्तां । की सदुरुंच्या आरोग्याकरिता । जपावा शिवपंचाक्षरी मंत्र ॥१२॥
पाच कोटी जप भक्तीने । जपावा मनापासून प्रेमाने । हेतु स्वामींचे आरोग्य संवर्धनाकारणे । ऐसे वदती माताजी ॥१३॥
दुजा हेतु माताजींचा । की उद्धार हावा भक्तांचा । मन एकाग्रता साधण्याचा । हा तरणोपाय असे ॥१४॥
तसेची श्री सच्चिदानंद स्वामी । सांप्रत रामनगरचे स्वामी । सदा आनंदी अंतर्यामी । भेटले श्री परिज्ञानाश्रमांम ॥१५॥
श्री 'करपात्री' नामे संन्यासी काशीत । श्री सत्यसाईबाबा बेंगळूरात । काशी मठाधीश सुधींद्रतीर्थ । भेटले अनेकदा स्वामींसी ॥१६॥
कवळे मठाधीश गोमंतकात । श्री सच्चिदानंद सरस्वती स्वामी समवेत । राहिले काही दिन मठात । कवळे येथे श्री परिज्ञानाश्रम स्वामी ॥१७॥
गोकर्ण पर्तगाळी मठाधीश । श्रीविद्याधिराजतीर्थ वडेर विशेष । तसेंची धर्मस्थळ मठाधीश । श्री वीरेंद्र हेगडे यांसी ॥१८॥
श्री पूज्य गगनगिरी महाराज । श्रीपूज्य पाचलेगांवकर महाराज । श्री गुळवणी महाराज । आणिक अनेक संत सज्जन ॥१९॥
'तिथल' येथील श्रीसाई संस्थान स्वामी । सदा शांत अंतर्यामी । सांप्रत निवास त्यांचा तिथल ग्रामी । गुजरात राज्यामाजी ॥२०॥
भेटले ते श्री परिज्ञानाश्रमांसी । करिता हरिद्वारा ग्रामी पर्यटनासी । 'प्रभुजी' नामे ओळखती त्यांसी । भक्तगण सारे सर्वत्र ॥२१॥
कन्याकुमारी ते बदरीकेदार । सर्व तीर्थक्षेत्रे मनोहर । निसर्ग सौंदर्य सुंदर । पाहूनी आनंदले श्री परिज्ञानाश्रम ॥२२॥
सन शहात्तरामाझारी । स्वामी परिज्ञानाश्रमांची स्वारी । प्रयाण करी शिवानंदाश्रमांतरी । हृषीकेश येथे निवासार्थ ॥२३॥
खार मठात असता । भागवत ग्रंथ उपदेशिला भक्ता । सुलभ शब्दांनी संपूर्णतः । शंकासमाधान केले भक्तांचे ॥२४॥
बोधसार नरहरी आचार्य लिखित । उपदेशिले भक्तांसी बेंगळूरात । आनंद जाहला भक्तां अमित । श्रवण करिता गुरुवाणी ॥२५॥
दशम गुरु चित्रापूर मठाधीश । पूज्य परिज्ञानाश्रम ईश । निघाले परदेश भ्रमणार्थ विशेष । काही भक्तजनां संगे ॥२६॥
दोन जून एकोणऐंशी रोजी । श्री परिज्ञानाश्रम स्वामीजी । संगे श्री भवानीशंकर मूर्ती सहजी । घेऊनी निघाले परदेशी ॥२७॥
हा ऐतिहासिक दिन । चित्रापूर सारस्वतांसी महत्त्वपूर्ण । प्रथमतः चित्रापूर मठाधीश महान । निघाले विदेश पर्यटनार्थ ॥२८॥
आपुल्या परदेश दौऱ्यात । स्वामींनी पर्यटन केले अमेरिकेत । कॅनडा युरोप राष्ट्रात । इंग्लंड फ्रान्स इटली स्विझर्लंड येथे ॥२९॥
न्यूयॉर्क गणपती मंदिरात । उपदेशिले उपनिषद् मराठीत । जन जाहले विस्मयचकित । स्वामींचे वाक्चातुर्य ज्ञान पाहूनी ॥३०॥
उपनिषद्‌विषयी कथिताना । स्वामी उपदेशिती भक्तजनांना । जीवनी मानवाने जगताना । केवळ बहिर्सुखास्तव झटू नये ॥३१॥
प्रकृतीची विविधरूपे घेऊनी । आलो आम्ही सारे जन्म घेवोनी । जन्माचे मूळ प्रयोजन जाणूनी । जाणावे आपुले आत्मरूप ॥३२॥
परब्रह्म निर्विकार परमात्म्यांसी । सर्व चराचरांत पाहण्यासी । प्राणिमात्र वस्तूत शोधण्यासी । प्रयत्न करावे सातत्याने ॥३३॥
वेदोक्त भाषा कठीण । उपनिषद् सांगती सुलभ शब्दांतून । सर्वांत सरळ सोपी महत्त्वपूर्ण । भाषा असे कथोपनिषदांची ॥३४॥
उपनिषद् सांगति आत्मज्ञान । आत्मरूप जाणण्याचे प्रयोजन । की जन्ममृत्यूतूनी मुक्ती जाण । हेची मुख्य ध्येय ठेवावे ॥३५॥
आत्मज्ञान ही ऐसी स्थिती । प्राप्तीनंतर न ढळे कल्पान्ती । त्यातूनी दूर जाण्याची इच्छा चित्ति । नच उद्भवे कदापि ॥३६॥
श्रेय व प्रेय हे द्विपंथ । येती प्रत्येक मानवी जीवनात । आत्मज्ञाना प्रति नेई श्रेयपंथ । परमात्म रूप दावूनी ॥३७॥
बहिर्जगातील सुख अशाश्वत । शोधे प्रेय पथिक जीवनात । अंती सर्वही गमावून खचित । सापडे जीवन चक्रव्यूहात ॥३८॥
श्रेय दावी निवृत्ती मार्ग । प्रेय दावी प्रवृत्ती मार्ग । अक्षय अनंत परमात्म मार्ग । सापडे श्रेय मार्गियांसी ॥३९॥
ध्येयाप्रति दृढ निश्र्चयी राहूनी । मन सदा स्थिर राखूनी । अंतरी सदा शांती पाळूनी । जो वर्ते जीवनी ॥४०॥
त्यासी श्रेयमार्गी जाणावा । कथारूपांत ब्रह्मतत्त्व आढावा । कथिला कथोपनिषदातून बरवा । ऐसे वदती स्वामी ॥४१॥
श्रेय म्हणजे आत्मतत्त्व । अनंत शक्ती सर्वव्याप्त । आदि अंत रहित । राही संदैव अस्ति रूपे ॥४२॥
दशेंद्रिये देती ज्ञान देहांत । बहिर्जगविषयी खचित । मन श्रेष्ठ त्याहूनी निश्चित । देई वस्तुची जाण ॥४३॥
मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥
हे ब्रह्मांड रचियेता विश्वंभर । परमपुरुष जगदाधार । सर्वज्ञ निर्गुण निराकार । त्याहूनी श्रेष्ठ नसे कांही ॥४५॥
इंद्रियांपासूनी प्राप्त जे सुख । त्याचा उपभोगी तो जीवात्मा एक । राही प्रशांत निद्रावस्थेत शुष्क । सत्स्वरुप संबंधांत जीवात्मा ॥४६॥
इंद्रिये अंतर्मुख करुनी । पाहावे सत्स्वरूपासी अंतर्चक्षूंनी । आत्मा हाची परमात्मा जाणूनी । जावे श्रेय मार्गावरी ॥४७॥
देह व आत्मा विषयी कथिती । स्वामी उपस्थित भक्तांप्रती । संक्षिप्तरूपे लिहिते ग्रंथी । परिसा सज्जन भाविकहो ॥४८॥
देह हा असे रथ । आत्मरूप परमात्मा वसे त्यात । बुद्धी ही सारथी निष्णात । जाणे सर्व विवेक दृष्टीने ॥४९॥
मन बुद्धीचा असे लगाम । जेणे बुद्धी आवरी इंद्रिये सक्षम । सद्‌सद्‌बुद्धीन्वये जाणावे उत्तम । निजात्मस्वरूप प्रत्येकाने ॥४०॥
हे कथोपनिषदातील सार । अत्यंत संक्षिप्तरूपे करूनी शब्दाकार । लिहूनी मोजके वाक्प्रचार । कथिले स्वामींच्या आशीर्वचनांतूनी ॥५१॥
या व्यतिरिक्त अनेक विषय । कथूनी त्यातील आशय । स्वामी परिज्ञानाश्रम निरामय । वदती भक्तांसी परदेशी ॥५२॥
श्रद्धाम्योयम पुरुषः विषयी आशीवर्चन । दिधले हिंदी भाषेतून महत्त्वपूर्ण । योगवशिष्ट ग्रंथ महान । कथिला स्वामींनी थंडरबे कॅनडात ॥५३॥
मायामोहातूनी मुक्त व्हावया । ज्या दश पायऱ्या लिहिल्या । श्रीवशिष्टांनी श्रीरामा कथिल्या । त्या परिसा संक्षिप्तरूपे ॥५४॥
'अनासक्त' राहावे संसारी । 'जगत् मिथ्या' भाव राखावा अंतरी । 'वासनापाश' तोडावे चित्तांतरी । 'आत्ममनन' करावे नित्य ॥४॥
करावे नित्य 'शुद्ध निरुपण' । सर्व कार्यें करावी 'आत्मार्चन' । अष्टम पायरी 'आत्म निरुपण' । जेथ देहभाव न वसे अंतरी ॥५६॥
नववी 'जीवनमुक्त' अवस्था । देही राहूनही नच राही देहास्था । द्वैत दृष्टीची चंचलावस्था । नच राही तेथे अंतरी ॥५७॥
दशम पायरी 'निर्वाण' । शब्दांत सांगणे जी अवस्था कठीण । केवळ स्वानुभवाने पूर्ण । जाण होई अद्वितीय स्थितीची ॥५८॥
ह्या दश पायऱ्या उपदेशून । ॠषी वशिष्ट कथिती सहजतापूर्ण । करण्यासी साधन चतुष्ट्या अवलंबन । त्या विषयी परिसा भाविकहो ॥५९॥
सदसद्‌विवेकबुद्धी, अनासक्ती । मुमुक्षुत्व, षट्‌गुण संपत्ति । अशी ही साधन चतुष्ट्ये निश्चिती । पाळावी मानवाने ॥६०॥
मन बुद्धी अहंकार संयमन । ध्येयपूर्तीस्तव प्रयत्न संपूर्ण । सहनशिलता, इंद्रियदमन । सात्त्विक समाधान अन् श्रद्धा ॥६१॥
ही षट्‌गुण संपत्ति । कथिती स्वामी परिज्ञानाश्रम, भक्तीप्रती । लाभेल शाश्वत सुख निश्चिती । आचरिता हे नियम जीवनी ॥६२॥
इतुके कथुनी स्वामी वदती । भक्तीत असे अद्वितीय शक्ती । भक्तीयोगे होई ज्ञान प्राप्ती । भक्तासी जीवनान्तरी ॥६३॥
गुरुमंत्र तपावा श्रद्धायुक्त । जाणून योग्य अर्थ खचित । नेणे प्राप्त होत आत्मज्ञान निश्र्चित । वदती स्वामी परिज्ञानाश्रम ॥६४॥
विज्ञान विषयी अनेक प्रश्न । पुसिले भक्तांनी स्वामींसी महान । अध्यात्म, विज्ञानविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करिती भक्त स्वामीसंगे ॥६५॥
रुद्राक्ष, अजपाजप । स्वस्तिक, शाळिग्राम स्वरूप । गीता, उपनिषद्, ब्रह्मसूत्र साररूप । आणिक विविध साधना ॥६६॥
पाणिनी लिखित संस्कृत व्याकरण । 'वेदान्तिकसत्य' महत्त्वपूर्ण । आधुनिक पदार्थविज्ञान । तसेच इलेक्ट्रॉनिक शास्त्र ॥६७॥
ज्ञान विज्ञान परस्पर संबंध गहन । कोंकणी परिभाषा महत्त्वपूर्ण । श्वान व पशु संवर्धन । तसेची स्वादपूर्ण सारस्वत स्वयंपाक ॥६८॥
ऐशा नाना विषयी संभाषण । ऐकूनी जाहले विस्मित जन । स्वामीनी तीक्ष्ण बुद्धी अवलोकून । धन्य म्हणती भक्त सारे ॥६९॥
चानुर्मासामाजी नित्य । नरहरी आचार्यकृत 'बोधसार' स्तुत्य । कोंकणी व संस्कृतातूनी नित्य । उपदेशिती भक्तांसी ॥७०॥
जन्माष्टमीच्या शुभदिनी । पूज्य परिज्ञानाश्रम स्वामीनी । 'भक्ती रसायन' विषयी आशीवर्चन देऊनी । आशिष दिला श्रोत्यांसी ॥७९॥
नित्य होई पूजा पठण । रात्रौ होई पवित्र अष्टावधान । भजन, आशीवर्चन, गुरुदर्शन । याचा लाभ घेती जन ॥७२॥
भक्तांनी दिधले कॅनडात । 'मानपत्र' प्रेमे स्वामींप्रत । केले भक्तीभावे सन्मानित । सारस्वत भक्तवृंदातर्फे ॥७३॥
आले भक्त बहुसंख्य । अमेरिकन, भारतीय नागरिक । श्रवणार्थ आशीर्वचन सुरेख । स्वामी परिज्ञानाश्रमांचे ॥७४॥
लंडन येथे स्वामी येता । सहर्ष सत्कार भक्तांनी करिता । आनंदले स्वामी पाहता । भक्तांचा उत्साह असीम भक्ती प्रेम ॥७५॥
तेथील पर्यटन व्यवस्था । भक्तांनी आयोजिली संपूर्णतः । फ्रान्स, इटली स्विझर्लंड पाहता । संतोषले मनी स्वामीजी ॥७६॥
परदेशी यशस्वी दौरा करून । भक्तासंगे परतले स्वामी दयाघन । श्री भवानीशंकर मूर्तीसहित पावन । तीस सप्टेंबर एकोणसत्तरासी ॥७७॥
भारतांत आम्ही विचारिला प्रश्न एक । जरी म्हणावे जग मायामयसम्यक । सृष्टी दिसे जी नयनी सुरेख । ती वसे कोणत्या रितीने ॥७८॥
श्रवण करा स्वामींचे उत्तर महान । दावी विज्ञानज्ञानाची जाण । स्वामींच्या चातुर्य प्रतिभेचे लक्षण । दिसे उत्तरातून ॥७९॥
भक्तांस स्वामी वदती । इच्छा उद्भवता परमात्मचित्त । शक्ती प्रसवली जगती । दोन्ही असती एक रूप ॥८०॥
नाद‌ब्रह्माच्या पटावरी । पंचमहाभूते निर्मिली सारी । अणू घेऊनी विविध प्रमाणांतरी । निर्मिले विश्व त्यातूनी ॥८१॥
विविध अणूंच्या विविध युती । जणू पदार्थापरी भासती । प्रोट्रॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन जगती । ओविले अक्षांश रेखांश रूपे ॥८२॥
या विविधाणूंचा समन्वय । पाहता येई जगताचा प्रत्यय । परि मूळ लाइफट्रॉन करी कार्यान्वय । या साऱ्या अणूंसी ॥८३॥
याचा उगम अंत अगम्य कुणासी । नच उमगेल प्रयत्नान्तीही शास्त्रज्ञांसी । जेथूनी मिळे जीवन अणूंसी । असे अलौकिक निसर्गसृष्टी ॥८४॥
परमाणु शोध लागला शास्त्रज्ञांसी । तरी मूळ नकळे कुणासी । अथवा त्याच्या स्वरूप लक्षणासी । या विशाल मायामय ब्रह्मांडी ॥८५॥
पदार्थाचा संहार होणे । म्हणजेची अणूंचे विघटन होणे । अखंडित शक्ति स्त्रोत खुंटणे । हाची त्याचा अर्थ असे ॥८६॥
वस्तू, काया विघटन होता । मिळे प्रतितत्त्व पंचमहाभूतात संपूर्णतः । परमात्म्याची इच्छा मिटता । मिसळती पंचमहाभूते सत् स्वरूपांतरी ॥८७॥
असे ऐकावे निरूपण । श्री परिज्ञानाश्रमांविषयी महान । काय वर्तले परतता मायदेशात पावन । त्या विषयी सत्यघटित ॥८८॥
पुनश्र्च येता मायदेशात । भक्तांनी सन्मानिले स्वामींस येथ । परि विजयी जाहले दुर्दैव परत । असत्य वार्ता समाजांत पसरल्या ॥८९॥
परदेश वास्तव्य संबंधांत । अपप्रचार जाहला अमित । विपर्यासाने वेढीले निश्चित । काही जनांनी सबळपणे ॥९०॥
यावरी क्षणभरी होऊनी व्यथित । प्रार्थिनी स्वामी मनांत । सद्गुरु आनंदाश्रमांनी त्वरित । परिसावे त्या विषयी ॥९१॥
‘‘सद्गुरु तुम्ही दिले धर्मपीठ स्तुत्य । ज्या कारणे लाभले मठाधिपत्य । पसरल्या सर्वत्र वार्ता असत्य । माजला कल्लोळ समाजात ॥९२॥
मठाधिपत्याचा सन्मान त्वचित । नत्र इच्छिला आम्ही निश्र्चित । अधिकार तुम्हांकडोन प्राप्त । तरी आज्ञा आता मज द्यावी’’ ॥९३॥
ऐसे मनोमनी प्रार्थूनी । गेले विराम कक्षेत निघूनी । वचनापरी श्री आनंदाश्रमांनी । दिली अनुज्ञा मठाधिपत्य न्यागार्थ ॥९४॥
लाभता अनुज्ञा सद्गुरूंची। त्यजिली सूत्रे मठाधिपत्याची । केली स्वामींनी घोषणा त्याची । चित्रापूर सारस्वत समाजांत ॥९४॥
बळेंची घेऊनी स्वाक्षरी पत्रात । काहींनी भाग पाडिले खचित । कानगोष्टी ऐशा जाहल्या निर्मित । चित्रापूर सारस्वतांमाजी ॥९६॥
स्वयें सूत्रे त्यजिली स्वामींनी । अथवा जबरदस्ती केली कांही जनांनी । हा प्रश्न जरी वेढे भक्तमनी । तरी एक वार्ता सत्य असे ॥९७॥
‘‘आम्ही सद्गुरु प्रेरणेपरी । त्यजितो मठाधिपत्य सूत्रे सारी’’ । घोषित केले स्वामींनी सत्वरी । योग्य समयी भक्तांसी ॥९८॥
हे असे सत्य त्रिवार । स्वामींचे आशीर्वचन ज्याचा आधार । कलहाचे मूळ संशय साकार । आणिक पुरोगामी प्रतिगामी द्वंद्व ॥९९॥
अंतर्यामी प्रशांत सोज्वळ । पूज्य परिज्ञानाश्रम प्रेमळ । भाव पाहती भक्तांचा अंमळ । त्यजूनी मठाधिपत्य सूत्रे ॥१००॥
भक्त आले दर्शनार्थ । विनविण्या सद्गुरुमूर्ती समर्थ । प्रार्थिती श्री परिज्ञानाश्रमांसी सार्थ । 'नच त्यजावे मठाधिपत्य'  ॥१०१॥
तोषले भक्त प्रार्थना ऐकून । परी न स्वीकारिला मठाधिपत्य मान । 'सद्गुरु आज्ञा आम्हा प्रमाण’ । वदती स्वामी परिज्ञानाश्रम ॥१०२॥
‘‘आज्ञा सद्गुरुंची उल्लंघून । कदापी न वर्तेन जीवन संपूर्ण । आज्ञा मिळाल्यासी पुनश्च परिपूर्ण । स्वीकारु मठाधिपत्य ॥१०३॥
त्यजिले जरी मठाधिपत्य सार्थ । नच सोडू आम्ही परमार्थ । भक्तजीवन करण्या कृतार्थ । झटेन निश्र्चये जीवनी ॥१०४॥
असू आम्ही नामान्य संन्याशी । विश्वंभर उभा आमुच्या पाठीशी । किं कारणे भ्यावे कुणासी । विश्वची सारे घर माझे’’ ॥१०५॥
करिता त्याग मठधिपत्याचा । हक्क नसे मठांत राहण्याचा । प्रश्न गहन वादाचा । उद्‌भवला जनमानसी ॥१०६॥
ऐशिया कठीण स्थितीत । मुंबईतील खार आनंदाश्रम मठांत । व असंख्य भक्तांच्या गृहात । राहिले काही काळवरी ॥१०७॥
सन एक्याऐंशी प्रारंभात । लोणावळा बांगरवाडी येथ । स्वामीजी राहिले निवांत । भक्त रमेश कर्णिक गृही ॥१०८॥
रम्य परिसर लोणावळ्यचा । आवडे स्वामींस साचा । बांधावा आश्रम येथे आमुचा । ऐसे चिंतिती स्वामी ॥१०९॥
श्री देवी एकवीरेच्या डोंगर पायथ्यावर । मुंबई पुणे हमरस्त्यावर । कार्ला ग्रामी सत्वर । विक्रये घेतली भूमी आश्रमार्थ ॥११०॥
येथ नच संपला वाद । उद्‌भवला नूतन वाद । हक्क होती सर्व बाद ।  त्यजता मठाधिपत्य एकवार ॥१११॥
पुनश्च सूत्रे मठाधिपत्याची । कां द्यावी स्वामींसी महत्त्वाची । ऐशापरी गहन वादाची । वैचारिक शृंखला उपजली ॥११२॥
द्वंद्वयुक्त या शृंखलेने । द्विखंड निर्मिले सहजतेने । मानवी तीव्र अहंकाराने । विभागिले चित्रापूर सारस्वतांसी ॥११३॥
षड्रिपूंचा करुनी चित्ती अंगिकार । प्रत्येक म्हणे मीच शुद्धसाचार । विषण्णतेने स्वीकारिला सर्वाधिकार । चित्रापूर सारस्वतांतरी ॥११४॥
वादी प्रतिवाद्यांच्या द्वंद्वात । स्वामी सापडले विवंचनेत । बाल तरुण वृद्ध समस्त । जाहले संभ्रमित चित्तांत ॥११५॥
ऐशिया विपरित संकटकाळी । भक्तोद्धारार्थ स्वामींनी समुळी । समर्पिले सर्वस्व सदाकाळी । जनसेवे कारणे ॥११६॥
ऐहिक प्रश्र्न घेऊनी आले । अगणित भाविक भक्त चांगले । सकल विघ्ने निरसुनी उद्धरिले । स्वामींनी स्वभक्तांसी ॥११७॥
केली गरजवंतांसी मदत । उद्धरिले अगण्य भक्त । संकटी शीघ्र धावुनी खचित । रक्षिले तिन्ही त्रिकाळी ॥११८॥
कित्येकांसी दिधले सदेह दर्शन । दृष्टान्ताने केले शंका समाधान । केली सर्व विघ्ने दहन । आपुल्या कृपाबळे ॥११९॥
दिधले अनेकांसी जीवनदान । अनारोग्य अस्वास्थ निरसिले पूर्ण । तारिले साधकांसी भवरोगांतूनी । दावुनिया मोक्षपंथा ॥१२०॥
स्वामींच्या अद्वितीय कृपेचे उदाहरण । परिसा जे महत्त्वपूर्ण । दावी तपोबलाचे महिमान । स्वामी परिज्ञानाश्रमांच्या ॥१२१॥
एका भक्तावरी आले विपरीत कष्ट । व्याधी विघ्नरूपे अरिष्ट । परि नच वदे तो भक्त श्रेष्ठ । कोणासही आपुली चिंता ॥१२२॥
एकदा मध्यान्ही पावणे-तीन वाजता । प्रगटले स्वामी प्रत्यक्षत: भक्त स्वस्थ बैसला असता । स्वगृही मुंबापुरी माजी ॥१२३॥
‍स्वामी होते तेव्हा बेंगळूरात । प्रगटुनी म्हणती भक्ताप्रत । ‘‘जाणतो आम्ही तव कष्ट समस्त । चिंता मुळी करु नये ॥१२४॥
तव मन आवरी समूळ । नच विचलित होऊ दे कदाकाळ । श्री भवानीशंकर तो निर्मळ । रक्षील तव कुटुंबासी सर्वदा ॥१२५॥
विश्र्वंभरावरी तव विश्र्वास । कदापि न जाईल फुका खास । धरी हा दृढ आत्मविश्वास । तव अंतरी तो सदा वसे’’ ॥१२६॥
बोलुनी इतुके क्षणात । अंतर्धान पावले प्रत्यक्षात । भांबावला भक्त मनात । म्हणे 'नच स्पर्शिले गुरुचरण' ॥१२७॥
सदेह गुरु साकार प्रगटले । मज मूढासी नच स्मरले । की गुरुचरण वंदावे यावेळे । चिंती भक्त तो मनीं ॥१२८॥
परिसावे दुजे उदाहरण । प्रार्थनापत्र धाडी सारस्वत सज्जन । की ‘‘मम मातेचे मानस संतुलन । बिघडले अचानकपणे ॥१२९॥
वैद्यांनी केले नाना उपाय । तरी वंदितो आपुले चरणद्वय । देऊनी आम्हा आता अभय । तारी सद्गुरु दयाघना" ॥१३०॥
इतुकेची लिहूनी प्रार्थनापत्र । धाडिले भक्तिभावे पवित्र । वदिले नच कदापी जनां अन्यत्र । कोणासी गृहांतरी ॥१३१॥
प्रत्युत्तर स्वामींचे आले । श्री भवानीशंकर प्रसादासहित भले । की ‘‘पूर्ववत आरोग्य लाभेल यावेळे । श्री भवानीशंकर कृपे तव मातेसी ॥१३२॥
गुरु आनंदाश्रमांनी दिधला । तव मातेसी शिवपंचाक्षरी मंत्र भला । तो स्मरणे तिने संपूर्ण सोडिला । सुरु करावा तो पूर्ववत ॥१३३॥
दरम्यानच्या काळी तिजसी । द्यावे योग्य औषधोपचारासी । भगवत् कृपे लाभेल तिजसी । पूर्ववत मनःशांति’’ ॥१३४॥
लाभता स्वामींचा आशीष परिपूर्ण । पूर्ववत जाहले आरोग्य संपूर्ण । स्मरु लागली भक्तीभावपूर्ण । शिवपंचाक्षरी जप श्रेष्ठ ॥१३५॥
या विषयी विचारा स्वमानसी । कीं ज्ञात कैसे जाहले स्वामींसी । भक्ताच्या विघ्न विषयासी । जे अज्ञात स्वयें भक्ता ॥१३५॥
श्री आनंदाश्रमांनी दिला उपदेश । कैसे स्वामींसी कळले विशेष । कसे प्रगटले सदेह विशेष । विचार करा सज्जनहो ॥१३७॥
भक्तोद्धारक श्री परिज्ञानाश्रम गुरु । यांच्या तपोबल अविष्कारु । दावी अद्वितीय अगम्य स्वरूपाकारु । सदेह सदुरुरूपे ॥१३८॥
स्वामींची कृपा असीम । योजिले जरी कथिण्या संपूर्ण जन्म । तरी अपुरा पडेल हा जन्म । शब्दांत वर्णावयासी ॥१३९॥
जाती धर्म भेदाविण सर्वांसी । उद्धरिले अभय देऊनी त्यांसी । आस्तिक नास्तिक सर्व जनांसी । प्रेमभावे प्रतिपाळिले ॥१४०॥
दीन होतकरु विद्यार्थ्यांसी । देऊनी धन स्वनिधीतून शिक्षणासी । अध्ययन संपूर्ण करण्यासी । दिधले प्रोत्साहन प्रेमभरे ॥१४१॥
लाभली ऐच्छिक नोकरी अनेकांसी । मिळावी रोगमुक्ती रुग्णांसी । जाहली संतानप्राप्ती निपुत्रिकांसी । स्वामी परिज्ञानाश्रम भक्त ॥१४२॥
आर्थिक संकट समयासी । धैर्य देऊनी दुःखितासी । उन्नति पथावर आणूनी भक्तांसी । केले सुखी समृद्ध ॥१४३॥
तन मन दुर्बलांस्तव विरार येथे । स्थापिली संस्था प्रेमे तेथे । पुनरूज्जीवन कार्य आरंभिले सर्वार्थ । तन मन दुर्बलांसाठी ॥१४४॥
'श्री परिज्ञानाश्रम एज्युकेशन अॅण्ड वोकेशनल सेण्टर' । नामासहित मनोहर । व्यवस्थापन योजूनी सुंदर । आरंभिले सत्कार्य ॥१४५॥
दुर्दैवी दुबळ्यांस्तव । असावी एक संस्था अभिनव । 'शांत सुखदा' नामक संस्था कार्यास्तव । निर्मिण्या योजिले स्वामींनी ॥१४६॥
निरक्षरांसी करण्या साक्षर । लघु उद्योगां उत्तेजिण्या सत्वर । योजूनी खेडोपाडी शिबिर । औषधोपचार संस्था करी ॥१४७॥
धार्मिक कार्यास्तव उत्तेजन दिधले । युवापिढीसी स्वामींनी चांगले । दत्तजयंती उत्सवार्थ आज्ञापिले । स्वामी परिज्ञानाश्रमांनी ॥१४८॥
'तालमकी वाडी युथ असोशिएशन' । ही संस्था करुनी स्थापन । तालमकी वाडीतील तरूण । साजरा करिती दत्तजयंती सोहळा ॥१४९॥
प्रथम वर्षी कनकाभिषेक । केला सुवर्ण पुष्पांचा अभिषेक । मंत्रघोषात स्वामींवरी सुरेख । दत्तजयंती उत्सवात ॥१५०॥
द्वितीय वर्षी शतचंडी होम । आदिशक्तीसी आवाहन परम । यथोचित विधीयुक्त सुगम । जाहला स्वामींच्या उपस्थितीत ॥१५१॥
तृतीय वर्षी महारुद्राभिषेक । महारुद्र आळविती वैदिक । भक्तीभावे जमले भाविक । पाहण्या अनुपम सोहळा ॥१५२॥
अंतिम दिनी अन्नसंतर्पण । सर्व भक्तगणांसी भोजन । पालखी उत्सव महान । होई दत्तजयंती उत्सवात ॥१५३॥
स्वामींनी करिता महानिर्वाण । पादुका पूजिती भक्तगण । कार्ल्याहूनी पदयात्रा करुन । आणिती प्रेमे पादुकांसी ॥१५४॥
धर्म संस्कृती विज्ञान । जनसेवा, मानवता अध्यात्म ज्ञान । एकरूपतेचा धागा अद्वैत ज्ञान । दाविले स्वामींनी भक्तांसी ॥१५५॥
द्वैतातील अद्वैत सत्य । अद्वैतातील द्वैत जे भासे नित्य । उपदेश व वर्तनातूनी समन्वय स्तुत्य । दाविला स्वामींनी ॥१५६॥
इतुके करुनी शब्दांकन । स्वामी परिज्ञानाश्रमांसी वंदून । अर्पिते गुरुचरणी भावपूर्ण । द्विषष्टद‌शाध्याय पवित्र हा
॥१५७॥
अध्याय ॥६२॥
ओव्या १५७॥
ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति द्विषष्टदशाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP