चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५८॥
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
प्रथम वंदन श्रीगणेशासी । तैसेंची माता सरस्वतीसी । कुलस्वामिनी जगदंबेसी । अत्यादरें वंदन ॥१॥
वंदन माझें भवानीशंकरासी । भक्तरक्षक श्रीमहांगिरीशानी । आणिक वंदितें महालक्ष्मीसी । नत मस्तक होवोनि ॥२॥
नमन सद्गुरु आनंदाश्रमांसी । आणिक माझिया सिद्धारुढांसी । नमित श्रीगुरुच्या परंपरेसी । लीन होवोनी चरणीं ॥३॥
आतां वंदितें परिज्ञानाश्रमा। तयां पाहतां आनंद आम्हां । जन सौख्यासी नुरली सीमा । लाभोनियां तयातें ॥४॥
नव्या गुरुंना नवरत्नांची । परंपरेला रत्नहाराची । मागिल अध्यायीं उपमा साची । दिधली गुरुदासानें ॥५॥
परिज्ञानाश्रम शिष्य लहान । रत्नजडित पदका समान । रत्नहारीं त्या शोभती जाण । परंपरेमाजीं साजिरें ॥६॥
करितें मातापित्यांसी वंदना । तैसेचि सासूश्वशुरांस जाणा । फिटों ना शके तयांच्या ऋणा । पूर्व पुण्ये लाभलीं ॥७॥
येथवरी करविलें चरित्र लेखन । माझिया जेष्ठची भगिनीकडोन । जाहले अध्याय सत्तावन्न पूर्ण । सकळिकांच्या कृपेनें ॥८॥
तैसीच द्यावी मजला स्फूर्ती । गाईन मीही श्रीगुरु कीर्ति । कर जोडोनी तुम्हां प्रार्थी । मंदमती मी पामर ॥९॥
देवोनियां मजला सुबुद्धी । करवावी ती ग्रंथवृद्धी । तेणें होईल कार्य सिद्धि । आशीर्वचनें तुमचिया ॥१०॥
चालेल कैसी माझी झरणी । तुमच्या कृपे वांचोनी । काठीविना चालोनी । जाय कैसा जन्मांध ॥११॥
म्हणोनी सकलांसी माझी प्रार्थना । उत्स्फूर्त करावें मज लेखना । करा मजवरी तुम्ही करुणा । प्रेमभावें सकलही ॥१२॥
शेवटीं नमितें श्रोते सज्जन । ऐका चित्तें सावधान। अध्याय असे हा परी नूतन । लिहावयासी घेतला ॥१३॥
एक रात्रीं भासे मजला । कीं गुरुंनीं आदेश दिधला । घेई आतां लिहावयाला । नूतन अध्याय सत्वरीं ॥१४॥
येथवरी लिहिली सुरम्य कथा । वर्णियला नऊ गुरुगाथा । दशम जाणे उरली आतां । श्रीपरिज्ञानाश्रमांची ॥१५॥
जाहला असे शिष्यस्वीकार । सोहळा तो अपूर्व फार । लिही बाई त्याचें सार । ऐसी आज्ञा जाहली ॥१९॥
शिरसावंद्य ती मानियली । गुरुची आज्ञा ऐकियली। लेखनासी सुरुवात केली । ऐका श्रोते प्रेमळ ॥१७॥
जय जयाजी स्वामीराया । आनंदाश्रम श्रीसद्गुरु सदया । शरण आलें मी तव पायां । वरद हस्ता शिरीं ठेवा ॥१८॥
नाहीं केली कधीं भक्ती । कैंची मिळावी मग मज मुक्ती । परी ऐकोनी तव मुखोक्ती । मन:शांती लाभली ॥१९॥
भवार्णवीं मी बुडालें खास । विसरोनियां निजरूपास । आधार द्यावा बुडत्यास । तव कृपेचा तरावया ॥२०॥
आतां माझें हेंची मागणे । कर जोडोनी तव पदीं जाणे । कीं मम हस्तें कथा लिहविणें । स्फुर्ती मजला देवोनी ॥२१॥
कृपा असावी मजवरी ताता । आरंभ कग्निं लिहिण्यासी कथा । एका प्रेमळ श्रोते आतां । चित्त करोनी एकाग्र ॥२०॥
कथा आहे सुरस सुंदर । ऐकावी हो तुम्ही सादर । निवारण होतील चिंता पार । लाभेल शांती मानसा ॥२३॥
चित्रापुरींचा पवित्र मठ । असे सारस्वतांचे धर्मपीठ । बहु मानिती धर्मनिष्ठ । अत्यादरें करोनियां ॥२४॥
करावयासी धर्म रक्षणा । लावोनी तयांचे प्राण पणा । गुरुपरंपरा झटली जाणा । आजवरी बहुतची ॥२५॥
परिज्ञानाश्रम आदी करोन । दशम गुरुंचे दशक पूर्ण । सारस्वतांचे पूर्व पुण्य । म्हणोनियां तें लाभलें ॥२६॥
करोनियां सद्धर्म जागृती । संत सद्गुरु जन उद्धरिती । विस्तारोनी शिकविती । मर्म सनातन धर्माचें ॥२७॥
ऐशा दिव्य परंपरेचे । नवम गुरु जे असती आमुचे । आनंदाश्रम नाम तयांचे । महाज्ञानी थोर ते ॥२८॥
असती आतां मठाधिपती । लोककल्याणास्तव झटती । करोनियां शिष्यस्वीकृती । मठ परंपरा रक्षिती ॥२९॥
बुडालों आम्ही मोहांधकारीं । परि तिमिरातें गुरु नाश करी । दिव्य प्रकाश तोची पसरी । ज्ञानदीप लावोनी ॥३०॥
संसारांत आमुचें लक्ष । तोच आम्हां मूढां मोक्ष । परी स्वामी निरपेक्ष । मार्ग आम्हां दाविती ॥३१॥
गुरु असे ज्ञातीचें भूषण । जगीं नसे गुरुवीण । अन्य दुजेंची वरदान । पूज्य होय सकलांसी ॥३२॥
सद्गुरु आमुचा माता पिता । तोचि रक्षितो आम्हां सर्वथा । गुरुविना कवणाही अन्यथा । आत्मज्ञान लाभेना ॥३३॥
दुस्तर असे भवसागरू । भक्तीरूपी उभें तारूं । सद्गुरु तो कर्णधारू । निवृत्ती तटासी नेतसे ॥३४॥
कलियुगीं नरदेह प्राप्ती । अति दुर्लभ ती श्रीगुरुभक्ती । पुण्यें लाभे सत्संगती । ब्रह्मादिकां जी दुर्लभ ॥३५॥
ऐसी ही सुखप्राप्ती । मृत्युलोकीं देव वांछिती । नाथ वर्णिती भागवतीं । गुरुमाहात्म्य ऐसें तें ॥३६॥
माता जैसी बालकाला । तैसे सद्गुरु प्रिय शिष्याला । सदा संभाळिती तयाला । प्रेमामृत पाजोनी ॥३७॥
दुखविती ना तयाच्या भावना । परी रुजविती सद्भावना । पूर्ण करिती मन कामना । वात्सल्यातें स्वीकारुनी ॥३८॥
शिष्य जरी असे अज्ञ । त्यासी करिती स्थितप्रज्ञ । करिती तयासी सर्वज्ञ । दशेंद्रियांसी जिंकवुनीं ॥३९॥
काया वाचा आणिक मन । कैसे आवरावे दृढ धरोन । तुटों न द्यावें अनुसंधान । प्रेमें शिकविती शिष्यासी ॥४०॥
जीव परमात्मा दोन्ही एक । श्रुती वचनें सांगती चोख । ऐक्य भोगणें परमात्म सुख । विज्ञान सम्यक त्या नांव ॥४१॥
षड्रिपूंसी जिंकविती । अहंकारातें भस्म करिती । कर्म अकर्म तया बोधिती । निजात्म दर्शन करवोनी ॥४२॥
ऐसें श्रीआनंदाश्रम स्वामी करिती । प्रिय शिष्यासी सिद्ध बनविती । भक्तांसाठीं ऐसा उजळिती । गुरुपरंपरादीप उज्ज्वल ॥४३॥
गुरुशिष्यांची गोड ही कथा । निवारील ती भवभय चिंता । सावध करोनि तुमच्या चित्ता । ऐका श्रोते हो पुढती ॥४४॥
आज ऐसाचि काळ पातला । जगीं धन दौलतीं मान चढला । देव धर्म आणिक गुरुला । मानिती ना निःशंक ॥४५॥
मानिती ना ते शास्त्र वेद । वृधा चाले वितंडवाद । संत सज्जनांचा सुबोध । नास्तिकांसी पटेना ॥४६॥
नास्तिकवादी पटवून देती । देव नसे कीं खचित जगतीं । उदय पावे मानव म्हणती । स्वबुद्धीच्या आधारें ॥४७॥
मानिती ना वर्णाश्रम धर्म । नाहीं उरले क्रियाकर्म । श्रद्धा भक्ती यांचे मर्म । नुमगे हो कवणासी ॥४८॥
जाणोनी या परिस्थितीसी । विचार पडला स्वामींजीसी । पाहिजे का सारस्वत ज्ञातीसी । धर्मपीठ जागृत ॥४९॥
जरी न मानिती धर्मासी । कोण पूजील मठासी । कासया पाहिजे गुरु यांसी । संदेह वाटे गुरु मानसा ॥५०॥
श्रीमत् आनंदाश्रम श्रीसद्गुरु । करिती अंतरीं दीर्घ विचारू । करावा का शिष्यत्वीकारू । ऐशा दुर्घट समयासी ॥५१॥
परी घडली विचित्र घटना । देवोनियां दिव्य प्रेरणा । उद्युक्त केलें लोकांना । श्रीभवानीशंकरें ॥५२॥
श्रीभवानीशंकराचें मनांत । आला असे दुजाची हेत । कीं गुरुपरपरेचें व्रत । ऐसें अखंड चालवावें ॥५३॥
उत्स्फूर्त करी जन मनासी । देवोनियां आशीर्वचनासी । उभी राहिली पाठीसीं । गुरुपरंपरा महान ती ॥५४॥
ध्यान लागतसे लोकांना । शिष्यासाठी करिती याचना । श्रीमत् आनंदाश्रम स्वामींना । पेंच पडला मानसीं ॥५५॥
एका मागोन एक येती । स्वामीलागीं एकच पुसती । होईल केधवां शिष्यस्वीकृती । द्यावें आश्वासन आम्हां ॥५६॥
पाहोनि या जन उत्साहा । आनंदले स्वामी अहा । परमेश्र्वराचा खेळ पहा । कैसा असे अघटित ॥५७॥
मग श्री आनंदाश्रम गुरुवर । शोधूं लागले शिष्य सत्वर । दृष्टी पुढें तो येई रवीन्द्र । सान सद्भक्त तयांचा ॥५८॥
आणोनी तयाची कुंडली । महाशास्त्र्यांस दाखविली । जन्म पत्रिका सुंदर जमली । सकल गुणें जी युक्त ॥५९॥
आतां ऐका रवीन्द्र कोण । शुक्ल कुलाचा असे पुत्र सुजाण । पिता तयात्रा शंकरनारायण । माता शांताबाई असे ॥६०॥
नाम वेदमूर्ती शुक्ल लक्ष्मण । जयांचे । पितामह ते रवीन्द्राचे । परमार्थ साधनीं चित्त आजीचें । नाम जियेचें असे कमला ॥६१॥
अठराशें एकोणसत्तरांत । पवित्र चित्रापूरे ग्रामांत । ज्येष्ठमासीं कृष्णपक्षांत । रवीन्द्र बाळ जन्मला ॥६२॥
होतें सर्वजित नाम संवत्सर । एकादशीचा दोन प्रहर । होता मंगल रविचा वार । ठेविलें रवीन्द्र नाम तया ॥६३॥
बाळ होता सुकुमार । तेजःपुंज ती काया सुंदर । सरल नामिका नयन मनोहर । गुलाब फुलले जणुं गालीं ॥६४॥
शुल्केंदु सारिखें बाळ वाढलें । आरोग्यें बहु पुष्ट जाहलें । जननीचें मानस धालें । पाहोनियां बालमूर्ति ॥६५॥
बाळ झाला मोठा आतां । चार वरुषांचा तो पुरता । रोज नेई रवीन्द्राची माता । देवदर्शनासाठीं तया ॥६६॥
मठ असे तैं घराजवळीं । पूजा कीर्तन वेळोवेळी । भजन चाले सांज सकाळीं । बाळ श्रवण करीतसे ॥६७॥
नित्य प्रातः कालीं जाई । हस्तीं घेवोनी मोगरा जुई । भावें वाही प्रभूपायीं । लीन होवोनी चरणीं ॥६८॥
वंदन करी भवानीशंकरासी । आणिक समस्त समाधींसी । नमित आनंदाश्रम सद्गुरुंसी । उपहारातें देवोनियां ॥६९॥
मग प्रसादासी ग्रहण करणें । गुरुदर्शनाविना नाहींच खाणें । नित्य नेम तयाचा जाणें । कधींच न पडे अंतर ॥७०॥
स्वामींना जरी उशीर जाहला । बाळ उपाशी तैसा राहिला । एक ग्रासही कधीं न स्पर्शिला । स्वामीविना बालकें ॥७१॥
पहा कैसा तो मन संयम । कठीण असे हा नित्यनियम । भक्ती असेची अप्रतिम । सानुल्या त्या रवीन्द्राची ॥७२॥
इतर बालकांची असे रीती । खाऊ पाहतां उडी घालिती । ग्रास हातींचा कोणा न देती । बाल स्वभाव हा असे ॥७३॥
परि हें बालक असे आगळें । इतरांहुनी भासे वेगळे । मुखावरी त्या तेज झळाळे । अपूर्व त्यागबुद्धीचें ॥७४॥
ऐसी निष्ठा स्वामीचरणीं । मन व्हावें कीर्तन पुराणीं । नित्य शिकतसे सुश्लोक गाणीं । बहुत स्तोत्रे पाठ तया ॥७५॥
सदा सायंकाळी जावें । दीप नमस्कार पाहावे । पुष्प तुळशीचे हार वाहावे । स्वामिजींच्या कंठी तेणें ॥७६॥
प्रसाद म्हणोनी ग्रहण करावे । स्वयेंची गळां घालोन घ्यावे । आजोबांशी हट्ट धरावे । पाद्यपूजा करा माझी ॥७७॥
सांगा तेधवां कवणासी ठावें । कीं त्या पायांची सद्गुरुसवें । पूजा होईल जीवेभावें । भविष्यकाली इयेरीती ॥७८॥
ऐसा होता रवीन्द्र बालक । बाळपणापासोन मोठा साधक । धन्य धन्य तयाचे पालक । पूर्व पुण्य महानची ॥७९॥
रामायण आणि महाभारत । गुरुपरंपरेच्या कथा समस्त । अत्यादरें तो सदा ऐकत । रवीन्द्र बाळ चिमुकला ॥८०॥
रात्रीं जाई पुराणाला । निद्रेची न पर्वा तयाला । स्वामी सांगती जाई बाळा । नीज जावोनी गृहाप्रती ॥८१॥
छे छे म्हणे रवीन्द्रबाळ । निद्रेची न जाहली वेळ । आवडीचा तयाचा खेळ । पुराण श्रवण हाची असे ॥८२॥
ऐसें चाललें बाळपण । भोवतीं पवित्र वातावरण । गृहामाजी असे धार्मिक वळण । शुद्ध संस्कार तयावरी ॥८३॥
माता तयाची अने सोज्ज्वळ । नामा सारखी शांत प्रेमळ । सात्विक त्यागी पिता निर्मळ । आजा आजी भाविक ॥८४॥
पांच वरुषें बाळा जाहलीं । मुंबापुरीं सकळही आलीं । वाकोल्यामाजी तये वेळीं । गृह करिती राहावया ॥८५॥
पोद्दार विद्यालयामाजीं । शिक्षण घेई 'रवीन्द्र सहजीं । होता तृतीय वर्गामाजीं । बुद्धी तयाची बहु तीव्र ॥८६॥
अध्ययनीं तया अत्यंत आवडी । खेळांतही बहु गोडी । विद्यालयी तो मित्र जोडी । अध्यापकांचा लाडका ॥८७॥
वाचेचा असे बहु रसाळ । मनाचाही अति मवाळ । अंतःकरणीं अत्यंत प्रेमळ । प्रिय असे तो सकलांसी ॥८८॥
अष्ट वरुषांचा बाळ होतां । विचार करिती मातापिता । कीं सत्वरची करावें आतां । मौजीबंधन रवीन्द्राचे ॥८९॥
सकल सिद्धता त्वरें करिती । चित्रापुरी ती मुंज बांधिती । समस्त आप्तही गृहीं जमती । थाट काय तो पुसावा ॥९०॥
होते ग्रीष्म ऋतूचे दिवस । मल्लापुरीं अने ग्वामींचा वास । परी येती शिरालीस । मौंजीबंधनासाठी या ॥९१॥
बटूस आशीर्वाद दिधला । धन्य ऐसा बाळ जाहला । पूज्य हस्तें प्रसाद लाभला । रवीन्द्रासी ते समयीं ॥९२॥
जाहली तेधवां एक गंमत । शिखा ठेवणें कोणा न संमत । परी धरिला भलता हेत । रवीन्द्राने तेधवां ॥९३॥
शिखेविना कसा करणें । श्रीशंकरासी अभिषेक जाणे । धर्मबाह्य हें ऐसें वर्तणें । कधिं न करी मी सर्वथा ॥९४॥
ऐसा केला दृढ निश्चय । रवीन्द्राने पाहा निर्भय । शिखा ठेवोनियां जाय । मठाप्रती पूजेसी ॥९५॥
जधीं परतला मुंबापुरी । पावोनी हांसती शिखा ती शिरीं । मित्र बोलती नानापरी । पर्वा न करी रवीन्द्र ॥९६॥
म्हणे ऐशा निंदेस भिवोन । करावें का मी अयोग्य वर्तन । होई सत्वरी केश वर्धन । चिंता नसावी तुम्हांतें ॥९७॥
नित्य करी संध्यावंदन । आणिक गायत्रीचें ध्यान । देवादिकांचे पूजन । सद्भावें तो करीतसे ॥९८॥
असतां ऐसे चालले दिवस । पहा एकदां माटुंग्यास । आनंदाश्रम येती खास । भक्तजनांच्या आग्रहें ॥९९॥
उत्सवाची यादी जाहली । गीता स्पर्धा होती ठेविली । बालकांनी सिद्धता केली । गीता पठनासाठी तैं ॥१००॥
रवीन्द्र असे त्या माजीं एक । पुढे ऐका तुम्ही कवतुक । सहा दिवसांतची चोख । द्वादशाध्याय पाठ करी ॥१०१॥
गावोनी गीता उत्तम जाणे । स्पर्धा जिंकिली रवीन्द्राने । प्रशंसा करी एकमुखानें । जनसमूह जो जमला ॥१०२॥
बाळ असे अजुनी लहान । गीता बोले थोरां समान । गहिंवरले आनंदघन । सद्गुरूराज प्रेमळ ॥१०३॥
आतां पुढती गोष्ट ऐका । सांताक्रुझ ग्रामी देखा । येवोन देती संतोष लोकां । आनंदाश्रय स्वामीजी ॥१०४॥
तेथें चाले नित्य प्रवचन । पूजा आणिक भजन कीर्तन । स्वामी शमविती सकलांची तहान । बोधामृत पाजोनी ॥१०५॥
लोक पूजिती गुरुचे पाद । तयां लागला श्रीगुरुछंद । रवीन्द्राचा थोर आनंद । गगनामाजीं मावेना ॥१०६॥
शाळा सुटते कधीं म्हणावें॥ सद्गुरुप्रती धावोनि जावें तयां सन्निधीं तल्लीन व्हावें । भान नुरावें धामाचें ॥१०७॥
गुरुवरीं ऐसी भक्ती । देवधर्मावरी प्रीती । नित्य जाहल्याविना आरती । गृहा रवीन्द्र जाईना ॥१०८॥
जरि घडतां कांहीं चूक । माता म्हणे रवीन्द्रा ऐक । मान्य करीं तुझी चूक । क्षमा आमुची मागोनी ॥१०९॥
रवींद्र म्हणे कदापि नाहीं । पडेन मीं श्रीगुरुच्या पायीं । पाय कधींही धरणार नाहीं । इतरांचे मी सर्वथा ॥११०॥
तेधवां म्हणती हट्टी बाळ । आज उमजे तयाचें मूळ । गुरुप्रेमाचें तें खूळ । रवीन्द्रासी लागलें ॥१११॥
ऐशा वर्तती बहुत कथा । ग्रंथ विस्तार होईल सांगतां । परी सांगती भविष्य वार्ता । कीं बाळ होईल महात्मा ॥११२॥
एकोणिसशें अठ्ठावन - सालान्तीं । मुंबापुरी स्वामिजी येती । निवास तयांचा दंतोपचाराप्रती । जाहला असे ते स्थळीं ॥११३॥
जेधवां कळली वार्ता ऐसी । शुक्ल शंकरनारायणासी । येती स्वामिजींच्या दर्शनासी । निवासस्थानीं तयांच्या ॥११४॥
शंकरनारायणाचे मन निवालें । अंतःकरणी भाव उमलले । नयन तयाचे आर्द्र जाहले । गुरुमूर्ती पाहोनी ॥११४॥
जवळी तयासीं बोलविती । प्रसादासी आमंत्रिती । सहकुटुंब यावें म्हणती । आनंदश्रम श्रीसद्गुरु ॥११६॥
दुसरे दिवशीं रविवारीं । भोजनासी येती सारीं । भगिनी वल्लभी आणि दुसरीं । शुक्ल कुळींचे प्रमुख ते ॥११७॥
सद्गुरूंनी त्या समयासी । अनुग्रह दिधला शांताबाईसी । त्रयोदशाक्षरी मंत्र तियेसी । उपदेशिला पवित्र ॥११८॥
द्वितीय प्रहरू जधीं उलटला । इष्ट समूहही समस्त जमला । स्वामी भोवतीं सादर बैसला । त्यांचिया आज्ञे करोनियां ॥११९॥
सद्गुरु करिती परमार्थ कथन । उकलोनि सांगती विषय गहन । म्हणती असे नरदेह पावन । सार्थक करा जन्माचें॥१२०॥
शतजन्मींच्या पूर्वपुण्यें । नरदेह दुर्लभ प्राप्त होणें । याची जन्मीं परमार्थ साधणें । कर्तव्य असे मानवाचें ॥१२१॥
सदा करावी भगवद्भक्ति । तीच देईल तुम्हां शांती । तेणेंची लाभेल जीवन्मुक्ती । भगवत् प्राप्ती तेणेंची ॥१२२॥
करा अंतरी हरिस्मरण । श्रवण करावें हरिकीर्तन । जिव्हें करावें हरिगुण गान । नयनीं पाहावें हरिसी ॥१२३॥
सद्गुरु माय आनंदाश्रम । दावी ऐसें भक्तिमाहात्म्य । मार्ग सोपा म्हणती परम । नवविधा भक्तीचा ॥१२४॥
त्यजोनियां परि देहाभिमान । जोडावा श्रीसच्चिदानंदघन । वासनारहित होवोन । आत्मचिंतन करावें ॥१२५॥
सकल भूताचिये देहीं । वसे नित्य परमात्मा पाहीं । तयाविण दुजें कांहीं । त्रैलोक्यीही नसेची ॥१२६॥
प्रपंच करावा बहु सुंदर । आतिथ्यी राहावें सदा तत्पर । परि न विसरा तुम्ही प्रभुवर । नित्यकर्मे करितांना ॥१२७॥
कर्में करोनी व्हावें अकर्ता । देहीं असोनी विदेहता । जाळावी ती समूळ अहंता । विवेक अंगी बाणवावा ॥१२८॥
ऐसें पाजिती बोधामृत । पिवोनि होती श्रोते तृप्त । जाहलें मानस अत्यंत शांत । गुरुवचनातें ऐकोनीं ॥१२९॥
मग वंदिती गुरुंना सकळ । उभा असे तेथें जवळ । रवीन्द्राचा पिता प्रेमळ । पाचारिती त्याजला ॥१३०॥
शंकरनारायणास स्वामी पुसती । सन्निध उभी असे शांती । शुक्ल कुलांतील प्रमुख व्यक्ती । कर जोडोनी ऐकती ॥१३१॥
सुपुत्र तुमचा रवीसमान । द्यावा आम्हां शिष्य म्हणोन । ऐकोनियां हें सद्गुरुवचन । विस्मित समस्त जाहले ॥१३२॥
तीन दिवसांनी कळवा पाहीं । उपरी न बोलले सद्गुरु कांहीं । खूण पटली उभयतांनाहीं । काय अंतरीं चाललें ॥१३३॥
परी न करिती अधिक विचार । माता पितरें खीचीं उदार । शिरसावंद्य वचन थोर । श्रीगुरुंचे मानिती ॥१३४॥
देती उभयतां अनुमोदना । धन्य शंकरनारायणा । धन्य शांताबाई जाणा । धन्य धन्य कुल तयांचे ॥१३५॥
ऐका आतां श्रोते प्रेमळ । पुढील कथा अति रसाळ । न लावी मी बहु पाल्हाळ । ऐका ऐका लवलाहें ॥१३६॥
आशीर्वाद गुरुंचा घेती । परतोनियां गृहासी जाती । विचार करी रात्री शांती । निद्रा न ये तियेसी ॥१३७॥
रवीन्द्र आमुचा पुत्र ज्येष्ठ । आहे खरा बहु श्रेष्ठ । घ्यावे की परि इतुके कष्ट । धर्मपीठा कारणें ॥१३८॥
स्वामीपदावरि आरूढ । होणें आहे अति अवघड । रवीन्द्र बाळ माझा हूड । साधेल कां ते बाळाला ॥१३९॥
धर्मगुरुंचा अधिकारू । आहे जरी अत्यंत थोरु । कर्तव्यें ना करील पारू । बाळ मठाधिपतींची ॥ १४०॥
रवी माझा असे लहान । करील कैसें सकळही सहन । संन्यासाश्रम महा कठीण । देह दंडण विधियुक्त ॥१४१॥
जरी केला दृढ निश्चय । तळमळे ती मनीं माय । विपरीत घडे कैसें काय । दुःख जाहलें अनिवार ॥ १४२॥
निजला असे रवीन्द्र जवळी । निष्पाप कोमल ती मूर्ति सावळी । शांती तयाचें मुख न्याहाळी । चुंबीतसे प्रेमानें ॥१४३॥
चिंतातूर ती जाहली माय । रडे मोकलूनि धाय । व्याकुरली जेवीं गाय । वासरानाठीं तियेच्या ॥१४४॥
विचार करोनि रडतां रडतां । निद्राधीन जाहली माता । भवानीशंकर जगन्नियंता । यई तियेचे स्वप्नांत ॥१४५॥
कर जोडोनि उभी असे । दिव्य प्रकाश ती पाहतसे । तेजोराशी तिजला दिसे । भगवान शंकर प्रगटले ॥१४६॥
उभा रवीन्द्रा जवळी जाणा । अमे साक्षात कैलासराणा । बाळ वंदी दिव्य चरणां । माथां अभय हस्त ठेवियला ॥१४७॥
विस्मित होवोनि माता पाहे । नयनीं घळघळां नीर वाहे । अंतःकरणी जाहली आहे । सद्गदित माउली ॥१४८॥
भिऊ नको बाई व्यर्थ । तुझा पुत्र असे महासमर्थ । जाणोनि घेई पूर्ण अर्थ । श्रीगुरुंच्या वचनांचा ॥१४९॥
ऐसे बोलती उमापती । मातेलागीं धीर देती । अर्पण करीं पुत्र म्हणती । धर्मासाठी निर्भयें ॥१५०॥
बोलोनियां ऐसें वचन अदृश्य जाहले उमारमण । उठली शांती खडबडोन । स्वप्न सांगे पतीसी ॥१५१॥
घडलें जें समग्र कांही । निवेदिलें तें गुरुंना पाहीं । आशीर्वाद येणें मागोनि घेई । शांताबाई तेधवां ॥१५२॥
व्हावें धर्मपीठाचे संरक्षण । तैसेचि व्हावें धर्माचरण । युक्त तें घडा रवीन्द्राकडोन । हेंचि मागणें गुरुचरणीं ॥१५३॥
पति पत्नी भावें उभयतां । शरण जाती सद्गुरुनाथा । कुमार अर्पिला म्हणती ताता । तव पायीं या दिनीं ॥१५४॥
पाय गुरुंचे धरोन बोलती । निरसावी आमुची मोहवृत्ती । सामर्थ्य देईजे आम्हांप्रती । पुत्रविरह साहावया ॥१५५॥
ऐकोनिया आनंदली । आनंदाश्रम श्रीगुरुमाउली । म्हणती देवें कृपा केली । तोचि देईल धैर्य तुम्हां ॥१५६॥
गुप्त ठेवा परि समग्र । म्हणती ते शांतिसागर । नको या गोष्टीचा उच्चार । एधवांच जनांमाजीं ॥१५७॥
ऐसा श्री आनंदाश्रमांनीं । सच्छिष्य घेतला निवडोनी । जैसा अर्जुनास श्रीकृष्णांनीं । धर्म जागृती करावया ॥१५८॥
ज्ञातीमाजी असती अनेक । विद्वान सुंदर चतुर बालक । परी स्वामी निवडिती चोख । रवीन्द्रासी त्यांमाजीं ॥१५९॥
पाहोनियां पात्रापात्रता । शिष्य निवडिला सद्गुरुनीं तत्त्वतां । भविष्य कालींचा धर्मनेता । हंसक्षीर न्यायें बा ॥१६०॥
पातला ऐनाची श्रावण मास । बहर आला वृक्ष लतिकांस । सृष्टीदेवी नटली खास । साज पाचूंचा लेवोनी ॥१६१॥
विविध रंगी पुष्पें फुलती । हरित तृणांकुर तैसे डोलती । मंजुळ गीतें द्विजगण गाती । चैतन्य येई चराचरा ॥१६५॥
ऐशा मंगल समयासी । रवीन्द्र जाई गोकर्णासी । त्या ठायींच चातुर्मासीं । निवास स्वामींचा होता ॥१६३॥
श्रीगुरुंसी शिष्य भेटला । हार तेणें कंठीं वाहिला । गुरु संन्निधीं उभा ठेला । सद्भावें युक्त होवोनी ॥१६४॥
कीं गाय भेटे निज वत्सास। कीं हरिणीसी चुकलें पाडस । उचंबळले हर्षोल्हास । उभयतांचे अंतरीं ॥१६५॥
चार दिवस तो तेथें राहिला । सेवेमाजीं मग्न जाहला । पवित्र गीता दिधली तयाला । गुरुप्रसाद म्हणोनी ॥१६६॥
तृप्त होवोनियां मानसीं । रवीन्द्र गेला चित्रापुरासी । उत्सव चाले अहर्निशीं । गोकुळाष्टमीचा ते स्थळीं ॥१६७॥
अष्टमीच्या मंगल दिवशीं । बैसला होता आजोबांपाशीं । महत्त्वाचा प्रश्न रवीन्द्रासी । पुसियेला पितामहें ॥१६८॥
अरे रवीन्द्रा ऐक सत्वर । कीं स्वामींचा असे विचार । करावा का तव स्वीकार । पट्टशिष्य म्हणोनियां ॥१६९॥
आहे कारे तुझी अनुमती । शिष्य व्हावया स्वामींप्रती । लाभेल तुजला सत्संगती । रात्रंदिन प्रिय सद्गुरुंची ॥१७०॥
पितामह ऐसें पौत्रास बोलती । सांगती तया गुरूंची महती । मातापित्यांचा विचार कळविती । रवीन्द्रासी तेधवां ॥१७१॥
रवीन्द्र बोलला हांसोन । आनंदें मी करीन मान्य । जरी असे का अनुमोदन । मातापित्यांचे याजला ॥१७२॥
ऐकोनि द्रवले सारें गेह । गहिवरले पितामह । अनावर जाहला मोह । जवळी घेती रवीन्द्रासी ॥१७३॥
जाणोनी गुरुंचा थोर विचारू । कीं होईल त्वरें शिष्यस्वीकारू । संतोष जाहला अपरंपारू । रवीन्द्रासी ऐकोनी ॥१७४॥
ऐसी आनंदाची वार्ता । राहेल का ती गुप्तचि आतां । पसरली पैं बोलतां बोलतां । समीरामसम वेगानें ॥१७५॥
ज्ञातीस वाटे आनंद चित्तीं । रवीन्द्राचिया गृहास जाती । कौतुकें तया अवलोकिती । उत्सुक होवोनी मानसीं ॥१७६॥
पाहोनियां वाटे आदर । शिष्य चिमुकला सुकुमार । जयाचें मुखकमल सुंदर । इंदुबिंबा सम भासे ॥१७७॥
कोणी बोलविती भोजनासी । निमंत्रिती उपहारासी । देती कोणी अहेरासी । रवीन्द्रानी प्रेमानें ॥१७८॥
ऐसें चाले कोडकौतुक । रवीन्द्र बाळाचिये अनेक । लाभे सकलां अत्यंत सुख । वर्णावया मी असमर्थ ॥१७९॥
शिष्यस्वामींची कथा सोज्ज्वळ । सांगावयासी पैं ती सकळ । मज मूढेला नसेचि बळ । क्षमा करावी सकळिकीं ॥१८०॥
असो आतां पुढील अध्यायीं । आनंदाश्रम सद्गुरुमाई । निज अंकावरी शिष्य घेई । अपूर्व सोहळा तो असे ॥१८१॥
यावरी सांगूं पुढें विवरण । अध्याय संपवू परि येथोन । उपरि ऐका गोड निरूपण । परम रसाळ असे जें ॥१८२॥
नागरकट्टी शांताबाईनें । जरी लिहिलें स्वहस्तानें । परि लिहविलें परमात्म्यानें । स्फूर्ति तिजला देवोनी ॥१८३॥
श्रीसद्गुरुची कृपा जाहली । म्हणोनि तियेची लेखणी चालली । काव्य रचना तैसी घडली । परम गुरुचिया कृपेची ॥१८४॥
श्रीगुरुपरंपरा चरित्र सुंदर । ऐकतां नासती पापें थोर । जयांत शिष्याचें शैशव समग्र । अष्टपंचाशत्तमोध्याय गोड हा ॥१८५॥
अध्याय ॥५८॥
ओव्या १८५॥
॥ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणामस्तु ॥
॥ इति अष्टपंचाशत्तमोध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2024
TOP