मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥३५॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥३५॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीपांडुरंगाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥
जय जय सद्गुरो करुणासागरा । तारीं तूं या अज्ञ पामरा । तुजवीण अन्य नाहीं आसरा । दीनालागीं निश्र्चयेंसीं ॥१॥
तुझ्या कृपेंचि जन पावती । निश्र्चयें बापा मोक्षाप्रति । म्हणोनि देवा आम्हां जगतीं । हेचि चरण लाभोत बा ॥२॥
तूं जरी टाकिलेंस मजला । कोणका नेईल परमपदाला । तुजवीण जन्म व्यर्थचि जाहला । ऐसें वाटतें मजलागीं ॥३॥
जरी म्यां केला अन्याय थोर । तरी तूं देवा कृपासागर । क्षमा करोनि उद्धरीं सत्वर । भक्तवत्सला गुरुराया ॥४॥ ‍
माता जरी उपेक्षी बाळासी । तें जाईल कुठें कोणत्या दिशेसी । ऐसा विचार करोनि मानसीं । करीं उद्धार माझा पैं ॥५॥
जरी असें मी बुद्धिहीन । तरी तूं देवा कृपा करोन । सांभाळीं बा मजलागोन । येतों शरण तुजलागीं ॥६॥
जरी मजला जन्म देसी । तरी तूंही येईं अवतारासी । जरी अवतार न घेऊं म्हणसी । तरी मीही जन्म नेघें कधीं ॥७॥
जरी अवतरसी भक्तांसाठीं । तरी मीही जन्मोनि उठाउठीं । न सोडीन तुझी पाठी । निश्चयें ताता गुरुराया ॥८॥
अहा गुरुमूर्ति किती गोमटी । बघतांचि निजवरूपीं मिठी। पडे निश्चयें उठाउठीं । किती वानूं दयाळा ॥९॥
तूंचि वर्णवीं तुझी कीर्ति । ऐकाया उत्सुक श्रोते होती । झणींच करवीं ग्रंथसमाप्ति । देऊनि स्फूर्ति मजलागीं ॥१०॥
आतां ऐका श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । सावकार - पुत्र वांचविला जाण । पांडुरंगाश्रम - गुरुरायें ॥११॥
आणिक बोलूं महिमावर्णन । त्यांचिया कृपाप्रसादेंकरोन । तुम्ही सकलही लक्ष देऊन । परिसा आतां भाविक हो ॥१२॥
सद्गुरुस्वामी यांची कीर्ति । वर्णाया मेदिनी न पुरे निश्चितीं । त्यामाजीं मुख्य जी प्रख्याति । तीचि सांगूं आतां पैं ॥१३॥
सद्गुरु बघती भक्तांचा भाव । आळवितां नुपेक्षिती सर्वथैव । ऐका कथा आतां अपूर्व । सावधचित्तें श्रोते हो ॥१४॥
हल्याळ या ग्रामामाजीं । नामें माने गणपत रामजी । फॉरेस्ट - रेंजर ऐशा काजीं । होता परम भाविक तो ॥१५॥
ऐसें असतां एकेकाळीं । मामलेदार याच्याजवळी । खटला एक चालला त्या स्थळीं । जंगल - खात्याचा परियेसा ॥१६॥
तेव्हां मॅजिस्ट्रेटसाहेब यासी । माने यावरी संशय परियेसीं । म्हणोनि गुन्हेगार त्यासी । ठरविला फॉरेस्टसाहेबें ॥१७॥
त्यापरी तो आपुल्या ठरावीं । माने अपराधी हें लिहूनि ठेवी । तेव्हां त्यासी नोकरी केवीं । देतील सांगा तुम्ही हो ॥१८॥
मग गेलें त्याचें काम । बैसला म्हणत रामराम । चिंताक्रांत होऊनि परम । हळहळे मानसीं बहुतचि ॥१९॥
आतां काय करूं देवा । कवण देवाची करूं सेवा । कवण पोहोंचेल मजसी बरवा । ऐसा तळमळे हृदयांतरीं ॥२०॥
इतुक्यामाजीं आमुचा एक । त्याचा मित्र सारस्वत देख । उभा राहिला त्याच्या सन्मुख । म्हणे काय विचार चालविला ॥२१॥
बघुनी मित्रासी गणपत माने । खिन्न मनेंचि या हो म्हणे । येरु बोले त्याजला त्वरेनें । चिंतातुर बा कां दिससी ॥२२॥
यावरी म्हणे गणपति मित्रासी । काय सांगूं बा रे तुजसी । दुस्तर संकट ओढवलें मजसी । म्हणोनि चिंता वाटे बहु ॥२३॥
माझी नोकरी गेली जाण । काय उपाय करावा येथून । हेंचि न कळे मजलागोन । सांग मित्रा आतां तूं ॥२४॥
तेव्हां बोले सारस्वत । आम्हां मानवां काय कळत । आतां एक सांगतों तुजप्रत । जावें शरण गुरुदेवा ॥२५॥
आमुचे सारस्वत - मठाधीश । पांडुरंगाश्रम - परमहंस । साक्षात् दत्तावतार खास । अवतरला अवनीं या पाहीं ॥२६॥
त्यांसी शरण जातां आपण । सारें संकट होय निवारण । याहुनी उपाय मजला आन । न दिसे जाण निश्र्चयेंसीं ॥२७॥
काय सांगूं आतां तुम्हां । असे अद्भुत त्यांची महिमा । भक्तजनांच्या बहुविध कामा । पुरविती प्रेमानें तात्काळ ॥२८॥
चित्रापुरीं असे वास । तेथें करीं तूं प्रार्थना बहुवस । भवानीशंकरा करीं नवस । महारुद्र अभिषेकाचा ॥२९॥
तोचि तेथील मुख्यदेव । नानापरी करिती उत्सव । ऐसें करितां सद्गुरुराव । तुष्टती बहुत निश्चयेंसीं ॥३०॥
स्वामींसी होतां संतोष । मग काय उणीवता आम्हांस । स्वामींसी प्रिय तें करितां खास । संकटें सारी दुरावती ॥३१॥
असो आतां जाईं शरण । पांडुरंगाश्रम - स्वामींसी जाण । ऊठ झडकरी न लागतां क्षण । ध उशीर न करीं ये वेळे ॥३२॥
ऐकुनी बोले माने गणपती । प्रस्तुत नसे पैसा हातीं । कैसें जाऊं त्या ग्रामाप्रती । भेटाया स्वामी - सद्गुरूतें ॥३३॥
यावरी बोले मित्र सारस्वत । विनंतिपत्र पाठवीं तेथ । आणिक नलगे सायास तुजप्रत । नको जाऊं त्या ठायीं ॥३४॥
इतुकें ऐकतां मित्राचें वचन । लिहिलें पत्र न लागतां क्षण । काय तें ऐका सावधान । श्रोते सज्जन प्रेमानें ॥३५॥
श्रीमत्परमहंस । सगुरुस्वामी पुण्यपुरुष । ऐशा चरणसंनिधीं बहुवस । प्रणिपात माझा दृढभावें ॥३६॥
जय जय देवा भक्तवत्सला । करुणासमुद्रा दीनदयाळा । शरण असे बाळ हा आपुला । रक्षीं रक्षीं जगदीशा ॥३७॥
गुरुराया तुझी कीर्ति ऐकुनी । आलों शरण दृढभावें चरणीं । नाहीं कोणी तुजवांचोनि । संकट माझें हरावया ॥३८॥
साक्षात् दत्तावतार म्हणोनि । ऐकिली कीर्ति आपुली कर्णी । मजला रक्षीं कृपा करोनि । सद्गुरुराया दयानिधे ॥३९॥
मी असें परमसंकटीं । नोकरी गेली माझी मोठी । आली हातीं करवंटी । काय करूं हो ये वेळीं ॥४०॥
तूंचि आतां मज आधार । कवणही रक्षूं न शके साचार । ऐसा माझा निश्चय थोर । खचित देवा गुरुराया ॥४१॥
काय करूं कवणा विचारूं । कोणता देव पोहोंचेल थोरु । ऐसें चिंतितां सारस्वत नरु । अवचित मित्र आला माझा ॥४२॥
त्यासी सांगतां वर्तमान । तो सांगता झाला मजलागोन। आपुलें अद्भुत महिमान । प्रेमळ वचनें हो जाणा ॥४३॥
ऐकतांक्षणीं आपुल्या ठायीं। भक्ति बैसली लवलाहीं । म आतां न सोडूं कदापिही । ऐसे चरण हे देवा ॥४४॥
तारीं अथवा मारीं मजला । परी नि सोडीं चरणकमलां । विशेष काय लिहूं वा तुजला । सर्व विदित तुज गुरुनाथा ॥४५॥
मी असें हा अज्ञ पामर । काय प्रार्थितों तुजला मी नर । न कळे सारासार विचार । देहबुद्धि मज क भारी ॥४६॥
म्हणोनि देवा तूंचि आतां । शिकवीं सारें मजला ताता। अज्ञ म्हणोनि न टाकीं | सर्वथा । आपुल्या बाळालागीं पैं ॥४७॥
असो आतां आपणां नमन । केलें माझें शरीर अर्पण । तव चरणांवरी जाण । भार सर्वही तुजवरीचि ॥४८॥
बालकचिंता मातेसी सहज । तीचि करी प्रेमानें काज । तैसी तूं मम माउली आज । असतां कैंचें भय मजला ॥४९॥
असो आतां आपुलें बालक । गणपत रामजी माने एक । याचा साष्टांग प्रणिपात देख । स्वीकारीं देवा गुरुराया ॥५०॥
यापरी गणपत माने यानें । विनंतिपत्र लिहुनी त्वरेनें । पाठविलें परम प्रीतीनें । असो ऐका पुढें श्रोते हो ॥५१॥
तेव्हां सद्गुरु - पांडुरंगाश्रमें । विनंतिपत्र स्वीकारोनि प्रेमें । केली प्रार्थना मानेच्या नामें । भवानीशंकरासंनिध ॥५२॥
म्हणती प्रभो भवानीशंकरा । नीलकंठा कर्पूरगौरा । उमाधवा करुणाकरा । रक्षीं किंकरा ह्या तुझ्या ॥५३॥
नानापरी केली प्रार्थना । लिहितां होईल विस्तार जाणा । असो मग तो सद्गुरुराणा । पाठवी प्रसाद गणपतीसी ॥५४॥
आणि आज्ञा केली त्यासी । कीं हा प्रसाद तूं परियेसीं । अंगावर धारण करितां तुजसी । होईल गुण निश्र्चयें ॥५५॥
म्हणोनि खटला संपेतोंवरी । धारण करी अंगावरी । भवानीशंकर तुज निर्धारीं । रक्षील तोचि निश्र्चयेंसीं ॥५६॥
ऐसें लिहूनि आशीर्वादपूर्वक । पाठविलें पत्र त्यासी देख । पत्र वाचितां गणपति भाविक । आनंदला चित्तीं बहुतचि ॥५७॥
आणि आज्ञेपरी प्रसाद । अंगावरी धरिला प्रसिद्ध । मग पत्र लिहिलें शुद्ध । इंग्लंड देशीं तात्काळ ॥५८॥
त्याच्यावरील जो अधिकारी । रजा घेऊनि देशांतरीं । इंग्लंडदेशामाझारीं । गेला होता त्या समयीं ॥५९॥
त्यासी लिहिला सकल वृत्तांत । ऐकतां तो आला धांवत । त्याचें नाम 'उड्रॉफ' असत । पुढील गंमत ऐका हो ॥६०॥
बधतां पत्र न लागतां क्षण । हल्याळ - ग्रामीं यई धांवोन । भेटूनि गणपत मानेलागून । सविस्तर वृत्तांत ऐकिला ॥६१॥
तो म्हणे भिऊं नको सर्वथा । करोनि खटपट तुजला आतां । पार घालीन ऐशी चित्ता । लागली हुरहुर माझिया ॥६२॥
म्हणूनि आलों धांवत तेथुनी । न करीं चिंता अणुमात्र मनीं । धरीं विश्वास माझिया वचनीं । नको संशय यामाजीं ॥६३॥
 पहा काय स्वामींची करणी । त्यांची कृपाच जाहली झणीं । यांवरी संशय न धरा मनीं । तुम्ही भाविक श्रोते हो ॥६४॥
तो असे जातीचा म्लेंच्छ । आपुल्या देशाचाही नव्हे साच । कासया धांवला म्हणाल तुम्हीच । गुरुकृपा ऐसेंचि बोलाल ॥६५॥
साक्षात् दत्तावतार म्हणती । यांत संशय नसे चित्तीं । पुढें परिसा सावध अति । वदविती जें गुरुनाथ ॥६६॥
मग 'उड्रॉफ यानें तेथील सारे । कागदपत्र पाहिले नेत्रें । अपराध नाहीं जाणिलें त्वरें । मानेचा यांत अणुमात्र ॥६७॥
मग सरकारामाजीं त्यानें । मानेकडुनी अपील त्वरेनें । करविलें तेव्हां निर्लोभमनें । द्रव्य खर्चोनि आपुलेंचि ॥६८॥
तेव्हां सरकारानें लवलाहीं । कागदपत्रें तपासिलीं पाहीं । मानेचा अपराध अणुमात्र नाहीं । ऐसें ठरविलें त्या समयीं ॥६९॥
आणि पुनरपि त्यासी त्याच्या । जागेवरी नेमिला साचा । मागील पगार सर्वही त्याचा । दिधला तत्काळ त्यालागीं ॥७०॥
शिवाय वरिष्ठ जागा तयासी । दिधली साहेबें अतिप्रेमेंसीं । ही घटना जाहली कैसी । सांगा तुम्ही श्रोते हो ॥७१॥
एक गुरुकृपा झालिया पूर्ण। मग भय कैंचें त्या नरा जाण । असो पुढें ऐका संपूर्ण । कथा सुंदर हो पाहीं ॥७२॥
तेव्हां गणपत माने यासी । कळली स्वामींची महिमा परियेसीं । तत्काळ गेला शिराळी - ग्रामासी । भेटला सद्गुरुस्वामींतें ॥७३॥
आणि भवानीशंकर देवाचें । घेऊनि दर्शन प्रेमळ साचें । स्तवन करोनि, आनंदें त्याचे । भरले नेत्र प्रेमभरें ॥७४॥
माने म्हणे स्वामिराया । तव कृपेची पडतां छाया । काय उणीव निजदासा या । निश्चयें देवा दयाळुवा ॥७५॥
तव कृपाप्रसादें जाण । सारें संकट झालें निवारण । वरील जागा पूर्वींहून । श्रेष्ठ ऐशी दिधली पैं ॥७६॥
आपणचि हें सारें केलें । इंग्लंडाहुनि 'उड्रॉफ' यासी आणिलें । अपील करोनि पुनरपि नेमिलें । कामावरी तेणें मजलागीं ॥७७॥
आणि वरील जागा मजसी । तूंचि दिधली बा परियेसीं । नातरी काय गति कैसी । होत असती माझी हो ॥७८॥
म्हणोनि मी देवा सद्गुरुनाथा । हे चरण कदापि न सोडीं सर्वथा । कृपा करीं मजवरी आतां । तारीं तारीं करुणाळा ॥७९॥
ऐसें प्रार्थूनि घाली लोटांगण । केलें सद्गुरुचरणीं वंदन । स्वामी म्हणती त्यालागोन । ऐक वचन आतां पैं ॥८०॥
हें जग सारें नश्वर । येथील भोगही अनित्य साचार । अज्ञपणें आसक्त होय नर । भुलोनि संसारा या साऱ्या ॥८१॥
जें जें प्रारब्ध असे ज्याचें । तें तें भोगावें आनंदें साचें । तेव्हांचि ब्रह्मपदीं तो नाचे । सत्य सत्य हो बापा ॥८२॥
सारें नश्वर बघतां दृष्टीं । केवीं होईल दुःख पोटीं । सत्य म्हणोनि बघतां, कष्टीं । पडे मन हें निश्र्चयेंसीं ॥८३॥
संकटें येतां होय दुःख । ते हरतां होय निश्र्चयें सुख । पुनरपि कष्ट होतां देख । आणिक दुःख त्या लाभे ॥८४॥
सुखचि पाहिजे सर्वांलागून । दुःखाची इच्छा न करी कवण । परी प्रारब्ध म्हणे आपण । सुखदुःख घ्या दोन्ही ॥८५॥
विचार करितां दोन्ही नश्वर । एकही न राहतसे स्थिर । ब्रह्म एक सत्य हा निर्धार । नसे अणुमात्र संशय येथ ॥८६॥
आतां म्हणसी आम्हां सर्वथा । ब्रह्म हें न कळे चित्ता । जग हेंचि सत्य ताता । दिसे आम्हांलागीं पैं ॥८७॥
तरी ऐक सांगतों आतां । निष्कामें भजावें देवा गुरुनाथा । तरीच समजेल सर्वही चित्ता । सत्य ब्रह्मचि हें पाहीं ॥८८॥
सारें जग हें मिथ्या समजोनी । त्याग करीं बा त्याचा तूं झणीं । त्याग म्हणतां जाशील भिउनी । नको भिऊं तूं अणुमात्र ॥८९॥
नको सोडूं दारा-सुत - धन। न सोडीं कधीही नोकरी जाण । करीं प्रपंच सुखेंकरोन । परी सर्वही अनित्य पहा ॥९०॥
जरी न येई मिथ्या दृष्टी । तरीही धरीं निश्चय पोटीं । कीं सद्गुरु ज्या सांगती गोष्टी । न होती खोट्या कदापि त्या ॥९१॥
ऐसें करितां करितां सहज । येईल अंगीं विचार तो तुज । विचारेंचि सर्वही आज । झाले ब्रह्मज्ञानी बा ॥९२॥
म्हणोनि सद्गुरुचरणीं एक । दृढ विश्वास धरितां देख । समाधान होय निश्चयात्मक । सत्य वचन हें आमुचें ॥९३॥
सद्गुरुसंनिध मागावें हेंचि । निजसुख देईं म्हणोनि त्यांची । सदा प्रार्थना करावी साची । अन्य कामना त्यागोनि ॥९४॥
मनुष्यजन्म असे दुर्लभ । येथेंचि करावा परमार्थ लगबग । दाविती सद्गुरु मार्ग सुलभ । जावें आपण त्या पंथें ॥९५॥
बहु न पडे सायास तुजप्रति । जें जें दिसे भासे चित्तीं । तें तें मिथ्या समजोनि निश्चितीं । स्वीकारीं रक्षणापुरतें तूं ॥९६॥
न होतां विषयीं आसक्त । भोजनादि व्यापार समस्त । करीं तूं देहसंरक्षणार्थ । अन्य व्यवसाय तूं त्यागीं ॥९७॥
स्वधर्मापरी करावें वर्तन । परनिंदा न करीं जाण । परधन परदारा यांसी दुरोन । बघतां पळोन जाईं झणीं ॥९८॥
ऐसियापरी परमबोध । केला स्वामींनीं नानाविध । ऐकतां चित्तीं झाला आनंद । गणपत माने यासी पैं ॥९९॥
मानूनि आभार श्रीस्वामींचे । ठेविलें मस्तक चरणीं साचें । म्हणे देवा निश्र्चयें आमुचें । भाग्य उदेलें आजि खरें ॥१००॥
म्हणोनि ऐसे चरण लाभले । तेणेंचि होय आमुचें भलें । कृपा करीं बा ये वेळे । बालकावरी गुरुराया ॥१०१॥
ऐसें करूनि त्यानें स्तवन । करविलें प्रेमानें स्वामींचें पूजन । भवानीशंकर देवासी जाण । महारुद्र अभिषेक करविला ॥१०२॥
यापरी करूनि सेवा सर्व । ठेवुनी स्वामींवरी भाव । सुखानें घेत त्यांचें नांव । गेला आपुल्या ग्रामासी ॥१०३॥
धरिली मनीं सद्गुरुमूर्ति । दरवर्षीं तो शिरालीप्रती । जाई रथोत्सवासी निश्चिती । या करवी सेवा प्रेमानें ॥१०४॥
असो ऐसी सद्गुरुमूर्ति । पहा कैसी पसरली कीर्ति । भजती त्यांसी सर्वही जाति । ब्राह्मणादि समस्तही ॥१०५॥
पुढील अध्यायीं आणिक कथन । श्रीस्वामींचें महिमान । मज नसे ज्ञानाज्ञान । कर्ता करविता तोचि पैं ॥१०६॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें पंचत्रिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१०७॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां मोह निरसेल समग्र । पंचत्रिंशाध्याय रसाळ हा ॥१०८॥
अध्याय ३५ ॥
ओंव्या १०८ ॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥

॥ इति पंचत्रिंशाऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP